Saturday, 10 December 2022

समृध्दी महामार्ग जितका प्रवास तितकाच पथकर !

 जितका प्रवास तितकाच पथकर !


नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपुरात होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील पथकराविषयीच्या माहितीपर हा लेख...

समृद्धी महामार्गाच्या निर्मितीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांना अधिकचा पथकर लागेल, असा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र, यातील वस्तुस्थिती अशी आहे की, जेवढा तुम्ही प्रवास कराल, तेवढाच तुम्हाला पथकर भरावा लागणार आहे.


निर्गमन पथकर


             समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्गमन पथकर (एक्झिट टोल). निर्गमन पथकर म्हणजे काय?, तर निर्गमन पथकर म्हणजे बाहेर पडताना देता येणारा कर... याचाच अर्थ तुम्ही जितके अंतर या मार्गावरुन कापले, तितकेच पैसे तुम्हाला द्यावे लागतील. समृद्धी महामार्गाने नागपूर ते मलकापूर असा प्रवास केला, तर मलकापूरपर्यंत जितके अंतर होईल, तितकाच पथकर तुम्हाला द्यावा लागेल, तुमच्याकडून मुंबईपर्यंतच्या प्रवासाचा पथकर वसूल केला जाणार नाही.


पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी) मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. इतर इंटरचेंजेस धरून एकूण 19 नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांकरिता सुमारे 900 रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.


आपत्कालीन व्यवस्था


महामार्गावर अपघात किंवा बिघाड झाल्यास हेल्पलाईन 1800-2332233, 8181818155 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. महामार्गावर ठिकठिकाणी हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित करण्यात येतील. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी रुग्णवाहिकेकरीता 108 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. 15 रुग्णवाहिका, 15 शीघ्र प्रतिसाद वाहने, 122 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.


उद्घाटनानंतर समृद्धी महामार्ग सर्वांसाठी खुला होईल. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा, द्रुतगती महामार्गावर कुठेही वाहने उभी करू नयेत, सीट बेल्टचा वापर करावा, वेग मर्यादेचे पालन करुन वाहनधारकांनी सुरक्षित व गतिमान प्रवासाचा आनंद घ्यावा.

-जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर

*

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 3


महाराष्ट्राची भाग्यरेखा


संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान

समृद्धी महामार्ग विशेष लेख : 1.

 समृद्धी महामार्ग विशेष लेख : 1.

आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग

कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे...यानिमित्त हा विशेष लेख.


             ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. या महामार्गामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त 8 तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी 13 तास लागत होते; आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ कमी होणार आहे.


घोषणा ते पूर्तता


             नागपूर व मुंबई प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करणार, अशी घोषणा केली होती. दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. या यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये आहे. या महामार्गांतर्गत एकूण 1901 कामांपैकी 1787 कामे पूर्ण झाली असून, 114 कामे प्रगतीपथावर आहेत.


वेळेची बचत आणि विकासाचा राजमार्ग


                या महामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या जनतेच्या जीवनात यामुळे मोठे परिवर्तन घडणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन एक वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले. या रस्त्यामुळे रोजगाराची संधी निर्माण होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा राजमार्ग निर्माण होण्यास मदत होईल. प्रवाश्यांच्या आरामासाठी द्रुतगती महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या रस्त्यांमुळे प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होऊन शेतमालाची जलद वाहतूक होण्यास मदत होईल. या भागातील उद्योग आणि उत्पादन केंद्रांची क्षमता वाढेल.


हरित महामार्ग


            या परिसरातील वन्यजीवांना हानी पोहोचू नये यासाठी 100 वन्यजीव मार्ग तयार करण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधकाची सोय करण्यात आली आहे. एक हजारांहून अधिक कृत्रिम शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखांहून अधिक झुडुपे व वेलींचे रोपण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तसेच अपघात झाला, तर तात्काळ मदत मिळावी यासाठी 15 वाहतूक साहाय्य केंद्रे, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी 21 जलद प्रतिसाद वाहने आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमसह 21 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील.


               वाहनांना तत्काळ इंधन मिळावे यासाठी देखील खबरदारी घेण्यात आली आहे. 138.47 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जाईल, 22 जिल्ह्यांना गॅस उपलब्धतेची निश्चिती, वाहन चार्जिंग स्टेशनमुळे ऊर्जा बचत होण्यास मदत होईल. वाहनांना टोल आकारणीसाठी ‘फास्ट टॅग’ प्लाझा निर्माण करण्यात येणार आहे. या प्रवासी वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणींशिवाय सुरक्षित व सुखकर प्रवास व्हावा यासाठी सर्व सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत. दक्षिण कोरिया सरकारशी झालेल्या करारानुसार या मार्गावर अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पुढील दोन वर्षात द्विपक्षीय निधीद्वारे स्थापित करण्याची योजना आहे. ज्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीला देखील शिस्त लावता येईल.


पाच लाख लोकांना रोजगार


          'कृषी समृद्धी केंद्र' म्हणून ओळखल्या जाणा-या नवीन शहरांची उभारणी या मार्गावर केली जात आहे. अशा नवीन शहरांच्या विकासासाठी 18 स्थळे ठरवलेली आहेत. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था आणि आयटी पार्क उभारण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये उभारण्यात आलेले कृषी आधारित उद्योग शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि इतर संधी उपलब्ध करून देतील. या महामार्गामुळे सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.


पर्यटनाला मिळणार चालना


        हा महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी इत्यादी विविध पर्यटन स्थळांना जोडत असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातूनही मालाची जलद वाहतूक करण्यास सुलभ होईल.


             भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात सुवर्ण चतुष्कोनची भूमिका मांडली. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकोता ही शहरे चौपदरी महामार्गानी जोडली गेली आहेत. त्याचेच दृश्य परिणाम आज पहावयास मिळत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जिल्हे जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग.


              राज्यात कार्यक्षम, सुरक्षित, वेळेची बचत करणारी, सर्वांना परवडणारी व सर्वांसाठीची अशी उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळात महाराष्ट्राला वेगवान प्रगतीसाठी राज्यातील जिल्हे जोडणारी, उत्कृष्ट दर्जाची वेगवान वाहतूक व्यवस्था करण्यासाठी ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ मोलाची कामगिरी बजावेल. गतिमान रस्ते विकासातून राज्याच्या विकासाचे शासनाने उचललेले हे पाऊल खूपच आश्वासक आहे.


हा महामार्ग विकासाचा मार्ग ठरेल, या महामार्गालगत राहणाऱ्या जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडून येईल, हे मात्र नक्की !


 



Friday, 9 December 2022

व्यवसायिक अभ्यासक्रम






 

समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा

 समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.


            दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.


            वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीची तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर हे यावेळी उपस्थित होते. तर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपरवार, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, महामेट्रोचे ब्रिजेश दिक्षित आदी यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होत असून आपल्या राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


            यावेळी मुख्य सचिवांनी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असून त्यानंतर खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. या काळात पंतप्रधान श्री. मोदी नागपूर मेट्रोमधून प्रवास करणार असून झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.


            पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी यावेळी होणाऱ्या विविध उपक्रमांचे कोनशिला अनावरण आदी बाबत नागपूर जिल्हा प्रशासन, एमएसआरडीसी, मेट्रो यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.


समृद्धी महामार्गाविषयी:-


            नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे.


             सदर महामार्गास दिनांक २२ डिसेंबर, २०१९ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नाव देण्यात आले आहे.


• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे.


• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८८६१.०२ हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.


• सदर प्रकल्प १६ पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण ८४ बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार हि बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.


सद्यस्थितीत १ ते ११ (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.


पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी ७०१ किमी पैकी ५२० किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै २०२३ पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे

दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत

 दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत

          मुंबई, दि. 9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दिनांक 10 व सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


          अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने ‘अंगणवाडी दत्तक धोरण’ राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी दत्तक धोरण, या धोरणाची अंमलबजावणी, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, तीन ते सहा वर्षातील सुदृढ बालक, निरोगी माता यांना होणारा लाभ, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त, रुबल अग्रवाल यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.


००००


 


 



मुंबईत उद्या आयोजित महारोजगार मेळाव्यात८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी

 मुंबईत उद्या आयोजित महारोजगार मेळाव्यात८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी


 मेळ्याव्यात सहभागी होण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन.

            मुंबई, दि. ९ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या शनिवारी १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ८ हजार ६०८ इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नोकऱ्यांसाठी कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरी इच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.  


            मेळाव्यामध्ये बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलीटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर, ॲप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगार इच्छूक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ञांमार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी १० वाजता मंत्री श्री. लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.


००००


नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणार

 नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा मुंबई, चेंबूर येथे शुभारंभ.

            मुंबई, दि. 9 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरु आहेत. याचदृष्टीने महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त भव्य महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली.


            कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 9 ते 11 डिसेंबर दरम्यान चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आज सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे अपर आयुक्त किशन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे कार्यकारी संचालक अनिल माथूर, बार्कचे मुख्य वास्तुविशारद श्री.नागराज, पोलिस उपायुक्त अजय बन्सल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            महसूल विभाग गतीमान करताना आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असणार आहे. महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक पुढील आठवड्यात नवी मुंबईत घेण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले. तसेच महसूल विभागासाठी येणाऱ्या काळात याबाबत त्या उपाययोजनांचा अभ्यास करुन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना काळात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोग्य यंत्रणेसोबत काम करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            कोविड महामारीमुळे महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. आता दोन वर्षांनी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजन केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना आपले कला गुण दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धांमुळे पुन्हा नव्याने चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल, असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.


            विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी तीन दिवसीय स्पर्धेमध्ये कोकण विभागातून जवळपास 1600 अधिकारी आणि कर्मचारी सामील झाले असल्याचे सांगितले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात खेळ संस्कृती रुजावी यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.


            कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून तसेच क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आला. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्यांना निरोगी खेळ खेळण्यासाठीची शपथ देण्यात आली. कोकण विभागाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग अशा सात जिल्ह्याच्या क्रीडा पथकांनी यावेळी संचालन केले. या क्रीडा संचलनात पालघर जिल्ह्याला तृतीय, रायगड जिल्ह्याला द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच यानंतर पार पडलेल्या 100 मीटर स्पर्धेतील विजेत्या पुरूष व महिला खेळाडूंना प्रशस्तीपत्र व पदक देऊन क्रीडा मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शुभारंभावेळी सांस्कृतिक फाऊंडेशनने सादर केलेल्या आय लव मुंबई या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले.


००००

Featured post

Lakshvedhi