Saturday, 24 December 2022

चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी

 चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी

मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहित

            नागपूर, दि.२३ : नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सदस्य सचिन अहिर यांनी नाशिक औरंगाबाद मार्गांवरील अपघाताबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            श्री. देसाई यांनी सांगितले की, खाजगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू ही बाब गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वाहन परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत कडक धोरण राबविणार असून भरारी पथकांची क्षमता वाढ करण्यात येईल. भरारी पथक अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून पथकाला लक्षांक देऊन वाहने तपासण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख केली जाईल.


वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये सक्तीचे


            प्रवाशांच्या सुरक्षेची आणि महामार्गवरील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी करण्यासाठी 24 तास विशेष तपासणी मोहीम चालू करणार आहे. वाहन सुस्थितीत असल्याचे वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यासाठी नियमावली तयार केली जाईल. हे प्रमाणपत्र लावण्यासाठी सक्तीचे केले जाईल. ऑक्टोबर 2022 मध्ये विशेष मोहिमेतर्गत वाहनांची तपासणी केली असता 3885 वाहनामध्ये विविध दोष आढळले आहेत, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.


परिवहनमध्ये नवीन बसबाबत निर्णय घेतला जाईल


            परिवहन विभागात साडेपाच हजार वाहने नवीन घेण्यात आली आहेत. काही डिझेलवरील वाहने सीएनजीवर केली आहेत. तसेच जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या एसटी बस नवीन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


            विविध सुट्टीच्या कालावधीत खाजगी बसला दीडपट दरवाढ करण्यास मान्यता आहे. मात्र यापेक्षाही जादा दर खाजगी बस घेत असतील तर उपप्रादेशिक परिवहन कारवाई करतील, असेही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातून

 राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातूनसुसंस्कृत युवापिढी राजकारणात येईल


- अंबादास दानवे.

            नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवापिढी राजकारणात येईल. राज्याच्या व देशाच्या राजकारणात ही युवापिढी महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी व्यक्त केला.


            राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.


            श्री.दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ सभागृह व विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जातात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे कायदे केले जातात. या सभागृहांचे प्रतिनिधित्त्व करण्याची अनेकांची इच्छा असते. आपले द्विसभागृह अमेरिका, इंग्लड येथील सभागृहाप्रमाणे समन्वय साधण्याचे काम करीत असतात. दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. कनिष्ठ सभागृहात एखादा कायदा करतांना त्यामध्ये काही सूचना, बदल वरिष्ठ सभागृह सूचविते. त्यानंतर पाठिंबा दिला जातो. त्याबाबत कुठलीही कटुता ठेवली जात नाही. हे राज्यातील द्विसभागृहाचे वैशिष्ट असल्याचे श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी श्री.दानवे यांनी विधानपरिषदेतील आजी माजी जेष्ठ व श्रेष्ठ सदस्यांचा त्यांच्या कामकाजाबाबतचा उल्लेख केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.दानवे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.दानवे यांचा परिचय करुन दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.गायत्री डुकरे-पाटील यांनी आभार व्यक्त केले.


००००

जनता आणि प्रतिनिधी यांच्यातील संवादच समाजाचा विकास करू शकतो

 -विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.

               नागपूर, दि. 23 : लोकशाहीत लोकप्रतिनिधीबद्दल लोकांच्या मनात पुरेसा विश्वास असेल तरच जनता आणि प्रतिनिधी यांच्यात संवाद टिकून राहू शकतो आणि त्यातून संपूर्ण समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.


            राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.


            विधानसभा उपाध्यक्ष श्री झिरवाळ म्हणाले, लोकप्रतिनिधींना मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळते म्हणजे सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधीत्त्व करुन त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवून एकप्रकारे त्यांची सेवा करीत असतात. गावचा सरपंच सुद्धा गावाचा चांगला विकास करु शकतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विविध विषयांचा सतत अभ्यास केला पाहिजे.  


            लोकशाहीत शिक्षण हा महत्त्वाचा असा भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे. आदिवासी बांधवांचीही शैक्षणिक प्रगती सुरु आहे. आदिवासी भागातील पाणीसाठे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे स्थलांतर थांबविले जाऊ शकते. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकांनी पाणी प्रश्नावर अभ्यास करुन चळवळ उभी करावी. भविष्यात पाणीवाटप हा महत्त्वाचा विषय राहणार असून युवकांनी याबाबत सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.


            कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.झिरवाळ यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. झिरवाळ यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.उषा सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.


