Tuesday, 14 March 2023

राज्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण

 राज्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण

 - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. १३ :- राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे तडवळ येथे अवैध पद्धतीने स्टोन क्रशर सुरु असून या माध्यमातून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही माहिती दिली.


            राज्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशाला आळा घालण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत असतात. परंतु, असे असतानाही राज्यात नियमबाह्य उत्खनन होत असेल आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


             पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करुन स्टोन क्रशर चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.


             या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.


००००

Monday, 13 March 2023

राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार.

 राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता

जन-सुविधा केंद्राची उभारणी करणार.


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. १३ : "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” कार्यक्रमांतर्गत राज्यातील ३४ किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांकरीता जन-सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या जनसुविधा केंद्रात पुरुष-महिला स्वच्छतागृह, शिशू काळजी केंद्र, अल्पोपहार केंद्र इत्यादी सोयीसुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत सदस्य संग्राम थोपटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील ३८७ स्मारकांच्या ठिकाणी क्यूआर कोडसह त्या-त्या स्मारकाची पूर्ण माहिती असणारे फलक लावण्यात येणार आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना त्या स्मारकाची माहिती मिळेल. गड किल्ल्याचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पावित्र्य भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर स्मारकांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांची माहिती सांगणाऱ्यांना बक्षीस देखील देण्यात येणार आहे.


            केंद्र संरक्षित शिवनेरी, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांसाठी सर्वंकष स्थळ विकास आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी राज्य शासनामार्फत सादर करण्यात आला आहे. किल्ल्यांच्या ठिकाणी राज्य पुरातत्व विभागास जतन व संवर्धनाचे काम तसेच पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करण्यास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.येत्या काळात महावारसा योजना राबविण्यात येणार असून सामाजिक उत्तरदायित्व निधी, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे मत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर ,सुभाष धोटे यांनी सहभाग घेतला.

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

 सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि.१३ : राज्यात सायबर सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत सदस्य जयकुमार रावल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, धुळे शहरात मोबाईल वरून शहरातील मुलींचे छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.


            छुप्या पध्दतीने छायाचित्रे काढण्याविषयी तसेच इतर विविध गुन्ह्यांविषयी सायबर कायदे जुने असून माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्याची सूचना केंद्राला पाठविण्यात येणार आहे.राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


            या चर्चेत सदस्य रईस शेख, प्रा.वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणपनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमी रस्त्याचेकाम युध्दपातळीवर पूर्ण करावे

 मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणपनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमी रस्त्याचेकाम युध्दपातळीवर पूर्ण करावे


-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

            मुंबई, दि. १३ : मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या कॉक्रीटीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उदिृष्ट्य आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरु आहे. त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.


            मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते, तर आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदी लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.


            मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या सुमारे ४२ किलोमीटरच्या महामार्गावरील एका मार्गिकेचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच याच महामार्गावरील दुसऱ्यामार्गिकेच्या रस्त्यावरील खड्डे लवकरच भरण्यात येतील. या रस्त्याचे पॅचवर्क तसेच आवश्यक काँक्रिटीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.चव्हाण यांनी दिले.


            मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत कामे लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर कामे करण्यात येतील. नॅशनल हायवे ऑथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी दिल्या. तसेच जे काम अपूर्ण राहिले आहे, त्या सर्व कामाची प्रगती पाहण्याच्या दृष्टीने या कामाचे चित्रीकरण ड्रोनच्या साहाय्याने करण्याचे निर्देशही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले.


            मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट्स आहेत, ते काम पावासाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे शिल्लक काम हे नियमित कंत्राटदारांकडून करण्यात येईल. अन्य छोटी-छोटी कामे ही अन्य ठेकेदारांकडून पूर्ण करुन घेण्यात येतील. या महामार्गावर प्रवास करणा-यांना त्रास होऊ नये व त्यांचा प्रवास सुखकर होईल यादृष्टीने काम करण्याच्या सुचनाही यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी दिल्या.


            पऱशुराम घाटाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा घाट किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चेळणीचा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल.तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे. ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिका-यांना देण्यात येतील, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.


००००

जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने

 जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र

            मुंबई दि 13:- जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले.


            यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी श्री महेश कुलकर्णी, श्री रोहित जोगळेकर, श्री राजप्रसाद इनामदार, श्री नरेंद्र पुराणिक व मान्यवर उपस्थित होते.


            जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्री समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील चोरीस गेलेल्या मूर्तींच्या तपासाकामी वेळोवेळी पाठपुरावा करून मूर्तींच्या शोधकार्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल तसेच विशेष प्रयत्नाने चोरीचा तपास जलद गतीने पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संस्थानच्या वतीने कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थानच्या वतीनेही यावेळी आभार मानण्यात आले.


हा तमाम पोलीस बंधू-भगिनींचा हृद्य गौरव


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            हा केवळ माझा नाही, तर माझ्या तमाम पोलीस बंधू-भगिनींचा हृद्य सत्कार आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.


            श्री.भूषण स्वामी म्हणाले की, जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील शेकडो वर्षांपासून चालत आलेली श्री रामोपासना आणि सूर्योपासना आजही अविरतपणे याठिकाणी सुरू आहे. अशा मंदिरातील मूर्ती पुन्हा जांबसमर्थ येथे संस्थापित होणे, ही महाराष्ट्रातील सर्व भक्ती सांप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भक्तांच्या मनातील हा अभिमान जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य याव्दारे घडले आहे. रामदासी सांप्रदायाचा अमूल्य ठेवा जांबसमर्थमध्ये पुन्हा संस्थापित झाला असल्याने सर्व श्रीरामभक्त, समर्थभक्त आणि रामदासी सांप्रदायिक परिवार अत्यंत कृतज्ञतापूर्वक ऋणी असल्याचे भूषण स्वामी यांनी सांगितले.


-----000---





कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

 कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक


जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणारनिवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित,


सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा - मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन


            मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहित कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.


            विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


       मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. लोकप्रतिनीधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीच्या मागे जे तत्व आहे त्या विरोधात सरकार नाही. यातून मार्ग काढण्याची मानसिकता सरकारची आहे. अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांची सामाजिक सुरक्षा जोपासण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल. यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची समिती नेमली जाईल. ही समिती कालबद्धरित्या अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ज्या राज्यांनी ही जुनी निवृत्ती योजना लागू केली आहे, त्याबाबत त्यांचा रोडमॅप अद्यापही तयार नाही. या योजनेबाबत राज्य शासन जे धोरण स्विकारेल त्यात याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही. कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. यावेळी श्री.काटकर यांनी संपाबाबत आणि जुन्या निवृत्ती योजनेबाबत मुद्दे मांडले.

लक्षवेधी मास मिडिया प्राय लि.

 







Featured post

Lakshvedhi