Saturday, 19 November 2022

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना, बाळासाहेब ठाकरे स्मारक,

 औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजना, बाळासाहेब ठाकरे स्मारक,पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यान पुनरूज्जीवनाच्या कामांना गती द्यावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. १८ :- औरंगाबाद शहरासाठीची पाणी पुरवठा योजना, शहरात साकारण्यात येणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक तसेच पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन यांसह जिल्हयातील तसेच पैठण मतदारसंघातील विविध महत्वपूर्ण विकास कामे, प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेसह या सर्व प्रकल्पांना निधी वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सूचना केल्या.


            औरंगाबाद जिल्हा आणि पैठण मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृहातील या बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार सिंघल, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, वित्त विभागाच्या सचिव ए. शैला, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पर्यटन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांड्येय, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.


            औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात यावी. त्यासाठी जायकवाडीच्या जलाशयातील उद्भव विहीरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम लवकरात लवकर पूर्ण करावी. योजनेतील टप्प्याटप्पाने कामांची पुर्तता आणि आवश्यक निधीची मागणी याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने सुरु असलेल्या कामांना वेग द्यावा. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


            औरंगाबाद महापालिकेच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृती वनाच्या कामास गती देण्यात यावी. या ठिकाणच्या पुतळ्याचे अंतिम आरेखन निश्चित करण्यात यावे. हे आरेखन सर्वोत्तम असावे, संग्रहालयात प्रदर्शित करावयाच्या माहितीबाबत तज्ज्ञांची नेमणूक करावी. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणी, माहिती मागवण्यात यावी. महापालिकेने या परिसरातील वनीकरण आणि अन्य कामे वेळेत पूर्ण व्हावीत, याकडे लक्ष पुरवावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.


            पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यानाचे पुनरूज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पुनर्विकास होईपर्यंत ते तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा लोकांसाठी खुले व्हावे यासाठी आवश्यक निधी जलसंपदा विभागास उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. यावेळी जलसंपदा विभागाने या उद्यानाच्या पुनर्विकासाबाबत आंतरराष्ट्रीय सल्लागार नियुक्त केल्याची माहिती दिली. सुमारे १७५ एकरवरील या उद्यानात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा या दृष्टीने पर्यटनेस्थळ साकारण्यात येणार आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी महत्वाचे स्थळ ठरेल, त्यादृष्टीने जलसंपदा, पर्यटन आणि वित्त विभागाने समन्वयाने उद्यानाचे पुनरूज्जीवन आणि पुनर्विकासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


            पैठण येथे महावितरणचे विभागीय कार्यालय तसेच बिडकीन नवीन उपविभागांची निर्मिती, विहामांडवा येथे १३२ केव्ही उपकेंद्र निर्माण करणे, औरंगपूरवाडी, दरकवाडी, रहाटगाव व केकतजळगाव येथील उपकेंद्राच्या उभारणीबाबतही बैठकीत चर्चा झाली.


            पोलीस गृहनिर्माण योजनेतून पोलीस आयुक्तालयासाठी तसेच क्रांती चौक येथे ७८० निवासस्थाने व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) करिता ४०५ निवासस्थाने बांधण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस गृहनिर्माण मंडळाला तातडीने आराखडे तयार करण्याचे, तसेच त्याबाबतचे प्रस्ताव सादर करून या कामांला गती देण्याचे निर्देश दिले. विहामांडवा येथे नवीन पोलीस स्टेशन निर्मितीबाबतही चर्चा झाली.


            संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी साखर आय़ुक्त आणि कामगार आयुक्त यांनी कारखान्याचे जुने व्यवस्थापन, आताचे खासगी व्यवस्थापन तसेच कामगार या तिन्ही घटकांशी चर्चा करावी. यासंदर्भात आवश्यकता भासल्यास सुनावणी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


०००००



 



महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2022

 महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2022 ची 8.90 टक्के दराने परतफेड.

              मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.90 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 19 डिसेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

             महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-11.12/प्र.क्र.18/अर्थोपाय दि.14 डिसेंबर 2012 अनुसार 8.90 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 18 डिसेंबर 2022 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 19 डिसेंबर 2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 19 डिसेंबर 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.


            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.


            तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 8.90 महाराष्ट्र शासन कर्ज, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली" असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.


            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.


            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाचे सचिव शैला ए यांनी कळविले आहे.





 

निवडणूक

 ( मागील पानावरून)तर या प्रश्नाचे उत्तर मतदान का करायचे नाही, यातच सामावले आहे. सैनिक ज्याप्रमाणे देशाचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य समजतो, त्याप्रमाणेच प्रत्येकाने मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावे. चांगले प्रतिनिधी संसदेत/विधानसभेत पाठविण्यासाठी, पुढील पिढीसाठी लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी, बळकट लोकशाही हवी असेल तर मतदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे तरुण वाहन परवाना काढण्यासाठी सजग असतो त्याप्रमाणेच त्याने मतदार यादीत नाव येण्यासाठीही सजग असले पाहिजे.

 

ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध - अर्चना कदम

श्रीमती कदम म्हणाल्या कीमतदार यादीत नाव नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय वापरता येतात. घरबसल्याही ऑनलाईनद्वारे अर्ज करता येतो व त्या अर्जावरील कार्यवाहीची माहितीही मिळते. एनव्हीएसपी वेबसाईटव्होटर पोर्टलपीडब्ल्यूडी ॲप या विविध माध्यमातून अर्ज करता येते. ज्यांच्याकडे राहण्याचा पत्ता नाहीअशा बेघरआदिवासीभटक्या समाजातील नागरिकांना स्वयंघोषणापत्र देऊनही नोंदणीसाठी अर्ज करता येतो. तसेच मतदारसंघाबाहेर कर्तव्यावर असणारेदिव्यांगमतदान केंद्रावर जाऊ न शकणारे 80 वर्षावरील चालू न शकणारे ज्येष्ठ नागरिक यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो.

            श्री. चांडक व श्रीमती घोलप यांनी मतदान नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. तसेच अर्ज नाकारण्याची कारणे आदींची माहिती दिली. सहायक मतदार नोंदणी अधिकारी वृषाली पाटील यांनी आभार व्यक्त केले. मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या 'निवडणूक समजून घेतानाही पुस्तिका मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती नाईक यांना यावेळी भेट दिली.

 

जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला मतदार यादीत नाव नोंदविण्याचा संकल्प

परिसंवादादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे व मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक नेमाणे यालाही मित्रनातेवाईक यांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. शिनगारे यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतःचे नाव नोंदणी करून मित्रसहकारीनातवाईकांनाही मतदार नोंदणी करण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांनीही परिसंवादसत भाग घेऊन मतदार नोंदणी प्रक्रिया समजून घेतली.

 


मतदार नोंदणीसंदर्भातील शंकांची उत्तरेसुदृढ, पारदर्शक

 ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

मतदार नोंदणीसंदर्भातील शंकांची उत्तरेसुदृढ, पारदर्शक व बळकट लोकशाहीसाठीतरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे                                                                - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे.

        ठाणे, दि. 18 (जिमाका) - मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे ... तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या. समृद्ध, सुजाण व बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी श्री. देशपांडे यांनी केले.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि ठाण्यातील के.ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित लोकशाही गप्पा – भाग 7 अंतर्गत ‘कशी होते मतदार नोंदणी’ या परिसंवादात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना घोलप, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोषकुमार सेंद्रे आदी या परिसंवादात सहभागी झाले होते. संवादक प्रणय चव्हाण व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अभिषेक नेमाणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य सुचित्रा नाईक, उपप्राचार्य श्रीमती टोके, महेश पाटील, संदीप पागे, श्री. आठवले आदी उपस्थित होते.


            विशेष पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजे काय, मतदार नोंदणी करणे का आवश्यक आहे, 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आगाऊ मतदार नोंदणी करता येते का अशा अनेक शंकांची उत्तरे यावेळी मान्यवरांनी दिली. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मतदार नोंदणी जनजागृतीविषयी पथनाट्य सादर केले. महाविद्यालयात उभारलेल्या मतदार नोंदणी केंद्राचे उद्घाटन श्री. देशपांडे यांच्या हस्ते झाले.


श्री.देशपांडे म्हणाले की, भारताची लोकशाही व्यवस्था जगातील मोठी लोकशाही आहे. लोकशाही टिकविण्याची व अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या निर्दोष असणे आवश्यक आहे. यादी निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण व अधिक अचूक असावी व कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वंचित, बेघर, तृतीयपंथीय, महिला, युवक अशा घटकांच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत. तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही बळकट कशी होणार. म्हणून तरुणांना, वंचित समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे.


विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती अशी अनेक कामे करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत युवा, बेघर, तृतीयपंथीय, देहविक्रय करणाऱ्या महिला, भटके विमुक्त, वंचित घटकांची मतदार यादीत नोंद करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जाची तपासणीसाठी विशेष यंत्रणा राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुदृढ व बळकट लोकशाहीसाठी या प्रक्रियेत तरुणांना सामावून घेण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये मतदान नोंदणी केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत असून मिम्स, लोकशाहीचा भोंडला अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त युवा वर्गाला मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी, यासाठी वर्षातून चार वेळा आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन 18 वर्षे पूर्ण न झालेल्या तरुणांनाही नाव नोंदविता येणार आहे. मात्र, त्यांच्या नावाचा समावेश 18 वर्षे पूर्ण झाल्यावर यादीत होणार असल्याचेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदार यादीत नाव नोंदवावे– जिल्हाधिकारी श्री. शिनगारे

मतदान का करावे, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर श्री. शिनगारे म्हणाले, आपल्या जाणतेपणा, सुजाणपणाचा भाग असेल तर (पुढील पानावर)

महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन म्हणजेचन्याय मिळवण्यासाठीची पहिली पायरी

 महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन म्हणजेचन्याय मिळवण्यासाठीची पहिली पायरी

- विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. 18 : कायदेविषयक मार्गदर्शन करणे म्हणजेच महिलांना न्याय मिळवण्यासाठी सहाय्य करण्याची पहिली पायरी असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

             सह्याद्री अतिथीगृह येथे कायदेविषयक विनामूल्य सल्ला देणारे केंद्र (Legal Aid Clinic) शुभारंभ कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील लीगल एड क्लिनिकचे लोकार्पण झाले.

        यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रेखा शर्मा, राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आयोगाच्या सदस्य अॅड. संगीता चव्हाण, ॲड. सुप्रदा फातर्पेकर, गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डी. पी. सुराणा उपस्थित होते.

            उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, महिलांचे संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे आहेत. हे कायदे आणि त्याची माहिती सर्व महिलांना होणे गरजेचे आहे. कायद्याचे मराठी भाषेत भाषांतर झाल्यास महिलांना कायदेविषयक ज्ञान मिळण्यास मदत होईल. महिलाविषयक तक्रारी पोलिसांनी संवेदनशीलपणे हाताळल्या पाहिजेत. महिलांचा समाजकारण आणि राजकारणामध्ये सहभाग वाढावा, यासाठी महिलांनी पुढे यावे.

कायदेशीर सल्ला केंद्रामुळे पीडित महिलांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन,

तत्पर मदत मिळण्यास मदत होईल- मंत्री मंगलप्रभात लोढा

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना कायदेविषयक विनामूल्य सल्ला केंद्र (Legal Aid Clinic) हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळण्यास मदत मिळेल. महिलांविषयी प्राप्त तक्रारी शून्य होतील. असे आयोगाच्या माध्यमातून काम करावे.

            राष्ट्रीय महिला आयोगाचे सहकार्य मिळाल्यामुळे राज्यात कायदेविषयक सल्ला विनामूल्य देणारे केंद्र सुरू करत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे. महिला आयोगाने आलेल्या तक्रारी ऑनलाईन घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मंत्री श्री.लोढा यांनी व्यक्त केली.

राज्यांच्या सहकार्यातून गावपातळीपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहोचवणार- रेखा शर्मा

            श्रीमती शर्मा म्हणाल्या की, कायदेशीर सल्ला केंद्र मोफत करून देशभरातील प्रत्येक गावागावात महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. मोफत कायदेशीर सल्ला मिळाल्यामुळे महिलांना एक प्रकारे आपण पाठबळ देणार आहोत. महिलांमध्ये कायदेशीर जनजागृती करणे ही काळाची गरज आहे

महिलांच्या कायदेशीर लढाईत आयोगाची साथ मिळेल- रुपाली चाकणकर

      श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे कौटुंबिक त्रास, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, मालमत्ताविषयक तसेच सामाजिक विषयांशी निगडित विविध तक्रारी घेवून महिला मोठ्या प्रमाणावर येत असतात. आयोगात कार्यरत समुपदेशक अनेक प्रकरणांमध्ये समुपदेशनाने मार्ग काढून महिलांना दिलासा देत असतात. नव्याने सुरू केलेल्या कायदेविषयक विनामूल्य सल्ला केंद्रा (Legal Aid Clinic) मुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना न्यायालयीन प्रक्रियेत सहाय्य मिळणार आहे. महिलांविषयक कायद्यांची माहिती, त्यांचे हक्क, न्यायालयातील प्रक्रियेची माहिती, कागदपत्रे तयार करण्यासाठी तज्ज्ञ वकिलांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष न्यायालयात जाण्यापूर्वी आयोग स्तरावरच महिलेला न्याय मिळावा, यासाठी कायदेविषयक विनामूल्य सल्ला केंद्र प्रयत्नशील राहील.


000

सुवर्ण महालक्ष्मी मंदिर

 


Friday, 18 November 2022

आवर्जून वाचा.

 🔴 आवर्जून वाचा. 🔴


एका लग्ना ला गेलो. जेवणाचा 

तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या . 

पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो..... 


तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .

सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल " 

मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले....... 

अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........


माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला

"सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??

अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले 

" हि तुमची डिश आहे ना ??

" होय, मी परत उत्तरलो .

" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल " 


मी चकित झालो .थोडा राग हि आला . त्याच रागात बोललो

"आहो थोडे राहिले अन्न ?

काय हरकत आहे .

नाही अंदाज आला.

म्हणून काय घरी न्यायचं" ?? 


"रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.

हे मोठ्यांच लग्न आहे .पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच .आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..

होय ,त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....


म्हणून आम्ही हि शक्कल लढवली , हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता "........ का ??? 


कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ?? 

" आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .

 खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय...... 

इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करणाऱ्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल .मेहनत ,इंधन सर्व काही वाचेल . थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......

(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता.... 

एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच.... 

पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...) 

अन्नावाचून, अन्न पिकवता आत्महत्या करतोय.......

#खाऊन माजावे, टाकून नाही..🙏🏻

अन्न हे परब्रम्ह आहे🙏🙏

🙏🌹जय गजानन 🌹🙏

🙏🙏🙏🙏🙏 व्हॉट्सॲप वरून आलेला आहे

Featured post

Lakshvedhi