Thursday, 22 September 2022

कांदा अनुदान

 लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा अनुदान योजना लागू

 

            बार्शी येथील लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खासगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या खासगी कंपनीला आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्धारे ७ कोटी ४७ लाख रुपये उपलब्ध करून वितरित करण्यात येतील तसेच हे कांदा अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पणन संचालकांमार्फत जमा केले जातील

पोलिसांच्या नैमित्तिक रजा

 पोलिसांच्या नैमित्तिक रजा वाढविल्या

 

            राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा १२ पासून २० इतक्या वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या.  मात्रपोलिसांवरील कामाचा वाढता ताणविविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्तव्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.

--

रेल्वे rute

 वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाला वेग देणार

सुधारित खर्चास मान्यता.

            वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाला वेग देण्यासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या द्वितीय सुधारित खर्चास आणि राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाच्या हिश्श्याचे असतील. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सध्या या रेल्वे मार्गाची केवळ ७ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. सन २०१० या वर्षी प्रकल्पाची किंमत २०० कोटी रु. होती, २०१५ या वर्षी ती ४६९ कोटी रु. झाली. प्रकल्प खर्चात विविध कारणांमुळे वाढ झाली.

            या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा मोबदला त्वरित द्यावा तसेच वन विभागाशी संबंधित मुद्दे तातडीने मार्गी लावावेत असे निर्देशही मंत्रिमंडळाने परिवहन विभागास दिले. दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी २९ कोटी २२ लाख रुपये निधी दिला असून राज्य सरकारने १९ कोटी २२ लाख रुपये इतका निधी दिला आहे.

वसतिगृह

 नाशिक येथील मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडेतत्त्वावर जागा.

            नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाकरिता भाडेतत्त्वावर जागा देण्यासंदर्भात करार करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            नाशिक येथे मुलींचे शासकीय वस‍तीगृह ज्या जागेत आहे त्या जागेतील २४८५ चौरस मीटर क्षेत्र वसतीगृहाच्या म्हणजेच शासनाच्या ताब्यात आहे. या ठिकाणी वसतीगृहाचे जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढे म्हणजेच ११९० चौ. मी. चटईक्षेत्राचे बांधकाम जमीन मालकाने करून द्यावे आणि त्यासाठी शालेय शिक्षण विभागास ५८२ चौ.मी. इतकी जागा कायम स्वरुपी मालकी तत्त्वावर वर्ग करण्यात यावी अशा स्वरुपाच्या काही अटी व शर्ती या करारात असतील.


----

पुनर्निर्माण

 आजारी, डबघाईला आलेल्या संस्थांचे पुनर्निर्माण करणे शक्यराज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीची स्थापना करणार

            राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होईल. 

            केंद्र सरकारकडे नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे. सध्या राज्य शासन विविध संस्थांना जमीन, भागभांडवल, अनुदान, कर्ज हमी देते. त्यांच्या मालमत्ता वेगवेगळ्या कारणास्तव संकटात सापडल्या तर त्यांच्या पुनर्निर्माणात शासनाची भूमिका मर्यादित असते. पर्यायाने शासनाचे म्हणजेच जनतेचे नुकसान होते. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन झाल्यास अशा आजारी व पारदर्शक कारभार न करणाऱ्या संस्थांचे पुनर्निर्माण करणे शक्य होईल. 

            या कंपनीचे भागभांडवल १११ कोटी निश्चित करण्यात आले असून वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव कंपनीचे अध्यक्ष आणि वित्तीय सुधारणा सचिव, व्यवस्थापकीय संचालक, सार्वजनिक उपक्रम सह सचिव संचालक आणि सहकार तसेच वस्त्रोद्याग आणि उद्योग विभागाचे प्रधान सचिव पदसिद्ध संचालक असतील.



Police भरती

 सुधारित

पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने व पारदर्शी व्हावी

            पोलिस भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सध्या पोलिसांच्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यासाठी मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.



पर्यटन

 राज्यातील पर्यटनाच्या बलस्थानांवर काम होणे गरजेचे

- अमिताव भट्टाचार्य.

             मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून, राज्यातील अमूर्त सांस्कृतिक वारसा जाणून घेवून, स्थानिक पर्यटन विषयक बलस्थानांना चालना देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे अशी माहिती कोलकता येथील अमूर्त सांस्कृतिक वारसा क्षेत्रात कार्य करणारे पर्यटन तज्ज्ञ अमिताव भट्टाचार्य यांनी दिली.

            'जागतिक पर्यटन दिन' येत्या 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तर्फे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पर्यटन विषयक चर्चा सत्र आयोजित केले आहेत. त्याअंतर्गत अमूर्त सांस्कृतिक वारसा विषयी दूरदृश्यप्रणालीव्दारे पर्यटन विषयक चर्चा सत्रात अमिताव भट्टाचार्य बोलत होते. या चर्चा सत्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चावरे, आय. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य निश्चित श्रीवास्तव, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील प्रादेशिक व्यवस्थापक, हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, पर्यटन क्षेत्रातील विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            श्री.अमिताव भट्टाचार्य यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून पश्चिम बंगाल व राजस्थान येथे पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. स्थानिक संस्कृतीला पर्यटनाची जोड देवून रोजगारात वाढ करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवता येतात. स्थानिक ठिकाणची पर्यटन विषयक बलस्थाने लक्षात घेवून त्याअनुषंगाने कौशल्यवृद्धी, लघुउद्योगांचे बळकटीकरण, सामाजिक व आर्थिक निकषांचा अभ्यास, स्थानिक कलाकारांची निवड, महिला बचतगटांचे सहाय्य, महिला सबलीकरणाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रमांना देण्यात आलेली बळकटी, परदेशातून पर्यटक येण्यासाठी सुरू करण्यात आलेले पर्यटन महोत्सव याबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना स्थानिक पर्यटन उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची यावेळी सविस्तर माहिती दिली.

          यावेळी प्रास्ताविक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी करून राज्यातील पर्यटन विषयक सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली, तर आभार महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी मानले.



Featured post

Lakshvedhi