Thursday, 18 August 2022

 पूरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद.

            मुंबई, दि. 17 : नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीकरीता बंद करण्यात आले आहेत. या भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु आहे. राज्यात अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.

            राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.

            गोंदिया जिल्ह्यात दिनांक १४ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत गोंदिया जिल्हा तसेच मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी १७३.५ मि.मी. हून अधिक पाऊस झाल्याने तसेच वैनगंगेच्या बाघ उपनदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.

              भंडारा, गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती व वैनगंगा नदी पातळीत झालेली वाढ याचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ७८ रस्ते वाहतूकीकरिता बंद करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात एसडीआरएफचे एक पथक व स्थानिक शोध बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरू आहे.

               गडचिरोली जिल्ह्यात गोसीखुर्द प्रकल्पाचा विसर्ग व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रवती नदी पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात निर्माण झालेली पूरपरिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून जिल्ह्यातील एकूण १८ रस्ते वाहतूकीकरिता बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF ची ०२ पथके व स्थानिक शोध व बचाव पथकांमार्फत पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरु आहे.

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात

            राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

            मुंबई (कांजूरमार्ग - १, घाटकोपर - १) - २, पालघर - १, रायगड – महाड - २, ठाणे - २, रत्नागिरी –चिपळूण - १, कोल्हापूर - २, सातारा - १, सांगली - २ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.

            नांदेड - १, गडचिरोली - २, भंडारा - १ अशा चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

            राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३५० गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२२ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

              मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.

00000



Wednesday, 17 August 2022

माय ची माया


 

अलिबाग शिवसेना

 




चाफेकर स्मारक समिती





 *""पुन्हा उभा राहिला चाफेकर बंधूंचा वाडा.""*


चिंचवड, पुणे येथील चाफेकर कुटुंबातील तीन तरुणांनी स्वातंत्र्य संग्रमात स्वताची आहुती दिली. त्यांचा जुना वाडा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दिमाखाने उभा होता. सन १९४८ मधील जळितात भस्मसात तो झाला. आगीतून वाचलेले वाड्याचे लाकूड घरोघरी लोकांनी सरपण म्हणून नेले. भिंतींची माती घरे लिंपण्यास, चुली सारवण्यासाठी लोक घेऊन गेले. वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीची कचराकुंडी झाली आणि ती चक्क बुजवली गेली. वाड्याच्या जागेवर दारूचे गुत्ते चालू लागले. कित्येक वर्षे त्याठिकाणी दारूचे गुत्ते चालू होते. ज्या ठिकाणी क्रांतिवीर जन्माला आले त्या ठिकाणी दारू पिऊन लोक झिंगू लागले. गावातील लोकांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. पण हे सारे बंद करण्याचे धाडस दाखवणारा एकही वीर पुढे येत नव्हता. एक दिवस काही मंडळींनी एकत्र येऊन सन १९९५-९६ च्या दरम्यान उठाव केला. मारामाऱ्या झाल्या आणि दारूच्या गुत्याची त्या जागेवरून हकालपट्टी झाली.
क्रांतिवीर चापेकर बंधूंचा वाडा पुन्हा जसाच्या तसा उभा करण्याचा विचार आणि निर्धार झाला. त्यासाठी स्थानिक मान्यवरांची समिती निर्माण झाली. गिरीश प्रभुणे, डॉ. वैद्य, दत्ता दातार, कांता जाधव, अश्विनी मोकाशी अशा अनेक मंडळीनी चापेकरवाडा पुन्हा पूर्ववत उभा करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला हजारो हात पुढे आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ठराव करून या पवित्र कार्यासाठी अनुदान मंजूर केले. 
दि. २२ जून १९९७ रोजी चापेकर बंधूंच्या हौतात्म्याच्या शताब्दीदिनी कामास प्रारंभ झाला. जुन्या जाणत्या लोकांच्या मुलाखतीवरून वाड्याचा रचना आलेख वास्तुरचनाकार संजू फणसळकर यांनी तयार केला.
काम महानगरपालिकेने टेंडरद्वारे एका ठेकेदाराला दिले. कामास प्रारंभ झाला. पाया भरला गेला. परंतु पुढील कामाचे क्लिष्ट व मोठे स्वरूप पाहून ठेकेदाराने काढता पाय घेतला. काम ठप्प झाले. त्यानंतर हे काम करण्यास कोणीही धजावत नव्हता. जुना वाडा, त्याचे जुने स्वरूप विशेषतः लाकडी काम त्यासाठी लागणारे किमती लाकूड, विशिष्ट प्रकारची तक्तपोशी, मेघडंबरी त्यावरील नक्षीकाम हे सारे पुन्हा तयार करावयाचे या गोष्टी अत्यंत जिकिरीच्या प्रचंड खर्चाच्या आणि कमीत कमी लाभाच्या होत्या. दगडाचे आणि विटांचे काम ही तितकेच बारकाव्याचे आणि प्रमाणबद्धतेचे होते. विहीरही पुन्हा उभी करावयाची होती. सारे काही अवघड होते. राष्ट्रीय प्रेरणेनेच कोणी पुढे आला तरच हे काम पुरे होणार होते.
हे आवाहन पुण्यातील स्थपती नंदकिशोर एकबोटे यांनी स्वीकारले. त्यांनी फायद्याचा काही विचार केला नाही. चिंचवड येथील प्रसिद्ध दैवत गजानन व संत मोरया गोसावी यांचा आशीर्वाद घेऊन सन २००४ मध्ये नव्याने कामाला सुरुवात केली. हिरालाल व गणेश हे दोन सुतार व रोकडे नावाचा पाथरवट चालू असलेले काम पाहण्यासाठी आले. आणि हे काम करण्याचे त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारले. 
वाडा पुन्हा उभा करण्यासाठी जुने सागवानी लाकूड मिळवून त्याचे योग्य त्या मापाचे दरवाजे तुळया, खांब, कडीपाट इ. गोष्टी तयार करण्यासाठी स्वतंत्र मशिनरी खरेदी केली आणि जागेवरच लाकडांची कापणी करून सुताराकडून सर्व गोष्टी जशाच्या तशा बनवून घेतल्या. नेवासा या गावावरून दगड मागविला. व तेथील काही पाथरवटास बोलावण्यात आले. त्यांच्याकडून चौकातील दगडकाम, तुळशीवृंदावन, जोते, तळखडे, दगडी पायऱ्या अशी ही दगडी कामे अतिशय कष्टाची, बुद्धीची आणि नेटाची होती. 
सज्जावरील मेघडंबरी तयार करणे व ती बसविणे, त्यावरील कोरीव कामास उठावदारपणा आणणे, कडीपाटास सुबक आकार देणे, तुळई आणि खांब यामधील ब्रॅकेट्स तयार करून बसविणे, हे सारे काम फारच जिकिरीचे होते. जाड खांबावर फळ्यांचे अस्तर देऊन त्यांची जाडी प्रमाणबद्ध ठेवून त्यावर तुळया व मध्ये कडीपाट बसविणे ते साधे दिसले तरी कौशल्याचे काम होते. 
लहान आकाराच्या चपट्या विटा बाजारात उपलब्ध नव्हत्या म्हणून ठराविक आकाराच्या विटा तयार करण्यासाठी वीटभट्टी सुद्धा जागेवरच लावण्यात आली होती. छपरासाठी लागणारी गोल नळीची कौले कोठेच मिळत नव्हती. हे सर्व साहित्य वीटभट्टीतून तयार करण्यात आले. वीटकाम इतके सुबक तयार करण्यात आले की विटांचे सांधे एकमेकांस बरोबर जुळवून अशा पद्धतीने बसविण्यात आले की त्यातील सिमेंट कोठेही दिसत नाही. दर्शनी भिंतींचा रंग पिवळ्या मातीसारखा दिसणे गरजेचे होते. ही रंगसंगती साधण्यासाठी रंगांचे विविध नमुने आणून त्यांची मिश्रणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. 
चौक, सोपे, आतील दालने, चौकातील वृंदावन, चौकात पूर्ण दगडी फरशी, अत्यंत रेखीव जोती, जोत्यांना ठिकठिकाणी बसवलेल्या कड्या, चाफेकरांनी दुधासाठी पाळलेल्या गाई-म्हशी बांधण्यासाठीचा गोठा, सज्जा, सज्जा वरील मेघडंबरी, दरवाजा, बाजूच्या देवड्या, आतील पायऱ्या असा तीनमजली वाडा अवघ्या काही महिन्यांत उभा राहिला. 
चिंचवड गावात रामआळीत पूर्वाभिमुखी हा वाडा उभा आहे. वाड्यासमोरून उत्तर-दक्षिण असा गावचा हमरस्ता आहे. वाड्याच्या समोर उभे राहिल्यावर दरवाजावरील गणेशपट्टी आणि वरील मेघडंबरीयुक्त सज्जा पाहून मन प्रसन्न होते. वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर दगडी फरशीचा चौक मधोमध असलेले तुळशीवृंदावन, चार सोपे, त्यावरील दोन मजले, सुंदर असे लाकूडकाम पाहिल्यावर खरोखरच चापेकरांचा हा वाडा नवा असला तरी जुन्या घटनांनी मात्र त्या काळातच घेऊन जातो. त्यांची त्या वेळची पितळी भांडी एका फडताळात ठेवलेली दिसतात. तर बाहेरच्या सोप्यात देव्हाऱ्यातील त्यांच्या पूजेच्या देवाचे दर्शन घडते. समोरच्या सोप्यात क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचा पुतळा पाहिल्यावर क्रांतिदिन मनःचक्षू पुढे साक्षात उभा राहतो. वाड्याचे तिन्ही मजले पाहिल्यावर परसातील विहीर पाहून नव्या उभ्या राहिलेल्या वाड्याचे मंगलमय प्रतिबिंब विहिरीतील पाण्यात दिसू लागते आणि त्याचक्षणी चापेकर बंधूंचा ब्रिटिशांच्या दडपशाही आणि अत्याचार यांच्या विरुद्ध दिलेला लढा आणि त्यातून प्राप्त झालेले वीरमरण याचा ज्वलंत इतिहास उभा राहतो.

