Monday, 19 December 2022

हिवाळी अधिवेशनात तान्हुल्यासह आल्या आमदार; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक.

 हिवाळी अधिवेशनात तान्हुल्यासह आल्या आमदार;

मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक.

            नागपूर, दि. 19 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार श्रीमती सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.


 


            विधानसभा सदस्य श्रीमती अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या, त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.

            विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे, हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे हा स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.


 

उद्योग निरीक्षक पदासाठीचीसर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 उद्योग निरीक्षक पदासाठीचीसर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.

मुंबई, दि.19 :महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.


 या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ' ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Post Preference / Opting Out' वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 26 डिसेंबर, 2022 रोजी 11.59 (रात्री) वाजेपर्यंत सुरु राहील.


            भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे .


0000

जिवन


 

वन भवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 वन भवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

            नागपूर, दि. 18 : ‘वन भवन’ या वन विभागाच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


            वन विभागाचे सुसज्ज कार्यालय या इमारतीत सुरु करण्यात येत असून नव्या इमारतीत हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या आगमन प्रसंगी वनमंत्री मुनगंटीवार यांनी वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर इमारतीजवळच्या सेल्फी पॉईंटवर तिघा मान्यवरांनी आपले छायाचित्र घेतले. व्याघ्रसंरक्षण दलाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर फित कापून व कोनशीला अनावरण करुन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.


            उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्ट काम करणारा विभाग आहे. राज्यात वनक्षेत्राचा लक्षणीय विस्तार करण्याचे काम या विभागाने केले आहे. या नूतन इमारतीत वन विभागाची सर्व प्रमुख कार्यालये एकाच छताखाली आल्याने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोय झाली आहे.


            या कार्यक्रमास लोकसभा सदस्य खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती मुक्ता कोक्कड्डे विधानसभा सदस्य आ. ॲड.आशीष जयस्वाल, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, नागपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उप वनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा आदी उपस्थित होते.


असे आहे ‘वन भवन’


            ही इमारत नागपूर शहराच्या सिव्हिल लाईन्स भागात ५६२५.०० चौ मी क्षेत्रफळ जागेवर स्थित आहे. इमारतीचे बांधकाम याप्रमाणे- तळमजला-१६९७.७२चौ मी,पहिला मजला -१५४८.१५ चौ मी., दुसरा मजला-९६७.७७ चौ मी, तिसरा मजला ९६७.७७ चौ मी. असे एकूण ५१८१.१९चौ मी बांधकाम आहे. या कामासाठी आतापर्यंत २६कोटी ५ लक्ष ४० हजार रुपये निधी खर्च झाला आहे.ही सुसज्ज इमारत अत्यंत देखणी असून सर्व सोयीने युक्त आहे.या एकाच इमारतीत वन विभागाची २० कार्यालये स्थापित आहेत.याशिवाय महिला कर्मचारी विश्राम कक्ष, वाहन चालक विश्राम कक्ष, उपहार गृह, संगणक नियंत्रण कक्ष इ सुविधा या इमारतीत स्थापित करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या अंतर्गत सजावटीत वन्यजीवांची छायाचित्रे, पेंटींग्ज इ. सुरेख वापर करण्यात आला आहे. या शिवाय वनांच्या संवर्धनासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्रही दर्शनी भागात लावण्यात आले आहे.


०००००



अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे

 अल्पसंख्याक विकास विभागाच्‍या पुस्तिकेचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

            नागपूर, दि. 18 : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अल्पसंख्याक समुदायासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा एकत्रित समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन आज अल्पसंख्याक हक्क दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती.


            यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

वनविभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय

 वनविभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण

            नागपूर, दि. 18 : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वनविभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वनविभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या कार्याचा गौरव आज येथे केला.


            डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात वनविभागाच्या ‘वन भवन­­’ या इमारत उद्घाटन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


             कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोक्कड्डे, आमदार सर्वश्री आशिष जयस्वाल, देवराव होळी, माजी खासदार पद्मश्री विकास महात्मे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी व वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख वाय.एल.पी. राव आदी अधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशात नागपूरच्या ‘झिरो माईल’चे विशेष महत्व असून त्याच्या बाजूला वनभवनाची इमारत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असतात. ही दोन्ही चाके सुरळीतपणे चालल्यास विकास शक्य आहे. मुंबई, ठाणे या भागात अर्बन फॅारेस्ट ही संकल्पना पुढे येत आहे. त्यामुळे प्राणवायू वाढण्यास नक्कीच मदत होईल. कोविडमध्ये प्राणवायूचे महत्व सर्वांनाच कळले आहे. मा. प्रधानमंत्र्याच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आलेल्या समृध्दी महामार्गावर छोटी - मोठी मिळून जवळपास 35 लक्ष झाडे लावण्याचे नियोजन आहे.


