Thursday, 16 February 2023

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतबृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम.

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतबृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम.

            मुंबई, दि. १५ : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे.


            वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


            "महाराष्ट्राची राजभाषा मराठी" या विषयाच्या अनुषंगाने मराठी, अमराठी लोकांमध्ये मराठीबाबत आपुलकी वाढीस लागावी, जागृती निर्माण व्हावी म्हणून अभिनव कल्पनेच्या आधारे जसे की, अभिनव कल्पनेत संगीत, छायाचित्रीकरण, रेखाचित्रे, घोषवाक्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विषय मांडणी इत्यादी विविध माध्यमांचा उपयोग करुन महानगरपालिका क्षेत्रातील अधिकारी - कर्मचारी यांनी वरील माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना शिक्षीत करावयाचे अपेक्षित होते. स्पर्धेत महानगरपालिकेच्या कमीत कमी १० अधिकारी/कर्मचारी यांनी भाग घेणे आवश्यक होते. २७ महानगरपालिकापैकी ८ महानगरपालिकेचे प्रस्ताव विहित मुदतीत प्राप्त झाले होते.


००००

महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे बेल, फुल अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी

 महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे बेल, फुल

अर्पण करण्यासह जलाभिषेकास परवानगी


पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मंदिर ट्रस्ट, भाविक प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय


            मुंबई, दि. 15 : मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक झाली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलींगावर बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आला.


            बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रॉफ यांच्यासह भाविकांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.


            कोरोना काळात मंदिरात पूजाविधीबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. तसेच आयआयटीच्या एका अहवालानुसार शिवलींगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजा साहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलींगाची झीज, नुकसान होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत भाविकांमधून पूजाविधी परत सुरु करण्याबाबत मागणी होती. या मुद्द्यावर स्थानिक आमदार व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंदिर विश्वस्त व भाविक प्रतिनिधींची आज मंत्रालयात बैठक घेतली. महाशिवरात्रीला बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे मंदिर विश्वस्तांसह पोलीस प्रशासन आदी सर्वजण भाविकांच्या मदतीसाठी असतील. भाविकांनी सहकार्य करावे. शिवलींगाची झीज, नुकसान होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी. भाविकांच्या भावनाही महत्वाच्या आहेत. मंदिर आपल्या सर्वांचे आहे. त्याची सुरक्षा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.


००००

शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा

 शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            ठाणे दि. 15 (जिमाका) : राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांच्या लाभाचे वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. हा नवीन कल्याण पॅटर्न आहे. राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांच्या लाभाचा वितरण सोहळा व भव्य लाभार्थी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, माजी आमदार नरेंद्र पवार आदी उपस्थित होते.


            या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थींना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आग्र्याच्या लाल किल्यातील दिवाण ए आम मध्ये 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. या कार्यक्रमास मंजुरी दिल्याबद्दल प्रधानमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शपथविधी नंतर घेतलेले प्रत्येक निर्णय हे सर्वसामान्यांना मदत करणारे, त्यांना न्याय देणारे आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे व सरकार घरापर्यंत पोचण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.


            केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी मोठी तरतूद आहे. राज्याच्या हितासाठी निर्णय घेत आहोत. ठाण्यात रस्ते विकसित केले. त्याप्रमाणे कल्याणमध्ये चांगले रस्ते होण्यासाठी प्रकल्पबधितांना युएलसीची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू. राज्यातील तरूण स्वतःच्या पायावर उभा राहून दुसऱ्याच्या हाताला काम देणारे उद्योजक होण्यासाठी इनोव्हेशन हबला राज्य शासन सहकार्य करणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवू या. योजना फक्त कागदावरच न राहता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            डॉ श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ कल्याण पूर्व मधील लोकांना देण्यात येत आहे. तळागाळातील एकही लाभार्थी वंचीत राहू नये, लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करत आहोत. महिलांसाठी राज्य सरकार चांगले काम करत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित, आपला दवाखाना या योजना राबविण्यात येत आहे.


            केंद्रीय राज्यमंत्री श्री पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे जनतेला खूप मोठा फायदा मिळत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खूप चांगल्या योजना मतदार संघामध्ये राबविल्या आहेत. या योजनांचा लोकांना खूप फायदा होणार आहे.


            यावेळी लाभार्थींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभाचे व नवीन शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.


00000



 



टंकलेखन संस्थांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक

 टंकलेखन संस्थांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 15 : राज्य शासनामार्फत महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालनासाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली नव्याने मान्यता मिळणाऱ्या संस्थांना लागू असणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


            महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम 1991 मध्ये शासनाने सुधारणा केली आहे. या नियमावलीऐवजी जुनी नियमावली कायम ठेवण्याबाबतच्या संस्था चालकांच्या मागणीबाबत बुधवारी येथे आयोजित बैठकीत मंत्री श्री.केसरकर बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, सह सचिव इम्तियाज काझी यांच्यासह वाणिज्य शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, नवीन नियमावली ही नव्याने मान्यता मिळणाऱ्या संस्थांना लागू असेल. त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थांना आणि त्यांच्या वारसांना जुने नियम लागू राहतील. संस्थाचालकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता शासन घेईल, तथापि शिस्त लागणेही गरजेचे आहे. त्यानुसार संस्थेकडून गैरप्रकार घडल्यास मान्यता रद्द करण्याचे अधिकार शासनाकडे राहतील. संस्थांच्या नूतनीकरणाचे अधिकार शिक्षण उपसंचालकांकडे देण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला दिले.


00000

अवैध मद्य विक्री रोखण्यासाठीकायद्याची कठोर अंमलबजावणी करावी

 अवैध मद्य विक्री रोखण्यासाठीकायद्याची कठोर अंमलबजावणी करावी

- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 15 : राज्यात होणारी अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करताना अवैध मद्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अवैध मद्य विक्रीसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  


            या बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले की, परराज्यातून अवैधरित्या होणारी मद्य वाहतूक, विक्रीला आळा घालण्यासाठी राज्याच्या सीमेवरील संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. विभागाच्या माध्यमातून महसुली स्रोत वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.


***



 



राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार

 राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार


१ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू.

            मुंबई, दि. १५ : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहेत, अशी माहिती सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


            या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्व पदावर आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि १५ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार दि. ०१ एप्रिल २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया दिनांक ०१ मार्च २०२३ पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी दि. ०१ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.


            त्याचप्रमाणे प्राधिकरणाने सन २०२३ मधील दि. ०१ जानेवारी २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे १५०, १२०, ६० व ६० दिवस अगोदर सुरु करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.


            ज्या सहकारी संस्था निवडणुकीकरीता प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे ६३, १०१४, १०१६३ व ९३९८ अशा एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. अ वर्ग संस्थांमध्ये प्रामुख्याने २८ सहकारी साखर कारखाने, ३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, २६ सहकारी सुतगिरण्यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


00

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

 आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार.

            मुंबई, दि. 15 : आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.


            छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. शिवछत्रपतींनी आग्रा येथील याच किल्ल्यात बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. अशा ‘दिवाण-ए- आम’ मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याने आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.


            आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.


            या सोहळ्यामुळे मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे, याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.



Featured post

Lakshvedhi