Tuesday, 30 August 2022

पुरस्कार

 महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान.

          नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

              बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

                  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

हॉस्पिटल उभारणी

 सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनीघेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट.

          मुंबई, दि. 29 : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली.

          यावेळी सिक्कीमचे पर्यटन मंत्री बी. एस. पंत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

          सिक्कीम राज्यातील अनेक रुग्ण मुंबईत उपचारासाठी येत असतात, या रुग्णांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी सिक्कीम सरकारच्या वतीने नवी मुंबईत 'सुस्वास्थ्य भवन' बांधण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

०००

सुविधा

 पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना

जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

          मुंबई, दि. 29 : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

          देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

          अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, धावणाऱ्या 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

००००



 



उद्योग

 इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उद्योग वाढीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

          मुंबई दि. 29 : मागास भागांत रोजगार निर्मिती व्हावी यासाठी उद्योग वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

          इंडोरामा कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर येथे वस्त्रोद्योग असून सुमारे दोन लाख कोटी रूपयांची उलाढाल आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. आगामी तीन ते चार वर्षांत टप्प्या-टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.

          सह्याद्री अतिथीगृह येथे या भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळात इंडोरामाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल लोहीया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुधिंद्र राव यांचा समावेश होता. श्री लोहीया यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मरणचिन्ह देऊन सन्मानित केले.

००००



पुरस्कार

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन.

          मुंबई, दि. 29 :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

          बीड जिल्ह्यातील दामु नाईक तांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष 2022 साठीचे हे पुरस्कार पटकावले आहे.

          'या शिक्षकांची कामगिरी राज्याच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव वाढविणारी आहे. या तिघांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारे ठरेल. यासाठी या सर्वांचा अभिमान आहे. तिघांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा' असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

000



मेट्रो

 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-३ ची यशस्वी चाचणी

मेट्रो ३ प्रकल्प पर्यावरण पूरक ठरेल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 30 :“ राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने जीवन वाहिनी ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारिपुत नगर, आरे कॉलनी येथे झाला. यावेळी आमदार दिलीप लांडे, अतुल भातखळकर, जपान सरकारचे डेप्युटी कौन्सुल जनरल तोशीहिरो कानेको, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “राज्य शासन सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची वरदळ कमी होईल. याप्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल. ”

            ज्या राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असते तेथील नागरिक त्याचा वापर करतात, पर्यायाने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होते असे सांगून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सुद्धा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार असून लवकरच या मार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे,” असे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाठीशी असून राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करू,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रो ३ च्या यशस्वी चाचणीसाठी त्यांनी श्रीमती अश्विनी भिडे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मेट्रो 3 च्या पूर्णत्वाने आत्मीय समाधान लाभेल - देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची जीवनवाहिनी बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली आहे. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ 80 दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, ” असे त्यांनी सांगितले. “हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊन या प्रकल्पाला परवानगी दिली असल्याने पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, ”असे त्यांनी सांगितले.

            मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रास्ताविकाद्वारे मेट्रो 3 ची वैशिष्टे सांगून डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

मुंबई मेट्रो मार्ग 3 (कुलाबा- बांद्रा-सिप्झ कॉरिडॉर) रेल्वे गाड्यांची ठळक वैशिष्ट्ये

· मुंबई मेट्रो मार्ग -3 च्या रेल्वे गाड्या 8 डब्यांच्या असतील. 75% Motorisation मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.

· रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30 टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.

· एका गाडीतून अंदाजे 2400 प्रवासी प्रवास करू शकतील.

· 85 किमी प्रतितास अशा प्रत्यक्षातील प्रचालन वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.

· स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान 35 वर्षे टिकू शकतील.

· ट्रेन प्रचालन साठी चालक विरहित प्रणाली स्वीकारली असून अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC)’ सिग्नल व्यवस्थेमुळे 120 सेकंदची frequency ठेवणे शक्य होणार आहे.

· प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.

· स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.

·       ट्रेनच्या छतावर स्थित ‘व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF)’ प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने 4 ते 5 टक्के ऊर्जा बचत होईल.

·       डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्तिथीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.

·       रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यकतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून 'मुंबई मेट्रो मार्ग-3' या संपूर्ण भूमिगत मर्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.

·       सेवा चाचण्यांचे नियोजन मार्ग 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने गाड्यांचे संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.









00000



सरकारला सुनावले बोल चिमुरडी ने


 

Featured post

Lakshvedhi