Wednesday, 28 December 2022

रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे जूनमध्ये होणार लोकार्पण

 रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे जूनमध्ये होणार लोकार्पण.

- मंत्री डॉ. तानाजी सावंत

            नागपूर, दि. 28 : “रामटेकळी (ता. मानवत, जि. परभणी) येथील कोल्हापूरी बंधारा क्र.३ चे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या जून २०२३ मध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येईल”, अशी माहिती मंत्री डॅा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


            या बंधाऱ्याच्या कामांची चौकशी करण्याबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात एकनाथ खडसे, अनिल परब आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले.


            मंत्री डॅा.तानाजी सावंत म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बांधकामाचे कार्य आदेश सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. मध्यंतरी कोरोना काळात काम थांबले होते. कंत्राटदाराने उपविभागाकडून कामाची आखणी करून न घेता परस्पर दुसऱ्या ठिकाणी काम सुरु केले. ही बाब निदर्शनास येताच काम थांबविण्यात आले. याबाबत कंत्राटदार आणि उप अभियंत्यांना नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शासनाचा निधी वाया गेला नसून शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. तथापि या कामातील हलगर्जीपणाबाबत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कार्रवाई केली जाईल”, असेही मंत्री डॅा. सावंत यांनी सभागृहात उत्तर देतांना सांगितले.


०००००



भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांस तात्काळ निधी दिला जाणार

 भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांस तात्काळ निधी दिला जाणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            नागपूर, दि. २८ : “रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालय तसेच कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला पुढील दोन महिन्यांत तात्काळ निधी दिला जाईल”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिले.


            “वरळी येथील कामगार रुग्णालयात अतिदक्षता व सुपर स्पेशालिटी सुविधा देण्यासाठी ई.एस.आय.सी. ला निर्देश दिले जातील. रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            “आर.एन. कूपर रुग्णालयात नेफ्रोलॉजी, कॅथलिक युनिट उभारण्याच्या परवानगीसह विद्यार्थांसाठी हॉस्टेल सुविधा देण्यासाठी संबधितांना तात्काळ निर्देश दिले जातील”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


            यासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर, विलास पोतनीस, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला होता.

महाड तालुक्यातील साकव बाधंकामाचे काम प्रगतीपथावर

 महाड तालुक्यातील साकव बाधंकामाचे काम प्रगतीपथावर

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            नागपूर, दि. 28 : “महाड तालुका, जिल्हा रायगड येथील सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेत साकवाच्या बांधकामात अनियमितता व गैरव्यवहार याबाबत तपासणी केली असता या साकवचे काम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल”, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.


            महाड तालुका, जिल्हा रायगड येथे साकव बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.


            “कोकणात या प्रकारचे पूल बांधले जात असतात. या कामाची पाहणी करुन अहवाल सादर करण्याबाबत अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, कोकणभवन, नवी मुंबई यांना कळविण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्याचे नियोजन आहे. याबाबत दोन पुलांसाठी प्रत्येकी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या साकवाचे काम साकव पद्धतीने न होता इलिमेंटप्रमाणे केले आहे. साकव पद्धत पूर्वीप्रमाणे केल्यानंतर त्यावरुन छोटी-छोटी वाहने जाऊ शकतात”, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


000

इलेक्ट्रिक एस. टी. बसेस करिता १७० ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्स

 इलेक्ट्रिक एस. टी. बसेस करिता १७० ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्स

- मंत्री शंभूराज देसाई

            नागपूर, दि. २८ : राज्य परिवहन महामंडळाकरिता नवीन बसेस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त ७०० कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात १७० ठिकाणी बस चार्जिग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


            सन २०१६-१७ पासून २९२१-२२ या कालावधीत एस टी महामंडळाने ३२३४ बसेस घेतल्या आहेत. यात ६१७ बसेस या भाडेतत्त्वावर ते २६१७ बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन ७०० बसेस खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने २ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. 700 बसेस मध्ये ४५० डिझेल बसेस, ५० इलेक्ट्रिक बसेस तर २०० निम-आरामदायी बसेसचा समावेश आहे. या ७०० बसेस पैकी १९० बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडी बिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती मंत्री श्री.देसाई यांनी दिली.


            ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एस. टी.बसेसच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमंडळामार्फत दूर केल्या जातील, असेही मंत्री श्री.देसाई यांनी आपल्या उत्तरात सांगितले.


            यासंदर्भातील प्रश्न विधानपरिषद सदस्य राजेश राठोड, अभिजित वंजारी, जयंत आजगावकर यांनी प्रश्न विचारला होता

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू

 अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन

बनावट आदेश काढल्याप्रकरणी कारवाई चालू

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            नागपूर, दि. 28 : “अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्या प्रकरणी कारवाई चालू आहे ही कारवाई 1 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.


            अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांना मान्यता देऊन बनावट आदेश काढल्याबाबत प्रश्न ॲड. पराग अळवणी यांनी उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,ज्या शिक्षण संस्थांमध्ये असे बनावट आदेश जारी करून शिक्षकांना घेण्यात आले होते, त्यांना पदावरून कमी करण्याची कारवाई चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होता जे शिक्षक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, हिंदसेवा मंडळ,अगस्ती महाविद्यालय,अकोले,प्रवरा शिक्षण मंडळ अशा या संस्थेत 14 शिक्षकाच्या सुनावण्य घेऊन 9 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता अयोग्य असल्याने रद्द करून त्याचे वेतन बंद केले आहे.


            “हायकोर्टाने याबाबत स्टे दिला आहे. यामध्ये 675 प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी 442 जणांची सुनावणी चालू आहे. तर 659 माध्यमिक शिक्षका पैकी 259 शिक्षकाची सुनावणी चालू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केला आहे त्यांच्यावर कारवाई चालू आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण कसे करता येईल, यादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. काही संस्थांना चुकीची संच मान्यता दिली असेल, तर याची पडताळणी करून ती संच मान्यता रद्द करण्यात येईल. असे शिक्षक आढळून आल्यास त्यांना कमी करण्यात येईल.


            विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र वायकर, बाळासाहेब पाटील, राहुल कुल यांनी प्रश्नाच्या चर्चेत सहभाग घेतला.


0000

अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव

 अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव

तातडीने केंद्र शासनाकडे पाठविणार

मंत्री दीपक केसरकर यांची विधानपरिषदेत माहिती


            नागपूर, दि. 28: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.


            अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते.


            मंत्री श्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर नामांतरसाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठविण्यास कळविले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे.


            सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही श्री. केसरकर यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रा. राम शिंदे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत.

 नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत.

            नागपूर, दि. २८ : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन येत्या ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.


            गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि शुक्रवार दि. ३० डिसेंबर रोजी शासकीय कामकाज व अशासकीय कामकाज केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सभागृहात सांगितले.

Featured post

Lakshvedhi