Friday, 9 December 2022

दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत

 दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत

          मुंबई, दि. 9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दिनांक 10 व सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


          अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने ‘अंगणवाडी दत्तक धोरण’ राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी दत्तक धोरण, या धोरणाची अंमलबजावणी, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, तीन ते सहा वर्षातील सुदृढ बालक, निरोगी माता यांना होणारा लाभ, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


००००


 


 



मुंबईत उद्या आयोजित महारोजगार मेळाव्यात८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

 मुंबईत उद्या आयोजित महारोजगार मेळाव्यात८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी


 मेळ्याव्यात सहभागी होण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन.

            मुंबई, दि. ९ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या शनिवारी १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ८ हजार ६०८ इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरी इच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.  


            मेळाव्यामध्ये बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलीटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर, ॲप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ञांमार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी १० वाजता मंत्री श्री. लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.


००००


नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणार

 नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा मुंबई, चेंबूर येथे शुभारंभ.

            मुंबई, दि. 9 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरु आहेत. याचदृष्टीने महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त भव्य महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली.


            कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 9 ते 11 डिसेंबर दरम्यान चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आज सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे अपर आयुक्त किशन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे कार्यकारी संचालक अनिल माथूर, बार्कचे मुख्य वास्तुविशारद श्री.नागराज, पोलिस उपायुक्त अजय बन्सल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            महसूल विभाग गतीमान करताना आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असणार आहे. महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक पुढील आठवड्यात नवी मुंबईत घेण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले. तसेच महसूल विभागासाठी येणाऱ्या काळात याबाबत त्या उपाययोजनांचा अभ्यास करुन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना काळात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोग्य यंत्रणेसोबत काम करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            कोविड महामारीमुळे महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. आता दोन वर्षांनी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजन केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना आपले कला गुण दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धांमुळे पुन्हा नव्याने चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल, असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.


            विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी तीन दिवसीय स्पर्धेमध्ये कोकण विभागातून जवळपास 1600 अधिकारी आणि कर्मचारी सामील झाले असल्याचे सांगितले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात खेळ संस्कृती रुजावी यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.


            कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून तसेच क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आला. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्यांना निरोगी खेळ खेळण्यासाठीची शपथ देण्यात आली. कोकण विभागाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग अशा सात जिल्ह्याच्या क्रीडा पथकांनी यावेळी संचालन केले. या क्रीडा संचलनात पालघर जिल्ह्याला तृतीय, रायगड जिल्ह्याला द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच यानंतर पार पडलेल्या 100 मीटर स्पर्धेतील विजेत्या पुरूष व महिला खेळाडूंना प्रशस्तीपत्र व पदक देऊन क्रीडा मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शुभारंभावेळी सांस्कृतिक फाऊंडेशनने सादर केलेल्या आय लव मुंबई या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले.


००००

राज्य विकास कर्ज 2023 ची 8.63 टक्के दराने 9 जानेवारी रोजी परतफेड.

 राज्य विकास कर्ज 2023 ची 8.63 टक्के दराने

 9 जानेवारी रोजी परतफेड.

              मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.63 टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज 2023 ची परतफेड दि.9 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


            बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.63 टक्के महाराष्ट्र शासन कर्ज, 2023 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. तसेच रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.


            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


           रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाचे सचिव शैला ए यांनी कळविले आहे.


             महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.4 जानेवारी 2013 अनुसार 8.63 टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज, 2023 अदत्त शिल्लक रकमेची दि. 8 जानेवारी 2023 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 9 जानेवारी 2023 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि.9 जानेवारी 2023 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.


            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.

मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’

 मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’ चेपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्घाटन

     मुंबई, दि.९ : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार 'ग्रंथोत्सव २०२२' चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.


            हा ग्रंथोत्सव वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज जवळ कम्युनिटी हॉल येथे होणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार ॲड अनिल परब, ॲड आशिष शेलार, झिशान सिद्दिकी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत.


            दुपारी १२ ते १ या वेळेत 'आनंदयात्रा' या विषयावर प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २ ते ३ या वेळेत दीपाली केळकर यांचा हास्य संजीवनी हा कार्यक्रम होईल. ३ ते ४ या वेळेत उद्योजकता आणि स्टार्टअप विकास या विषयावर प्रा. एस.आर.कस्तुरे यांचे व्याख्यान होईल. दुपारी४ ते ५.३० या वेळेत महेश केळुसकर यांचे २१ भारतीय भाषातील अनुवादित कवितांचे सादरीकरण होणार आहे यामध्ये डॉ.विजय चोरमारे, सतीश सोळांकूरकर, प्रतिभा सराफ, प्रज्ञा दर्भे यांचा सहभाग राहील.


              ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत मुलांसाठी कथाकथन स्पर्धा होणार आहे.सकाळी ११ ते १२ या वेळेत श्याम जोशी यांचे ‘मराठी पुस्तक आणि वाचन संस्कृती’ या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच दु. १२ ते १ या वेळेत 'ब्लॉकचेन तंत्रज्ञान' या विषयावर गौरव सोमवंशी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ३ या वेळेत 'माझा साहित्यप्रवास' या विषयावर डॉ.संगीता बर्वे यांचे व्याख्यान,दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रविण दवणे यांचे 'वाचनाची आनंदयात्रा' यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४ ते ५ या वेळेत 'आर्थिक साक्षरता' या विषयावर प्रफुल्ल वानखेडे यांची सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक राहूल गडपाले हे मुलाखत घेणार आहेत.


           सायंकाळी ५ ते ६.३० वाघूर दिवाळी अंकाचे संपादक नामदेव कोळी, संतोष शेळके, अविनाश सावंत,प्रदीप कोकरे, प्रियांका तुपे, स्वप्नील जाधव, विशाखा विश्वनाथ, काजल बोरस्ते, सचिन शिंदे, संजय पवार यांचे कवि संमेलन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रंथप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले आहे.


००००


 


 



Car tecnology


 

भन्नाट उखाणे


 

Featured post

Lakshvedhi