Thursday, 9 March 2023

सर्व जिल्ह्यात महिला बचतगटांसाठी बाजार सुरू करण्यात येणार

 सर्व जिल्ह्यात महिला बचतगटांसाठी बाजार सुरू करण्यात येणार


— महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            एका वर्षाच्या आत राज्यातील सर्व जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी मोफत 15 दिवस जागा देवून बाजार सुरू करण्यात येणार आहे. तसेच सर्व सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून 50 टक्के रक्कम महिलांच्या सोयीसुविधांसाठी वापरण्यात येणार असून राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


            राज्यात राबविण्यात येणाऱ्या महिला धोरणांची अंमलबजावणी करून त्याचा आढावा प्रत्येक वर्षी अधिवेशनात घेण्यात येणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. लवकरच महिला टुरिस्ट पॉलिसी राबविण्यात येणार आहे. आजच राज्यात 200 कोटी रुपयांच्या बीजभांडवल योजनेचे राज्यपाल महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कंटेनर अंगणवाडी सुरू करण्यात आली आहे. तसेच चालते फिरते सुविधा केंद्र, महिला जीम, महिला अभ्यासिका, महिला स्किल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अशा अनेकविध योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले.


            मंत्री श्री लोढा म्हणाले, महिलांच्या सर्व समस्या एकदाच सुटणार नाहीत. विधानसभेत सर्व महिला आणि पुरुष सदस्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. सभागृहात सर्व सूचनां विचारात घेतल्या आहेत. यावर अधिवेशन कालावधीत महिला सदस्या तसेच विरोधी पक्ष नेते यांच्यासोबत सविस्तर बैठक घेवून सर्व सुचनांचा सकारात्मक विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदस्यांच्या सुचनासांठी सरकार संवेदनशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या सूचनांचा महिला धोरणात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.


            आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने मंत्री श्री लोढा यांनी सर्व महिला सदस्यांना शुभेच्छा दिल्या.


            जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रस्तावावरील चर्चेत सदस्य यामिनी जाधव, सुलभा खोडके, माधुरी मिसाळ, सरोज आहिरे, गीता जैन, प्रतिभा धानोरकर, देवयानी फरांदे, सदस्य अबू आजमी, ऋतूजा लटके, अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. भारती लव्हेकर, मंजूळा गावित, अदिती तटकरे, लता सोनवणे, प्रणिती शिंदे, मंदा म्हात्रे, वर्षा गायकवाड, मनीषा चौधरी, श्वेता महाले,सीमा हिरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, भास्कर जाधव, ज्ञानराज चौगुले, हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, आशिष शेलार, चेतन तुपे आदीनीं सहभाग घेतला.


००००

बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठीमहानगरपालिका आणणार प्रमाणित कार्यपद्धती

 बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठीमहानगरपालिका आणणार प्रमाणित कार्यपद्धती


मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी


आढावा बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचे निर्देश


            मुंबई, दि. 8 : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांसह प्रस्तावित कामांना देखील गती द्यावी, विशेषतः बांधकामे आणि पाडकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीच्या नियंत्रणासाठी महानगरपालिकेची प्रमाणित कार्यपद्धती लवकरात लवकर तयार करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिले.


            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आज महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.


            उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, विशेष कार्य अधिकारी सुनील सरदार यांच्यासह विकास व नियोजन, रस्ते व वाहतूक, यांत्रिकी व विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बेस्ट उपक्रम इत्यादी खात्यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.


            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाने यापूर्वीच दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तथापि अलीकडील हवा प्रदूषण नियंत्रणाची गरज लक्षात घेता अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नव्याने काही बाबी समाविष्ट केल्या आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्वच बाबींचा एकंदरीत आढावा या बैठकीत घेण्यात आला.


            बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले की, हवेचा गुणवत्ता स्तर खालावण्याचे स्थितीतील प्रमुख कारण्यांपैकी एक कारण धूळ हे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धूळ नियंत्रणाची कार्यवाही होत असली तरी मुंबई महानगराचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि गरज लक्षात घेता मुंबई महानगरासाठी महानगरपालिका प्रशासनाची स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांच्या अधीन राहून मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रण संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तातडीने निश्चित करावी. तसेच याच अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनातील सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी व सर्व संबंधित भागधारक घटकांची पुढील आठवड्यात कार्यशाळा आयोजित करून धूळ नियंत्रणाची कामे तातडीने मार्गी लागतील असे पहावे, असे निर्देश डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत.


            मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम उपनगरांकरिता गोराई येथे आणि शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता नवी मुंबईमध्ये प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रिया केंद्रांची मिळून एकूण क्षमता १,२०० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी राहणार असून त्यासंदर्भातील कार्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.


            त्याचप्रमाणे, रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याच धर्तीवर आता नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक झाडू द्वारे दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटर अधिकच्या रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांवर व वाहतूक चौकात पाणी फवारणी करून स्वच्छता करू शकणारे ५० संयंत्र तर सूक्ष्म पद्धतीने पाणी फवारणी करणारे ५० संयंत्र असे एकूण १०० वाहन आरूढ १०० संयंत्र खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हवा शुद्धिकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही देखील सुरु आहे. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारली जाणार असून त्याबाबतची कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने धोरण २०२१ नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वापरासाठी ३५ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत विविध प्राधिकरणामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आतापर्यंत ४८६ चार्जिंग स्टेशन उभारली गेली आहेत. महानगरपालिकेच्या वतीने आणखी २५ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग सुविधा उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम अंतर्गत सुमारे २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर बसेस तर ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देऊन प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, शासनाच्या सूचनेनुसार जुनी वापरात असलेली डिझेलवर धावणारी वाहने सीएनजी मध्ये रूपांतरित करून घेण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ६५२ वाहतूक दिवे चौक (ट्रॅफिक सिग्नल जंक्शन) पैकी आतापर्यंत २५८ वाहतूक दिवे चौक हे स्वयंचलित पद्धतीने कार्यरत करण्यात आले आहेत. उर्वरित वाहतूक दिवे चौक देखील टप्प्याटप्प्याने स्वयंचलित यंत्रणेवर कार्यरत करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून २०२३ पर्यंत त्यांच्याकडून अहवाल येणे अपेक्षित आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.


            घनकचऱ्यातून उद्भवणाऱ्या हवा प्रदूषणाविषयी देखील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी संपूर्ण आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने देवनार क्षेपणाभूमी येथे ६०० टन प्रतिदिन घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याद्वारे ४ मेगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी कार्यादेश देण्यात आले असून या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ऑक्टोबर २०२५ मध्ये तो कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने ओशिवरा, धारावी आणि मालाड येथे प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आणखी आठ ठिकाणी अशा स्वरूपाचे केंद्र सुरू करण्यात येणार असून या नवीन आठ केंद्राद्वारे प्रत्येकी दररोज सुमारे ४ टन म्हणजे दररोज एकूण ३२ टन घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या नवीन केंद्रासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी नमूद केले.


            मुंबई महानगरातील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ११ ठिकाणी तर भारतीय हवामान खात्याकडून 'सफर' अंतर्गत ९ ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आता शिवडी, गोवंडी, पंतनगर (घाटकोपर), भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि चारकोप (कांदिवली) अशा पाच ठिकाणी हवा गुणवत्ता संनियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. सदर पाचही केंद्र दिनांक १५ मे २०२३ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.


***



विविध क्षेत्रात अग्रेसर महिलांचा अभिमान




 विविध क्षेत्रात अग्रेसर महिलांचा अभिमान

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पर्यटन विभाग व इंडियन ऑइलतर्फे प्रकाश व ध्वनी कार्यक्रम संपन्न


            मुंबई, दि. 8 : सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑइलच्या संयुक्त विद्यमाने आज रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित विशेष मल्टी मीडिया प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जी 20 महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, विपणन संचालक व्ही. सतीशकुमार, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, संचालक डॉ.बी. एन. पाटील, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात.त्यामागे त्यांचा त्याग असतो. महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सहकार्याने राज्यात विकास योजना राबविण्यात येत आहेत. अलिकडेच केंद्रीय नगरविकास विभागातर्फे १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.


