Saturday, 27 August 2022

दिलखुलास

 दिलखुलास' कार्यक्रमात धुळे उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची मुलाखत.

           मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी, धुळे तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. 29 ऑगस्ट आणि मंगळवार दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. सहायक संचालक श्री. सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कामात श्रीमती धोडमिसे यांनी कशा प्रकारे आमूलाग्र बदल केले, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र वितरण मोहीम, कायदा व सुव्यवस्था, आयएसओ मानांकन, हेरिटेज वॉक, तिरंगा रॅली, आश्रम शाळांमधील विविध उपक्रम व त्याचे दिसून आलेले सकारात्मक परिणाम याची सविस्तर माहिती श्रीमती धोडमिसे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

00000

 दळवी महाविदयालयाचा परिसर शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावा .                                                                                         - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            सिंधुदुर्गनगरी, दि. 27 : मुंबई विद्यापीठातंर्गत वैभववाडी तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविदयालयाचा (मॉडेल कॉलेज) परिसर शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरावा, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ भगत सिंह कोश्यारी यांनी केली. त्यांच्या हस्ते आज इमारतीचे (कॅम्पस ) उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते .

            याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, मानद मार्ग निर्देशक विनायक दळवी आदी उपस्थित होते. श्रीकोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली .

            मंत्री दीपक केसरकर म्हणाले, निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. भविष्यात राज्यामध्ये सिंधुदुर्ग शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. आमदार नितेश राणे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या या कॅम्पसमुळे अल्पदरात विद्यार्थ्यांना चांगले व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल. विदयार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल तसेच सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊ. प्रारंभी कुलगुरू श्री.पेडणेकर यांनी प्रास्ताविक करताना या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. विनायक दळवी यांनी ही समोयिचीत विचार व्यक्त केले. या कॅम्पस उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

000

 सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन.

         सिंधुदुर्गनगरी दि : 27 : वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गंत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते राज्यपालांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी, प्र.कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वेंगुर्ला नगर परिषद प्रशासक प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

000

 महाराष्ट्र-अमेरीका दरम्यान व्यापाराच्या व गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील - रणधीर जायस्वाल


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे अमेरीकेत व्यापार परिषद संपन्न

मुंबई ः भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश असुन भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरीकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे ते पाहता महाराष्ट्र व अमेरीके दरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील असा विश्‍वास भारताचे न्युयॉर्क मधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ व बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरीका यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरीकेतील अटलांटीक सिटी, न्यु जर्सी येथे बिझनेस समीट चे आयोजन करण्यात आले होते, सदर समीट च्या उद्घाटनप्रसंगी जायस्वाल बोलत होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिषदेत बृहन्महाराष्ट्र मंडळ च्या अध्यक्ष विद्या जोशी, बिझनेस समीट चे निमंत्रक आनंद चौथाई, नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रूमादेवी, पर्सिस्टंट कंपनीचे प्रमुख आनंद देशपांडे, विकास बावधनकर, नरेन गोडसे, नवीन पाठक, चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी व्यासपीठावर उपस्थित होते.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती विद्या जोशी यांनी बिझनेस समीट चे आयोजन हा महत्वपूर्ण निर्णय असुन भविष्यात या उपक्रमामुळे महाराष्ट्राशी आमचे ॠणानुबंध अजुनही दृढ होतील असा विश्‍वास व्यक्त केला.
बिझनेस समीट चे निमंत्रक आनंद चौथाई यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाने या आयोजनासाठी केलेल्या आवाहनास महाराष्ट्र चेंबर ने सकारात्मक प्रतिसाद देऊन हे आयोजन यशस्वी केले याचा अमेरीकेतील महाराष्ट्रीयन समुहास अभिमान आहे असे सांगितले.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महाराष्ट्र चेंबरच्या योगदानाची माहीती देऊन महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य असुन गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण व उत्तम बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणारे राज्य असुन व्यापारात संयुक्त उपक्र मांसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वात उत्तम पर्याय असल्याचे आग्रहपूर्वक नमुद केले.
चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी महाराष्ट्राचे विभागवार वैशिष्ट्यासह प्रभावी सादरीकरण केले.
पर्सिस्टंट चे आनंद देशपांडे, श्रीमती रूमादेवी यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी महाराष्ट्रात नवीन गुंतवणुकीसाठी तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे येणार्‍या प्रस्तावांच्या स्विकृतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र चेंबर तर्फे जगभरातील विविध देशात राहणार्‍या महाराष्ट्रीयन लोकांच्या संघटनांचे एक सामुहीक व्यासपीठ ‘ग्लोबल महाराष्ट्र फोरम’ या नावाने गठीत केल्याची घोषणा ललित गांधी यांनी केली. या फोरम चे औपचारीक ‘उद्घाटन’ कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित विविध उपक‘मांना अमेरीकेतील विविध राज्यातुन आलेलया 5000 हून अधिक मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्रात गुंतवणुकीचा विविध प्रस्तांवावर चर्चा करण्यात आल्या व विविध उद्योजकांच्या समुह बैठका संपन्न झाल्या.
याप्रसंगी दिपक शिकापूर, प्रवीण पाटील, शेखर चिटणीस, विनित पोळ, नितिन इंगळे, श्‍वेता इनामदार, प्रज्ञा पोंक्षे, भाऊसाहेब कालवाघे, रविराज अहिरराव, संजीव तांभोरकर यांनी बैठकांमध्ये सहभाग घेतला.


टोलमाफी, गणेश मंडळ पुरस्कार

 कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय.

