Thursday, 9 March 2023

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेणार

 कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर

निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेणार


- उद्योगमंत्री उदय सामंत.

            मुंबई, दि. 8 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती.


            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.


0000

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक

 नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या

 मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक


- उद्योगमंत्री उदय सामंत.

            मुंबई दि. 8 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी करार व कंत्राटी पद्धतीवर आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून अधिवेशन काळात याबाबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून कायम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात पाच वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे शक्य नसल्याने सध्या कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मानधन वाढीबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

दर्जेदार, आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन

 दर्जेदार, आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन

- सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 08 : समाजाला विषारी विचारांपासून वाचविण्याची जबाबदारी चित्रपटसृष्टीची आहे, दर्जेदार आणि आशयघन चित्रपट निर्मितीतून चित्रपटसृष्टीने ती पूर्ण करावी. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            आज मंत्रालयात दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेंतर्गत 41 मराठी चित्रपटांना 12 कोटी 71 लाख रुपये अनुदान वाटपाचा कार्यक्रम मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह प्रसिद्ध चित्रपट कलावंत जॅकी श्रॉफ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


            याप्रसंगी श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले कि, मराठी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आणि पोषण निर्णय घेतले जात असून दर्जेदार आणि आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य सरकार चित्रपटांच्या निर्मितीला बळ देण्यासाठी पाठीशी उभे आहे. राज्यात जास्तीत जास्त चित्रपट तयार व्हावेत आणि ते चित्रपटगृहांमध्ये उत्तम चालावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यादृष्टीने राज्यातील नाट्यगृहे ही नाट्यचित्र मंदिर करता येतील का आणि तेथे दिवसभराच्या वेळेत चित्रपट प्रसारित करता येतील का, याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


            सध्या आपण राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय घेत आहोत. चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान ३ महिन्याच्या आत देण्याची सूचना विभागाला केली आहे. अधिकाधिक आशयसंपन्न चित्रपट निर्मिती मराठीमधून व्हावी, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीचा विकास त्यादृष्टीने आपण करत आहोत, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. मागील दोन महिन्यापूर्वी 15 सदस्यांची चित्रपट परीक्षण समिती राज्य शासनाने गठीत केली. चित्रपट क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञ मंडळींचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे पारदर्शी पद्धतीने जलदगतीने चित्रपटांचे परीक्षण होऊन अनुदान पात्र चित्रपटांना अनुदानाची कार्यवाही पूर्ण होईल, असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी श्री.श्रॉफ यांनी मराठीमध्ये अनेक गुणी कलाकार असून मराठी मध्ये दर्जेदार चित्रपटनिर्मिती होत असल्याचे सांगितले.


            प्रधान सचिव श्री. खारगे यांनी मराठी भाषेत अधिकाधिक अ वर्ग दर्जाचे चित्रपट तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचे काम चित्रपट निर्मात्यांसोबतच राज्य शासन करणार असल्याचे ते म्हणाले.


            महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने श्रीरंग गोडबोले, प्रमोद पवार आणि संतोष पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वच निर्मात्यांनी त्यांच्या मनोगतातून अनुदान वाटपाच्या केलेल्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाचे आभार मानले.


            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते चित्रपट निर्मात्यांना अनुदान वाटप करण्यात आले. यामध्ये ०४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ०४ (मुरंबा, बंदीशाळा,पितृऋण,भोंगा) चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. खैरे यांनी आभार मानले.


*चौकट*


            शिवराज्याभिषेकाच्या अर्धत्रिशतसांवत्सरिक महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही आपल्या सूचना द्याव्या असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार

 खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 8 : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते जालना हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय कुटे, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.


            या प्रकल्पाबाबतचा विकास आराखडा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाने या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्यानंतर राज्याच्या हिस्स्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.



नाशिक महानगरपालिकेच्या भूमापन प्रक्रियेत मातंग समाजाच्याजागेसंदर्भातील बदलाबाबत लवकरच निर्णय

 नाशिक महानगरपालिकेच्या भूमापन प्रक्रियेत मातंग समाजाच्याजागेसंदर्भातील बदलाबाबत लवकरच निर्णय


- उद्योगमंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील सर्व्हे नंबर 491 (फायनल भूमापन क्रमांक 251) नगर रचना योजना भाग - एक ही जागा अनेक वर्षापासून मातंग समाजाची होती. या जागेचा सातबारा देखील या समाजबांधवांच्या नावावर होता. परंतु भूमापन प्रक्रियेत बदल झाल्याचे निदर्शनास आल्याने यात अंशत: बदल करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            श्री. सामंत म्हणाले, या जागेच्या आरक्षणात झालेला बदलाबाबत लवकरच निर्णय घेऊन ही जागा मातंग समाजाच्या नावावर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.



महिला दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान.

 महिला दिनानिमित्त विधानभवन प्रांगणात महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान.

            मुंबई, दि. 8 :- आज सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत महिला पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणी चोख कर्तव्य बजावत असतात. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या प्राधान्याने पुर्ण केल्या जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जागतिक महिला दिनानिमित्त विधीमंडळातील प्रांगणात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीसांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


            आगामी अर्थसंकल्पात देखील राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असून महिला पोलीसांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानकात हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. फडणवीस यांनीही महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तृत्वाबाबत गौरवोद्गार काढले.


            यावेळी उपस्थित महिला पोलीस अधिकारी यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


****

राज्यातील सर्व निवासी, वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष

 राज्यातील सर्व निवासी, वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 8 : राज्यात यापुढे बांधण्यात येणाऱ्या निवासी आणि वाणिज्य इमारतींमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून, त्या जागेचा एफएसआय मोजण्यात येणार नाही. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सांगितले. 


            मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नवीन रस्ते बांधतांना नियमानुसार प्रत्येक ५० किमी अंतरावर शौचालय बांधण्यात येईल. तसेच महिला आयोग आणि महिलांशी संबंधित शासकीय कार्यालयांच्या इमारतींसाठी सुसज्ज जागा देण्याबरोबरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. मुंबईच्या दोन्ही फ्री वे वर महिला शौचालय बांधण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            विधानमंडळात महिलांसाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व सुविधा पुरविण्यात येतील. हा कक्ष याच अधिवेशन कालावधीत सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच मंत्रालयातदेखील विधिमंडळाच्या महिला सदस्यांसाठी एक विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi