Thursday, 9 February 2023

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर 2 महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार

 कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी

दर 2 महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार


- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

प्रशिक्षण संस्थांसाठी हेल्पलाईन

            मुंबई, दि. 8 : कोकण विभागातील कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणाऱ्या नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थांसमवेत (VTPs/TPs/TCs) आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संवाद साधला. कौशल्य विकास विभागामार्फत नोंदणीकृत असलेल्या या प्रशिक्षण संस्था आणि विभागामध्ये समन्वय साधणे, अडीअडचणी दूर करणे यासाठी यापुढील काळात दर २ महिन्यांनी या संस्थांचा जनता दरबार घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले. तसेच संस्थांना येणाऱ्या अडीअडचणी थेट मंत्री कार्यालयस्तरावर सोडविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही यावेळी जाहीर करण्यात आला. राज्यातील गरजू तरुणांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी केले.


            एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे झालेल्या या बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, एनएसडीसीच्या अधिकारी श्रीमती शताब्दी यांच्यासह महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अधिकारी, कोकण विभागातील विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध कार्यक्रमांना गती देणे, अडीअडचणी सोडविणे याअनुषंगाने मंत्री श्री. लोढा हे राज्यभरातील प्रशिक्षण संस्थांबरोबर संवाद साधणार आहेत. त्याअनुषंगाने आज कोकण विभागातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी मंत्री श्री. लोढा यांनी ऐकून घेऊन त्या दूर होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी काही संस्थाचालकांनी आपली मते मांडली. दर दोन महिन्यांनी याबाबतची बैठक संबंधितांसोबत घेण्यात येईल, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


            मुंबई विभागातील १७० प्रशिक्षण संस्था चालक या बैठकीकरिता उपस्थित होते. बैठकीमध्ये कोकण विभागातील उत्तम काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान १ प्रशिक्षण संस्थांची निवड करून त्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयडीईएमआय (मुंबई शहर), टीसी – के. जी. सोमय्या पॉलिटेक्निक, (मुंबई उपनगर), शगुन समाज विकास संस्था (जि. ठाणे), ऋषी कॉम्प्युटर एज्युकेशन (जि. पालघर), ब्युटीफूल टुमॉरो (जि. रायगड), सेंटर फॉर क्रिएटीव्हीटी डेव्हलपमेंट सेवा सामाजिक विकास संस्था, (जि. रत्नागिरी), श्री साई इन्फोटेक कॉम्प्युटर (सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) या संस्थांना सन्मानित करण्यात आले.

मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार

 मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 8 : मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्चून काँक्रिट रस्त्यांचे काम सुरू आहे. सर्वत्र सुशोभिकरण सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे, तर कोस्टल रोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. आगामी काळात मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या न्यूज स्टेट महाराष्ट्रतर्फे आयोजित ‘संकल्प महाराष्ट्र’ परिसंवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याबरोबरच देशाचीही आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात देशातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला गती देण्यात आली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. कोळी बांधवांच्या सुविधेसाठी कोस्टल रोडच्या नेव्हिगेशनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेसह पायाभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध होत आहे. 


            आमचे सरकार राज्याच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगतानाच जागतिक दर्जाचा समृद्धी महामार्ग आकारास आला आहे. त्याची भूसंपादन प्रक्रियाही विक्रमी वेळेत पूर्ण केली. त्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली थेट बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या महामार्गामुळे या परिसरात उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक सवलती राज्य सरकारतर्फे दिल्या जातील. त्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ३३ लाख रोपांची लागवड करण्यात येईल. तसेच सौर ऊर्जा निर्मितीही प्रस्तावित आहे.


            राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनारे रस्त्यांशी जोडले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता तयार करण्यात येणार असून त्यावर प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार वाढण्यास मदत होईल, असे ते यावेळी म्हणाले.


            कोकणात लहान- मोठे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडविण्यावर भर देण्यात आला आहे. पौष्टिक धान्य उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून आणण्याचे नियेाजन सुरू आहे. त्यासाठी ही योजना पुनर्जीवित करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


०००००

Wednesday, 8 February 2023

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ.

 विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ.

            मुंबई, दि. 8 :- विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.


            विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.


००००

अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ;9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार.

 अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ;9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार.

            मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.


            विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली.


            या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य सर्वश्री अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड् आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.


            बैठकीत 27 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.


            महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी "वंदे मातरम्' नंतर "जय जय महाराष्ट्र माझा" हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.


            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.


0000

कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

 कामगार पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

- कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे


राज्यस्तरीय कामगार केसरी, कुमार केसरी कुस्ती स्पर्धा २०२२-२३ विजेत्यांना बक्षीस वितरण.

            मुंबई, दि. ८ : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कामगारांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथे केले.


            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, मुंबई शहर तालिम मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, महेंद्र तायडे आदी उपस्थित होते.


            मंत्री डॉ. खाडे म्हणाले, राज्यात राजर्षि शाहू महाराज यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यांचा वारसा राज्याने जोपासला आहे. कुस्ती क्षेत्रातही नवनवीन बदल आणि तंत्रज्ञान आले आहे. मातीवरील कुस्ती आता मॅटवर होत आहे. हा बदल कुस्तीपटूंनी स्वीकारावा. खेळ म्हटला, की यश- अपयश येत राहते. मात्र, खेळाडूंनी अपयशाने खचून न जाता यशासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी. कामगार कल्याण विभागाचे आयुक्त श्री. इळवे यांनी प्रास्ताविकातून या स्पर्धेची माहिती दिली. माधवी सुर्वे यांनी आभार मानले.


अरू खांडेकर, कालिचरण सोलनकर विजेते


            या राज्यस्तरीय कुमार केसरी स्पर्धेत अरू हिंदुराव खांडेकर, तर राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धेत कालिचरण झुंजार सोलनकर यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना अनुक्रमे चांदीची गदा, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि ५० व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय अभिनंदन बोडके याने द्वितीय, ओंकार शिवाजी मगदूम याने तृतीय, तर विवेक कृष्णाजी धावडे याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. दुसऱ्या गटात भारत संजय पवार याने द्वितीय, प्रथमेश बाबा गुरव तृतीय, तर तानाजी सोपानराव विटकर याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.


00000


वंदे मातरम्” नंतर “जय जय महाराष्ट्र माझा”ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार

 वंदे मातरम्” नंतर “जय जय महाराष्ट्र माझा”ने

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. ८ : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते शनिवार 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर राज्याचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गायन केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


            विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आज घेण्यात आली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी "वंदे मातरम्' नंतर "जय जय महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत म्हटले जाणार आहे.


            भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून "जय जय महाराष्ट्र माझा - गर्जा महाराष्ट्र माझा" हे कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरण "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फूर्ती व प्रेरणा देणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे गीत आहे.


            “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीतातील एकूण 2 चरणे वाजविण्यात येणार असून याचा अवधी 1 मिनिट 41 सेकंद असेल. या 2 चरणांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधूत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली माडे यांनी हे गायले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र गीत येत्या दि. १९ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे. राज्यगीताचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत -


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा”


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ ||


 


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा


अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा


सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा


दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥


 


काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी


पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी


दारिद्रयाच्या उन्हात शिजला


निढळाच्या घामाने भिजला


देश गौरवासाठी झिजला


दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥


 


महाराष्ट्र राज्यगीत गायन, वादन संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी :-


1. राज्यगीत अंगिकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरीही, राष्ट्रगीताचा मान, सन्मान व प्रतिष्ठा सर्वोच्च राहील.


2. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांत सुरुवातीस राज्यगीताचे गायन वादन हे ध्वनीमुद्रीत आवृत्तीसोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे.


3. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत होताच राज्यगीत वाजविले / गायले जाईल.


4. राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरु होण्यापूर्वी, परिपाठ / प्रतिज्ञा / प्रार्थना / राष्ट्रगीत यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल.


5. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व प्रकारच्या अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था,खासगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांना सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम इत्यादी मध्ये राज्यगीताचा योग्य तो सन्मान राखून ते वाजविण्यास / गाण्यास मुभा राहील.


6. राज्यगीत सुरु असताना सर्वानी सावधान स्थितीत उभे राहावे व राज्यगीताचा सन्मान करावा. लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती तसेच वृद्ध व्यक्ती यांना सावधान उभे राहण्यापासून सूट असेल.


7. राष्ट्रगीताबाबतीत जसे तारतम्य बाळगण्यात येते तसेच ते राज्यगीताच्या बाबतीत सुद्धा बाळगण्यात यावे. हे गीत वाजविताना/ गाताना त्याचा योग्य तो सन्मान राखण्यात यावा.


8. वाद्य संगीतावर आधारित या गीताची वाद्यधून पोलिस बॅंडमार्फत वाजविता येईल.


9. राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या राज्यगीताचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात यावा.


10. या अधिकृत राज्यगीताची लिंक राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.


०००००

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार

 देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. ८ :- महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढा देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होतांना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


            ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र – गोवा’ या मराठी वृत्त वाहिनीचा शुभारंभ श्री. फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी "संकल्प महाराष्ट्राचा" या विशेष कार्यक्रमात श्री.फडणवीस यांनी आपले विचार मांडले.


            श्री.फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा केवळ मार्ग नसून तो आर्थिक महामार्ग आहे. या महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल. रस्ते विकास हा देशाच्या विकासात मोठी भूमिका पार पाडतो, त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. यासाठी श्री.फडणवीस यांनी अमेरिकेचे उत्तम उदाहरण दिले की, अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका प्रगती करू शकला. त्यामुळे नागपूर - गोवा, विरार - अलिबाग हे कॉरिडॉर लवकरच तयार केले जाईल, असे ते म्हणाले.


            आज मुंबईत मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन होत आहे. मेट्रो -३ मुळे जवळपास १७ लाख लोकांचे वहन होईल. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबई पायाभूत सोयी सुविधांमध्ये फार पुढे असणार आहे, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.


            श्री.फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प असून यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात यावे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नळगंगा - वैनगंगा प्रकल्पांमुळे खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत श्री.फडणवीस यांनी व्यक्त केले.


            आज राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्याच बरोबर, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून लवकरच जागतिक बँकेकडून ४ हजार करोड रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर शेती मालाबरोबर अन्य बाबींचे निर्यात करण्यासाठी वाढवण बंदर नव्याने तयार करण्यात येत आहे. या वाढवण बंदरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास श्री.फडणवीस यांनी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केला.


0000

Featured post

Lakshvedhi