            केंद्रीय मंत्री श्री. पुरी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम अतुलनीय आहे. हा पराक्रम प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र ही कर्तृत्ववान महिलांची भूमी आहे. महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरण, स्वावलंबन आणि स्त्रियांचा सन्मान ही नवीन भारताची ओळख आहे. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित देश म्हणून घडवायचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रातील महिलांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पुरेचा, इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्री. वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. मंत्री श्री. लोढा यांनी आभार मानले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०१३- १४, सन २०१४- १५, सन २०१५- १६, २०१६- १७, २०१७- १८ या कालावधीतील राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये सौ. नूरजहाँ बेगम हमीद अब्दुल हमीद पांडे (जि. वाशीम), सौ. वासंती संपतराव महामुलकर (जि. सातारा). सौ. हर्षदा विद्याधर काकडे (जि. अहमदनगर), श्रीमती वनमाला परशुराम पेंढारकर (जि. वाशीम), शोभा गुंडप्पा पारशेट्टी (जि. लातूर) यांचा समावेश होता. कोकण विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था अशा : श्री सद्गगुरू सदन वाचनालय व अभ्यासिका, घाटकोपर, मुंबई. वनवासी विकास सेवा संघ, उसरोली, मुरुड, जि. रायगड. सहेली ग्रुप, राधाकृष्ण सहनिवास, वडनाका बापटआळी, चिपळूण, जि. रत्नागिरी, आश्रय सोशल फाऊंडेशन पनवेल, जि. रायगड.


०००००

जिवन गाणे













 

नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या पदांना व आकृतिबंधाला मान्यता लवकरच पदभरती

 नवी मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाच्या पदांना

व आकृतिबंधाला मान्यता लवकरच पदभरती


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई दि. ८ : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली असून, प्राथमिक शिक्षकांची ३७२ पदे व माध्यमिक शिक्षकांचीही पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येणार आहेत. तोपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.


            नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नेमणूक करून शिक्षकांची भरती करण्याबाबत सदस्य रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, “शिक्षण विभागातील २९ प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाकरिता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व शिक्षण विभागाच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांची पदे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर भरण्यात येतील” असेही त्यांनी यावेळी सांगितले.


०००

महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावरुनभारक्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

 महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावरुनभारक्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई


- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 8 : पिंपळखुटी येथील महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावर नियमित ८ मोटार वाहननिरीक्षक त्यांच्या वेळेत कार्यरत असतात. तसेच वाहनांची तपासणी नियमित केली जात असल्याची माहिती बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेत दिले.


       पिंपळखुटी ता.केळापूर, जिल्हा यवतमाळ येथे वाहनचालकांची आर्थिक लूट करणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य डॉ.वजाहत मिर्झा यांनी उपस्थित केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. भुसे बोलत होते.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, पिंपळखुटी येथील महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यावर नियमित ८ मोटार वाहन निरीक्षक येथे वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कार्यरत असतात. या सीमा तपासणी नाक्यावर संगणकीकृत वजन काटे बसविण्यात आले आहेत. वाहनांची तपासणी करून अतिभार असणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. एप्रिल २०२०-२१ मध्ये ५२,१७९ वाहने एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ मध्ये ६६,८४८ दोषी वाहने आढळली आहेत. एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये ८२,४३३ वाहने दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भार क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२०- मार्च २१ मध्ये २१७५, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२- २१०७ एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३-१२८९ वाहने दोषी आढळली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सदस्यांनी त्यांच्याकडे असलेल्या व्हिडीओ क्लिप उपलब्ध करून दिल्यास त्याची चौकशी करण्यात येईल व दोषी आढळल्यास संबधितावर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


              यावेळी विधान परिषद सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे, रामदास आंबटकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

सर ज. जी. कला महाविद्यालयामध्ये १४ मार्चपासून कला प्रदर्शनाचे आयोजन.

 सर ज. जी. कला महाविद्यालयामध्ये १४ मार्चपासून

 कला प्रदर्शनाचे आयोजन.

            मुंबई, दि. ८ : सर ज. जी. कला महाविद्यालयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीचे पेंटिंग, मातीकाम, धातूकाम, अंतर्गत गृह सजावट, शिल्पकला, वस्त्रसंकल्प व कला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात तयार केलेल्या कलाकृतींमधील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन १४ ते २१ मर्च २०२३ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संस्थेच्या कला दालनामध्ये भरविण्यात येणार असून ते रसिकांना पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे, असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. वि. डों. साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


            यानिमित्त १६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. कला प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. साबळे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi