Wednesday, 11 January 2023

करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागा

 करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागा

शासकीय कार्यालयांना देण्याबाबत कार्यवाहीच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

            मुंबई, दि. ११ : करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाच्या ताब्यात असणाऱ्या जागेमधील त्यांना आवश्यक असणारी जागा वगळून इतर उपलब्ध जागा शासकीय कार्यालये आणि इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.


            सह्याद्री अतिथीगृह येथे आज शेंडा पार्क येथील जमीन विविध प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याच्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोल्हापूर येथील करवीर तालुक्यातील शेंडा पार्क येथील जागेत जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, हवामानशास्त्र प्रयोगशाळा, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, प्रस्तावित जिल्हाधिकारी कार्यालय, वखार महामंडळ गोडावून आणि कार्यालय, समाजकल्याण वसतिगृह, करवीर पोलिस ठाणे, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, प्री एनडीए अकादमी, आय टी पार्क आदी प्रयोजनासाठी जागा आवश्यक आहे. सध्या कृषी आणि आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेली जागा उपयोगात आणण्याबाबत संबंधित विभागांचा अभिप्राय घेऊन कार्यवाही करावी. कृषी आणि आरोग्य विभागाला त्यांच्या विविध प्रयोजनासाठी आवश्यक असलेली जागा वगळता इतर जागा या इतर प्रयोजनासाठी उपयोगात आणण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कांदाभजी"*आयुष्य हे

 *"कांदाभजी"*


व्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते.  


मुंबई - अलिबाग मुख्य रस्त्यावरील एका छोटेखानी पिकनिक स्पाॅटचे एक गांव. त्या गावातील एका व्यक्तीची ही गोष्ट. 


बावीस वर्षांचा तरूण मुलगा. सुशिक्षित व रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला. काही कारणाने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही. शेतातून येणार्‍या भात व वालावर वर्ष काढणार्‍या कुटुंबाला पीक न आल्याने अर्थातच वर्षभर खायचं काय हा प्रश्न पडला होता. वडील , मोठा भाऊ व हा मुलगा रोजंदारीवर काम मिळेल ते करू लागले. पण रोज काम मिळेल याची काहीच खात्री नाही. त्यामुळे उद्या जेवायचे काय? हा प्रश्न सतत ग्रासत असायचा.


याच विवंचनेतून या कुटुंबातील धाकट्या मुलाला स्ट्रेस ने गाठले. सतत विचित्र विचार करत हा मुलगा अनाकलनिय गोष्टी व निरर्थक बडबड करू लागला. आईवडिलांना याला आता वेडबीड लागते की काय अशी भिती वाटू लागली. अचानक या मुलाने परवा आत्महत्या करायची असे निश्चित केले. पण आत्महत्या करण्या आधी कुटुंबातील सर्वांना कांदाभजी खायला घालायची असा त्याने विचार केला. 


दुसर्‍या दिवशी आईच्या कडून थोडे पैसे घेऊन त्याने कांदाभजी बनविण्यासाठीचे सर्व साहित्य स्वतः जाऊन आणले. दुपारी हा मुलगा ठरल्याप्रमाणे कांदाभजी तयार करण्यास घरा बाहेरील चुलीजवळ बसला. भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचला. कांदाभज्यांच्या खमंग वासाने पत्ता विचारण्याऐवजी या मुलाजवळ दोन प्लेट भजी देशील का अशी विचारणा केली. मुलाला "धंदा" वगैरेची काहीच कल्पना नव्हती. तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला दादा पैसे नको.. माझ्याकडून अशीच घ्या ही भजी.. 


त्या व्यक्तीने जास्त विचार न करता तिथेच बसून भजी खाण्यास सुरवात केली. कुरकुरीत चविष्ट कांदाभजी त्याला जबरदस्त आवडली. भजी खात असतानाच त्या व्यक्तीचे व मुलाला पत्ता विचारला. मग काय करतोस , शिक्षण किती, घरी कोण कोण आदी साधारण गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता तो व्यक्ती या मुलाला म्हणाला उद्या संध्याकाळी सहा साडे सहा वाजता इथूनच परत जाईन.. मला पाच सहा प्लेट कांदाभजी बनवून ठेव.. पण त्याचे मात्र पैसे घ्यायचे.. 


हे ऐकल्यावर तो मुलगा रडायला लागला.. आणि त्या व्यक्तीला म्हणाला.. दादा.. उद्या भजी नाय मिळणार.. तुम्ही नका येऊ इकडे उद्या.. सदरचा प्रसंग जरा विचित्रच होता. ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतोय.. थोडा वेळाने तो मुलगा जरा शांत झाला. मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली चल जरा गांव दाखव तुमचा.. थोड्या नाराजीनेच तो मुलगा त्या व्यक्ती बरोबर निघाला. चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीने या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? याचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेरीस बोलण्याच्या ओघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला. दादा मी उद्या या जगात नसेन.. म्हणूनच आज मी आईबाबांना आवडतात ती कांदाभजी करून खायला घातली.. आणि पुन्हा रडू लागला.


अखेरीस त्या व्यक्तीने त्या मुलाला थेट विचारलं.. का करतो आहेस आत्महत्या?? या अनपेक्षित प्रश्नाने तो मुलगा स्तब्ध झाला. त्या व्यक्तीने मुलाला धीर देत देत विचारलं तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्की सुटणार आहे आत्महत्या करून?? यावर त्या मुलाकडे ठोस उत्तर नव्हतं. पण काही वेळाने तो मुलगा म्हणाला दादा.. जगायचं तरी कसं?? ना भात ना वाल.. ना काम मिळतंय रोज.. नाही बघवत आईवडिलांची ही परिस्थिती.. मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली की.. उद्या तुझी बाॅडी बघून आनंद होईल का तुझ्या आईवडीलांना?? त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर.. आता तो मुलगा त्या व्यक्तीवर थोडा वैतागून म्हणाला.. पैसे नको धंदा करायला.. बोलायला काय जातंय.. धंदा कर.. 


यावर त्या व्यक्तीने मुलाला सुचवलं की तू कांदाभजी इतकी भन्नाट बनवतोस.. मग तीच का नाही विकत.. जे भांडवल लागेल ते मी देतो.. धंदा कर पैसे जमव.. आणि जमलं तर हळूहळू परत कर पैसे.. हो ना करता करता तो मुलगा तयार झाला. त्या व्यक्तीने त्याला विचारलं किती लागतील तुला पैसे? मुलगा आता धंद्याचा विचार करू लागला होता. थोडा विचार आकडेमोड करून तो बोलला भजी बनवायला घरातलं बाकी सामान आहे.. झारा, कढई आणि तेल - कांदा - बेसन लागेल आणायला.. त्या व्यक्तीने त्याला विचारलं तरी अंदाजे किती लागतील.. तो मुलगा म्हणाला दोन तीन हजार तरी लागतील. त्या व्यक्तीने या मुलाला वडखळ एटीएम मधून पाच हजार काढून दिले. मुलाला आता आशेचा सूर्योदय दिसत होता. त्याने वडखळ येथून लगेच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं. धंदा कुठे लावणार याची जागा दाखवण्यसाठी तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदाने रडत रडत म्हणाला.. दादा इथे या आडोशाला लावतो उद्या धंदा.. तुम्ही नक्की या.. भजी खायला.. त्या व्यक्तीने मुलाला सांगितले की भजी तर खाईनच पण त्या बरोबर छान गोड चहा ही हवा.. मुलगा जे समजायचं ते समजला.. आणि म्हणाला हो दादा.. चहा पण ठेवतो उद्यापासून.. पण तुम्ही नक्की या..


ती व्यक्ती त्या मुलाचा निरोप घेऊन तेथून निघाली. दुसर्‍या दिवशी धंदा लागलाय का हे दूरूनच गाडीतून पाहून समाधानाने निघून गेली. हळूहळू त्या मुलाचा धंदा व्हायला लागला. मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पहात इमाने इतबारे त्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे हळूहळू जमा करू लागला.


अखेरीस दोन वर्षांनी ती व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टाॅलवर थांबली व एक चहा अशी ऑर्डर तेथील मुलाला दिली. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला सारत एका मुलाने त्या व्यक्तीला दादा.. तुम्ही आलात अशी आनंदाने हाक मारली.. त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला सदर घटना आठवली.. आणि त्याने त्या मुलाला विचारलं अरे इकडे कुठे?? कसा आहेस? धंदा कसा चाललाय?? पटापट खुर्ची ठेऊन ती साफ वगैरे करत त्या मुलाने त्या व्यक्तीला हाताने धरून बसा बसा करत खुर्चीत बसवले.. पाण्याची बाटली समोर ठेवली.. एक मिनिट दादा म्हणत पटकन नवी कांदाभजी बनवून ती प्लेट आणि घट्ट गोड चहा त्या व्यक्ती समोर ठेवला.. स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चाललाय, घराला पत्रे घातले, पाॅवर टिलर घेतला, सेकंड हॅन्ड बाईक घेतली आदी सर्व सर्व गोष्टी डोळेभरून सांगू लागला.. 


तोपर्यंत चहा कांदाभजी संपली होती. त्या व्यक्तीने हात धूवून त्या मुलाला शंभरची नोट दिली. पैसे पाहून तो मुलगा म्हणाला काय दादा.. पैसे काय देता.. तुमचंच दुकान आहे.. आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला.. आणि पटकन एका डब्यात रुमालात बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो म्हणाला रोज वाट बघायचो तुमची.. तुम्ही आलातच नाही.. मला तुमचं नाव पण नाही माहिती.. कसं शोधणार तुम्हाला.. मग है पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले.. तुम्हाला परत द्यायला.. 


हे सर्व पाहून ती व्यक्ती पार हरखून गेली. दोन वर्षांपूर्वीचा तो निराश मुलगा आजचा उद्योजक झाला होता. त्या व्यक्तीने ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवत म्हटले.. तू हे पैसे दुसर्‍या कुणाला तरी दे.. त्याला धंदा शिकव.. 

आणि त्यालाही असेच करायला सांग.. 

बाकी श्रमाचि कृपा आहेच.. आणि ती व्यक्ती कांदाभज्यांच्या खमंग वासाने सेटल झालेल्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढील प्रवासाला लागली. 


"एखादी साधी घटनाही आयुष्य बदलवू शकते.. गरज असते ती परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीचा हात हात घेऊन पुढे चालण्याची.."


*मैत्रीची पाठशाळा* 

नुसतेच जगू नका जगायलाही शिकवा आज एकाला वाचवले तर तो इतरांना स्वतः सारखे होऊ नये म्हणून प्रयत्न करेल...👍🏻

महागाई भत्ता जुलै २०२२

 


जिंदगी गुलजार हैं





 

दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*

 शिक्षकाने वर्गात विचारले: 

*जगात कोणत्या ठिकाणाला प्रेमाचे प्रतीक मानलं जातं?*


संपूर्ण वर्ग एकाच आवाजात ओरडला: "ताजमहाल" फक्त एक विद्यार्थी म्हणाला: "रामसेतू"! शिक्षकाने त्याला उभे केले आणि विचारले, "तुला काय म्हणायचे आहे?"


तो विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, "रामसेतू भगवान श्रीरामांनी आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी बांधला होता, तिला पुरण्यासाठी नाही, आणि दुसऱ्याची जमीन हडप करून तर नाहीच. आणि ज्यांनी पूल बांधला त्यांना भगवान श्रीरामांनी पूर्ण आदर दिला. त्यांचे हात तोडले नाही." शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना ते ऐकून धक्का बसला. खरोखर आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक कथांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची अत्यंत गरज आहे.


*दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*


🙏🙏 *जय श्री राम* 🙏🙏

शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल

 शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. १० :- नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहीत कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने ‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारी ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


            शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज ‘शैक्षणिक दिशादर्शिका २०२३’ या शालेय शिक्षण विभागासाठीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही शिक्षण विभाग चांगले काम करीत आहे. हे काम अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी दिशादर्शिकेच्या माध्यमातून नियोजन करता येईल. त्याचप्रमाणे शिक्षणगाथा या त्रैमासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील यशस्वी गाथा इतरांपर्यंत पोहोचून त्यांनाही प्रेरणा मिळेल. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे कौतुक करून याचा महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व यंत्रणांना नक्कीच फायदा होईल तसेच कामकाजात एकसूत्रता व गतिमानता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता असते, त्यादृष्टीने शाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी बोलताना दिले.


            श्री.देओल यांनी ‘दिशादर्शिके’च्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये येणाऱ्या नवीन पिढीला विभागाची कार्यपद्धती समजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठका, विविध उपक्रम, कार्यक्रम यांचे नियोजन करणे देखील यामुळे सोपे होणार असून ‘शिक्षणगाथा’ त्रैमासिकामुळे नवनवीन प्रयोग आणि चांगल्या कल्पना इतरांनाही समजतील, असे ते म्हणाले.


            आयुक्त श्री.मांढरे यांनी दिशादर्शिकेमुळे अनावश्यक कामांमधला वेळ वाचून कामांची पूर्वतयारी करण्यासाठी ती उपयुक्त ठरेल असे सांगितले. विद्यार्थी आणि गुणवत्ता हा केंद्रबिंदू मानून काम करण्याच्या सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी दिल्या होत्या, याचा उल्लेख करून त्या अनुषंगाने चांगली कामे ‘शिक्षणगाथा’ च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला.


            डॉ.पालकर यांनी प्रास्ताविकाद्वारे दिशादर्शिका आणि शिक्षणगाथा बाबत माहिती दिली. तर, विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांनी आभार मानले.

: मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य

 शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह, घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण

            मुंबई, दि. १० : मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


            मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.


            मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि ‘जनहिताय सर्वदा’ घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रती निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते म्हणून आता मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे, असे बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रीत होणार आहे.

Featured post

Lakshvedhi