Thursday, 22 December 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली.


            मुंबई, दि. २२:- 'लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं,' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक

 -उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक

आ. भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंत यांचे उत्तर

मुंबई, दि. 22 डिसेंबर (प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या पी-उत्तर विभागातील पूर्वेला पालिकेच्या कार्यालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पालिकेची सुसज्ज वास्तू तयार करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाबरोबर संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी विधानसभेत केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रभारी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपताच १५ दिवसात स्थानिक आमदारांसह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊ न हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.


आ. भातखळकर म्हणाले, अनेक वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळलेला आहे. यापूर्वी अर्थसंकल्पात यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, जागेच्या उपलब्धते अभावी काम प्रत्यक्षात झालेले नाही. झोपडपट्टी पुनर्विकास योजना वर्षानुवर्षे रखडलेली आहे. तेथे पालिका कार्यालयासाठी जागा आरक्षित आहे. त्यामुळे या विषयावर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका अधिकारी, स्थानिक आमदार आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री महोदय यांची एक संयुक्त बैठक घ्यावी. तसेच याची कार्यवाही कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली.


यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, आमदार भातखळकर यांनी मांडलेली भूमिका रास्त आहे. पालिकेमार्फतच पालिकेचे कार्यालय बांधता येईल का? याबाबत विचार केला जाईल. अधिवेशन संपतात १५ दिवसांच्या आत स्थानिक आमदार आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक आपण स्वत: घेऊ. प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री सावंत यांनी दिले.

दिशा सालियन मृत्यु प्रकरणी एस आय टी चौकशी करणार

 दिशा सालियन मृत्यु प्रकरणी एस आय टी चौकशी करणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            नागपूर दि. २२ : “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एस आय टी) करण्यात येईल”, अशी घोषणा उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविणार

 अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबविणार.

- मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहिती.

            नागपूर, दि.22: अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.


            अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर घेतल्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना श्री. केसरकर बोलत होते.


            मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले की, जातपडताळणीत अवैध ठरलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील 3 हजार 898 उमेदवारांना राज्य शासनाने अधिसंख्य पदावर घेतले आहे. त्यांना पदोन्नती देण्यात येत नसल्याने बिंदूनामावलीत त्यांचा समावेश करता येत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग केल्याने रिक्त होणाऱ्या पदांसाठी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे. ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रम आखून सेवा प्रवेश नियमानुसार राबविण्यात येणार आहे.


            राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची कार्यवाही सुरू केली असून यामध्येही अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. यामुळे आदिवासी समाजातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.सध्या रिक्त असलेल्या पदांमधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतल पदे भरण्याची कार्यवाही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आणि गट क व गट ड मधील पदे भरण्याची प्रक्रिया 31 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची ग्वाही श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.


            अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ज्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे अशा अधिकारी व कर्मचारी यांना सेवाविषयक तसेच सेवा निवृत्तीचे लाभ देण्याचाही निर्णय घेतला आहे. यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा त्यांना लाभ मिळणार नाही. तसेच, अधिसंख्य पदावर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टीकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करुन एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा 11 महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांच्या सेवा निवृत्तीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री केसरकर यांनी दिली.


            जात पडताळणी घरातील एकाची किंवा वडिलांची असेल तर घरातील इतर सदस्यांना जात पडताळणीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री केसरकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य सचिन आहिर, महादेव जानकर, रमेश पाटील, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर, अभिजित वंजारी, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला होता.


0000

युवकांनी जनसामान्यांच्या मुलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी.

 युवकांनी जनसामान्यांच्या मुलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी.

- आमदार प्रणिती शिंदे.

            नागपूर, दि. 22 :- युवकांनी जनसामान्यांच्या मुलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.


            राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.


            यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशातील सामान्य जनतेच्या विविध प्रश्नावर युवकांनी जागृत राहून चांगल्या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. या कामातूनच आपले राजकीय भवितव्य घडवायचे आहे. यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो. युवकांनी लोकशाहीसाठी मतदार नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिला व युवकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. देशात विविध विचारप्रणाली आहेत. आपल्या आवडीच्या व योग्य विचाराप्रणालीत सहभागी होऊन नागरिकांच्या समस्या सोडवून देशातील लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. देशात विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून युवकांना राजकीय भवितव्य घडविण्यासाठी संधी मिळू शकते. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे. युवक-युवतींना राजकारणामध्ये येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी संधी आहे.


            युवकांनी जनमत व कार्यप्रणाली याची सांगड घालून काम करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर मेहनत घेवून सतत प्रयत्न केले पाहिजे. समुपदेशनाद्वारे वैयक्तिक समस्या सोडवाव्यात. त्यासाठी मदत घ्यावी, संकोच बाळगू नये. महिलांचा आदर केला पाहिजे. घरापासूनच महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. समाजाच्या आशा आकांक्षा युवकांच्या हाती असतात. लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार श्रीमती शिंदे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.


            यावेळी प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी श्रीमती शिंदे यांचा परिचय करुन दिला. अवर सचिव सुनिल झोरे यांनी आभार व्यक्त केले.


००००

लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे

 लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे

- संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील.

          नागपूर, दि. 22 :- लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


            राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.


            संसदीय कार्य मंत्री श्री.पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामांबाबत दूरदृष्टी असली पाहिजे. मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील निधी मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून त्यांच्यासाठी नियोजनबद्ध वेळ दिला पाहिजे, त्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. निवडणूकीची समिकरणे आता बदलली आहेत. विकासकामांबरोबरच जनतेशी सतत जनसंपर्क ठेवणे महत्त्वाचे झाले आहे. लोकप्रतिनिधींनी कर्तव्य, जबाबदाऱ्या व विकासकामांचे नियोजन यांचा समन्वय ठेवला पाहिजे. एका बाजूला विकासकामे, दुसऱ्या बाजूला संपर्क आणि तिसऱ्या बाजूला व्यक्तिगत वागणे यांचा समन्वय असेल तर मतदारसंघही सुरक्षित राहतो.


              मतदार संघातील प्रत्येक विकासकाम करीत असतांना लोकप्रतिनिधींनी कुटुंबप्रमुख म्हणून नागरिकांना प्रत्येक कामात सहभागी करुन घेतले पाहिजे. मतदार संघातील सार्वजनिक कामांबरोबरच नागरिकांच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सगळीकडे शहरीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांना नागरी सुविधा देताना भविष्यातील समस्यांचा विचार करून विकासकामे करताना योग्य ते नियोजन करावे. विशेषत: आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिलांसाठी नागरी सुविधा यासाठी प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे, श्री.पाटील यांनी सांगितले.


            ‘राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन’ हा विषय विकासासाठी फार महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सगळे निर्णय राज्यकर्तेच घेत असतात. चांगले राज्यकर्ते तयार होण्यासाठीही युवकांनी राजकारणात व चळवळीत सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत श्री.पाटील यांनी सांगितले.


            कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.पाटील यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.पाटील यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.प्रियांका मोहिते यांनी आभार व्यक्त केले.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतअग्निशमन यंत्रणेसाठी सात कोटींचा प्रस्ताव

 नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतअग्निशमन यंत्रणेसाठी सात कोटींचा प्रस्ताव

- मंत्री दादाजी भुसे.

            नागपूर, दि. 22 : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून बाजार समितीकडून अद्ययावत अग्निशमन योजनेसाठी सात कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी पणन विभागाच्यावतीने उत्तर देताना आज विधानसभेत सांगितले.


            विधानसभेत आज सदस्य कृष्णा खोपडे यांनी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत लक्ष वेधले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. त्यांनी सांगितले की, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मिरची बाजार लिलाव गृह २ मध्ये आग लागली होती. यात शेतमाल अंदाजे १८०० बोरे (४० किलो प्रती बोरा) मिरचीचे नुकसान झालेले आहे. त्याची अंदाजित किंमत ९० लाख रुपये आहे. या आगीवर बाजार समितीने अग्निशमन दलाद्वारे व समितीमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याद्वारे नियंत्रण आणले.


            बाजार समितीमधील अग्नी सुरक्षा यंत्रणेअंतर्गत धान्य बाजारात सहा किलोचे ४८ फायर सिलेंडर आहेत. सहा फायर हायड्रन्ट बसविले आहेत. अग्निशामकच्या गाडीमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था असून पाणी फवारणीसाठी पाईप आहेत. त्यानंतर बाजार समितीकडून अद्ययावत अग्निशमन योजनेसाठी प्रस्ताव प्राप्त झाला आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


०००

Featured post

Lakshvedhi