Thursday, 16 March 2023

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत

 इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यासलगेचच उपचार करून घ्यावेत


- सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत.

            मुंबई, दि. १५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावेत अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.


            एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.


            मंत्री सावंत म्हणाले, एच३एन२फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. उदा. एच१ एन १ एच३एन२ इ. या आजाराची सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्यात येतात. १३ मार्च २०२३ अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.


            राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणे तसेच उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांवर आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत असून आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.


०००




 

Wednesday, 15 March 2023

चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार

 चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी

कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करणार.


                                                - मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 15 : चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्राचा कृती आराखडा चंद्रपूर महानगरपालिकेने तयार केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


            येत्या रविवारी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात चंद्रपूर शहराच्या विषयावर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.


            विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोळसा वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण खूप होते. त्यामुळे बंदिस्त कंटेनरमधून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याशिवाय चंद्रपूर शहराच्या लगत एमआयडीसी, सिमेंट कारखाने आणि इतर औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्रांचा एकत्रित कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


            या चर्चेत सदस्य सचिन अहिर आणि सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला. 

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच भरणार

 अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच भरणार


                                         - मंत्री गुलाबराव पाटील

            मुंबई, दि. 15 : अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक होऊन शासकीय अधिकारी,कर्मचारी अनेक वर्षे कार्यरत होते. मात्र जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना अधिसंख्य पदावर नेमण्यात आले आहे. या नेमणुकीनंतर रिक्त झालेल्या जागा लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

            राज्यातील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना अधिसंख्य पदाचा पदभार दिल्यासंबंधी सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, राज्यातील अनुसूचित जमातीच्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.यावेळी सदस्य विक्रम काळे, जयंत पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची सुधारणासह स्वच्छता करणार

 बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची

सुधारणासह स्वच्छता करणार


                                                 - मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.


            विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, एस. टी.च्या वाहक आणि चालकांना रात्री बस मुक्कामी गेल्यानंतर तेथे विश्रांतीसाठी असणारी सुविधा अतिशय अपुरी आहे, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील आणि तातडीने तिथे सुधारणा करण्यात येईल.


            सध्याच्या परिस्थितीत वाहक आणि चालकांना मिळणाऱ्या रात्रीच्या वस्ती भत्त्यात सन 2018 मध्ये वाढ करण्यात आली आहे. गावपातळीवर 75 रुपये, जिल्हा पातळीवर 90 रुपये आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात रात्रीचा वस्ती भत्ता 100 रुपये इतका देण्यात येत आहे. अधिकृत संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा करून त्यात जसे ठरेल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            सध्या एस. टी.च्या वतीने 75 वर्षे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत, महिलांना बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बसस्थानकांचे नूतनीकरण करताना त्याठिकाणी चालक आणि वाहक यांना निवासाची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            विविध विभागांकडून एस. टी.ला विविध सवलतीपोटी देण्यात येणारी रक्कम वेळेत मिळण्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांच्यासह श्रीमती मनीषा कायंदे, श्रीमती उमा खापरे यांनी सहभाग घेतला.

पर्यटन स्थळ

 मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद;जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार


                                       - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि 15 :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.


       सदस्य दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तसेच मालोजी राजेंच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारण्यात यावे, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री. लोढा बोलत होते. 


       मंत्री श्री. लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील भुईकोट किल्ला महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाच्या नोदींत मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव, वेस यांचे पुनरुज्जीवन करुन या कचेरीच्या जागेतच मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात येईल. मालोजीराजेंच्या पादुकांसाठीही दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारुन त्यांचे जीवन चरित्र महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करेल.


       मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. तसेच येत्या 2 महिन्यांच्या आत ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणची, वास्तूची देखभाल ज्या विभागाकडे असेल त्यांच्या समन्वयाने तेथील अतिक्रमणे काढण्यात येतील. यासाठी लवकरच पर्यटन, सांस्कृतिक कार्य, महसूल आणि गृह विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल

 कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल

                                                                                  - बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे.

            मुंबई, दि. 15 : गडचिरोली येथील सुरजागड येथील गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लांन्टची प्रत्यक्ष पाहणी संबंधित विधानसभा सदस्य यांच्यासह करण्यात येईल असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.


       विधानसभा सदस्य सुनिल केदार, सुभाष धोटे यांनी कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


       श्री. भुसे म्हणाले की, सदर कंपनीच्या नावाने वाटप करण्यात आलेल्या कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलण्यात आल्याचे नुकसान झाले असल्याची बाब खरी नाही. मात्र संबंधित विधानसभा सदस्य यांना या प्लान्टबाबत काही शंका असलयास या प्लान्टची संयुक्त पाहणी करण्यात येईल.

ट्रान्सफॉमर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणा

 ट्रान्सफॉमर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार

                     - ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 15 : नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉमर्स तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.


       विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, संजय कुटे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, प्राजक्त तनपुरे यांनी विजपुरवठया अभावी पीकांचे होत असलेले नुकसान याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


       श्री. फडणवीस म्हणाले की, येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हयात ट्रान्सफॉमर्सचा पूल तयार करण्यात येईल. आज प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरवर लोड आल्याने ट्रान्सफॉर्मर जळत आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ट्रान्सफॉर्मरसाठी रिप्लेस आणि रिपेअर असे धोरण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात व्हेंडर बेस निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मदत घेण्यात येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत नुकतीच एक प्रीबीड बैठक झाली आहे.दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने काही वेगळे उपाय करता येतील का, याबाबतही विचार करण्यात येत आहे.


       शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन 2025 पर्यंत 50 टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. राज्यात सध्या 15 लाख 23 हजार 426 ग्राहकांनी आतापर्यंत एकही वीज देयक गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये भरलेले नाही. त्यांना थकीत देयके भरा अशा सूचना नाहीत तर चालू बील भरण्यासाठी विनंती करण्यात आली आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


       रब्बी हंगामात कृषी वाहिन्यांमधील भार वाढून महत्तम मागणीच्या कालावधीत काही वेळेसाठी सदर वाहिन्या अतिभारीत होतात आणि तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होतो. सदर तांत्रिक बिघाड दूर करुन, नादुरुस्त रोहित्र बदली करुन वीज पुरवठा कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्यात येतो. अजंग उपकेंद्राची स्थापित क्षमता 10 एमव्हीए असून तेथील अतिभारीत वाहिन्यांवरील भार कमी होण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS)अंतर्गत अतिरिक्त 5 एमव्हीए क्षमतेचे ऊर्जा रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi