Friday, 20 January 2023

एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक

 एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 19 : दि. 11 जुलै 2009 पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली.


            विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या दि. 5 सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार, अध्यापकांना कॅस चे लाभ देण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी पुढाकार घेऊन नोव्हेंबर 2022 मध्ये सकारात्मक भूमिका घेत विभागाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश एम.फील. पदवीधारक अध्यापकांना लाभ देण्यात आले मात्र काही मागण्या विचाराधीन होत्या. त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, महाराष्ट्र राज्य एम.फील. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. नीलेंद्र लोखंडे, डॉ. सचिन गोसावी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सविता तायडे, डॉ. लता चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर बोराडे, डॉ. अभिजित पवार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


००००

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता

 मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन.

            मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, 360 खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाली. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला आहे.


            देशाची नवी ओळख जगामध्ये आता अधिक ठळक होत आहे, असे सांगून ते म्हणाले की, विकसित भारताची उत्सुकता आता केवळ देशातच नव्हे, तर जगातही आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. याच सकारात्मकता आणि सामर्थ्याचा उपयोग करून गतिशील विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.


            सध्या देशात आधुनिक दळणवळणाकडे लक्ष दिले जात आहे. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या शहरांच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी स्पष्ट केले.


            मुंबईतील सामान्य मुंबईकरांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी दिली.


            रेल्वेचे आधुनिकीकरण मिशन मोडवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेची प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच, त्याच ठिकाणी बस, टॅक्सी आदी सुविधाही असाव्यात यासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी हब तयार करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सांगितले.

केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगाने धावू शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.

सुवर्ण अक्षरात नोंद करावी असा दिवस

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांचे जगणे सुसह्य करण्याची सुरूवात आहे. येत्या दोन वर्षांत त्याचा कायापालटही पहायला मिळेल आणि आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशीच आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याच हस्ते ऑक्टोबर 2015 मध्ये मेट्रोचे भूमिपूजन झाले होते आणि त्यांच्याच हस्ते आज उद्घाटनही होत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. म्हणूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना आम्ही मुंबईत आमंत्रित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या समृद्धीची सुरूवात

            गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देशातल्या गेमचेंजर समृद्धी महामार्गाची सुरुवात झाली. आता नव्या वर्षाची सुरुवात आपण मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करीत आहोत. एक कार्यक्रम राज्याच्या उपराजधानीत झाला आणि आज राज्याच्या राजधानीत हा अभूतपूर्व सोहळा होतोय, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे राज्यात 'समृद्धी' दाखल होत आहे.


            समृद्धी असो, मेट्रो असो किंवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणारा समुद्रावरील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे. आम्ही रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग उभारून देशातला एक आदर्श असा वाहतूक आणि दळणवळण आराखडा जगासमोर ठेवत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आम्ही मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरु करणार आहोत. ही मेट्रो लवकरच लाखो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. मुंबई महानगरात ३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील. वेळेची बचत होईल. प्रदूषण कमी होईल. कोस्टल रोडचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून नवी मुंबई मेट्रो लवकरच सुरु होईल, असेही ते म्हणाले.

विकासाला मानवी चेहरा देणार

            गेल्या सहा महिन्यात आम्ही जे काम केले आहे, त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे, आणि एकदा विश्वास टाकला की, मुंबईकर त्याची साथ कधीही सोडत नाही हा इतिहास आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की, केवळ रस्ते, पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकासाला मानवी चेहरा पाहिजे. आज आम्ही आणखी एक स्वप्न सत्यात उतरवतो आहोत ते म्हणजे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करतोय. मुंबईतील सांडपाणी पुनर्प्रक्रिया, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुशोभिकरण हे सर्वच आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे मुंबई हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होणार आहे.


            मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याचीही सुरुवात आज होते आहे. काँक्रिटीकरण केल्यानंतर किमान २५ वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील. संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी

             मुंबईकर मुंबईच्या बाहेर जाऊ नये याला आमचे प्राधान्य आहे. सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवित आहोत. पुनर्विकासाला गती आणतो आहोत, पोलिसांना, कामगारांना घरे देत आहोत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकासाचे उदाहरण दिले. 


            यावेळी त्यांनी राज्य शासनाने सामाजिक भावनेतून घेतलेल्या निर्णयांविषयीही सांगितले. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे, स्वतंत्र दिव्यांग विभाग, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत, दिवाळीत शंभर रुपयांत शिधा, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन, चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा दुपटीने जास्त मदत असे अनेक निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.


            दावोस दौऱ्यात अनेक उद्योजकांबरोबर बैठका झाल्या. प्रत्येकाने प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याबद्दल आदर व विश्वास व्यक्त केला. ते आमचे नेते व मार्गदर्शक आहेत याचा अभिमान तर आहेच, पण एक भारतीय म्हणून अभिमान वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला मिळालेल्या गुंतवणुकीविषयी माहिती दिली.


राज्यातील विकासाला प्रधानमंत्री मोदी यांचे बळ - उपमुख्यमंत्री फडणवीस


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ज्या योजनांचे भूमिपूजन प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यांच्याच हस्ते या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे. ही विकासाची बदललेली संस्कृती आहे.


            प्रधानमंत्री स्वनिधी योजनेला मध्यंतरी खीळ बसली होती. पुन्हा राज्य शासनाने ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एक लाखाहून अधिक फेरीवाल्यांना त्याचा लाभ होणार आहे. मुंबईच्या बाहेर राज्याच्या इतर भागातही आगामी काळात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामुळे मुंबईचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. धारावी येथील एक लाख लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प केवळ केंद्र सरकारने रेल्वे विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


००००




 



कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातीलराष्ट्रीय सेवा योजनेच्या 14 विद्यार्थ्यांचा सराव

 कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातीलराष्ट्रीय सेवा योजनेच्या 14 विद्यार्थ्यांचा सराव

            नवी दिल्ली, दि. 19 : प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानीत सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी सराव करीत आहेत.


             74व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने एनएसएस सराव शिबिर येथील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरु झाले आहे. देशभरातील 132 विद्यापीठातील 213 शैक्षणिक संस्थांमधून 200 विद्यार्थी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातील शिबिरात विविध टप्प्यातील निवड प्रक्रियेतून सहभागी झाले आहेत. यामध्ये पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातून क्रमश: 7 विद्यार्थी व विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थीनी असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी या शिबिरात सराव करीत असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संचालक डॉ. कमल कुमार कर यांनी दिली.


            शिबिर 31 जानेवारी 2023 पर्यंत सुरु राहिल. यामध्ये दररोज सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत योगासने, बौद्धिकसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येत, असल्याचे श्री. कर यांनी सांगितले. 1 ते 6 जानेवारीपर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव आला. 7 ते 23 जानेवारीपर्यंत कर्तव्यपथावर पथसंचलनाचा सराव सुरु असल्याचे पुणे विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे यांनी सांगितले.


             या शिबिरात प्रत्येक राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रोज साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पथक दररोज राज्याची लोक कला सादर करीत असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. १५ जानेवारीला मकरसंक्रांतीचा खास सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांनी सादर केला.


एनएसएस शिबिरात महाराष्ट्रातील या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश


            एनएसएसमध्ये सामील होणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी विविध शाखेतील अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेत असतात. यावर्षी महाराष्ट्राच्या पथकात मुंबईतील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचा साहिल भोसले, सातारा जिल्ह्यातील बलवंत महाविद्यालयाचा श्लोक वरूडे, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील डॉ.बी.एल.पुरंदरे कला महाविद्यालयाचा जयवंत दळवी, सोलापूर जिल्ह्यातील अकलुजमधील एस.एम. महाविद्यालयाचा सत्यजित चव्हाण, नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमधील एल.बी.एस. महाविद्यालयाचा विष्णू जाधव, मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाचा प्रफुल्ल येमनेरे, पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाचा अनमोल जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


            मुंबईतील के.सी महाविद्यालयाची संजना कऱ्हाडकर, श्रीमती पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाची स्नेहल पांडे, ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची दीपशिखा सिंह, नवी मुंबईतील एमजीएमयू, वैद्यकीय महाविद्यालयाची आकांक्षा पाटील, परभणीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची साक्षी काशीकर, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील पी.पी.इ.एस.ए.सी.एस. महाविद्यालयाची संयुक्ता हुजरे, कोल्हापूर जिल्ह्यातील दूध साखर महाविद्यालयाची करीना जमादार यांचा समावेश आहे.


            यासोबतच गोवा राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचा विद्यार्थी विनयानुज कुशवाह, म्हापूसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाची विद्यार्थींनी सोहाली नागवेंकर हिचाही समोवश पथसंचलनात आहे.

Thursday, 19 January 2023

रोखे विक्रीची अधिसूचना जारी ख

 महाराष्ट्र शासनाच्या 2 हजार 500 कोटींच्यारोखे विक्रीची अधिसूचना जारी.

            मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


        रोख्यांची विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 293 (3) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.


            राज्यशासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                      


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 24 जानेवारी, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 24 जानेवारी, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी करण्यात येईल.           


            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असेल.


             रोख्यांचा कालावधी 25 जानेवारी, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 25 जानेवारी, 2031 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 25 जुलै व 25 जानेवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 19 जानेवारी, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली.


००००

महाराष्ट्र शासनाच्या 2 हजार 500 कोटींच्यारोखे विक्रीची अधिसूचना जारी.

            मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र शासनाने दहा वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


        कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.


            राज्यशासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                      


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 24 जानेवारी, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 24 जानेवारी, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी करण्यात येईल.           


            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असेल.


            रोख्यांचा कालावधी 25 जानेवारी, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 25 जानेवारी, 2031 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 25 जुलै व 25 जानेवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 19 जानेवारी, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली.


००००



गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास२५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान

 गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास२५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान.

        मुंबई, दि. १८ : खालापूर (जि. रायगड) पोलीस ठाणेअंतर्गत दरोडा प्रतिबंधक पथकात कर्तव्यावर कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावर ५ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री दीड वाजता अपघात झाला. या अपघातात त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले. त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २५ लाख रुपये रकमेचा धनादेश गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


            गृहरक्षक दलाच्या जवानांना विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रातील ४६ हजार ३३४ जवानांचे बचत खाते उघडून त्यांना विमा संरक्षण व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री. आखाडे यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याने मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना मदतीचा धनादेश अनुज्ञेय झाला.


            यावेळी अपर पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह, रायगडचे अपर पोलिस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक अतुल उत्तमराव झेंडे, एचडीएफसी बँकेचे संदीप कोचर, क्लेम सेटलमेंट व्यवस्थापक मंजरी सावंत आदी उपस्थित होते.


००००

शौर्यपदक विजेते मेजर साकलकर यांना6 लाख रूपये अनुदान मंजूर.

            मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक अथवा सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शौर्यपदक अथवा सेवापदक प्राप्त करणाऱ्या सैन्यातील जवानांना अनुदान देण्यात येते.


            या योजनेंतर्गत परम विशिष्ट सेवेसाठी शौर्यपदक विजेते नागपूर येथील मेजर प्रतर्दन गोपाळ साकलकर यांना शासनाने 6 लाख रूपये अनुदान मंजूर केले आहे. मेजर साकलकर यांना 15 ऑगस्ट 2022 रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले आहे.


0000



 

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार

 कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई दि. 18 : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आगामी काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आयोजिजत करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विद्या वाघमारे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे वास्तुरचनाकार इंद्रजीत नागेशकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोयीसुविधा निर्माण करताना त्या आधुनिक काळाशी सुसंगत असतील तसेच या कामांची गुणवत्ता टिकून राहील याकडे लक्ष देण्यात यावे. आगामी काळात सांस्कृतिक क्षेत्राचा विस्तार करीत असताना कोल्हापूर चित्रनगरीच्या अधिकाधिक विकास आणि आधुनिकीकरणावर भर देणे गरजेचे आहे. यासंदर्भातील नियोजन करुन याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबरोबरच आवश्यक त्या निविदा काढण्याबाबत सूचना देण्यात दिल्या. तसेच महाराष्ट्रातील संतांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्यावर मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असल्यास मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी जी सूट देण्यात येते तीच इतर भाषांमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना देण्याबाबत विचार करता येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            कोल्हापूर चित्रनगरी येथे रेल्वे स्थानकाचा कायमस्वरूपी चित्रीकरण सेट तयार करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहरी बाजू आणि दुसरीकडे ग्रामीण बाजू तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आगळेवेगळे असावे यासाठी एक स्पर्धा घेऊन संकल्पना चित्र अंतिम करावे, अशा सूचनाही यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. या बैठकीत सौर ऊर्जा प्रकल्प बसविणे, बाह्य स्तोत्राद्वारे सुरक्षारक्षक पुरविणे, कर्मचारी पुरविणे, कोल्हापूर चित्रनगरीत आवश्यक तेथे पथदिवे लावणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.


००००

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण 23 जानेवारीला

 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण 23 जानेवारीला

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर.

            मुंबई, दि. १८ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवार, दि. २३ जानेवारी २०२३ रोजी विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.


            तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ॲड. नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


            अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकप्रिय नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची ओळख व्हावी त्यानुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तैलचित्राचे अनावरण लवकरात लवकर करावे असे निवेदन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्या निवेदनानुसार अध्यक्षांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दि. 23 जानेवारी रोजी विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनावरण कार्यक्रमाला देशातील आणि राज्यातील मंत्र्यासह खासदार, आमदार आणि कला, क्रीडा, सिनेसृष्टी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी दिली.


०००


 



Featured post

Lakshvedhi