Wednesday, 19 October 2022

शेतकऱ्यांची बरोबरी करणं

 शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देवाला सुद्धा शक्य नसतं...


आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं गरजेचं नव्हतं.....काउंटर ला आले अन म्हणाले मटण ताट कितीला आहेत... मी म्हटलं 250रुपयाला.. अन चिकन ताट.. मी म्हटलं 180ला... तो माणूस जरा वेळ बाहेर गेला अन म्हटला नुसता रस्सा अन भाकरी देता का... हो म्हटलं देतो की.. त्यांचीं एकूणचं हालचाल पाहून माणूस काही तरी टेंशन मध्ये असावा किंवा बचत करतं असावा असं मला वाटलं... दोन भाकरी अन रस्सा दया म्हटले... मी रस्सा आणी भाकरी भरायला लागल्यावर मला खूप अस्वस्थ वाटलं... मी त्याबरोबर  मटणाची प्लेट पण दिली... ते पाहून त्या माणसानं मला मटणाची प्लेट नको आहो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हटले... मी म्हटलं नसू दया.... घ्या त्यांनी त्या मटणाच्या प्लेट ला अजिबात हात लावला नाही... मला माघारी घेऊन जायला भाग पाडलं...... मी त्यांना परत रस्सा मागितल्यावर रस्यात मटणाचे पीस घालून दिले.. अन त्यांना म्हटलं.. हे रस्यातले पीस आहेत त्यांनी खाल्ले... जेवण करून बडीशेप घेताना मग त्यांना विचारलं.... मी म्हटलं कुठले..काय करता.... त्यांनी गावाचं नावं सांगितले अन म्हटले भाजी इकायला आलो होतो... म्हणलं भाजी चांगल्या रेट मधी जाईल पण 1200रुपये आलं... भूक लागली म्हणून मागच्या दोन हॉटेल वर विचारलं.. तर.. एका हॉटेल वर शाकाहारी जेवणाची थाळी 120रुपयाला सांगितली.... पण तसलं पनीर बिनीर खाऊ वाटतं नाही...... मी त्यांना वरण भात मागितला तर म्हटले 60रुपये.... तुम्ही दोन भाकरी अन रस्सा 50रुपयात देतो म्हटला म्हणून जेवायला बसलोय.......आहो दोनशे अन तीनशे रुपये जेवायला घालवायला तेवढं पैसे नाहीत येत शेतकऱ्याकडे.... दिवाळी आलीय... आता पोरं मोठाली झाल्यात कॉलेज ला जात्यात पाच दहा हजार रुपये खर्च हाय..... या वाचलेल्या दोनशे रुपयात माझं दोन तीन दिवसाचं पेट्रोल भागंल.... कुठ खर्च करतं बसता.... मी म्हटलं येत जावा कधी वाटेल तवा... तवा ते बाबा हसलं अन म्हणालं.. आवं आता कवा दोन महिन्यांनी आमची अन मटणाची गाठ पडायची....

असं म्हणून ते बाहेर गेले.. अन गाडीला अडकवलेल्या पिशवीतून दोन भाजीच्या पेंड्या.. अन चार कोंबडीची अंडी आणून काउंटर वर ठेवली... मी त्यांना पैसे किती झाले ते सांगा म्हटल्यावर ते म्हणाले ... काय रावं साहेब मी नको म्हटलं तर तुम्ही मला मटण रस्यातून आणून दिलंच की..... मला माहिती नाय व्हयं.... आहो शेतकरी आहे मी....नुसतं कोंब फुटलं तर त्याला धान येईल का नाय ओळखणारी मानसं.... तुम्ही माझ्या पोटात दोन घास घातल्यात तर आम्ही तुम्हाला चार घास घालू... फक्त शेतकऱ्याला अजून या जगानं वळखलं नाही....

खरचं आहेत शेतकऱ्याची बरोबरी करायला देवाला सुद्धा जमणार नाही....

मच्छिन्द्र टिंगरे -बारामती

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi