Friday, 14 October 2022

ये जीवन है


 

हजार कोटींच्यारोखे विक्रीची

 महाराष्ट्र शासनाच्या 4 हजार कोटींच्यारोखे विक्रीची अधिसूचना जारी.

            मुंबई, दि. 13 : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 4 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या क्रमांक एलएनएफ.10.19/ प्र.क्र.10/अर्थोपाय दिनांक 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 293 (3) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि.16 मे च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.


            राज्यशासनाच्या सर्व साधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                       


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 18 ऑक्टोबर, 2022 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 18 ऑक्टोबर, 2022 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 19 ऑक्टोबर, 2022 रोजी करण्यात येईल.


            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 19 ऑक्टोबर, 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी दि. 19 ऑक्टोबर 2022 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 19 ऑक्टोबर 2030 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 19 एप्रिल व 19 ऑक्टोबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली.

माता मृत्युदर कमी

 राज्यातील माता मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी प्रयत्न करावे"

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 13 : “सर्वसाधारणपणे डॉक्टर्स एकावेळी एकाच रुग्णाला सेवा देत असतात; परंतु प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ एकावेळी दोन जीवांना आरोग्य व जीवन देण्याचे पुण्यकार्य करीत असतात.

            देशातील माता मृत्युदर प्रति लक्ष १०३ इतका असला तरीही महाराष्ट्रात तो प्रतिलक्ष ३८ इतका कमी आहे. राज्याची या क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय अशीच आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तज्ज्ञांनी हा माता मृत्यू दर आणखी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व त्या दृष्टीने शासनाला सूचना कराव्यात” असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


            महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे गुरुवारी (दि. १३) सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 


            प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या “द असोसिएशन ऑफ ऑबस्टेट्रीक्स अँड गायनाकॉलॉजीकल सोसायटीज (AMOGS)” या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने यावेळी ३७ तज्ज्ञ व डॉक्टरांना 'AMOGS - We for स्त्री' पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


            “भारतात आई, वडील आणि गुरूंनंतर वैद्य - डॉक्टरांना महत्त्व दिले गेले आहे. प्रसूतीमध्ये प्रसूती तज्ज्ञ व परिचारिका आईचे रक्षण व स्वस्थ बाळाला जन्म अशा दोन्ही कामात साहाय्यभूत होऊन उभयतांना नवजीवन देतात. आपले कार्य ही ईश्वरी सेवा मानून केल्यास त्यातून आनंदही मिळतो व यश देखील मिळते”, असे राज्यपालांनी सांगितले.


स्त्रीचा सन्मान जपत प्रसूती सेवा देण्याचा प्रयत्न : डॉ नंदिता पालशेतकर


            “राज्याच्या ग्रामीण आणि सुदूर भागात प्रसुतीपूर्व सेवा देणे आव्हानात्मक काम असून या दृष्टीने प्रस्तृती तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांची 'अमॉग्स' ही संघटना कार्य करीत आहे”, असे संस्थेच्या २०२०-२२ या काळातील अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितले. प्रसूती हा महिलेकरिता सुखद अनुभव असावा या दृष्टीने स्त्रियांचा आत्मसन्मान जपत प्रसूतीसेवा देण्याच्या दृष्टीने संघटना शासनाच्या सहकार्याने 'लक्ष्य मान्यता' हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले   


            यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. हृषिकेश पै, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. आशा दलाल, डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. अमेय पुरंदरे, डॉ. अनि बी, डॉ. आशा दलाल, डॉ. रोहन पालशेतकर आदींचा हस्ते सत्कार करण्यात आला.


            सन २०२२-२४ या वर्षांकरिता संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी तसेच निमंत्रित प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.    


००००



 


Maharashtra Governor felicitates Gynecologists and Obstetricians


 


      Mumbai, 13th Oct : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated 37 eminent gynaecologists and obstetricians from the State for their outstanding work in the area of women's health at a felicitation function held at Raj Bhavan Mumbai.


      The felicitation was organised by the Association of Maharashtra Obstetric and Gynaecological Societies (AMOGS), a state level body having 42 societies from across the State.


      President of AMOGS (2020-22) Dr Nandita Palshetkar, President for (2022-24) Dr Rajendrasinh Pardeshi and gynaecologists and obstetricians were present.


      The Governor felicitated Dr. Hrishikesh Pai, Dr. Shivkumar Utture, Dr Anil Pachnekar, Dr Asha Dalal, Dr Ameya Purandare, Dr Rohan Palshetkar and others on the occasion.


००००



 



देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहती

 देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहती नजीकची ड्रेनेज लाईन बदलावी

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 14 : देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.

