Friday, 17 February 2023

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

 जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण


          जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : - जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात सांगितले.


          जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पुलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन व जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सर्वश्री. संजय सावकारे, किशोर पाटील, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत पाटील, लता सोनवणे, माजी आमदार स्म‍िता वाघ, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजना, प्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तत्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणी, हर घर जल या योजनांवर राज्य शासन प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता राज्य शासनाने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वांसाठी वरदान ठरणारा आहे. हर घर नल, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. तसेच मुक्ताईनगर, धरणगाव, चोपडा, पाचोरा, एरंडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेस, पाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारक, बहिणाबाई चौधरी स्मारक, धरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.


          यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून या कामांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहारात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, कापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.


          ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. जळगावात मेडिकल हबचे काम सुरु होत आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.


या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण


* भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी)


* शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी.


* मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.


* म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन रु. 35 कोटी.


* जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन - रु. 42 कोटी.


* बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.


* धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी.


* जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.


* जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.


* धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.


00000



 

राज्यपालांना निरोप

 मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

            मुंबई, दि. 17 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


००००

CM and Dy CM call on outgoing Governor

            Mumabi, 17th Feb : Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis called on the outgoing Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. They felicitated the Governor and wished him a long and healthy life.


0000



इस्रो प्रदर्शन


 

सुप्रभात

 







Thursday, 16 February 2023

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन

 शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन


- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. १६ :- पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


            यावेळी आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार उदयन राजे भोसले यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे. 


              यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्राची लोकसंस्कृती व ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक तयार केले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.  


          या सोहळ्यात एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबिर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.


            १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’ चे उद्घाटन होणार असून, सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम होणार आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा होणार तर, ३ ते ५ वाजेदरम्यान शिववंदना होईल. सायंकाळी ६:१५ ते ७ वाजेदरम्यान महा शिवआरती कार्यक्रम होणार आहे. सायं. ७ ते रात्री १० वाजेदरम्यान ‘जाणता राजा’ या महानाट्याचा कार्यक्रम होईल. तसेच २० फेब्रुवारी रोजीही सायं.७ ते रात्री १० वाजेदरम्यान जाणता राजा कार्यक्रम होईल. तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.


             “छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहेत. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे”, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.


०००

महाभारत पात्र, शिका त्यांचेकडून

 







शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार

 शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार


                                          - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


         सिंधुदुर्गनगरी दि.16 :- शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शिक्षक हे भावी पिढीला आकार देण्याचं, संस्कारित करण्याचं अतिशय मोलाचं काम करत असतात. शिक्षकांचे समाजामध्ये मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षकांवर जास्त बंधने लादली जाणार नाहीत. शासनाने गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते निर्णय हे राज्याचे हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्व सामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत.


            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, चंद्रपूरमधील पालडोह मधील शाळा ३६५ दिवस सुरु आहे. तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारितोषीक मिळाले आहे. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी रुपये देण्याचा निर्णय तत्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक हे ज्ञानदानाचे काम करत असतो. शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे.


             राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्ये शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालक व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वास देखील आता वाढत चालला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी निर्देशांकात एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


      नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरील शिक्षणावर भर दिला जाईल. इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे भविष्य काळातील सुवर्णसंधी आहे. या धोरणानुसार राज्यातील सर्व मुला-मुलींना समान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने देखील केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिशादर्शक काम करुन सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. शिक्षण व्यवस्था दर्जेदार करण्यासाठी जी रिक्त पदे आहेत ती भरण्यात येणार आहेत. तसेच केंद्र प्रमुखाची रिक्त पदे भरण्याचे काम सुरु आहे. शिक्षकांच्या मागणीच्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.


            शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर म्हणाले, केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा शिक्षक भरती झाल्यानंतर येत्या ६ महिन्यांत भरल्या जातील. शिक्षकांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून मागणी होती. ती मागणी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. १६ हजार, १८ हजार व २० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विविध प्रवर्गातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ केली आहे. असे सांगून श्री. केसरकर म्हणाले विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येईल. कोणीही विद्यार्थीं गणवेश अभावी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल.


०००००



Featured post

Lakshvedhi