Tuesday, 13 September 2022

समता चळवळ

 डॉ. आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवजसामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ !

- धम्मज्योति गजभिये.

            मुंबई / पुणे, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग परिषदांचा ऐतिहासिक दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीसाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदांच्या संशोधन व संकलनाच्या अनुषंगाने महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची पहिली बैठक दि.7 सप्टेंबर रोजी बार्टीच्या मुख्यालयात झाली. या बैठकीला निबंधक तथा विभाग प्रमुख इंदिरा अस्वार, विभागप्रमुख तथा जात पडताळणी अध्यक्ष डॉ.ज्योत्स्ना पडियार, उपायुक्त तथा विभागप्रमुख उमेश सोनवणे, विभागप्रमुख विस्तार व सेवा डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड, प्रकल्प अधिकारी रजनी वाघ उपस्थित होते.

            श्री. गजभिये म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेल्या विविध समाजाच्या परिषदांविषयी पाहिजे तसे संशोधन न झाल्यामुळे बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती त्या त्या समाजापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे खरा इतिहास समोर आला नाही. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने कार्य केले. अनेकांनी बलिदान देखील दिले, या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नातून आंबेडकरी चळवळ गतिमान व सर्वव्यापी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या उत्थानासाठी ज्या परिषदा आयोजित केल्या त्याचे संशोधन करून दस्तऐवजीकरण झाल्यास येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अनमोल ठेवा असेल.

मातंग परिषदांच्या अभ्यासासाठी समिती गठित

            डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या 13 मातंग परिषदा शोधून काढणे, त्यांचे संशोधन, संकलन करून ग्रंथरूपाने प्रकाशित व्हावे यासाठी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सूचनेवरून निबंधक तथा संशोधन विभागप्रमुख इंदिरा अस्वार यांनी महाराष्ट्रातील तज्ज्ञ अभ्यासकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि 13 मातंग परिषद अभ्यास समिती गठित केली. या समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून प्रसिद्ध विचारवंत रमेश राक्षे (पुणे),इतिहास संशोधक डॉ.संभाजी बिरांजे (कोल्हापूर), समाजशास्त्र अभ्यासक प्रा.डॉ.सुरेश वाघमारे (लातूर) आणि साहित्यिक प्रा.डॉ.विजयकुमार कुमठेकर (जालना) हे असून या समितीचे सदस्य सचिव डॉ.प्रेम हनवते (संशोधन अधिकारी बार्टी) हे आहेत.

००००



सहकार विभाग

  

राज्याचे सहकार विभागाचे काम देशात पथदर्शक ठरेल

- सहकार मंत्री अतुल सावे

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण

 योजनेची राज्यात होणार अंमलबजावणी

 

            मुंबईदि. 12 : केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेमुळेराज्यातील 12 हजार  प्राथमिक कृषी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थाचे कामकाज अधिक गतिमानपारदर्शक व उत्तरदायी होवून संगणकीय माहितीमध्ये अधिक सुलभता येईलया योजनेतील कामामध्ये महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात देशात पथदर्शी ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

         आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण या योजनेच्या राज्यात अंमलबजावणीस मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सहकार मंत्री श्री. सावे बोलत होते.

         राज्यातील  शेती कर्ज पुरवठा करण्यात सहकारी संस्थांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असून राज्यजिल्हा व गाव पातळीवरील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व २० हजार ९८६ कृषी पतपुरवठा सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी १२ हजार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची निवड करण्यात येणार असून या सहकारी संस्थाची कार्यक्षमता वाढविणेउत्तरदायित्व वाढवून कामामध्ये पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला अधिक बळकट करता येईल. हा प्रकल्प सन २०२२ - २३ ते २०२६ - २७ या पाच वर्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

      या योजनेसाठी राज्याच्या हिश्याची १५६ कोटी ५५ लाख रक्कम २०२२ - २३ ते २०२४ - २५ या तीन वर्षात उपलब्ध करून देण्यास आणि त्यासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ५१ कोटी ८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. नाबार्डच्या पुढाकाराने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तथापि, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना संलग्न असलेल्या बहुतांश कृषी पतपुरवठा सहकारी संस्थामध्ये अद्यापही संगणक प्रणाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सभासदांना विविध प्रकारच्या सेवा सक्षमपणे पुरविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरेल.

       या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे.

0000

आंतरमहाविद्यालयीन नाट्य

 आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन

कलाविष्कारही ईश्वराची अर्चना समजून सादर करा

-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 12 : विविध कला सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ईश्वरी कार्य आहे. कलाकार मंडळींनी कलाविष्काराचे सादरीकरण ईश्वराची अर्चना समजूनच करावेअसे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            ईप्टाच्या 49 व्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार बोलत होते. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडेपुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गेइंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाट्य संघाच्या अध्यक्ष सुलभा आर्याजनरल सेक्रेटरी मसुद अख्तर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तवरमेश तलवारसचिन निंबाळकर यांच्यासह या नाट्य स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी  यावेळी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेकला अविष्कार सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे कठीण काम कलाकार मंडळी करतात. कोणत्याही कलाकाराला आपण सादर केलेल्या कलेतून आनंद मिळाला तरच त्याची कला सगळ्यांपर्यंत पोहचेल. हे ईश्वरी कार्य करणाऱ्या कलाकारांचे स्थान समाजात अग्रस्थानी आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आजच्या या नवीन कलाकारांनी आपापल्या कलेत स्वतःला वाहून घेऊन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाट्य संघ गेले अनेक वर्षे नाट्य स्पर्धा आयोजित करून नवीन कलाकार तयार करीत आहे याचा आनंद आहे. सांस्कृतिक कार्य विभाग अशा संस्थांच्या मागे उभा असून भविष्यातील उपक्रमांना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

०००

स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास

 स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास मातृभाषेतून प्राधान्याने उपलब्ध करणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबई, दि. 12 : स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास वाचकांना मातृभाषेतून उपलब्ध झाल्यास तो अधिक लोकांपर्यत पोहचण्यास मदत होईल. त्यामुळे लोकार्पण करण्यात आलेले साहित्य मराठीत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

            ‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड’ - 1 ते 13 या मोबाईल ॲपचे लोकार्पण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दर्शनिका विभागाने दुर्मिळ साहित्य मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध केले आहे याचा आनंद आहे. कारण या अॅपमुळे हे साहित्य आपल्या मोबाइलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपण कितीही पुढे जात असलो तरी आपला इतिहास आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि हा इतिहास वाचण्यासाठी जर मातृभाषेतून उपलब्ध असेल तर ते आजच्या तरुणाईपर्यंत सहज पोहचू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकार्पण करण्यात आलेले साहित्य लवकरच मराठीत भाषांतरित करण्यात येणार आहे, असेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, मवाळवादी, जहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यचळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजाव आंदोलन या सर्व महत्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.दर्शनिका विभागाकडून विविध ग्रंथ प्रकाशित करण्यात येतात. या सर्व प्रकाशित ग्रंथांच्या ई आवृत्ती सीडी स्वरुपात तर काही पेन ड्राईव्ह स्वरुपात उपलब्ध आहेत. सर्व ग्रंथ मोबाईल ॲप, संकेतस्थळ याबरोबरच केंद्र शासनाच्या इंडियन कल्चर पोर्टलवरुन अभ्यासकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

कलाकार करतात हास्यदानाचे ईश्वरी कार्य

            कलाकार कला सादर करताना आपल्यासमोर बसलेल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करतात. कलाकारांमुळे सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचे काम होत असून रक्तदान, अन्नदान याप्रमाणे हास्यदानाचे ईश्वरी कार्य कलाकार करत असून या कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग उभा असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक गीतरचनेवर “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम

            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचनेवर आधारित “यशोयुताम् वंदे” कार्यक्रम या लोकार्पण सोहळ्यादरम्यान पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अज्ञात पैलूवर आणि मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील निवडक रचनेवर आधारीत “यशोयुताम् वंदे” कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले.

००००



 

एम्पोरियमला भेट.

 विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट.

            नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्ग स्थित विविध राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली आणि राज्यांच्या हस्तकला व त्यांचे प्रदर्शन-विक्री विषयीही माहिती जाणून घेतली.

           श्री. झिरवाळ यांनी आज येथील कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्गवरील स्टेट एम्पोरिया बिल्डींगमध्ये विविध राज्यांच्या कारागिरांच्या हस्तकलांचे दालन असणाऱ्या राज्यांच्या एम्पोरियमला भेट दिली. 

             श्री. झिरवाळ यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या मऱ्हाटी एम्पोरियमला भेट दिली. महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाच्यावतीने येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या राज्याच्या वैशिष्टयपूर्ण हस्तकलांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यांनतर श्री झिरवाळ यांनी अनुक्रमे जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि खादी इंडिया एम्पोरियमला भेट देवून हस्तकला वस्तुंची माहिती जाणून घेतली. सरकारच्या ट्राईब्स इंडिया या एम्पोरियमला भेट देवून त्यांनी येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध राज्यांतील आदिवासींच्या हस्तकलांची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

            दरम्यान, श्री. झिरवाळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.

000000

रशिया दौरा

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौर्‍यावर रवाना

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पणतैलचित्राचे अनावरण

 

            मुंबई१३ सप्टेंबर:-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौर्‍यावर रवाना झाले.भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे हे सुद्धा या दौर्‍यात सहभागीआहेत.

            या दौर्‍यात आजदि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे रशियातील भारतीय समुदायासोबत एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधतील. दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरमॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे ते लोकार्पण करतीलतर त्याचदिवशी सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दुतावासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करतील. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद  लोमोनोसोव्ह मॉस्को युनिव्हर्सिटीद इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडिज ऑफ द रशियन अ‍ॅकडमी ऑफ सायन्सरशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीजपुश्किन रशियन लँगवेज इन्स्टिट्युटसेंट पिटसबर्ग युनिव्हर्सिटी अशा अनेक संस्था या आयोजनात सहभागी आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवभारत-रशिया संबंधांची ७५ वर्षे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभावअसे सर्व योग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबत सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौर्‍यात भेटीगाठी होणार आहेत.

            यापूर्वी लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकजपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते. आता अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियात होत असल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा गौरवाचा विषय आहे आणि त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

0000

पाऊले चालती


 

Featured post

Lakshvedhi