Thursday, 16 February 2023

उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देणार

 उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            ठाणे, दि. 16 (जिमाका) :- महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी आवश्यक निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


            उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगांसाठी संगणक प्रणाली, प्लास्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण - डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल. रस्ते, पाणी, वीज आणि शहराची स्वच्छता यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. सर्वसामान्य लोकांच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासन काम करत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा राज्याच्या विकासासाठी आहे.


            उल्हासनगरमधील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात शासन निर्णय लवकरच जारी होईल. उल्हासनगर शहराला 50 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे, ही पाण्याची कमतरता देखील राज्य शासन दूर करेल. मोठे रस्ते, पिण्यासाठी पाणी, वीज, गार्डन या मूलभूत सोयी सुविधा देण्याचे काम महापालिका आणि राज्य शासन दोन्हीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या शहराचा सुनियोजित विकास, मोठे रुंद रस्ते, बाग, खेळाचे मैदान, आरोग्य सुविधा, चांगल्या शाळा, दवाखाने होतील आणि यामुळे उल्हासनगरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, उल्हासनगरमध्ये होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल. येथील रस्ते, घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.


            यावेळी आयुक्त श्री. शेख यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.


0000

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी‘द प्लान्ट फेस्टिव्हल’ स्तुत्य उपक्रम

 पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी‘द प्लान्ट फेस्टिव्हल’ स्तुत्य उपक्रम


- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर.

            मुंबई, दि. 16 : गेल्या अनेक वर्षांपासून ‘आय लव्ह मुंबई’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘द प्लान्ट फेस्टिव्हल’ हा स्तुत्य उपक्रम असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.


            मुंबईत दररोज नवीन उपक्रम राबविण्यात येत असतात, पण या पर्यावरण संवर्धन उपक्रमाला उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत असल्याबद्दल शायना एन. सी. यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी अभिनंदन केले.


            लोअर परळ येथील फिनीक्स मॉल येथे शायना एन. सी. आणि नाना चुडासामा यांच्या ‘आय लव्ह मुंबई’ उपक्रमांतर्गत ‘द प्लान्ट फेस्टिव्हल’मध्ये विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील उपस्थित होते.


            यावेळी ॲड. नार्वेकर म्हणाले की, या फेस्टिव्हलमुळे मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना निसर्गाची ओळख होण्यास मदत होईल. शिवाय हा उपक्रम अधिक लोकाभिमुख व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.


            16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.


            यावेळी शायना एन. सी. यांच्यासह सुनील देशपांडे, आयपीएस अधिकारी क्वॉयसर खालिद, मिकी मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


००००



कृषी प्रदर्शन,मेळावा



 

दिव्यांग विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ; दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत

 दिव्यांग विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ; दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत

राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 15 : राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग विकास विभागाचे सचिव अभय महाजन, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर, महाव्यवस्थापक युवराज पवार आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिव्यांग बांधव हे समाजातील महत्वाचे घटक आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता, कलागुण असून त्याला वाव देण्यासाठी महामंडळामार्फत प्रयत्न झाले पाहिजेत. महामंडळाला ५०० कोटींचे भाग भांडवल देण्यात आले असून गेली काही वर्ष थांबलेले कर्जवाटप आता पुन्हा सुरू होईल. त्यामुळे दिव्यांग बांधव स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतील.


            राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख दिव्यांग आहेत. मात्र, सध्या दिव्यांगांची संख्या किती आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक स्वराज्य संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, सामाजिक उत्तरदायित्व निधी या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांकडून निर्मिती, उत्पादित केलेल्या साहित्यांना स्टॉल देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी केले.


            दिव्यांगांच्या मागण्यांसदर्भात विभागाने संवेदनशीलपणे समजून घ्याव्यात आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिव्यांगांना उत्तम दर्जाच्या साहित्याचे वाटप झाले पाहिजे. साहित्याच्या गुणवत्तेची तडजोड करू नका, असे सांगतानाच दिव्यांग बंधू-भगिनी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील असे बॅटरीवर चालणारी सायकल, वाहन त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.



हसा लेको

 गण्याने त्याच्या गर्लफ्रेंडला 


५ फुटी टेडी गिफ्ट दिला..


आणि तिच्या आईने टेडी मधला 


कापूस काढून ४ उश्या बनवल्या..


End of valentine.....😜😅🤣😂

फुलांसारखी मुले

 "आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.

क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही!"


ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.


माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.


मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी ,मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली, माय फादर."


मीही 'गुडमॉर्निंग' म्हणालो.


टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, हिच्या नावापुढे सही करा."


मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, खरेच एवढे बिझी आहोत का आपण?


विचारतच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, बसून बघा सगळे पेपर." असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.


मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ.


अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२. 


टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली.


मीही मग चुकलेले प्रश्नोत्तरे बघायला लागलो.


उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.


मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची.


तिने असं केलं की मी रागवू शकत नाही म्हणून.


"बाबा, इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं!"


"आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का?" - मी.


"हो. सगळी माहीत आहेत."


"मग ठीक आहे. चुकू दे उत्तर. मार्क मिऴालेत समज"


"कसं काय ?" ती गोंधळली.


"बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे." मी उत्तरलो.


ती परत 'का?'


"कळेल नंतर!" मी


मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो. 


तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता. 


मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.


अचानक काही तरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं, बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं?


"काहीच म्हणजे?"


"म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते? घरी कधी कधी दमवते, टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही!"


मला हसू आलं.


मी तिला हसतच विचारलं, "तू शाळेत कचरा करतेस का?"


"नाही". - ती.


"सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस?"


"हो".


"तुझ्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते, ते तू कुणाला लागलं तर लगेच देतेस?"


"हो".


"रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस?'


"हो".


"नेहमी खरं बोलतेस?"


परत "हो"


"लगेचच मनापासुन सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना ?


'हो बाबा हो' किती विचारताय हो.


"मग ठीक आहे बेटा. या बदल्यात थोडे मार्क गेले, अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग." मी म्हणालो.


का पण? 


"हेच तर शिकायचंय आता तुला"


"आणि मार्कं, शिक्षण, पहिला नंबर?


"बेटा दुसरीचे मार्क दाखवून जीवनात काही मिळणार नाही आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं."


सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली, "बाबा, मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे?"


तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, "सुसंस्क्रृत". 


परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली, त्यासाठी मी काय करायचं नक्की.


मीही लगेच तिला धीर देत म्हणालो, "फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा!"


"मग ठीक आहे बाबा" तिच्या जीवात जीव आला.


एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, "बाबा, माझा रिझल्ट काय होता?

मी पाहिलाच नाही की?"


मी म्हणालो, "रिझल्ट? 

तू दुसरी पास होणार!"


पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली, 


"म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना?"


मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत Yes म्हणलं, हीच खरी शिकवण कुठे तरी लोप होत चालली आहे, आणि चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत। 


जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याचा!...

दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन.

 दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी

नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन.

            मुंबई, दि. 15 : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे.


            दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सुविधा 15 फेब्रुवारी पासून सकाळी 9 ते रात्री 7 या वेळेत सुरू राहील.


            हेल्पलाईन क्रमांक 022-27893756 आणि 022-27881075 हे आहेत. कार्यालयातील हेल्पलाईनसाठी डॉ.ज्योती परिहार, सहसचिव (7757089087), श्रीमती गीता तोरस्कर, वरिष्ठ अधीक्षक तथा सहा.सचिव (प्र.) (7021325879), श्रीमती सुप्रिया मोरे, वरिष्ठ अधीक्षक (9819136199) आणि श्रीमती सुवर्णा तारी, वरिष्ठ अधीक्षक (9987174227) या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


            तर, समुपदेशक म्हणून श्रीकांत शिनगारे - 9869634765, मुरलीधर मोरे- 7977919850 / 9322105618, 022-27893756/ 022-27881075. हयाळीज बी.के.- 9423947266, अनिलकुमार गाढे - 9969038020, जाधव विकास नारायण - 9867874623, विनोद पन्हाळकर - 9527587789, संजय जाधव - 9422594844, चंद्रकांत ज.मुंढे - 8169699204, अशोक देवराम सरोदे - 9322527076/ 8888830139, श्रीमती शैलजा मुळ्ये - 9820646115, शेख अखलाक अहमद अ.रज्जाक - 9967329370, श्रीमती स्नेहा अजित चव्हाण - 8369015013 आणि श्रीमती उज्ज्वला क.झरे - 9920125827 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


00000



 



Featured post

Lakshvedhi