Friday, 16 September 2022

सिंचन

 राधानगरी तालुक्यातील 9 सिंचन योजनांच्या खर्चावरील स्थगिती उठविण्याचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राधानगरीतील जलसंपदा- जलसंधारण योजनांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.

            मुंबई, दि. 15 :- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष भौगोलिक परिस्थिती पहाता ९ विविध योजनांच्या कामांसाठी ५८ कोटी रुपये खर्चास दिलेली स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

            मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राधानगरी विधानसभा मतदार संघातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. आमदार प्रकाश आबिटकर यांचेसह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, सचिव (लाभक्षेत्र विकास) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

            महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुमारे 58 कोटी रुपये किंमतीच्या 9 योजनांच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे 347 हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. पालबुद्रुक, नवरसवाडी, पंदीवरे, दुर्गमानवाड इत्यादी भागातील पाझरतलाव, साठवणतलाव, उपसासिंचन योजना, कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधणे आदींसाठी सुमारे 58 कोटी रुपये खर्चावरील स्थगिती उठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            राधानगरी मतदार संघातील 15 उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षण कामांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. तसेच भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटल्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी 45 कोटी रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय उर्वरित 100 कोटींच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावावर सर्वेक्षण करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            कालवे आणि साठवण तलावांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज असून पिण्यासाठी आणि शेतीसाठी लाभ व्हावा याकरिता योग्यप्रकारे पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी जलसंपदा-जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.

00000



उद्योग व रोजगार वाढवण्याकरिता

 उद्योग व रोजगार वाढवण्याकरिता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,

इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर या संस्थेचे मार्गदर्शन महत्त्वाचे

- केंद्रीय मंत्री नारायण राणे

            मुंबई, दि. 15 : राज्यात उद्योग व रोजगार वाढविण्याकरिता महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर या संस्थेचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

            वर्ल्ड ट्रेंड सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषदेत केंद्रीय मंत्री श्री. राणे बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि उद्योजक उपस्थित होते.

            केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चर चे राज्याच्या औद्योगिकरणात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.

            महाराष्ट्र चेंबरची महिला उद्योजिका समिती व युवा उद्योजक समिती ने नवउद्योजक घडविण्यासाठी जे अभियान व धोरण निश्चित केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल व संयुक्तपणे कार्य करेल. महाराष्ट्र चेंबर महिलांसाठी व अन्य क्षेत्रांसाठी क्लस्टर्स उभारणी करत आहे ज्याचा राज्याच्या विकासात मोठा फायदा होईल. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

            देशाच्या विकासात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे बहुमोल योगदान आहे.शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असून उद्योगाला पूरक असे धोरण केंद्र सरकार राबवित आहे. उद्योग क्षेत्राच्या विविध प्रस्ताव व समस्यांसंबंधी 'महाराष्ट्र चेंबर' च्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करू. महाराष्ट्रात नवीन गुंतवणुक व आधुनिक तंत्रज्ञान येण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत बिझनेस कॉन्फरन्स आयोजित केली ही बाब कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात मुंबई येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ट्रेड एक्सपो’ आयोजित केला आहे. यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असेही केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात मोठी गुंतवणूक व रोजगार उपलब्ध करणारे उद्योग आणणार.

 - उद्योग मंत्री उदय सामंत

            राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले,मोठी गुंतवणूक वा मोठा रोजगार उपलब्ध करणारे उद्योग राज्यात आणणार असून महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात भविष्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवीन उद्योजकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मोठे उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संस्थेच्यावतीने ज्याप्रमाणे जिल्ह्यात जाऊन उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो, त्याप्रमाणे शासनही उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. संस्थेच्या उपक्रमासाठी शासनाकडून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यामध्ये उद्योग आणि रोजगार वाढवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी प्रास्ताविक केले. विविध उद्योगात प्रगती करणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या विविध उपक्रमाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000


हेटवणे धरण तुडुंब


 

सतर्क रहा

 हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले : नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

पेण दि.  ( प्रतिनीधी ) पेण तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हेटवणेे धरण 100% भरून ओव्हरफ्लो होत असल्याने या धरणाचे 6  दरवाजे एका फुटांनी उघडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकिनारी व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 पेण तालुक्यातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या हेटवणे पूर्णतः भरले आहे. या धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मागील काही दिवसांपासून पेण तालुक्यात व धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने हेटवणे धरण भरले आहे. त्यामुळे या धरणाचेे 6 दरवाजे 1 फुटांनी उघडले आहे. त्यातुन 120 घन मिटर लिटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे.

  नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहणे गरजेचे आहे. सदचेर दरवाजे केवळ सावधानता बाळगण्याकरिता उघडण्यात आले आहेत अशी माहिती हेटवणे धरणाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जाधव व उपविभागीय अभियंता आकाश ठोंबारे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी खाडी व नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या तरी पूरपरिस्थिती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.

शैक्षणिक साहित्य देवूया





 🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻 शैक्षणिक साहित्य देवूया 

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आमच्या घरी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने साखर चौथीचा गणपती दि. 13/9/2022 रोजी गणपती बाप्पाचे 5 दिवसांसाठी आगमन झाले आहेत. आपण सर्वं दर्शनासाठी आतुरतेने येणार परंतु यावर्षी गणपती दर्शनाला येताना बाप्पाला पेढे, लाडू, मोदक, हार, फुल, फळ न आणता *बाप्पाच्या चरणी शैक्षणिक साहित्य (वही, पेन, पेन्सिल, ई.)* आणलेत तर बरं होईल. या तत्वावर आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद म्हणून हेच शैक्षणिक साहित्य आपण एखाद्या गरीब गरजू किव्वा अनाथ आश्रम मध्ये तीर्थ प्रसाद म्हणून देऊ. यामागे आम्हा हसनबाई मारुती आणि कोळी परिवाराचे एकच उद्दिष्ट आहे की गणपती बाप्पाला हार फुल सर्वच आणतात त्या फुलांचा सुगन्ध 2-3 दिवस राहणार, परंतु आपण जर बुद्धीच्या देवते समोर जर शैक्षणिक साहित्य अर्पण केले तर नक्कीच त्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग गोर गरीब, गरजू आणि अनाथ आश्रमातील मुलांना गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच गोर गरीब अनाथ विद्यार्थ्यांना एक शिक्षणाची मदत होईल.

सर्वांना माझा मनापासून निमंत्रण आहे.

संकल्पना गोर गरीब अनाथ मुला मुलींसाठी असेल तर नक्कीच त्यांच्या हिताचे विचार करणारे सुद्धा महान माणसे या संकल्पनेत पुढाकार घेत असतात.

त्याच प्रमाणे आमच्या हसनबाई मारुती आणि कोळी परिवाराच्या गणपती बाप्पाचे दर्शनाला यायला जमलं नाही म्हणून रायगड जिल्ह्यातून महाड शहरातून माझी मैत्रिण *सौ स्वाती शेट मॅडम* यांनी नवीन संकल्पने नुसार गोर गरीब, अनाथ मुलांसाठी 501 रुपयाची शैक्षणिक साहित्य खरेदी साठी गणपती बाप्पाच्या चरणी मदत अर्पण केली.

नवघर गावातील माजी सरपंच नकुल महादेव कोळी व यांच्या कुटुंबियांने सामाजिक हिताची जाण ठेवून बाप्पाला शैक्षणिक साहित्य अर्पण केले, तसेच रसायनी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. मोहन रोटकर, डॉ. मनाली रोटकर यांचे कुटुंब, श्री.विजय पांडुरंग कोळी, सौ.दर्शना भोईर, तसेच ज्यांना प्रत्यक्षात बाप्पाच्या दर्शनाला येता येत नाहीत परंतु ऑनलाईन दर्शन घेऊन नवीन संकल्पना आवडल्याने घरी बाप्पाच्या चरणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रुपये पाठवून बाप्पाला अर्पण करण्यात आले.

अजून बरेचशे मित्र परिवार आणि आप्टेंष्ठ दर्शनाला येणार आहेत. नक्कीच या संकल्पनेतून 

*निमंत्रक : देवेंद्र मारुती कोळी आणि कोळी परिवार*

दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या

 कविता संघवी यांची मुलाखत

 

             मुंबईदि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर'  या ॲपवरून सोमवार दि. 19 सप्टेंबर व मंगळवार दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुंबईतील चत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी शाळेत राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम याची माहिती दिलखुलास कार्यक्रमात दिली आहे.

00000

लम्पी चर्म रोग बाधित


 लम्पी चर्म रोग बाधित पशुधनाच्याऔषधांचा सर्व खर्च शासन करणार

- राधाकृष्ण विखे पाटील

            पुणे, दि. १६: राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

            पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. डी. डी परकाळे आदी उपस्थित होते.

श्री. विखे पाटील म्हणाले, राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. खाजगी पशुवैद्यकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना निवास व अनुशंगिक व्यवस्था आणि प्रति लसीकरण तीन रूपये प्रमाणे मानधन सुरू करावे. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर भेटी देवून लम्पी चर्म रोगाबाबत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा.

            राज्य शासनाने वेळेत उपाययोजना केल्याने हा आजार नियंत्रणात आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आल्याने देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत या आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले आहे. आजारावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून पाच किलोमीटर परिसरातील पशुधनासोबतच राज्यभरातील पशुधनाचे लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एका दिवसात एक लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येत असून येत्या काळात हा वेग अधिक वाढेल, असा विश्वास श्री. विखे पाटील त्यांनी व्यक्त केला.

            श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, मृत जनावरांसाठी गाय ३० हजार, बैल २५ हजार आणि वासरू १६ हजार याप्रमाणे मदत पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि राज्य पातळीवरील हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवर देखील हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हशींवर या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत नसल्याने म्हशींच्या संदर्भातील केंद्र सरकारची मंजुरी घेऊन बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात येईल. पशुपालकांनी भयभित न होता जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाची लक्षणे आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

            प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी राज्यभरात पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलेल्या औषध पुरवठा व इतर उपाययोजनांची माहिती दिली.

            पशुसंवर्धन आयुक्त श्री. सिंह म्हणाले, शासन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असून पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जनजागृतीवर भर द्यावा. लसमात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून अधिक लसीकरण असलेल्या जिल्ह्यांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येईल.

            या बैठकीस दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi