Thursday, 15 December 2022

दिलखुलास

 दिलखुलास’ कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव.

डॉ. अनुप कुमार यादव यांची उद्या मुलाखत.

मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शुक्रवार दि. १६ आणि शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.


१८ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन' साजरा करण्यात येतो. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज कसे चालू आहे. तसेच मदरशांच्या आधुनिकीकरणासाठीच्या कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत, अल्पसंख्याक महिला बचतगटांच्या योजना, अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या शैक्षणिक योजना, अल्पसंख्याक बहुलक्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठीच्या योजना, मुलींसाठी वसतिगृह व शिष्यवृत्ती योजना यांची सविस्तर माहिती अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ. यादव यांनी या मुलाखतीत दिली आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


0000

वाणिज्य दुतांची दुसरी वार्षिक परिषद

 वाणिज्य दुतांची दुसरी वार्षिक परिषद


मुंबई, दि. १५ - विविध देशांतील मुंबईतील वाणिज्य दूतांची दुसरी वार्षिक परिषद आज मुंबईत पार पडली. या परिषदेस राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीसह सुमारे २० हून अधिक देशांतील वाणिज्यदूत व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्यातील उद्योगवाढीसह पर्यावरण, द्विराष्ट संबंध आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.


आज मुंबई येथे झालेल्या या परिषदेला मीचल ब्राऊन (ऑस्ट्रेलिया), शमी बाऊकेज (फ्रान्स), यासुकाता फुकाहोरी (जपान), इरिक मॅलमबर्ग (स्वेडन), माईक हँकी (अमेरिका), गुलीमेरो डिवोटो (अर्जेटीना), फ्रँक गिरकेन्स (बेल्जीयम), माईक पॉल (हंगेरी), अहमद झुअेरी युसूफ (मलेशिया), वॅल्सन वेथड (श्रीलंका), अचिम फॅबिग (जर्मनी), तेअरी व्हॅन हेल्डन (नेदरलँड), इको ज्युनोर (इंडोनेशिया) डॅमिक इरझिक (पोलंड), अँड्रीया कौन (साऊथ आफ्रिका), अहमद डेन्क, हुसेन ऐयदीन (तुर्कस्थान) कतारचे वाणिज्य प्रमुख, नार्वेचे राहुल माहेश्वरी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार

 महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार

- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा  

राज्यातील ज्यू वारसा स्थळांचा समावेश करण्यासंदर्भात पर्यटन महामंडळ - इस्त्राईल दरम्यान सहकार्य करार

            मुंबई, दि. 15 : राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.


आज मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात, मुंबईतील इस्राइलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, इस्राइलचे राजकीय दूत अनय जोगळेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


            पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यात अनेक शतकांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य आहे. त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि चालीरिती स्वीकारल्या आहेत. जगभरातील अनेक इस्रायली आणि ज्यू लोक पर्यटनासाठी मुंबईला भेट देतात आणि त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देण्याची इच्छा असते. या उपक्रमाची माहिती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी तसेच यासाठी सर्व परवानग्या देण्यासाठी शासन सहकार्य करेल, या सहकार्यामुळे ज्यू वारसा जपला जाईल आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल


             पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, इरादा पत्रावर झालेल्या स्वाक्षरीमुळे राज्यातील विविध ज्यू वारसा स्थळांचा विकास करणे शक्य होणार आहे. लवकरच इस्राईलचे महावाणिज्यदूत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत जेविश पर्यटन सुरु करण्यात येईल. मुंबई आणि ठाणे येथील सिनेगॉग आणि सिमेट्रिज तसेच पनवेल, पुणे आणि अलिबाग येथील ज्यू वारसा स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात येईल.


इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करणार


कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी म्हणाले की, इस्रायलमध्ये भारतीय ज्यू समुदायांबद्दल आणि महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल जगभरातील ज्यूंमध्ये जागरूकता वाढवण्यास यामुळे मदत होईल. इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी असाच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी, कृपया मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासातील अनय जोगळेकर यांच्याशी ९७६९४७४६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.


पर्यटन पॅकेज बाबत माहिती देणार


एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी म्हणाल्या की, या इरादा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर, मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासाच्या मदतीने स्थानिक ज्यू समुदाय आणि ज्यू स्मारकांमध्ये त्यांच्या इतिहासाची आणि महत्वाची माहिती देणारे फलक लावून एमटीडीसी एक ते तीन दिवसांच्या प्रवासाचे अनेक कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच टूर गाइड आणि हॉटेल्स इत्यादींसह पॅकेज म्हणून ऑफर देखील तयार करण्यात येतील.

कलाकारांच्या कलागुणांना जी-२० परिषदेतील प्रतिनिधींचा प्रतिसाद

 कलाकारांच्या कलागुणांना जी-२० परिषदेतील प्रतिनिधींचा प्रतिसादउद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह.

मुंबई, दि, १५ : जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना राज्यातील अभिजात कला व संस्कृतीची माहिती देणारे स्टॉल परिषदस्थळी उद्योग विभागामार्फत उभारण्यात आले आहेत. या स्टॉलना या सर्व प्रतिनिधींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.


सांताक्रुज येथील हॉटेल ग्रँड हयात येथे जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टॉल्सना मिळणारा प्रतिसाद याविषयी माहिती देताना श्री. कुशवाह बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सहसंचालक सुरेश लोंढे, उपसंचालक संगीता हिवाळे उपस्थित होते.


 श्री. कुशवाह म्हणाले, या स्टॉलमध्ये बिरडी कला, लातूर येथील बंजारा समाजातील विविध दागिने आणि कपडे, कोल्हापूर येथील चांदीचे दागिने आणि कोल्हापुरी चपला, औरंगाबाद येथील हिमरू शाल आणि पैठणी साड्या, सांगली येथील वाद वृंदांचा स्टॉल यांचा समावेश आहे. गेले दोन दिवसापासून जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती देण्यात येत आहे. या प्रतिनिधींकडून देखील अतिशय उत्सुकतेने विविध प्रश्न या कारागीरांना विचारले जात आहेत. तसेच विशेष कौतुकही केले जात आहे.


****

आरोग्यवर्धिनी केंद्र, आभा कार्ड नोंदणीतमहाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार

 आरोग्यवर्धिनी केंद्र, आभा कार्ड नोंदणीतमहाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार


आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले अभिनंदन


            मुंबई, दि. 14 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आभा आरोग्य कार्ड नोंदणी कार्यात केंद्र सरकारने निश्चित केलेले लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल आरोग्य विभागाचा वाराणसी येथे झालेल्या समारंभात गौरव करण्यात आला. याबद्दल आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि पथकाचे अभिनंदन केले आहे. 


            केंद्र सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक आरोग्य कव्हरेज दिनानिमित्त १० आणि ११ डिसेंबर २०२२ रोजी वाराणसीतील इंटरनॅशनल को-ऑपरेशन ॲण्ड कन्वेन्शन सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षासाठी ‘आपल्याला हवे ते जग घडवूया : सर्वांसाठी निरोगी भविष्य’ अशी संकल्पना आहे.


            या समारंभामध्ये नवीन मोहिमेबाबत चर्चा, क्रॉस लर्निंग, आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या प्रमुख आव्हानांवर चर्चा करण्यात आली. आयुष्मान भारत-आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करणे, आभा कार्ड निर्मिती व दूरध्वनीद्वारे आरोग्य सल्ला (टेली-कन्सल्टेशन) या संदर्भात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


            केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विषयी प्रतिबंधात्मक, प्रबोधनात्मक तसेच उपचारात्मक सेवा आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत देण्यात येतात. केंद्र सरकारने डिसेंबर, २०२२ पर्यंत १०,३५६ आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचे लक्ष्य महाराष्ट्राला दिले होते. राज्याने आजपर्यंत ८३३२ उपकेंद्र (२५३ आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश), १८६१ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५७९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, असे एकूण १०,७७२ आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित केले आहेत. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रा. डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


            आयुष्यमान भारत डिजिटल अभियान (ABDM) या योजनेची सुरुवात मा. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली आहे. आभा कार्ड आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा एक भाग असून या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच ‘आभा कार्ड’ तयार करीत आहे.


            राज्यामध्ये आजअखेर सुमारे १.७२ कोटी जनतेचे आभा कार्ड बनविण्यात आले असून २०.१०.२०२२ ते १०.१२.२०२२ या कालावधीमध्ये १८ लाखाहून अधिक जनतेची आभा नोंदणी करण्यात आली आहे. या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवणारे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास गौरविण्यात आले आहे.


            याबद्दल आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी मुंबई येथे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव एन. नवीन सोना, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. नितिन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. प्रकाश पाडवी यांचे अभिनंदन केले.


****



ऑप्टीमिस्ट एशियन आणि ओशेनियननौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन

 ऑप्टीमिस्ट एशियन आणि ओशेनियननौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे उद्घाटन

19 वर्षानंतर भारताला यजमानपद : मुंबईतील गिरगांव चौपाटीतून स्पर्धेला सुरुवात.

            मुंबई, दि. 14 : तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टीमिस्ट एशियन अॅण्ड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. गुरुवार 15 डिसेंबरपासून मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.


            सन 2003 नंतर भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, जपान, श्रीलंका, थायलंड, युएई, बेल्जियम, मॉरिशस, तुर्की, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया या 13 देशांनी सहभाग घेतला आहे. आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सेल ऑप्टीमिस्ट, यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) आणि नॅशनल ऑप्टीमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एनओएए) यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सर्व 10 शर्यती दररोज प्रति फ्लीट जास्तीत जास्त तीन शर्यतींसह आयोजित केल्या जातील. 19 डिसेंबर 2022 रोजी ठाकर्स, चौपाटी, मुंबई येथे स्पर्धेचा समारोप होईल.


            उद्घाटनप्रसंगी से.नि. कॅप्टन अजय नारंग, विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भरत नाट्यम नृत्यकलेचे सादरीकरण करण्यात आले. यादरम्यान स्पर्धेत जगभरातील 13 सहभागी देशातील 105 खलाशी आणि प्रशिक्षकांचा परिचय देण्यात आला. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, उपसचिव सुनील हांजे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कराड-चिपळूण राष्ट्रीय म

 कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे

- मंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई दि 14 : कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे व आवश्यक आहे तेथे डांबरीकरण करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.


            कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज तसेच सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.


            यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग मुंबईचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता धनजंय देशपांडे, एल ॲण्ड टी कंपनीचे परेश वारुळे, रवींद्र मोहिते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विहे घाटातील डांबरीकरण, मल्हार पेठेतील काँक्रिटीकरण, नवसरी येथे डांबरीकरण, नाडे, अडूळ, म्हावशी येथील काँक्रिटीकरणाचे काम आठ दिवसांच्या आत सुरु करुन तातडीने पूर्ण करावे. तसेच पाटण ते संगमनगर धक्का व संगमनगर धक्का ते घाट माथा या रस्त्याचे काम डांबरीकरणातून तातडीने पूर्ण करुन महामार्ग वाहतूक योग्य करावा. तसेच या रस्त्याच्या निविदेची फेर प्रक्रिया लवकर पूर्ण करुन सहा महिन्यांच्या आत काम सुरु करावे. एल ॲण्ड टी कंपनीने या रस्ता कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन गरज पडेल तिथे स्थानिकांच्या मदतीने काम मार्गी लावावे. हे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी समन्वय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.


पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबतचा आढावा


            सातारा पोलिस विभागाकडील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाला हस्तांतरीत करण्याविषयी पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागाने चर्चा करुन याविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा यांच्या शासकीय निवासस्थानासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी योवळी केल्या.


******

Featured post

Lakshvedhi