००००

आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

 आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत माहिती.

            नागपूर, दि.23 : कोरोना काळात गरिबांची आर्थिक स्थिती खालावली होती. दिवाळीमध्ये त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये म्हणून राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत दिली.


            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आनंदाचा शिधा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.चव्हाण बोलत होते.


            मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, दिवाळीच्या तोंडावर गरिबांना चणाडाळ, साखर, रवा आणि पामतेल एक किलोप्रमाणे पोहोचवण्यासाठी त्वरित ई-लिलाव प्रक्रिया राबविली. यामध्ये 9 अर्जापैकी 6 संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने ई-लिलावात भाग घेतला होता. ही प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्ष पार पाडली. यामध्ये कोणतीही अनियमितता झाली नाही. त्यावेळी असलेल्या बाजारभावानेच चारही पदार्थ संस्थेने खरेदी केले. अत्यावश्यक बाब असल्याने NeML या पोर्टलच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया पार पाडली आहे.


            राज्य शासनाने दिवाळीमध्ये गरिबांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून हा प्रयोग नवीन असला तरी यशस्वी झाला आहे. कंत्राटदारांना एक आठवडा शिधा पोहोचविण्यास उशीर झाल्यास निविदेच्या एक टक्का तर दोन आठवडे उशीर झाल्यास तीन टक्के दंड आकारला आहे. यातून सहा कोटी 51 लाख 805 रुपये दंड वसूल केला असून धान्य देण्याची प्रक्रिया ऑनलाईन न करता केवळ नोंद घेऊन करण्यात आल्याची माहितीही श्री.चव्हाण यांनी दिली.


            ज्याठिकाणी जादा दराने वाटप झाले आहे, तिथे गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत एक कोटी 55 लाख 43 हजार 44 गरीब कुटुंबाना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले असून उर्वरित वाटप ज्यांना मिळाले नसेल त्यांना वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ॲड. मनीषा कायंदे, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे यांनी सहभाग घेतला.

पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बाधित खातेदारांकरिता लवकरच विस्तृत धोरण

 पाटबंधारे प्रकल्पांतर्गत बाधित खातेदारांकरिता लवकरच विस्तृत धोरण

- मंत्री शंभूराज देसाई

            नागपूर, दि.२३ : सीना कोळेगाव प्रकल्पातील बऱ्याच खातेधारकांनी नियमानुसार ६५ टक्के रक्कम भरली नाही. त्यामुळे आता या खातेधारकांना ही रक्कम भरण्याचा प्रस्ताव मान्य केल्यास तयार झालेला सध्याचा आराखडा विस्कळीत होईल, त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी एक सर्वंकष विस्तृत धोरण ठरवून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.


            सीना कोळेगाव प्रकल्पासंदर्भात विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना जमिनी खरेदी करून गावठाणास द्यावी लागल्यास ती देण्यात येईल. त्याचबरोबर जमिनीचे वाटप करताना सर्व प्रकल्पग्रस्तांची एकत्रित बैठक घेऊन एकाच कुटुंबातील सदस्यांना जवळपास जमिन, प्लॉट देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री.देसाई यांनी उत्तरादरम्यान सांगितले.


            या लक्षवेधीत विधान परिषद सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही प्रश्न विचारला होता.


000

कोविड


दिलखुलास’ कार्यक्रमात सं

 दिलखुलास’ कार्यक्रमात सप्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची मुलाखत.

          मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 26, मंगळवार दिनांक 27 व बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. 


            नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले, 45 वर्षाहून अधिक काळ चित्रपट, मालिका आणि नाटकं अशा 100 हून अधिक कलाकृती हाताळलेले, विविध पुरस्कारांनी सन्मानित, कलाकार घडविणारे नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नाटकांची संहिता स्वतःच्या हाताने लिहिण्याची कारणे, नेपथ्य आणि हालचालींचे चित्रमय आराखडे बनवण्याचे फायदे, मालिकांमध्ये व्यस्त असलेल्या नटांना घेऊन तालमींचं काटेकोर नियोजन, स्वगतं सादर करण्यातील नव्या शक्यता काय आहेत, अशा अनेक रोचक विषयांवर विस्तृत माहिती संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

कोण आरोग्य संपन्न ? *आजी की आइ ?* चिमुकला तुलनात्मक अभ्यास करतोय.!


 कोण आरोग्य संपन्न ?

*आजी की आइ ?*

चिमुकला तुलनात्मक अभ्यास करतोय.!

Featured post

Lakshvedhi