Friday, 26 August 2022

अभिवादन


 धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

आनंदआश्रम व शक्तिस्थळावर जाऊन वाहिली आदरांजली.

            ठाणे, दि. 26 (जिमाका):- धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदआश्रम व दिवंगत दिघे यांच्या समाधीस्थळ असलेल्या शक्तिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. तसेच टेंभी नाका येथील दिवंगत दिघे यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त विपीन शर्मा, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्र्यांचे ठाण्यात आगमन झाल्यानंतर प्रथम आनंदआश्रम येथे जाऊन दिवंगत दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शक्तिस्थळावर जाऊन समाधीवर पुष्प अर्पण केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधून स्व. दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, दिवंगत आनंद दिघे व हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर्श घेवून राज्य सरकार काम करत आहे. गेल्या दीड महिन्यात सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी कामगार, पोलीस यांच्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्य घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. त्यांच्यासाठीच आम्ही काम करत आहोत.

            आनंद आश्रम येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

            शक्तिस्थळावरील कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या वतीने आदिवासी पाड्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या फिरते आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

            दै. ठाणे वैभव या वृत्तपत्राच्या एलबीएस मार्गावरील नव्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी संपादक मिलिंद बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

०००००


बैल पोळा

 


क्रीडा विकास

 राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ

                        - क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन

          मुंबई, दि. 26 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

            मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशातील पंजाब, हरियाणा राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये करण्यात आले आहेत.

            त्याचप्रमाणे खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्याही बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी 12.50 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 7.50 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 5 लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहेत.

बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल स्पर्धेतराज्यातील 7 खेळाडूंना 8 पदके प्राप्त

            बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये एकूण 14 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी राज्यातील 7 खेळाडूंनी 8 पदके प्राप्त केली आहेत. या खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना 3.50 कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. यामध्ये सुनिल शेट्टी याने टेबल टेनिस (पुरुष सांघिक) या खेळामध्ये सुवर्णपदक, चिराग शेट्टी याने बॅडमिंटन (पुरुष दुहेरी) या खेळामध्ये सुवर्णपदक आणि मिक्स सांघिक या खेळामध्ये रौप्यपदक, श्रीमती स्मृती मानधना, श्रीमती जेमिमा रॉड्रिग्स, श्रीमती राधा यादव यांनी क्रिकेट (महिला संघ) या खेळामध्ये रौप्यपदक, संकेत महादेव सरगर वेटलिफ्टिंग (पुरुष 55 कि.ग्रॅ.) या खेळामध्ये रौप्यपदक, अविनाश साबळे ॲथलेटिक्स (3 हजार मिटर स्टिपलचेस) या खेळामध्ये रौप्यपदक प्राप्त केले आहे.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंशी थेट संवाद साधतात. तसेच पदक विजेत्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करतात. ते खेळांकडे गांभिर्याने बघतात. खेळाडूंसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंजाब, हरियाणा या राज्यातील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या विविध भत्त्यांसह सोयी - सुविधा राज्यातील खेळाडूंना देण्यात येणार आहे.

            ग्रामीण, आदिवासी खेळाडूंना अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याकरीता विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. विभाग, जिल्हा, तालुका, क्रीडा संकुलांसाठी देण्यात येणारा निधी आणि सोयी - सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अधिक पदके प्राप्त करुन राज्याची क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढविण्यासाठी मदत होईल, असेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.




सूचना

 यदि आपके पास केवाईसी दस्तावेजों/यूजर आईडी/पासवर्ड/डेबिट कार्ड संख्या/पिन/सीवीवी/ओटीपी आदि को अपडेट या सत्यापित करने संबंधी कोई ई-मेल/मैसेज में एम्बेडेड लिंक/कॉल आते हैं तो कभी भी इनका उत्तर ना दें। यदि आपने अनजाने में अपनी प्रामाणिकता उजागर कर दी हो तो तत्काल अपने पासवर्ड/सीवीवी/पिन को बदल दें।

सैन्य भरती मेळावा

 भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी अनुदानात वाढ

            मुंबई, दि. 26 : संरक्षण दलामार्फत भूदल, वायुदल आणि नौदल सैन्यभरतीसाठी सैन्य भरती मेळावे आयोजित करण्यात येतात. या भरती प्रक्रियेचा कालावधी विविध दलनिहाय अंदाजे 8 ते 10 दिवसांचा असतो. ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनामार्फत आर्थिक अनुदान देण्यात येते.

            भारतीय संरक्षण दलामार्फत प्रतिवर्ष राज्यात घेण्यात येणाऱ्या 5 भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात रूपये 6 लाखावरून रूपये 9 लाख इतकी वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वायुदल, नौदल आणि महिला भूदल सैन्यभरती मेळावे घेण्यासाठी रूपये 3 लाख मंजूर करण्यात आले. त्यामुळे सन 2022-23 या वर्षामध्ये एकूण 10 मेळाव्यांसाठी एकूण रूपये 60 लाख इतकी मान्यता देण्यात आली आहे.

            भूदल सैन्यभरतीच्या प्रती मेळावा रूपये 9 लाख याप्रमाणे एकूण 5 मेळाव्यास रूपये 45 लाख, भूदल महिला सैन्यभरती आणि नौदलाच्या एका मेळाव्यास रूपये 3 लाख प्रत्येकी आणि वायुदल भरतीच्या प्रती मेळावा 3 लाख प्रमाणे 3 मेळाव्याकरिता 9 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.

                        कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागील 2 वर्षापासून भारतीय संरक्षण दलामार्फत सैन्यभरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने या वर्षी सैन्यभरतीसाठी वयोमर्यादेत 2 वर्षाची सवलत दिली आहे. उमेदवारांची वाढती संख्या तसेच वाढत्या महागाईचा विचार करता भूदल सैन्यभरती मेळाव्याकरिता अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नौसेना आणि वायुदलाच्या महिला भूदल सैन्य भरती मेळावे आयोजित करण्यासाठीही आर्थिक तदतूद करण्यात आली आहे.

000



परदेशी शिष्यवृत्ती

 परदेश शिष्यवृत्तीसाठी ७५ विद्यार्थ्यांची निवड.

            मुंबई,दि.२६ : अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकातील ७५ विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीकरीता निवड झाली असून या योजनेंतर्गत सन 2022-23 या वर्षासाठी दिडशे कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही परदेश शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेला आहे.

         अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळावी याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2003 पासून परदेश शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. दि. 27 जून,2017 च्या शासन निर्णयान्वये या योजनेची सुधारीत नियमावली करण्यात आलेली आहे.

      महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे विद्यार्थी पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 300 क्यूएस वर्ल्ड रॅन्कींगच्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा एकूण 75 विद्यार्थ्यांची योजनेंतर्गत निवड करण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2022-23 साठी एकुण 75 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णय 26 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून तो शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

       विविध कारणास्तव राज्यशासनाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत झालेली निवड रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केल्यास, अशा रिक्त होणाऱ्या जागांवर निवड करण्याच्या दृष्टीने एकूण 38 विद्यार्थ्यांची सर्वसाधारण प्रतिक्षा यादी निर्धारीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती विभागाने दिली आहे.


००००



 

शोधिसी मानवा

 *आयुष्यात सर्व कांही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही,*

*आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यांत येते की जे बाहेर शोधत होतों ते तर माझ्याच जवळ होते‌‌...*

         *🙏🌹 प्रेम ,समाधान🌹🙏*    

            

 

Featured post

Lakshvedhi