Wednesday, 28 December 2022

महिलांसाठी राखीव जागेवर केवळ महिलांचीच नियुक्ती

 महिलांसाठी राखीव जागेवर केवळ महिलांचीच नियुक्ती

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            नागपूर, दि. २७ : शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता राखिव ठेवण्यात आलेल्या जागांवर केवळ महिलांनाच नियुक्ती देण्यात येईल, तसा सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सदस्या डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.


            दि. 25 मे 2001 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात आरक्षणाची व्याप्ती, अटी व शर्तीनुसार भरतीच्या वर्षात त्या त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर सदर आरक्षण इतरत्र अदलाबदली न करता त्या त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांमार्फत भरण्यात यावे अशी अट आहे. त्यामुळे महिला उमेदवारांवर अन्याय होत असून त्यांना हक्काच्या आरक्षणापासून वंचीत रहावे लागत होते, अशा आशयाची लक्षवेधी डॉ. लव्हेकर आणि श्रीमती मनीषा चौधरी यांनी उपस्थित केली होती.


            या शासन निर्णयात बदल करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या प्रश्नी शासन सकारात्मक असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.


***

माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा

 माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा.

- संचालक हेमराज बागूल.

            नागपूर, दि. २७ : “माध्यमांचा परिघ वेगाने विस्तारतो आहे. त्यांचे प्रवाह बदलत आहेत. या परिस्थितीत विश्वासार्ह, अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. अशा माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा”, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(प्रशासन) हेमराज बागूल यांनी विद्यार्थ्यांना केले.


            संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयमार्फत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ आणि प्रिमिअर ॲकॅडमी, नागपूर येथील विद्यार्थ्यांची विधान भवन, नागपूर येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी माहिती व जनसंपर्क शिबिर कार्यालयात आयोजित ‘शासन आणि जनसंपर्क’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.


            यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, प्रा. सुरेश जाधव, प्रा. विभा जाधव, प्रा.श्रृती इंगोले उपस्थित होते.


            संचालक श्री. बागूल म्हणाले, “माध्यम क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. मुद्रित, दृकश्राव्य, समाजमाध्यमांचा प्रभाव वाढतो आहे. या बदलत्या काळात अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. या माहितीवर प्रक्रिया केल्याशिवाय माहितीचे ज्ञानात रूपांतर होत नाही. बाजारप्रधान जगात, प्रतिमानिर्मितीच्या युगात तुम्हाला स्वत:चे भवितव्य घडवायचे आहे. साहित्य, अुनभूती, चिंतनाच्या माध्यमातून मानसिक जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास महत्वाचा असून त्यांचे सृजन आणि सर्जन विकसित झाले पाहिजे. त्यासाठी वाचनाबरोबर स्वत:शी बोला”.


            “विस्तारलेल्या साधनांचा उपयोग योग्य पद्धतीने करा. मुद्रित, दृकश्राव्य माध्यमे, समाज माध्यम, जनसंपर्क क्षेत्र, संशोधन, संवाद या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संयम ठेवून स्वत:ची कौशल्ये विकसित करा. त्यामुळे तुम्हाला या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच समाज माध्यमांचा अतिरेकी वापर टाळावा”, असेही श्री. बागूल यांनी सांगितले.


             ‘विधिमंडळ समिती पद्धती’ या विषयावरील व्याख्यानात विधानमंडळ सचिवालयातील उपसचिव विलास आठवले म्हणाले की, विधिमंडळ समिती म्हणजे विधानमंडळाची प्रतिकृती असते. समित्यांचे विविध प्रकार आहेत. सार्वजनिक हितासाठी समित्यांचे कामकाज सुरू असते. लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांच्या माध्यमातून प्रशासनावर अंकुश ठेवला जातो. विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचे कामकाज सुरू असते. प्रशासनावरील नियंत्रणासाठी समिती कार्यपद्धती महत्त्वाची समजली जाते.


            ‘विधिमंडळ कामकाज आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने म्हणाले की, लोकशाही मजबूत करण्यात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान आहे. माध्यमे अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, समाजसुधारक आगरकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखणीला नैतिक अधिष्ठान होते. राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याप्रमाणे पत्रकारिता अभिव्यक्तीचे कार्य करते आहे. माध्यमे आणि शासन परस्परांशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यामुळे लोकशाही टिकून राहण्यास मदत होते.


            लोकानुरंजन न करता लोकप्रबोधनात्मक बातम्या देण्यासाठी पुढाकार घ्यावा. सनसनाटीशरण न होता लोकप्रबोधनात्मक पत्रकारिता करा, असे आवाहनही श्री. मदाने यांनी विद्यार्थ्यांना केले.


            यावेळी अरफान पठाण, कीर्ती जाधव, कल्याणी वरकुडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.


००००


 




 



शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत

 *शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत

- मंत्री शंभूराज देसाई

 

            नागपूरदि. २७ : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्याबरोबरच आपत्तीच्या काळात त्यांना भरीव मदत करण्यात येत आहेअशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

            विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले कीशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन आणि प्रबोधन करण्यात येत आहे. विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतक-यांच्या विकासासाठी "कृषी समृद्धी" योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतीपूरक उद्योगमहिला व शेतकरी समूह गट तयार करणेलघु व सूक्ष्म उद्योग निर्मितीमार्केट लिंकेजकुक्कटपालनमत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रमदुग्धव्यवसाय तसेच रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आदींचा त्यात समावेश करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

            कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतमालाला हमीभावपीएम किसान सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली, तसेच अल्पमुदत कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक  कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

            चालू हंगामातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने व २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत ६ हजार ४१७ कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले.

            अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ९९ हजार  ९०१ बाधित शेतकऱ्यांना रू.५५१.२१ कोटी रुपये एवढे निविष्ठा अनुदान मंजूर झाले असून ५५१.२१ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी रू.४७७ कोटी ६७ लाख निधी प्रत्यक्ष खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री.देसाई यांनी दिली.

000

Suprabhat

 A *MISTAKE* which makes you *HUMBLE* is much better than an *ACHIEVEMENT* that makes you *ARROGANT*.


🌹 *GOOD MORNING .*🌹

जिवन गाणे गात





 

आवड निवड

 


Tuesday, 27 December 2022

खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे चित्रनगरीचे आवाहन

 खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे चित्रनगरीचे आवाहन


          मुंबई, दि. 27 : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.


            महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल.


        अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


000






Featured post

Lakshvedhi