Thursday, 15 September 2022

सहकारी सूतगिरणी

 सहकारी सूतगिरण्यांचे प्रलंबित प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेणार


वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. 14 : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून सहकारी सूतगिरण्यांना नवसंजिवनी देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या अडचणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

            यावेळी आमदार अमरीशभाई पटेल, राजेंद्र पाटील-यड्रावकर, पी. एन. पाटील, समीर मेघे, कुणाल पाटील, राजू आवळे, प्रताप अडसड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण ढोबळेमाजी आमदार पृथ्वीराज देशमुखवस्त्रोद्योग प्रधान सचिव पराग जैनमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली-उगले, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, संचालक मंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3 प्रमाणे 3 वर्षांकरीता वीज अनुदान व खाजगी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 2 प्रमाणे वीज अनुदान देण्याचा शासनाने यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला होता. सहकारी सूतगिरण्यांची या सवलतीची मुदत संपल्याने मागील 2 वर्षांच्या कोविड पार्श्वभूमी आणि  कापसाच्या किंमतीत झालेली वाढ व त्यामानाने सूत दरात न झालेली वाढ या बाबी लक्षात घेवूनशासन सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3 प्रमाणे सवलत आणखी 1 वर्ष वाढवून देण्याबाबत सकारात्मक आहे. तसेच वस्त्रोद्योग धोरणानुसार 21 डिसेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीची थकीत रुपये 3 प्रती युनिट प्रमाणे ची वीज सवलतीची रक्कम वित्त विभागाशी चर्चा करुन देण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची  माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

            सहकारी सूत गिरण्यांकडे असलेल्या अतिरिक्त जमीन विक्रीस परवानगी देवूनसूतगिरण्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांची जमीन लिलाव पद्धतीने विक्री करण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच सहकारी सूत गिरण्यांनी मागील वर्षात खरेदी केलेल्या कापूस गाठीच्या किंमतीवर 10 टक्के कापूस खरेदी अनुदान मंजूर देण्याबाबत शासन व वस्त्रोद्योग महासंघ यांनी सकारात्मक अहवाल सादर करावा, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

          श्री. पाटील म्हणालेसूत गिरण्यांच्या कर्जाचे शासकीय भाग भांडवलात रुपांतर करण्याबाबत विचार करण्यात येईल तसेच सहकारी सूत गिरण्यांना देण्यात येणारे 45 टक्के भाग भांडवल 1-2 हप्त्यात देण्यात येईल जेणेकरुन नवीन सहकारी सूत गिरण्यां  लवकर सुरु होतील. सहकारी सूतगिरण्यांची प्रकल्प किंमत रुपये 80.90 कोटी  प्रचलित प्रो-रेटा पद्धतीने सुधारित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आजारी सहकारी सूतगिरण्यांना साखर कारखान्यांप्रमाणे वित्तीय संस्थेकडून घ्यावयाच्या कर्जास शासन हमी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच सहकारी सूत गिरण्यांनी प्रती चाती ३ हजार याप्रमाणे वित्तीय संस्थेकडून एनसीडीसी कडून कर्ज घेण्याची मुदत संपली असल्याने सहकारी सूतगिरण्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. यास  मुदतवाढ देण्यात येईल. ज्या सहकारी सूतगिरण्यांनी यापूर्वीच्या कर्जाची परतफेड केली आहे आणि अद्याप कर्ज घेतलेले नाही, अशा सर्व सहकारी सूतगिरण्यांना या योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

बंद दस्त नोंदणी

 बंद दस्तनोंदणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

महसूलमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली

दस्तनोंदणी संदर्भात बैठक. 

            मुंबई, दि. 14 : राज्यात तुकडेबंदी व ग्राम पंचायत हद्दीतील सदनिकांची दस्तनोंदणी बंद असून त्यामुळे सर्वसामान्य सदनिकाधारकांना अडचणी येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी गुंठेवारीतील जाचक अटी दूर होईपर्यंत दस्त नोंदणी त्वरित सुरु करण्याबाबत विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

            आज मंत्रालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, महसूल व नोंदणी खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 मधील कलम 44/1 (i) याला उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारची स्थगिती दिली नसल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन लवकरच दस्त नोंदणी सुरु होईल असे विश्वास दोन्ही मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


             सर्वसामान्यांना कायम स्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी पुढील अधिवेशनात कायद्यात बदल करता येईल का यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सन 2001 च्या गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देताना त्यात जाचक अटी घालण्यात आल्या व दंडाची रक्कम ही अवाजवी आकारण्यात येत असल्यामुळे मनपा किंवा पीएमआरडीए हद्दीत गुंठेवारीची अत्यल्प प्रकरणे प्राप्त झाली. त्यामुळे यातही सुधारणा करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही या बैठकीत सांगितले.


००००

ट्रान्स हार्बर लिंक

 मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्याकामाचीमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

रायगड जिल्ह्यातील चिर्ले परिसरात निर्माण होणार नविन ग्रोथ सेंटर

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 14 : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेणपोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्कटाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतूवर जावून कामाचा आढावा घेतला. यावेळी एम एम आर डी एचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली.

दिवसाला एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा २२ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदूषण विरहित असा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची देखील काळजी घेण्यात आली असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त फ्लेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटात पार करणे शक्य होईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एम टी एच एल प्रकल्प ईस्टर्न फ्री वेला जोडणार

            राज्याच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक वाटा मुंबई महानगर क्षेत्रातून येत असून या भागातील नागरिकांना हा  प्रकल्प फायदेशीर ठरणार आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई - वरळी कोस्टल रोड देखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ओएसडी जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर

            या प्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे. पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बनडायऑक्साईड कमी होणार आहे तीन पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी शिवडी प्रकल्प कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. श्रीनिवास यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.

००००


Wednesday, 14 September 2022

छोटू ची भाकरी


 

राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’

 मत्‍स्यव्‍यवसाय ठेका धोरणात ‘राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’ या तत्‍वाचा समावेश.

मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय, शासन निर्णय निर्गमित.

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणास मदत होणार.

            मुंबई, दि. 14 : सहकार क्षेत्राचे बळकटीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने महामंडळाकडे हस्‍तांतरीत करण्‍यात आलेल्‍या जलाशयावरील स्‍थानिक मच्‍छीमार सहकारी संस्‍थांना प्राधान्‍य देण्‍याच्‍या उद्देशाने ई-निविदा प्रक्रिया करताना ‘राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’ या तत्‍वाचा समावेश करण्‍याचा निर्णय मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.


            या निर्णयाच्‍या अनुषंगाने शासनाच्‍या कृषी व पदुम विभागाने दिनांक १२ सप्‍टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. ई-निविदेद्वारे प्राप्‍त ई-निविदांपैकी तांत्रिकदृष्‍ट्या पात्र निविदाधारकांमध्‍ये स्‍थानिक नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्‍थांचा सहभाग असल्‍यास वाणिज्यिक निविदा उघडल्‍यानंतर ज्‍या निविदाधारकांचा ठेका रकमेचा दर सर्वात उच्‍चतम असेल त्‍या रकमेत २० टक्‍के सवलत देऊन जर स्‍थानिक मच्छिमार संस्‍था ठेका घेण्‍यास तयार असेल तर त्‍या संस्‍थेस प्रथम प्राधान्‍य देण्‍यात यावे. तसेच एकापेक्षा जास्‍त स्‍थानिक मच्छिमार संस्‍था तांत्रिकदृष्‍ट्या पात्र असतील तर त्‍यापैकी ज्‍या संस्‍थांची ठेका रक्‍कम जास्‍तीची असेल त्‍या संस्‍थेचा विचार प्रथम करण्‍यात यावा असा निर्णय देखील घेण्‍यात आला आहे.


            महाराष्‍ट्र मत्‍स्‍योद्योग विकास महामंडळाकडे मासेमारी हक्‍क हस्‍तांतरीत केलेल्‍या जलाशयांमध्‍ये मासेमारी करण्‍याकरिता ई-निविदेने ठेका देण्‍याबाबतची कार्यवाही करण्‍यास दिनांक ३ जुलै २०१९ च्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. राज्‍यातील विविध मच्छिमार सहकारी संस्‍थांकडून ई-निविदा प्रक्रियेमध्‍ये प्राधान्‍य मिळावे, अशी मागणी मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे करण्‍यात आली होती. त्‍याअनुषंगाने २५ ऑगस्‍ट २०२२ रोजी मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठकही आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्‍या निर्णयाच्‍या अनुषंगाने १२ सप्‍टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आला आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्राचे बळकटीकरण होण्‍यास मोठी मदत होणार आहे.


००००

उलेखनिय कामगिरी

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या

उल्लेखनीय कामगिरीचा होणार गुरुवारी गौरव

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.

            मुंबई, दि. 14 : राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव समारंभ तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या १५ सप्टेंबर रोजी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

            विकासाचे भगिरथ भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन “राष्ट्रीय अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता षण्मुखानंद सभागृह, सायन येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांचे या कार्यशाळेमध्ये मागदर्शन होणार आहे. तसेच, या प्रसंगी विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्तीच्या अनुषंगाने करावयाच्या अधिक सक्षम उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करणे व रस्ते, पूल बांधणी यामध्ये नवीन साहित्य, व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करणे, शासकीय जमीनींवर नवीन प्रकल्प उभारणे त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहांचा सुयोग्य वापर करणे, विभागाचे संगणीकरण अद्ययावत करणे, तसेच रस्ते व इमारती यांची देखभाल दुरुस्ती व नवीन कामांसदर्भात कृति आराखडा तयार करणे आणि विभागाच्या सर्व कामांची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना करणे आदी सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे.

            तसेच, सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील विभागाच्या उत्कृष्ट अभियंत्यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते गौरव होणार आहे. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. तसेच, या प्रसंगी सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे, सचिव (इमारती) प्र.द.नवघरे, मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे सचिव सु.अ.वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे सचिव खं.तु.पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक अ.ब.गायकवाड, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे र.रा.हांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

            या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागातील पुरस्कारप्राप्त अभियंत्यांचे मनोगत तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती, मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी दिली आहे.



रोजगार

 अडचणीतील सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने

सुरू राहण्यासाठी शासन सहकार्य करणार

- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई दि. 14 : कृषीक्षेत्रानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. परंतु राज्यातील अनेक सूतगिरण्या आणि यंत्रमाग अडचणीत आहेत. त्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शासन सहकार्य करेल असे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शितल उगले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. पाटील म्हणाले, राज्यातील सूतगिरण्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहेत. काही बंद आहेत तर काही बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या सर्व सूतगिरण्यांबाबत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत. यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत प्रत्येक सूतगिरणी नुसार विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या सूतगिरण्या सुरू राहतील यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे श्री. पाटील यांनी सांगून टेक्सटाईल पार्क संदर्भात आढावा घेतला. काही टेक्सटाईल पार्कला भेट देऊन पाहणी करण्यात येईल त्यांच्या अडचणी समजून घेण्यात येतील, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000



Featured post

Lakshvedhi