            एम.ईस्ट वॉर्ड, गोवंडी (पूर्व) येथे पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी आमदार अबू आझमी,तसेच सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            देवनार बेस्ट कामगार वसाहत मुंबई (पूर्व) येथे गेले ३० वर्षे ड्रेनेज लाईन तसेच इमारतींची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. येथील नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी. या कामामध्ये दिरंगाई करू नये. महाराष्ट्र नगर ते मानखुर्द घाटकोपर येथे पूलाचे बांधकाम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.

            नागरिकांनी २७५ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर ७४ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिल्या.

            'पालकमंत्री आपल्या भेटीला' हा उपक्रम दि. १५ ऑक्टोबर रोजी एच वेस्ट वॉर्ड- वांद्रे पश्च‍िम येथे सकाळी १० वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार करता येतील.

डीपीडीसी’ तून मिळणार मत्स्यव्यवसाय निधी

 डीपीडीसी’ तून मिळणार मत्स्यव्यवसाय विकासाकरिता निधी !

- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई, दि. 14 : मत्स्यबीज निर्मितीकरिता लागणारे साहित्य, प्रजनक साठा व मत्स्यबीजाकरिता खाद्य, संप्रेरके, तलाव व्यवस्थापनाकरिता लागणारे खत, रासायनिक द्रव्ये, जाळे, हापे, मजूरी, सामुग्री पुरवठा, लहान बांधकामे यासाठी आता जिल्हा वार्षिक योजनेमार्फत (डीपीडीसी) निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            या निर्णयामुळे शासकीय मत्स्यबीज केंद्र व संवर्धन केंद्र यामध्ये मत्स्यबीज निर्मिती कार्यक्रम राबविणे शक्य होणार आहे. तसेच याचा फायदा मत्स्य बोटुकली उत्पादनात वाढ होऊन राज्यात मत्स्योत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. यामध्ये मत्स्यबीज निर्मिती करण्यासाठी व केंद्रामधील तलावांचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे साहित्य व सामुग्री जसे प्रजनक साठा व मत्स्यबीजकरिता खाद्य, संप्रेरके, तलाव व्यवस्थापनाकरिता लागणारे खत, रासायनिक द्रव्ये, जाळे, हापे, मजूरी, सामुग्री पुरवठा, लहान बांधकामे यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधी उपलब्ध होणार आहे.

            गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीकरिता योग्य जातीच्या मत्स्यबीजाची वाढती गरज विचारात घेऊन मत्स्यबीजाचे राज्यातील उत्पादन वाढविण्यासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करण्यात आली. सध्या राज्यात एकूण 32 मत्स्यबीज उत्पादन केंद्र, 2 कोळंबी बीज उत्पादन केंद्र, 32 मत्स्यबीज संवर्धन केंद्र आणि 1 कोळंबी बीज संवर्धन केंद्र असे एकूण 67 केंद्र आहेत.

            केंद्राच्या स्थापित उत्पादन क्षमतेनुसार 32 मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून अंदाजे 180.25 कोटी मत्स्यजिरे तयार होऊ शकतात. मत्स्यजिरे संवर्धन करुन 32 मत्स्यबीज संवर्धन केंद्रातून 61.906 कोटी मत्स्यबीज तयार होऊ शकते. या सर्व मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्रामधून अंदाजे 25.25 कोटी मत्स्यबोटुकली तयार होऊ शकते. राज्यातील मत्स्यबोटुकलीची गरज 8209.81 लाख इतकी आहे. सध्या 67 केंद्रापैकी भाडेपट्टीने दिलेली 9 केंद्र वगळता सर्व केंद्र विभागाच्या ताब्यात असून सर्व केंद्राची संरचना जुनी आहे.


वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने

 वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने



मंत्रालयात विविध उपक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुस्तक प्रदर्शनाला भेट

            मुंबई, दि. 14 : वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस दि. 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आजपासून मंत्रालय प्रांगणात मराठी भाषा विभागातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.        

            वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सर ज. जी. उपयोजित महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यात प्रथम क्रमांक सृष्टी चिद्रवार, द्वितीय क्रमांक रोहित कोकरे, तृतीय क्रमांक सोनाली गाभा यांना प्राप्त झाला आहे.

          वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी भाषा विभागाने घेतलेल्या बोधवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतना पेरवी, द्वितीय क्रमांक वैष्णवी राणे तर तृतीय क्रमांक अपेक्षा सोनवणे यांनी पटकवला आहे. त्यांनाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यात आली.

            वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्व संध्येला आज दि. 14 ऑक्टोबर रोजी मंत्रालयीन विभाग व क्षेत्रिय कार्यालय अधिकारी, कर्मचारी यांचे अभिवाचन व काव्यवाचन होणार आहे.

          माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनी उद्या दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.


आलेच me


 

Featured post

Lakshvedhi