Wednesday, 14 September 2022

उलेखनिय कामगिरी

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या

उल्लेखनीय कामगिरीचा होणार गुरुवारी गौरव

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.

            मुंबई, दि. 14 : राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा गौरव समारंभ तसेच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या १५ सप्टेंबर रोजी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

            विकासाचे भगिरथ भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन “राष्ट्रीय अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता षण्मुखानंद सभागृह, सायन येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांचे या कार्यशाळेमध्ये मागदर्शन होणार आहे. तसेच, या प्रसंगी विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्तीच्या अनुषंगाने करावयाच्या अधिक सक्षम उपाययोजना, नाविन्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करणे व रस्ते, पूल बांधणी यामध्ये नवीन साहित्य, व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करणे, शासकीय जमीनींवर नवीन प्रकल्प उभारणे त्याचप्रमाणे शासकीय विश्रामगृहांचा सुयोग्य वापर करणे, विभागाचे संगणीकरण अद्ययावत करणे, तसेच रस्ते व इमारती यांची देखभाल दुरुस्ती व नवीन कामांसदर्भात कृति आराखडा तयार करणे आणि विभागाच्या सर्व कामांची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना करणे आदी सर्व बाबींवर सविस्तर चर्चा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे.

            तसेच, सन २०१४ ते २०१९ या कालावधीतील विभागाच्या उत्कृष्ट अभियंत्यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते गौरव होणार आहे. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे. तसेच, या प्रसंगी सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे, सचिव (इमारती) प्र.द.नवघरे, मुंबई प्रदेश प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे सचिव सु.अ.वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे सचिव खं.तु.पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक अ.ब.गायकवाड, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे र.रा.हांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

            या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागातील पुरस्कारप्राप्त अभियंत्यांचे मनोगत तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती, मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी दिली आहे.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi