Wednesday, 21 December 2022

कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा

 कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा

- डॉ.नीलम गोऱ्हे.

            नागपूर, दि. २१ : विधिमंडळात सार्वजनिक हिताच्या भूमिकेतून कायदे केले जातात. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.


            राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात “विधिमंडळात विधेयकाचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार” या विषयावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.


            डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, “व्यक्ती आणि समाजाचे नियमन करण्यासाठी विधिमंडळात आवश्यक ते कायदे तयार केले जातात. कायदे समाजाच्या मागणीतून केले जातात. चळवळी व आंदोलनांतूनही काही कायद्यांची निर्मिती होत असते. माहिला चळवळीतून महिलांविषयक अनेक कायदे विधिमंडळात संमत झाले आहेत. जे कायदे समाजात परिवर्तन घडवितात, न्याय देतात ते कायदे समाजात सर्वत्र पोहचवून त्या कायद्यांचा अभ्यास करुन त्यात आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्या केल्या जातात. कायदा बनविण्यासाठी काहीतरी कारण असायला पाहिजे.


            विधिमंडळात केलेल्या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे, तरच त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असते. विधिमंडळात विधेयकांवर चर्चा होऊन त्याचे कायद्यात रुपातंर केले जाते. विधेयक कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन करतांना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, विधेयकाचे उद्दिष्ट वाचावे, वाचताना त्याचे टिपण काढले पाहिजे. विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत कितीही वेळ सदस्य चर्चा करु शकतात. सभागृहात एखाद्या मुद्दावर मतभेद होऊ शकतात. या वाद-संवादातून सक्षम असा कायदा होतो.


            अधिवेशनात विधेयकावर होणारी चर्चा विद्यार्थ्यांनी आर्वजून ऐकली पाहिजे विधेयक समजून घेण्यासाठी या चर्चांचा उपयोग होत असतो. आजच्या युवकांनी कायद्याविषयी जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.


            विधिमंडळातील सदस्यांना विशेषाधिकार असतात. सभागृहाचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा व परंपरा तसेच सभागृहाचे व सदस्यांचे अधिकार अबाधित रहावे हा हेतू असून सदस्यांना कोणत्याही बाह्यशक्तीच्या दडपणाविना मोकळेपणे कार्य करता यावे, यासाठी विशेषाधिकार असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.


             कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांचा परिचय करुन दिला. तसेच यावळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ.गोऱ्हे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.नेहा कापगते यांनी आभार व्यक्त केले.


००००

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही

 मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही

देवीपाडा, काजूपाडा, केतकीपाडा येथील पाणीपुरवठा

सुरळीत करण्यासाठी मनपा उपाययोजना करेल

- मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती.

            नागपूर,दि.21 : मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आली नाही. बोरीवली (पूर्व) येथील देवीपाडा, काजूपाडा आणि दहिसर (पूर्व) येथील केतकीपाडा परिसराचा बहुतांश भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन हद्दीत अती उंच आणि सखल भागात विभागला आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका तत्काळ उपाययोजना करीत असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.


            देवीपाडा, काजूपाडा आणि केतकीपाडा येथील पाणीपुरवठ्याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना श्री. देसाई बोलत होते.


            श्री. देसाई यांनी सांगितले की. महानगरपालिकेने बोरीवली जलाशयाच्या आउटलेटची डिग्री वाढवून पाण्याचा योग्य दाब वाढविला आहे. यामुळे पाणीपुरवठा योग्य दाबाने होत आहे. काजूपाड्यातील अभिनवनगर, बोरीवली (पूर्व) येथील मनपाच्या नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या आवारात १०० घनमीटरऐवजी १५५ घनमीटर क्षमतेची शोषण टाकी आणि उदंचन संच कार्यान्वित करण्यात आला आहे. देवीपाडा परिसरातही पाणी गळती थांबविण्यासाठी १५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली आहे. शिवाय वन हद्दीतील २५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील झडप शोधून फेरफार करण्यात आले आहेत. यामुळे पाण्याच्या दाबात वाढ झाली असून अती उंच भागात सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने होत आहे.


            हनुमान टेकडी या उंच भागातही वेळेचे नियोजन करून पहाटे ४.४० ते सकाळी ६.३५ दरम्यान दोन तास योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. केतकीपाडा परिसरात काही तांत्रिक बदल करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मुंबईतील नागरिकांना निर्धारित वेळेत आणि योग्य क्षमतेने पाणीपुरवठा मिळण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.


            यावेळी सदस्य सर्वश्री अनिल परब, कपिल पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.


0000

हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप

 हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ.

            नागपूर, दि. २१ : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला.


            विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.


            याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲपची निर्मिती करणाऱ्या सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.


            ‘महा असेंब्ली’ अॅप द्वारे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. या अधिवेशन काळात प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून पुढील काळात नवनवीन सुविधायुक्त असे ॲप उपलब्ध होणार आहे.


            अॅपचे सादरीकरण राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून त्यांनी या संकल्पनेचे व अॅपचे कौतुक केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अॅपचा आढावा घेऊन हे अॅप महत्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली.


            अॅपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल या अॅपच्या निमित्ताने जगासमोर आले आहे.


            अथक परिश्रम घेऊन सेटट्राईबच्या विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसात परिपूर्ण असे अॅप तयार करून ते कार्यान्वित केले असून त्यांना महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे श्री.वाकोडीकर म्हणाले.


००००

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात

अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

            नागपूर, दि. 21 :- पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.


            विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.


            यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार श्री. भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


            यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.


            सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


००००



सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार

 सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूर, दि. 21 :- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देण्यात येईल. मात्र यासाठी निकष ठरवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

            अतिवृष्टी अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांबाबत सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देतांना श्री.फडणवीस बोलत होते. या विषयावरील चर्चेत विरोधीपक्ष नेते अजित पवार, सदस्य सर्वश्री राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, डॉ.संजय कुटे, हसन मुश्रीफ, हरिभाऊ बागडे, श्रीमती यशोमती ठाकूर, यांनी सहभाग घेतला.


            उपमुख्यमंत्री म्हणाले की, ­‘अतिवृष्टीग्रस्त परिसरातील पिकाच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ ने दर ठरवून दिले होते. या दरांनुसार नुकसान भरपाई देण्यात येते. नवीन दर नुकतेच घोषित केले आहेत. एनडीआरएफच्या निकषात सततचा पाऊस ही संकल्पना नाही. तरीही सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आपण मदत दिली आहे. यापुढे सतत पडणाऱ्या पावसामुळे द्याव्या लागणाऱ्या मदतीसाठीचे निकष समितीमार्फत एक महिन्याच्या आत ठरविले जातील.


            विमा कंपन्यांच्या संदर्भात विचारलेल्या एका उपप्रश्नाला उत्तर देतांना श्री. फडणवीस म्हणाले की, विमा कंपनीने किती नफा कमवावा या संदर्भात मर्यादा निश्चित करण्यासाठी नविन धोरण आणणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमेसाठी कमीतकमी एक हजार रुपये किमतीचा मदतीचा धनादेश असावा, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. विमा संबंधी तक्रार निवारणासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            अतिवृष्टीग्रस्त पिकांसाठी अनुदान देण्यासाठी 66 मि.ली. पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा निकष आहे. आतापर्यंत तीन हजार 500 कोटींचे प्रस्ताव आले आहेत. सततचा पाऊस पडणाऱ्या परिसरात मदत देण्याकरिता निकष ठरविण्यासाठी अपर मुख्य सचिव, नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी वरील लक्षवेधी संदर्भात बोलतांना दिली.


0000

लोकराज्यमधील विषय समाज परिवर्तनशील

 लोकराज्यमधील विषय समाज परिवर्तनशील

-डॉ. नीलम गोऱ्हे.

            नागपूर, दि.21 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेल्या 'लोकराज्य' मासिकामधील विषय हे समाज परिवर्तनशील असल्याचे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.


            नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने विधानभवन परिसरात शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लावण्यात आले आहे. या प्रदर्शनास त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अभिजित वंजारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहूल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकार प्रविण टाके, गोंदियाचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, विधानमंडळातील अवर सचिव पुष्पा दळवी यांची उपस्थित होती.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेले 'लोकराज्य' मासिक सामान्य लोकांपर्यंत पोहचणारे एकमेव मासिक आहे. सात दशकांची समृद्ध परंपरा असलेल्या लोकराज्यची व्याप्ती वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामपंचायात स्तरावरील विकासावर आधारित लेख लोकराज्यमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना त्यांनी केली.


            लोकराज्य टीम परिश्रम घेवून विविध विशेषांकाची निर्मिती करत आहे. या प्रदर्शनात 1964 पासूनचे दुर्मिळ अंक ठेवण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशन कालावधीत विधानभवनात येणाऱ्या सर्व स्तरातील लोकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे हे प्रदर्शन असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकराज्य मासिकाच्या वाटचालीस तसेच महासंचालनालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रश्नांना न्याय

 विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय

- माजी मंत्री बाळासाहेब थोरात.

            नागपूर, दि. 21 : “विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात येणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अंतिम आठवडा प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, विविध नियमांन्वये चर्चा, औचित्याचे मुद्दे इत्यादी संसदीय आयुधे अत्यंत महत्त्वाची असून याद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात दोन्ही सभागृहे महत्त्वाची भूमिका बजावतात”, असे माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे सांगितले.


            राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विधान भवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत अभ्यासवर्ग सुरू आहे. त्यामध्ये आज ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर आमदार श्री. थोरात बोलत होते.


            श्री. थोरात म्हणाले की, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिका हे आपल्या लोकशाहीचे स्तंभ आहेत. त्याचबरोबर प्रसिद्धी माध्यमांना आपण चौथा स्तंभ मानतो. कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असते. त्याचबरोबर विधिमंडळात तयार होणारे कायदे हे घटनेला अनुसरून आहेत किंवा नाहीत यावर न्यायपालिकेचे नियंत्रण असते. अशाप्रकारे एकमेकांवर नियंत्रण असणारी आपली राज्यपद्धती आदर्शवत अशी आहे.


            आमदार श्री. थोरात म्हणाले की, विधानसभेतील सदस्य हे फक्त त्यांच्या मतदारसंघापुरतेच प्रश्न न मांडता राज्यातील कोणत्याही भागातील प्रश्न विधिमंडळात मांडू शकतात. सभागृहात राज्यातील सर्व भागांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होते. या प्रश्नांची शासनाला दखल घ्यावी लागते आणि त्यावर कार्यवाही करावी लागते. अधिवेशन काळात शासन यंत्रणेला गती येते, मंत्र्यांनाही राज्याच्या विविध भागांतील अनुषंगिक प्रश्न माहीत होतात. त्यावर चर्चा, वाद-संवाद होत असल्याने सर्वांगीण माहिती घेऊन प्रश्न सोडविले जातात. अशा पद्धतीने लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारी आपली संसदीय पद्धती आहे, असे त्यांनी सांगितले.


            श्री. थोरात म्हणाले की, विधिमंडळात सदस्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विविध संसदीय आयुधांच्याद्वारे व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जाते, त्यातील दोष दूर केले जातात आणि शासन यंत्रणा गतिमान होते. त्यामुळे ही संसदीय आयुधे फार महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर विधिमंडळात विविध समित्या कार्यरत असतात. यामध्ये प्रामुख्याने अंदाज समिती, लोक लेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांचा समावेश आहे. लोकहिताचा एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर या समित्यांद्वारे कामकाज केले जाते. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने या समित्या फार महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.


            यावेळी आमदार लहू कानडे यांनी श्री. थोरात यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिमंडळाचे अवर सचिव सुनील झोरे यांनी केले. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी यशश्री राणे हिने आभार मानले.


००००




Featured post

Lakshvedhi