            वन्यजीवांना धोका होऊ नये म्हणून या महामार्गावर 100 अंडरपास व ओव्हरपास तयार करण्यात आले आहे. त्यासाठी 350 कोटी रुपये अतिरिक्त खर्च केले आहे.


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा पर्यावरणप्रेमी, संवेदनशील आणि आत्मियतेने काम करणारा दूरदृष्टीचा नेता मंत्रीमंडळात आपला सहकारी आहे. वन विभागात त्यांनी अतिशय तळमळीने काम केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            वनभवन समाधान भवन व्हावे ही अपेक्षा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


वन आणि जीवन यांचा शब्दश: संबंध आहे. वन असेल तेथेच जीवन आहे. देशाच्या हृदयस्थानी असलेल्या ‘झिरो माईल’ येथे वनभवन उभारण्यात आले आहे. या इमारतीमध्ये 14 क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज होणार असून वनभवन हे सेवाभवन व्हावे, अशी अपेक्षा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.


ते पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरात आले असता वनविभागाच्या पहिल्याच कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभली. हे आमचे सौभाग्य आहे. जगातील 193 देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. त्यातील 65 टक्के वाघ भारतात आढळतात. आणि विशेष म्हणजे देशात नागपूर ही टायगर कॅपिटल म्हणून ओळखली जाते. वनभवन ही इमारत जी प्लस फोर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून यावर्षी भारताला जी - 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून या परिषदेमध्ये पर्यावरण हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे नागपूर येथील जी-4 या वनभवनाच्या इमारतीमधून जी-20 ला देशाच्या पर्यावरणाविषयी योग्य माहिती मिळणार असल्याचे वनमंत्री म्हणाले. 


            आई आणि वनराईची सेवा ही मौल्यवान आहे. पृथ्वीच्या 456 कोटी वर्षाच्या इतिहासात अलिकडच्या 100 वर्षात सर्वाधिक उष्णता वाढली आहे. प्रदुषणामुळे मृत्युच्या संख्येत 300 टक्के वाढ झाली असून आपल्या आरोग्याची चिंता करतांना आपल्याला पृथ्वी आणि पर्यावरणाच्या आरोग्याचीसुध्दा चिंता करावी लागणार आहे. मुख्यमंत्री वने, आणि पर्यावरण याबाबत अतिशय संवेदनशील आहेत. जगात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 36 व्या क्रमांकावर आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामात महाराष्ट्र पहिल्या 10 क्रमांकात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले, त्यांनी यापेक्षाही उत्तम कार्य करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वनरक्षक रामदास खोत, प्रफुल फरतोडे, व्ही.व्ही. हलगे यांच्यासह पाच जणांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.


            दीप प्रज्वलन व वृक्ष पुजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार नागपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी मानले.


00000


 



महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन : नागपूर

 महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन : नागपूर

प्रस्तावित विधेयके :- 23 (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त - 12,मंत्रीमंडळ मान्यता सापेक्ष-11)

पटलावरती ठेवावयाचे अध्यादेश -5

 (1) विधानसभा विधेयक -  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग),

 (2) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, 2022 ( सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).

 (3) सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).

  (4) विधानसभा विधेयक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठकवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022, (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगूरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

 (5) विधानसभा विधेयक-  जे.एस.पी.एम. युनिव्हसिर्टी विधेयक, 2022 ( नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग).

 (6) महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा ( विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 ( शिक्षेची तरतूद कमी करण्याबाबत) (गृह विभाग).

 (7) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र औद्योगिक संबंधमहाराष्ट्र कामगार कल्याण निधीमहाराष्ट्र माथाडीहमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण)महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, 2022 (मुख्य अधिनियमातील तुरंगवासाच्या तरतुदीऐवजी दंडाची तरतूद वाढविण्याकरिता) (उद्योगऊर्जा व कामगार).

 (8) विधानपरिषद विधेयक - युनिवर्सल ए. आय. विद्यापीठपुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

 (9) विधानपरिषद विधेयक -  पिंपरी चिंचवड विद्यापीठपुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

 (10) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग).

 (11) विधानसभा विधेयक - उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, 2022 (नगर विकास विभाग)

 (12) विधानसभा विधेयक - महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग).

पटलावर ठेवायचे अध्यादेश

 (1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (तिसरी सुधारणा) अध्यादेश, 2022 (ग्रामविकास विभाग)

 (2) महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश, 2022 (आकस्मिकता निधीमध्ये तात्पुरती वाढ करणेबाबत) (वित्त विभाग)

 (3) महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा अध्यादेश, 2022 ( शेतकन्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).

 (4) मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) अध्यादेश, 2022 ( इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).

(5) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठकवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2022 ( विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगूरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).

00000

Featured post

Lakshvedhi