Wednesday, 14 December 2022

जी-20 प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीची

 

जी-20 प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांचे हॉटेल ताज पॅलेस येथे दिमाखदार आयोजन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची हॉटेल ताज पॅलेस येथे उपस्थिती

 

            मुंबईदि. 13 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जी-20 प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आणि परंपरा दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आज हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जी – 20 परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांतमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

            भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची संकल्पना वसुधैव कुटुंबकम असून जी-20 परिषद 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी-20 च्या प्रतिनिधींना आणि बैठकांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना संपूर्ण वर्षभर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसाचे दर्शन होणार आहे.

            महाराष्ट्राचा संपन्न वारसामहाराष्ट्रातील संस्कृतीमहाराष्ट्रातील वेगवेगळया परंपरावाटचाली आणि प्रगतीची माहिती याबरोबरच राज्यातील सांस्कृतिक कलेची ओळख जी-20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककलांवर आधारीत गेट वे ऑफ इंडिया येथील हॉटेल ताज पॅलेस येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर गेट वे ऑफ इंडियाजवळ विशेष लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी पुणेरी ढोल पथकाने सादरीकरण केले.

            या परिषदेसाठी विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचा वारसासंस्कृती व परंपरा याची माहिती महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यकमातून देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस  महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा याची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.

            गणेश वंदना आणि पुणेरी ढोलच्या माध्यमातून जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय नृत्यापासून सुरुवात करण्यात आली. यानंतर मुंबईची ओळख असलेले कोळी बांधव आणि त्यांचे पारंपरिक वेशातील कोळी नृत्यही सादर करण्यात आले.

            या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी संगीत वाद्यांची जुगलबंदीसुफी नृत्यशास्त्रीय संगीत व लोकगीत यांचे सुरेख सादरीकरण केले. महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती असलेले लावणीगोंधळजोगवा यांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रतिनिधींचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.

            सांस्कृतिक कार्यक्रमानंतर जी-20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी हॉटेल ताज पॅलेसमध्ये खास मेजवानीचा आस्वाद घेतला. यानंतर प्रतिनिधींनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरफटका मारला. उपस्थित सर्व मान्यवरांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित करण्यात आलेल्या लाईट शोचा आनंद घेतला.

            या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धेबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहलराजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरसांस्कृतिक कार्य आणि पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,कायदा व सुव्यवस्था पोलीस सहायुक्त विश्वास नांगरे पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.

00000

वर्षा आंधळे/शैलजा पाटील/ १३ डिसेंबर २०२२

सुप्रभात





 

मुक्ताईनगर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता २६ हजार हेक्टर क्षेत्रास लाभ

 मुक्ताईनगर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता

२६ हजार हेक्टर क्षेत्रास लाभ.

            जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देण्याचा आणि त्यासाठी २२२६ कोटी रुपयाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            इस्लामपूर धरणातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील २१ गावे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील ५३ गावे तसेच संग्रामपूर तालुक्यातील ३० गावे अशी एकूण १०४ गावातील २५ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील ८ हजार २४९ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यातील १७ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. 


            या प्रकल्पासाठी ५९७ हेक्टर जागेपैकी ४५८ हेक्टर भूसंपादन झाले आहे. माती धरणाचे काम ६८ टक्के पूर्ण झाले असून कमांड एरियामध्ये ५ हजार १६२ शेततळी देखील घेण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरु करणारराज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार

 जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरु करणारराज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.

            जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान २०१५-२०१९ या कालावधीत राबविण्यात आले होते व ३९ लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. आता नव्याने सुरु होणाऱ्या या अभियानात येत्या ३ वर्षात सुमारे ५ हजार गावे नव्याने समाविष्ट केली जातील. 


            जलयुक्त शिवार अभियान २२ हजार ५९३ गावात राबविण्यात आले व यामध्ये ६ लाख ३२ हजार ८९६ कामे पूर्ण झाली. तसेच २० हजार ५४४ गावे जल परिपूर्ण झाली. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. तसेच कृषीचे विशेषत: रब्बीतील उत्पादनही वाढले. जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ मध्ये प्रथम टप्प्यातील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे पण अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे तेथे देखील ही कामे लोकसहभागातून करण्यात येतील. 


            या अभियानासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प व आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावे निवडण्यात येतील. गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक राहील. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येईल. 


            पूर्ण झालेल्या योजनांसाठी देखभाल दुरुस्ती परिरक्षण देखील करण्यात येईल. गावांमधील ग्रामस्थांची जलसाक्षरता अभियानाद्धारे जनजागृती देखील करण्यात येईल. पिकाच्या उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणणे त्याचप्रमाणे सामुहिक सिंचन सुविधा निर्माण करणे या व इतर बाबींचा आराखड्यामध्ये समावेश असेल. 


            जलयुक्त शिवार अभियानाच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ३ लाखांपेक्षा अधिकचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येईल. सर्व मृद व जलसंधारण कामाचे मॅपिंग करून नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येतील. 

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार

 

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार.

            राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी व तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या संदर्भात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२२ पासून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवा नियमित करण्याच्या दिनांकापासून सर्व प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळतील. नियमित करण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांनी ५ वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.



Tuesday, 13 December 2022

गर्दी

 


ह्रदय पिळवटून टाकणारी कथा .. रिटायर्ड माणूस

 सेवा-निवृत्ती शाप की वरदान!

   

प्रत्येकाने वाचावी: ह्रदय पिळवटून टाकणारी कथा .. रिटायर्ड माणूस

*जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस!*

  ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे ५८/६० व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.

        नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. 

सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. 

अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा.

 भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 

*ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.*

एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. 

दुपार खायला उठायची 

आणि 

करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. 


मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे

आणि 

तिचा संताप होई. 


सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 


त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो.


 तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.


रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा.


 तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते 


आणि 


जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.


*गरजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं.*


 वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या.


 त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता.


*हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.*


तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय 

आणि 

आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,

ही जाणीव तिला बोचत असावी. 


खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं 

आणि 

व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. 


मुलांची लग्न, *सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ,* तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, 


आणि


 हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, 


पण घरकामाला  काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 


तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि 

समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. 


तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 


*हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला.* 


आणि 

त्या दिवशी ती प्रचंड चिडली.


 कारण 


काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. 


पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला 

आणि 

तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला.


 त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट 

त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला.


 तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. 


तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. 

आणि 

ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, *‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!*


त्याने ऐकलं 

आणि 

निराश होत विचारलं!


 *‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’* तिला वाटलं हा चिडवतोय,


 ती मग आणखीनच चिडली.


 हातवारे करत किंचाळली! *‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’*


 हे ऐकून हा एकदमच शांत झाला.

 तश्याही परिस्थितीत म्हणाला, 

*‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो!* 


हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणा साठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची 

आणि 

मोबदल्यात 

तो तिला 

शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. 


तिच्या मनांत तसं काही नसायचं.


 त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं.


 शेवटी 

तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 


पण

 तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की

 तिची विचार शक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, 

मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि 

तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे 

आणि 

एक दिवस अचानकच 

तो गेला.


 सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.


घरांत धावपळ झाली, 

डॉक्टर आले,

 त्यांनी तपासलं 

आणि 

त्यांच्या प्रथेनुसार 

इंग्रजीत 

‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. 


एकच हलकल्लोळ झाला.


तो मात्र त्याच्या स्वभावा प्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. 


प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. 


‘Before Time असं मरण नको होतं ,असा प्रत्येकाचाच सूर होता.


तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली’ असे लोक म्हणत होते .


 आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ? वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 


*आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही.


* तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.


तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, *काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.*


असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला. 


पण ‘सतत तुझंच कौतुक कसं  करायचं ?’

 म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.


नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, 

मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, 

आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?

’ असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. 


तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेंव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण *‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’* हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 


तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. 


आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. 


'तुझी  उपयोगिता संपायला आलीय' याची जाणीव लोक आडून पाडून  तीला करून देऊ लागले 


आणि

 *नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.*


एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा 

आणि

 सूनही 

थकायला लागले होते.


 त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या 

आणि 

नवी सून 

तिच्याच सासूचं काही करेना,

 तिच्याकडून

 आजेसासू साठी काही अपेक्षा करणं 

तर 

फारच कठीण होतं. 


ती रोज आतल्या आत रडायची.


 ‘देवा, उचल मला’ म्हणून प्रार्थना करायची. 


‘भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून 

तो सुखासुखी निघून गेला’

 म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडून रहायची. 


फारसं आठवायचं नाही 

तिला काही 

आज काल. 


मात्र तिने दिलेले 

शाप 

आणि 

त्याने दिलेले आशीर्वाद,


 प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते....!


‘मेलास तर फारच बरं होईल,


 माझी सुटका होईल.’

 हा

 तिनं त्याला दिलेला

 शाप होता 

की 

आशीर्वाद होता!


 ‘तू मात्र खूप जग, 

शतायुषी हो,’ 

हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता

 का 

शाप होता

 की आशीर्वाद ?

 हे मात्र 

तिला तिचंच कळत नव्हतं....


*मित्रांनो!*


आपलेही 

बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत 

व 

काही निवृत्ती'च्या उबंरठ्यावर आहेत. 


एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा.


*सदरचा लेख कुणी लिहिला ,* *माहित नाही.*  


मात्र लेखकाने लिहीलेले प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, 

असे जरी ग्रहित धरले तरी देखील,

 सदरची घटना सहजासहजी  मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही

 हे निश्चित.


 मात्र 

अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवा निवृत्ती नंतर जर घडत असेल, 

तर 

हे फारच भयानक 

व 

ह्रदयद्रावक चित्र आहे.


  जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस"

        


*हा लेख  रिटायर्ड व्यक्तींनी जरुर जरुर वाचावा.*   

🌹🌹

Featured post

Lakshvedhi