Wednesday, 17 August 2022

उपयोगी निर्णय

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत करणार

75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास

दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमा संरक्षण

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

            मुंबई, दि. 16 : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीने मदत करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देतानाच राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

            पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, सार्व. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये यापूर्वी जिरायत शेतीसाठी 10 हजार रुपये प्रती हेक्टर ऐवजी त्यात बदल करून 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 25 हजार रुपयांवरून ती आता 36 हजार रुपये प्रती हेक्टर मदत करण्यात आली आहे. यात 2 हेक्टरवरून 3 हेक्टर मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला जवळपास दुपटीने मदत होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

            उच्च दाब व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रती युनिट इतकी सवलत कायम, लघु दाब जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर जून 2021 पासून नव्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

            विद्युत वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून महावितरण कंपनीच्या रु. 39 हजार 602 कोटी व बेस्टच्या रु. 3 हजार 461 कोटी रकमेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे. तसेच वीज वितरणातील हानी 15 टक्केपर्यंत कमी करून ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मीटरचा 1 कोटी 66 लाख ग्राहकांना फायदा होणार आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थीना जागा देण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या धर्तीवर 1 हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क रक्कम निश्चित, मोजणी शुल्कामध्ये 50 टक्क्यांपर्यंत सवलत, 2 मजली ऐवजी 4 मजली इमारत बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे श्री शिंदे यांनी सांगितले

             अनेक गोविंदा पथकांची शासनाने विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            भंडारा जिल्ह्यातील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी श्रीमती रागसुधा, समादेशक, राज्य राखीव पोलिस दल यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला असून याबाबतचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात येईल. तसेच शक्ती कायदा बाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मागील सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्यात आलेले नाहीत. त्या निर्णयांचा आढावा घेऊन पूनर्विलोकन करण्यात येत आहे. त्यातील अत्यावश्यक आणि प्राधान्यक्रमानुसार निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

            राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल, त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या भागामधील 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचनाम्याबाबत तक्रारी केल्या असल्याने त्या त्या भागातील पंचनामे पूर्णत्वाकडे आहेत. याबाबत तातडीने मदत करण्यात येईल. ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा होईल. जनतेच्या हितासाठी हे सरकार असून कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून पुनर्विलोकन ते करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्पष्ट केले.

000


 



 


 




 

भाजी ghya भाजी, रान भाजी























 

Tuesday, 16 August 2022

राष्ट्रगीत

 चला सारेजण राष्ट्रगीत गाऊ या,एक अनोखा विक्रम करू या .

                    - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

      मुंबई, दि. १६ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत नियोजित ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम निर्माण करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

         नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान - थोर, स्त्री - पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.



मुलाखत

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागाचे

उपसचिव विलास थोरात यांची आज मुलाखत.

    मुंबई,दि.१६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'समूह राष्ट्रगीत गायन' या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          आज मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंक वर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

       या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'समूह राष्ट्रगीत गायन' ही संकल्पना, या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याबद्दल उपसचिव श्री. थोरात यांनी सविस्तर माहिती दिली आहे.    

000

 शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबधी माहिती द्या

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.

               मुंबई, दि.16 : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

            कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी मंत्रालयात आज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी चांगल्या वानांची बियाणे, पीक विमा, किटक नाशके, खते, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना गावागावात जाऊन द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले.

            शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वानाची माहिती, खत कोणते वापरावे, कृषी संबंधी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासंबंधीची माहिती द्यावी. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही कृषी मंत्र्यांनी केल्या. अतिवृष्टी आणि किड प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्वरीत पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            कृषी विद्यापिठाने नवनवीन संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध बियाणे कंपन्यांची तुलना करुन जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. इस्त्रायल सारख्या देशाच्या शेतीचा अभ्यास करुन त्या धर्तीवर येथील शेतीमध्ये बदल घडवावा, अशा सूचनाही श्री. सत्तार यांनी यावेळी केल्या. राज्याच्या काही भागात पिकांवर गोगलगाईसारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबाबत मी स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

             यावेळी अधिकाऱ्यांनी विभागवार सादरीकरण करुन राज्यातील कृषी क्षेत्राची माहिती दिली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त, पुणे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण),पुणे, कृषी संचालक (मृदसंधारण), पुणे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), पुणे, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया/नियोजन), पुणे, कृषी संचालक(फलोत्पादन), पुणे, कृषी संचालक (आत्मा), पुणे आदी उपस्थित होते.

0 0 0



आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय

 आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न;

लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई दि.१६ भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            श्री. शिंदे म्हणाले, जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

            मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागेअभावी अडचण येऊ नये म्हणून पु.ल.देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दि.२८ सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे, यानिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०००



Featured post

Lakshvedhi