सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 17 August 2022
Tuesday, 16 August 2022
राष्ट्रगीत
चला सारेजण राष्ट्रगीत गाऊ या,एक अनोखा विक्रम करू या .
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १६ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे या कालावधीत नियोजित ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम निर्माण करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. राज्यातही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान - थोर, स्त्री - पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.
मुलाखत
जय महाराष्ट्र' कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागाचे
उपसचिव विलास थोरात यांची आज मुलाखत.
मुंबई,दि.१६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'समूह राष्ट्रगीत गायन' या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आज मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंक वर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'समूह राष्ट्रगीत गायन' ही संकल्पना, या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याबद्दल उपसचिव श्री. थोरात यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
000
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबधी माहिती द्या
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
मुंबई, दि.16 : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी मंत्रालयात आज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी चांगल्या वानांची बियाणे, पीक विमा, किटक नाशके, खते, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना गावागावात जाऊन द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले.
शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या वानाची माहिती, खत कोणते वापरावे, कृषी संबंधी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळेल यासंबंधीची माहिती द्यावी. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही कृषी मंत्र्यांनी केल्या. अतिवृष्टी आणि किड प्रादूर्भावामुळे झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी त्वरीत पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कृषी विद्यापिठाने नवनवीन संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, विविध बियाणे कंपन्यांची तुलना करुन जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. इस्त्रायल सारख्या देशाच्या शेतीचा अभ्यास करुन त्या धर्तीवर येथील शेतीमध्ये बदल घडवावा, अशा सूचनाही श्री. सत्तार यांनी यावेळी केल्या. राज्याच्या काही भागात पिकांवर गोगलगाईसारख्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याबाबत मी स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधिकाऱ्यांनी विभागवार सादरीकरण करुन राज्यातील कृषी क्षेत्राची माहिती दिली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त, पुणे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण),पुणे, कृषी संचालक (मृदसंधारण), पुणे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), पुणे, कृषी संचालक (कृषी प्रक्रिया/नियोजन), पुणे, कृषी संचालक(फलोत्पादन), पुणे, कृषी संचालक (आत्मा), पुणे आदी उपस्थित होते.
0 0 0
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न;
लता दीदींच्या जयंती दिनी 28 सप्टेंबरला संगीत महाविद्यालय सुरू करावे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई दि.१६ भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी २८ सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जेष्ठ गायिका उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरत्या जागेची सुविधा उपलब्ध करून तातडीने यावर्षी किमान प्रमाणपत्र कोर्स सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्याने पदविका आणि पदवी कोर्स सुरू करण्यात यावेत. हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे आणि तातडीने सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही श्री. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा असून त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. या समितीने यावर्षी सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहवाल लवकर सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. महाविद्यालय यावर्षी सुरू करण्यास जागेअभावी अडचण येऊ नये म्हणून पु.ल.देशपांडे कला अकादमी मध्ये तात्पुरते महाविद्यालय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दि.२८ सप्टेंबर रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांची जयंती आहे, यानिमित्त यावर्षी पहिली बॅच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
०००
पूरग्रस्त
पूरग्रस्त भागात नागरिकांना स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरू
मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात.
मुंबई दि.१६ : नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरु आहे. १५३१ नागरिकांना गेल्या २४ तासात सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे.राज्यात इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.
राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.
नागपूर विभागामध्ये गेल्या २४ तासात सरासरी २१.५५ मिमी एवढा पाऊस झाला असून भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिनांक १४ ते १५ ऑगस्ट २०२२ या २४ तासाच्या कालावधी मध्ये गोंदिया जिल्हा तसेच मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी १७३.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने तसेच वैनगंगा नदीची उपनदी असलेल्या बाघ नदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६.२ मिमी एवढा पाऊस झाला असून बाघ व बावनथडी या नद्या धोका पातळीच्या वर वाहत असून पूरग्रस्त भागातील २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती व वैनगंगा नदी पातळीत झालेली वाढ याचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात भंडारा जिल्ह्यात २५ मिमी एवढा पाऊस झाला असून वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. पूरग्रस्त भागातील ९०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF चे ०१ पथक व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
दिनांक १४ ते १५ ऑगस्ट २०२२ या २४ तासाच्या कालावधी ७७.६ मिमी एवढा पाऊस झाला होता. तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचा विसर्ग व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रवती नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ याचा एकत्रीत परिणामामुळे गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३५.१ मिमी पाऊस झाला असून प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून पूरग्रस्त भागातील ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात SDRF चे ०२ पथक व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरु आहे.
राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात
राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-१, कोल्हापूर-२, सातारा-१, सांगली- २ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.
नांदेड- १, गडचिरोली- २,भंडारा-१, अशी एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३२५ गावे प्रभावित झाली आहेत. ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.
000
'
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
























