Wednesday, 22 February 2023

दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रीमंडळ व शासनाच्या इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.

 दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रीमंडळ व शासनाच्या इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती.

            मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात गेल्या आठवड्याभरातील शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.


            वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी मंत्रीमंडळ निर्णयांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.



लोणी (जि. अहमदनगर) येथे आजपासून २ दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन

 लोणी (जि. अहमदनगर) येथे आजपासून २ दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन


महसूल विभागाचे लोकाभिमुख, सर्वसमावेशक धोरण निश्चित करणार


– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती


            लोणी दि. 21 : जनतेची कामे पारदर्शकरित्या आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून महसूल विभागाचे लोकाभिमुख व सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी लोणी (जि. अहमदनगर) येथे महसूल विभागाच्यावतीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. २२ फेबुवारी आणि २३ फेब्रवारी २०२३ ला हे अधिवेशन होणार असल्या‍ची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील पत्रकार परिषदेत दिली.


            यंदा प्रथमच ही परिषद लोणीसारख्या ग्रामीण भागात होत आहे. यामध्ये राज्यातील पाच विभागांचे अप्पर मुख्य सचिव, दोन विभागांचे प्रधान सचिव, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानि‍रीक्षक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरिक्षक, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक उपस्थित राहणार असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले. राज्याच्या प्रगतीचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी परिषद महत्त्वपूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी ठरेल असा विश्वास महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी व्यक्त केला.


            या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या २२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता होणार असून, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप सोहळा पार पडणार आहे. या दोन दिवसीय परिषदेत नवीन वाळू धोरण, आयसरिता २.०, विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण, शासकिय जमिनीवरील अतिक्रमण, शर्त भंग, पानंद रस्ता, शिवार रस्त, कब्जेपट्टयाने दिलेल्या, जमिनींच्या शर्तभंगाबाबत, अर्धन्यायिक कामकाज, शत्रू संपत्ती अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, ई-चावडी, ई-मोजणी, ई-पीक पाहाणी, ई-ऑफीस, सलोखा योजना, भूसंपादन, बिनशेती, तुकडेजोड, तुकडेबंदी अधिनियम अशा विविध विषयांबाबत वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.


            या परिषदेच्या वैशिष्ट्यांबाबत बोलताना मंत्री विखे- पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री कृषि सौरवाहिनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह, ऊर्जा, गृहनिर्माण व पाटबंधारे या सचिवांसह राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. वाळू धोरणाबाबतचा मसुदा या परिषदेमध्ये निश्चित करण्यात येणार आहे. या मसुद्यासाठी येणाऱ्या सूचनांच्या अहवालाचा अंतिम मसुदा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती राज्य सरकारला सादर करणार असून, त्यानंतरच अं‍तिम वाळू धोरण जाहीर केले जाणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.


            राज्यस्तरीय महसूल परिषद लोणी येथे घेण्याबाबतची पार्श्वभूमी विशद करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी लोणी येथे लोकनेते खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य परिषद संपन्न झाली होती. या परिषदेतील मसुदा हा देशाच्या आरोग्य धोरणाचा भाग बनला. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतुक केलेल्या प्रवरेच्या ‘पुरा’ मॉडेलचे देशात स्वागत झाले. कृषी मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमही या भूमीत संपन्न झाले आहेत. त्याचदृष्टीने ही महसूल परिषद राज्याच्या प्रगतीचा आणि सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि सर्वार्थाने यशस्वी ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.


००००





 



वॉटर supply

 


जीवन गाणे

 



Tuesday, 21 February 2023

जीवनावश्यक मासे खा मासे


 

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी सहाय्यक अनुदाना

 शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी

सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

            मुंबई, दि. 21 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत योजनेअंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातीलo नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.


            शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसूल विभागातून अर्ज मागविण्यात आले आहेत.


            विहित नमुन्यातील अर्ज आणि नियम www.mahasanskruti.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. संस्थांनी अर्ज सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, महात्मा गांधी मार्ग, मुंबई- 400032 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2023 असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नसल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.


0000

पणन विभागातर्फे २२ पासूनमुंबईत मिलेट महोत्सवाचे आयोजन

 पणन विभागातर्फे २२ पासूनमुंबईत मिलेट महोत्सवाचे आयोजन.

            मुंबई, दि. २१ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष "आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष" म्हणून घोषित केले आहे. या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचाच एक भाग म्हणून पणन विभागामार्फत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे "मिलेट महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे.


            या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मिलेटविषयी सर्वंकष माहिती असणारे 'पुस्तक' देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे ‘मिलेट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.


            पणन विभागातर्फे मिलेट विपणन व मूल्य साखळीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मिलेट धान्याचे आरोग्यविषयी फायद्याबाबत प्रचार, प्रसिध्दी व जाणीव निर्माण करणे, आहार साखळीमध्ये मिलेटचे हरविलेले स्थान परत मिळविणे व खप वाढविण्याकरीता नवीन ग्राहक वर्ग तयार करणे, उत्पादन ते ग्राहकांपर्यंत संघटित मूल्यसाखळी तयार करून उत्पादकांना अधिक मूल्य व ग्राहकांना माफक दरात मिलेट उपलब्ध करणे हे मिलेट विपणन व मूल्यसाखळी मिशनचे उद्दिष्टे आहेत.


तीन दिवसीय महोत्सवाची रूपरेषा


दि. २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी मिलेट विपणन आणि मूल्यसाखळी एक दिवसीय परिषद होईल.


दि.२३ फेब्रुवारी, २०२३, रोजी मिलेट खरेदीदार-विक्रेता संमेलन व खरेदी करारावर स्वाक्षरी होईल.


दि. २२ ते २४ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत मिलेट व मिलेट पदार्थ राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री होईल.


             महाराष्ट्रात मिलेट मिशन मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. मिलेट धान्य, पीठ व विविध मूल्यवर्धित मिलेटचे खाद्य उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरीता मिलेट उत्पादक, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया करणाऱ्या संस्था व उद्योजक तसेच पणनमध्ये असलेल्या विविध सहकारी संस्थांच्या मूल्यसाखळी निर्माण करणे तेवढेच महत्वाचे आहे. मिलेट खरेदीदार-विक्रेता संमेलन व खरेदी करारामुळे तसेच राज्यस्तरीय तीन दिवसीय प्रर्दशनामार्फत मिलेट विक्रीमुळे सर्वसाधारण लोकांना माफक दरामध्ये उपलब्ध होण्यास मदत होईल.


            या मिलेट महोत्सवाला राज्यातील मिलेटविषयी उत्सुक जनतेने तसेच मिलेट उत्पादक शेतकरी, मूल्य साखळीतील घटक, शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी यांनी भेट द्यावी, असे आवाहन पणन विभागाद्वारे करण्यात आले आहे. मिलेट महोत्सव सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.



Featured post

Lakshvedhi