Saturday, 17 December 2022

सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्येसकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा

 सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्येसकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा

 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 16 : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई - स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.


       मुंबईचा शाश्वत विकास करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या अभियानामध्ये शाळांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार, पी.वेलारासू, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, महानगरपालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, अभियानाचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ.सुभाष दळवी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळांचे सुमारे 1000 मुख्याध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.


       अभियान कालावधीत प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवार स्वच्छता दिवस म्हणून घोषित करण्यात येतील. या दिवशी अभियान भागीदार त्यांच्याशी निगडीत अथवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान राबवतील. अभियान कालावधीत उर्वरित दिवशी स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतील. तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन व मिशन मोडमध्ये स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविणे अशा कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात येईल असे बैठकीत नियोजन करण्यात आले.


       सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, महानगरपालिकेच्या शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक/ माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडवून अभियानाची अंमलबजावणी करतील. सदर अभियान यशस्वी होण्याकरीता आपल्या शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जाईल तसेच महानगरपालिकांचे प्रभाग कार्यालय व शिक्षण विभागाची कार्यालये यांच्याकडून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


०००



रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल

 रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल.

                                                                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            रत्नागिरी, दि. 16 : रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिपूर्ण संकुल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, संचालक डॉ. अभय वाघ, तसेच लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागत होते, परंतु ही अडचण आता दूर झाली आहे. तरुण पिढीला चांगल्या उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ही या शासनाची मुख्य भूमिका आहे. तरुणांना शिक्षणाचा भविष्यात योग्य उपयोग होऊन प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक ते करार व निर्णय शासनामार्फत घेण्यात येत आहेत. थांबलेल्या भरती प्रक्रिया सुरू करून 75 हजार नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शासन औद्योगीकरणाला प्रोत्साहन देत आहे.


उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे या संकुलाबद्दल माझ्या मनात विशेष भावना आहे. मी मागील काळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतो. त्या वेळेला विविध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता उद्योग मंत्री आहे आणि हे संकुल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. विविध मोठ्या उद्योगांच्या बरोबर येथे कौशल्य विकासाचे विविध प्रयोग केले जाणार आहे. येथील स्थानिक विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ लागू नये यासाठी तंत्रशिक्षणाच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. आणि आज या इमारतीच्या रूपाने बरेचशे स्वप्न पूर्ण होत आहे. 


प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ झाला.


अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन नियोजित इमारतीची वैशिष्ट्ये


शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी इमारत बांधकामासाठी रु. ४६ कोटी २१ लाख २१ हजार ३२७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारत तळ मजला अधिक २ मजले अशी आर.सी.सी. बांधकामाची असून मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरींग, सिव्हील व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स, इलेक्टिकल इंजिनियरींग, फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट अशा अभियांत्रिकीच्या ५ शाखांकरिता एकूण ३०० विदयार्थ्यांकरिता ३० वर्गखोल्या शाखांना आवश्यक ३४ प्रयोगशाळा व कार्यशाळा, ग्रंथालय व अभ्यासिका,प्रत्येक मजल्यावर पुरेशी स्त्री व पुरुष प्रसाधनगृहे, उद्वाहने, उपहारगृह व त्याचे स्वयंपाकगृह, विभागप्रमुखांचे कक्ष, प्राचार्य कक्ष, कॅम्पस मुलाखतीकरिता स्वतंत्र कक्ष, समिती कक्ष यांचा समावेश आहे.


यावेळी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


0

नमस्कार

 ✒️ *नियमित नमस्कार केल्‍याने आपल्यातील अहंकार दूर होतो, आणि समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक चांगुलपणा निर्माण होतो..*

*त्यामुळे रोजच सर्वांना शुभेच्छा देत राहणे, नमस्कार देत राहणे हे चांगल्या परिवार निर्माण आणि समाज निर्माणाचे सूत्र आहे ....*


    🙏🏻❤️ *शुभ सकाळ* ❤️🙏🏻

ग्रामपंचायत निवडणूक सुटी

 


Friday, 16 December 2022

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून

 विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून.

          मुंबई, दि. 13 : विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 19 डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

          मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे व खनिकर्म विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते..

          यावेळी 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक 28 डिसेंबर रोजी घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात अंदाजे 21 विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. 


०००

कैलास मानसरोवर यात्रा सुलभ

 


दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत


          मुंबई, दि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 19, मंगळवार 20 व बुधवार 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


          कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समजप्रबोधन करणाऱ्या, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कळसूत्रीकार मीना नाईक यांनी आपल्या सादरीकरणातून बालकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमीने नुकताच पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कोणकोणते विषय हाताळले आहेत, तसेच त्यांची ही कला काय आहे याबाबतची माहिती त्यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


0000

Featured post

Lakshvedhi