            मुंबई, दि. 26 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार दि. 27 ऑगस्टपासून करण्यात येत आहे. मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत दि. 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

            गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

            दिनांक 27 ऑगस्ट ते दि. 11 सप्टेंबर या कालावधीत मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (रा. म. क्र.48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा. म. क्र. 66) यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

            या टोलमाफी सवलतीसाठी "गणेशोत्सव 2022, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

            पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

0000

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सवमंडळांना मिळणार पुरस्कार

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. २६ : राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

            राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० ऑगस्ट २०२२ हा आहे.

            या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याwww.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.


०००००                                                             


पर्यटन

 महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी 50 नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

महाराष्ट्र पर्यटनाचे मोठे पाऊल.

            मुंबई, दि.26 : ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


            यावेळी उपस्थित टूर मार्गदर्शकांचे आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या, हे उमेदवार आधीच शहरस्तरीय टूर गाईड आहेत. त्यांना प्रशिक्षणाद्वारे आता राज्य स्तरावर पदोन्नती दिली जात आहे. पात्र आणि प्रमाणित पर्यटक मार्गदर्शकांची ही नवीन तुकडी पर्यटन स्थळांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आणि अधिकाधिक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची शैली आणि नवीन तंत्रे जोडून राज्याचे सौंदर्य प्रदर्शित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन संचालनालयाद्वारे चालवलेला हा उपक्रम प्रमाणित मार्गदर्शकांची कमतरता भरून काढेल. आवश्यक प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी असलेले या नवीन पर्यटक मार्गदर्शकांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळेल. अशा फलदायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पर्यटन संचालनालयाचे त्यांनी अभिनंदन केले.


            पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी प्रास्ताविक करताना सर्व प्रशिक्षित उमेदवारांची प्रशंसा करून आनंद व्यक्त केला. आतापर्यंत राज्यातील 15 वेगवेगळ्या ठिकाणी ऑफलाईन टूर गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये एकूण 450 मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यात आले असून ते सेवा बजावण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि, महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आयआयटीएफ सर्टिफिकेशन प्रोग्रामच्या यशस्वी उमेदवारांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

            नवीन उमेदवारांसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उमेदवारांना जबाबदार, शाश्वत, वारसा आणि साहसी पर्यटन यावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर, महाराष्ट्रातील पर्यटनाच्या उपरोक्त विषयांवरील त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. त्यात ते उत्तीर्ण झाले. लवकरच ते राज्यस्तरावर टूर गाईडची कर्तव्ये पार पाडणार आहेत. या 50 उमेदवारांची अधिकृतपणे टूर मार्गदर्शक म्हणून घोषणा करण्यात आली असून ते महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित मार्गदर्शक म्हणून सेवा प्रदान करतील.

            पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

००००



कामगार कल्याण

 कामगारांच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन

एकत्रितपणे समन्वयातून राबविणार.

                - कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे.

            मुंबई, दि. 26 : केंद्र शासन व राज्य शासनाच्या संघटित व असंघटित कामगारांच्या हिताच्या विविध योजना एकत्रितपणे समन्वयाने भविष्यात राबविणार असल्याचे,कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सांगितले.

            दि.25 व 26 ऑगस्ट रोजी केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयामार्फत तिरुपती आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्री व कामगार सचिवांच्या राष्ट्रीय परिसंवादात मंत्री डॉ.खाडे बोलत होते .

             या परिषदेला केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव तसेच विविध राज्यांचे कामगार विभागाचे मंत्री व कामगार प्रधान सचिव तसेच राज्याच्या कामगार प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आदी उपस्थित होते.

            या परिषदेमध्ये महाराष्ट्राकडून केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या चार लेबर कोड संदर्भातील नियम बनवण्याची कार्यवाही अतिशय वेगाने पार पाडण्यात आली आहे. हे नियम प्रसिद्ध करून त्यावर जनतेकडून सूचना व हरकती मागवण्यात आलेल्या असून नियम अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असल्याची बाब कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी निदर्शनास आणून दिली. राज्य शासनाकडून या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचे केंद्रीय मंत्री श्री. यादव यांच्याकडून कौतुक करण्यात आले व इतर राज्यांनी महाराष्ट्र प्रमाणे कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या परिषदेमध्ये राज्य शासनाकडून कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधेसंदर्भातील संपूर्ण माहिती व सादरीकरण करण्यात आले. राज्यातील बांधकाम कामगारांकरिता बांधकाम कामगार मंडळामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधा व आर्थिक सामग्रीच्या स्वरूपातील मदतीसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली.

             या परिसंवादात राज्य शासनामार्फत केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व त्यामध्ये राज्यातील सर्व संघटित व असंघटित कामगारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हावा, याकरिता राज्याच्या कामगार विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देखील देण्यात आली. केंद्रीय मंत्री यांच्याकडून राज्यातील कामगारांसाठी विशेषत: बांधकाम कामासाठी विविध योजना राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा मंत्री श्री.खाडे यांनी व्यक्त केली

            कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन जुन्या व अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून फक्त चार कायदे तयार केले आहेत. महाराष्ट्राने या कायद्याचे नियम तयार करून ते इंटरनेटवर प्रसिद्ध केले आहेत. त्यावरील हरकती मागविल्या आहेत 90 कामगार संघटनांनी यावर सूचना केल्या आहेत. या सूचनांचा अभ्यास करून ते विषय मंत्रिमंडळासमोर ठेवले जातील. कामगार व उद्योजक यांचे संबंध चांगले राहतील तसेच नवीन तंत्रज्ञांचा वापर करून उद्योजक व कामगार यांना त्याचा उपयोग होईल, असे मत कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी मांडले .

            या परिसंवादात राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनीता वेद सिंगल यांनी सहभाग घेतला.


00

Featured post

Lakshvedhi