सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 5 February 2023
राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट
राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे 'ग्लोरी ऑफ हेरिटेज' या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली.
राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ यावेळी राज्यपालांनी जाऊन विचारपूस केली.
जेजे स्कूल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून अधिव्याख्याता शार्दूल कदम यांच्यासह सुमारे 50 विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.
कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार
कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी दि.4 (जि.मा.का):- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.
आंगणेवाडी येथील श्री.देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज घेतले. यानंतर झालेल्या कार्याक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंतर्गत रस्ते देखील महत्वाचे आहेत. एमएमआरडीएच्या धर्तीवर एमआयडीसी, सीडको व एमएसआरडीसी यांना सोबत घेऊन कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणाला त्याचा खूप फायदा होईल. हे प्राधिकरण अतिशय महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की, श्री. देवी भराडी आईच्या दर्शनाला आलेल्या लाखो भाविकांचे, भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा पण देतो. राज्यातील जनतेला, बळीराजाला त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृध्दी,भरभराटी त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, तसेच त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण व समाधान आले पाहिजे, अशी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर राज्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करुया, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सागरी महामार्ग हा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचेही काम हातामध्ये घेत आहोत. रस्त्यांचे रुंदीकरण आपण करतोय, जेणेकरुन कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. सगळे सागर किनारे हे अतिशय सुंदर आहेत. त्यांचे सुशोभिकरण करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग नागपूर-मुंबई महामार्गाच्या धर्तीवर आपण ग्रीनफिल्ड रस्ता मुंबई- सिंधुदुर्ग फास्टट्रॅक कंट्रोल याचे देखील काम हाती घेतोय. जेणेकरुन खऱ्या अर्थाने कनेक्टीव्हिटी मिळेल. तसेच प्रदूषण कमी होईल व लोकांचा वेळ वाचेल. विकासाला चालना मिळेल. विकासाची दारे खुली होतील. कोकणामध्ये पर्यटन व मस्त्य व्यवसायालाही मोठा वाव आहे. कोकणामध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा खूप पाऊस पडत असतो. परंतु, बरेचसे पाणी हा वाहून जाते. वाहून जाणारे पाणी शॉर्टटर्म व लाँगटर्म प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत. सिंधुदुर्गात मालवण वेंगुर्ला येथे काजू व आंबा मार्केटिंग व ब्रॅडिंग यांनादेखील चालना द्यायची आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीयमंत्री श्री. राणे म्हणाले की, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. शासनाने या यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे.
यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
०००००
जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक
जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक
-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि.4 – “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
विविध क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी जर्मनीचे शिष्टमंडळ मुंबईत आले आहे. आज या शिष्टमंडळासह मुंबईत झालेल्या एका परिषदेत श्री. केसरकर बोलत होते. यावेळी जर्मनीच्या बाडेन वृटेमबर्गचे राज्यमंत्री डॉ. फ्लोरियन स्टॅगमन, लॉर्ड मेयर डॉ.फ्रँक मेंट्रप, स्टूटगार्ड चे महापौर थॉमस फुहरमन, जर्मनीचे महा वाणिज्य दूत अचिम फॅबिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री केसरकर म्हणाले की, मुंबईचे जर्मनीतील विविध शहरांशी घनिष्ठ संबंध असून महाराष्ट्र जर्मनीशी हृदयाने जोडला गेलेला आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून व्यावसायिक आणि कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाने विविध व्यावसायिक तसेच कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी करार केलेले आहेत. शाळांमधून व्यवसाय आणि कौशल्य आधारित प्राथमिक शिक्षण दिले जाते. जर्मनीमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असून जर्मनीची आवश्यकता विचारात घेता व्यवस्थित नियोजन करून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याबाबत परस्पर सामंजस्य करार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पर्यावरण, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्रात परस्पर सहकार्यास वाव असून विशेषतः कोकणातील पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जर्मनीतील पर्यटकांनी कोकणात यावे, असे आवाहन श्री.केसरकर यांनी यावेळी केले.
जर्मनीतील राज्यमंत्री डॉ. स्टॅगमन यांनी यावेळी बोलताना भारत विविध क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटी, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात आम्ही सहकार्य करू इच्छित आहोत, तर जर्मनीला सुमारे चार लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ती पूर्ण करू शकतो. या माध्यमातून परस्पर संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0000
काळाघोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट
काळाघोडा कला महोत्सवाला पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट
मुंबई, दि.5 : मुंबईतील कला प्रेमींसाठी संगीत नाट्य आणि कलेची मेजवानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला शनिवार दि. 4 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. या महोत्सवाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी काळा घोडा आर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या महोत्सवात नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स थिएटर, साहित्य, खाद्य, बालसाहित्य आणि कार्यशाळा, सिनेमा, हेरिटेज वॉक, स्टँड अप कॉमेडी, स्ट्रीट आर्ट, शहरी डिझाईन आणि आर्किटेक्चर, व्हिज्युअल आर्टस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काळा घोडा आर्ट असोसिएशन तर्फे आयोजित होणारा काळा घोडा कला महोत्सव फोर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट रोड, क्रॉस मैदान, कूपरेज बँडस्टँड , म्युझियम गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या वर्षी पुन्हा एकदा कलाप्रेमींसाठी ही पर्वणी उपलब्ध होत आहे. हा महोत्सव 12 फेब्रुवारी पर्यंत कला रसिकांसाठी खुला राहणार आहे.
सन 1999 मध्ये स्थापित झालेल्या या वार्षिक कलामहोत्सवाने देशातील तसेच जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरात सुरु असलेल्या या कलामहोत्सवात ललित कला, नृत्य, नाटक - सिनेमा, वास्तुकला, छायाचित्रण, सांस्कृतिक आणि प्रादेशिक कला अशा अनेक कलांचे सादरीकरण होणार आहे.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी या महोत्सवाची पाहणी करुन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सोयी सुवींधाकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना करुन कलाकांराचे अभिनंदन केले. तसेच कलाप्रेमींना या कार्यक्रमात सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत 3 हजार 600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिक मदत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत सात महिन्यांत
3 हजार 600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिक मदत.
मुंबई, दि. 5 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सात महिन्यांत 3 हजार 600 रुग्णांना 28 कोटींपेक्षा अधिकची वैद्यकीय मदत केली आहे.
जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत, ऑगस्ट - 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर - 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर - 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर - 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर -1013 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना विक्रमी 8 कोटी 89 लाख रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक
कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
रत्नागिरी, दि. 5:- कोकणात लोककलेची समृध्द परंपरा असून पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबध्दरित्या होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. तसेच कोकणातील लोककला वृद्धिंगत करण्यासाठी लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर 5 ते 8 फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक व खाद्य महोत्सव रंगणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमस्थळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री शेखर निकम, प्रसाद लाड, योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समिती अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
लोककला प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या लोककलावंतांच्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लोककला महोत्सवामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील गडकिल्ले, सागरी किनारे, निसर्गसंपन्न वातावरण कोकणचे वैभव आहे. दळवणवळण गतिमान होण्यासाठी मुंबई ते गोवा जुना महामार्गदेखील वेगाने तयार होत आहे.
कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या मोबाईल वापराने कलेपासून दूर गेलेली तरूणाई लोककला महोत्सवामुळे निश्चितच याकडे वळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यासह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. तसेच रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे.
खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.
अशा महोत्सवांमुळे गोवा, केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्याच निसर्ग संपन्न, पंरपरा जपणाऱ्या आणि सांस्कृतिक संपन्नता असणाऱ्या कोकणाकडे वळविण्यास मदत होईल. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर, रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा 40 पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार असून सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे 30 पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
00000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...