राष्ट्रगीत


 मंत्रालयात समूह राष्ट्रगीत गायन.

            मुंबई, दि. 17 : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून या उपक्रमाअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन राज्यभर करण्यात आले.

            मंत्रालयातही मुख्य प्रवेशद्वार आणि त्रिमूर्ती प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. समूह राष्ट्रगीत गायनात यावेळी मंत्रालयात नियुक्त करण्यात आलेले पोलीस पथक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0000

सीईटी एक्साम

 एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षादेणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. 17 : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

                   सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000


 


 


 


 



उपयोगी निर्णय

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार

75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास

दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमा संरक्षण

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

            मुंबई, दि. 16 : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

            पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार रुपये प्रती हेक्टर ऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

            उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रती युनिट इतकी सवलत कायम, लघु दाब जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर जून 2021 पासून नव्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

            विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून महावितरण कंपनीच्या रु. 39 हजार 602 कोटी व बेस्टच्या रु. 3 हजार 461 कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वीज वितरणातील हानी 15 टक्केपर्यंत कमी करून ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मीटरचा 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थीना जागा देण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित, मोजणी शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सवलत, 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे श्री शिंदे यांनी सांगितले

             अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            भंडारा जिल्ह्यातील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी श्रीमती रागसुधा, समादेशक, राज्य राखीव पोलिस दल यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला असून याबाबतचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येईल. तसेच शक्ती कायदा बाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मागील सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्यात आलेले नाहीत. त्या निर्णयांचा आढावा घेऊन पूनर्विलोकन करण्यात येत आहे. त्यातील अत्यावश्यक आणि प्राधान्यक्रमानुसार निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

            राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल, त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या भागामधील 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनाम्याबाबत तक्रारी केल्या असल्याने त्या त्या भागातील पंचनामे पूर्णत्वाकडे आहेत. याबाबत तातडीने मदत करण्यात येईल. ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होईल. जनतेच्या हितासाठी हे सरकार असून कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून पुनर्विलोकन ते करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले.

000


 



 


 

Featured post

Lakshvedhi