सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 19 October 2022
शेतकऱ्यांची बरोबरी करणं
शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देवाला सुद्धा शक्य नसतं...
आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं गरजेचं नव्हतं.....काउंटर ला आले अन म्हणाले मटण ताट कितीला आहेत... मी म्हटलं 250रुपयाला.. अन चिकन ताट.. मी म्हटलं 180ला... तो माणूस जरा वेळ बाहेर गेला अन म्हटला नुसता रस्सा अन भाकरी देता का... हो म्हटलं देतो की.. त्यांचीं एकूणचं हालचाल पाहून माणूस काही तरी टेंशन मध्ये असावा किंवा बचत करतं असावा असं मला वाटलं... दोन भाकरी अन रस्सा दया म्हटले... मी रस्सा आणी भाकरी भरायला लागल्यावर मला खूप अस्वस्थ वाटलं... मी त्याबरोबर मटणाची प्लेट पण दिली... ते पाहून त्या माणसानं मला मटणाची प्लेट नको आहो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हटले... मी म्हटलं नसू दया.... घ्या त्यांनी त्या मटणाच्या प्लेट ला अजिबात हात लावला नाही... मला माघारी घेऊन जायला भाग पाडलं...... मी त्यांना परत रस्सा मागितल्यावर रस्यात मटणाचे पीस घालून दिले.. अन त्यांना म्हटलं.. हे रस्यातले पीस आहेत त्यांनी खाल्ले... जेवण करून बडीशेप घेताना मग त्यांना विचारलं.... मी म्हटलं कुठले..काय करता.... त्यांनी गावाचं नावं सांगितले अन म्हटले भाजी इकायला आलो होतो... म्हणलं भाजी चांगल्या रेट मधी जाईल पण 1200रुपये आलं... भूक लागली म्हणून मागच्या दोन हॉटेल वर विचारलं.. तर.. एका हॉटेल वर शाकाहारी जेवणाची थाळी 120रुपयाला सांगितली.... पण तसलं पनीर बिनीर खाऊ वाटतं नाही...... मी त्यांना वरण भात मागितला तर म्हटले 60रुपये.... तुम्ही दोन भाकरी अन रस्सा 50रुपयात देतो म्हटला म्हणून जेवायला बसलोय.......आहो दोनशे अन तीनशे रुपये जेवायला घालवायला तेवढं पैसे नाहीत येत शेतकऱ्याकडे.... दिवाळी आलीय... आता पोरं मोठाली झाल्यात कॉलेज ला जात्यात पाच दहा हजार रुपये खर्च हाय..... या वाचलेल्या दोनशे रुपयात माझं दोन तीन दिवसाचं पेट्रोल भागंल.... कुठ खर्च करतं बसता.... मी म्हटलं येत जावा कधी वाटेल तवा... तवा ते बाबा हसलं अन म्हणालं.. आवं आता कवा दोन महिन्यांनी आमची अन मटणाची गाठ पडायची....
असं म्हणून ते बाहेर गेले.. अन गाडीला अडकवलेल्या पिशवीतून दोन भाजीच्या पेंड्या.. अन चार कोंबडीची अंडी आणून काउंटर वर ठेवली... मी त्यांना पैसे किती झाले ते सांगा म्हटल्यावर ते म्हणाले ... काय रावं साहेब मी नको म्हटलं तर तुम्ही मला मटण रस्यातून आणून दिलंच की..... मला माहिती नाय व्हयं.... आहो शेतकरी आहे मी....नुसतं कोंब फुटलं तर त्याला धान येईल का नाय ओळखणारी मानसं.... तुम्ही माझ्या पोटात दोन घास घातल्यात तर आम्ही तुम्हाला चार घास घालू... फक्त शेतकऱ्याला अजून या जगानं वळखलं नाही....
खरचं आहेत शेतकऱ्याची बरोबरी करायला देवाला सुद्धा जमणार नाही....
मच्छिन्द्र टिंगरे -बारामती
सिल्लोड – सोयगाव मधील जलसंधारण प्रकल्पांच्या
सिल्लोड – सोयगाव मधील जलसंधारण प्रकल्पांच्या सीमानिश्चिती, खोलीकरण, उंची वाढविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी
- कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. १८ : निजामकालीन पाणी वितरण व्यवस्था आणि सिल्लोड व सोयगाव या दोन्ही तालुक्यातील जलसंपदा प्रकल्पाबाबतचा जल आराखडा तसेच प्रकल्पसीमा निश्चितीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ आणि जलसंधारण विभागाला दिले आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा लाभ या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असून सिंचन क्षमता वाढून हे तालुके पाणीदार होणार आहेत.
यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. सत्तार बोलत होते. या बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे, औरंगाबाद जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे आदींची उपस्थिती होती.
सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील अनुक्रमे भराडी, खेळणा, शिवणा, नानेगाव, जंजाळा व खडकपूर्णा या प्रकल्पाच्या दुरुस्तीबरोबरच शिवना आणि भराडी धरणाच्या सीमारेषा निश्चित करुन मार्कींग करण्याची प्रक्रिया नियोजन जलसंपदा विभागाने करावे. खेळणा प्रकल्पाची उंची वाढविण्याची तसेच गाळपेराचा उपसा करुन काढलेला गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जलसंधारणाच्या प्रस्तावांचा शासनाकडे पाठपुरावा करुन सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल. परिणामी शेतीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. दोन्ही तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या सर्व प्रकल्पांची मालमत्ता नोंद घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.
शेतकरी आत्महत्या येतील नियंत्रणात
सिल्लोड - सोयगाव तालुक्यामधील सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले तर हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. त्यामुळे उत्पन्न चांगले येईल, असा विश्वास कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
खोलीकरणाचे दुहेरी फायदे
सिंचन प्रकल्पांचे खोलीकरण केल्यास सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता वाढेल आणि तेथील गाळ शेतकऱ्यांना दिल्यास शेती सुपीक होईल असा दुहेरी लाभ सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा होणार आहे. तसेच या भागातील वाहून जाणारे पाणी प्रकल्पांमध्ये वळविल्यास ते प्रकल्प वेळेत भरून जमिनीची सिंचन क्षमता वाढेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तत्काळ सर्वेक्षण करून काम सुरू करा
सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे पंधरा दिवसात सर्वेक्षण करून तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश कृषिमंत्री सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच वन्य प्राण्यांचा होणारा त्रास कशा पद्धतीने कमी करता येईल या संदर्भात सूचना दिल्या.
आत्महत्यांचा कलंक पुसायचाय......
सिल्लोड -सोयगाव तालुक्यांना लागलेला आत्महत्यांचा कलंक मला पुसायचा आहे. त्यासाठी या भागातील सिंचन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठीच सिंचन प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. उत्पादन क्षमता वाढल्याने शेतकरी आत्महत्या नक्कीच नियंत्रणात येतील. : कृषीमंत्री अब्दुल सत्तार
शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार
शिधाजिन्नस संच रेशनिंग दुकानांवर उपलब्ध होणार
- अन्न, नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. १८ :- राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी आणि रेशनिंग दुकानांवर धान्य घेणाऱ्या लाखो नागरिकांना दिवाळी सणानिमित्त चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. १९ व २० ऑक्टोंबर पर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील व त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
चार वस्तूंचा पुरवठा रेशनिंग दुकानांवर योग्यपध्दतीने होण्याच्या दृष्टीने मंत्री श्री. चव्हाण स्वत: लक्ष घालत असून त्यांनी आज राज्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. दिवाळीपूर्वी चार वस्तूंचा शिधाजिन्नस संच हा पात्र शिधावाटप पत्रिकाधारकांपर्यंत योग्य पद्धतीने लवकरात लवकर कसा वितरीत होईल याचे नियोजन करावे, असे निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी या बैठकीत दिले. या प्रसंगी अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे, उपस्थित होते. तसेच, व्हीसीच्या माध्यमातून सर्व उपायुक्त पुरवठा, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लक्ष, प्राधान्य कुटुंबातील 1.37 कोटी व औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्हयांतील एपीएल (केशरी) मधील सुमारे 9 लक्ष शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण १ कोटी ७१ लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना सदर शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे. सदर शिधाजिन्नस संच पात्र शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे १०० रु. या दिवाळीसाठीच्या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी सणानिमित्त 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तू प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणांवरुन रेशनिंग दुकानांपर्यंत अथवा रेशनिंग गोदामात पोहोचणार आहेत. आणि शिधावाटप धारकांना त्यांचे एकत्रित वितरण केले जाणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधावाटप पत्रिका धारकांना तसेच पात्र एपीएल (केशरी), शेतकरी शिधावाटप पत्रिका धारकांना दिवाळी निमित्त या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली.
ग्रंथोत्सवाचे’ आयोजन
नोव्हेंबर मध्ये दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी प्राथमिक आढावा बैठक घेतली.
मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ साठी जिल्हा समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, शिक्षण उपनिरीक्षक रंजना राव, मनपा शिक्षक ग्रंथालयांच्या ग्रंथपाल साधना कुदळे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद खानोलकर, प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे, कार्यवाह सुनिल कुबल, कार्यवाह उमा नाबर आदी उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथ दिंडी, चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान असे दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच साहित्य जगतातील लेखक, साहित्यिकांच्या ग्रंथसंपदासाठी स्टॅाल उभारले जाणार आहेत. वाचनप्रेमींसाठी ही ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
चौकट :
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. विशेषत: लहान शाळकरी मुलामुलींमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याची आवश्यकता आहे. ई-बुक सुविधाही आता उपलब्ध झाली आहे. काळानुरूप बदलले पाहिजे. प्रत्येकाचे वाचन वाढले पाहिजे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेवून लोकसहभाग वाढवावा. ग्रंथोत्सव हा ‘लोकोत्सव’ व्हावा”, अशा सूचना उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी बैठकीत दिल्या.
०००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




