सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 13 August 2022
वसतिगृह महिलांसाठी
बोरिवली येथील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन.
मुंबई, दि. १२ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता बोरिवली येथील वसतिगृहात शासनामार्फत मोफत निवासाची व्यवस्था करण्यात येते. या वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता इच्छुकांकडून १७ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
वसतिगृहामधील प्रवेश नियमावली पुढील प्रमाणे आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत राहणारे नसावे, अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतिगृह सोडावे लागेल.काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील. त्यानंतर त्यांना वसतीगृह सोडणे अनिवार्य राहील. वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी अनामत रक्कम म्हणून वसतिगृहाच्या व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.
इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत. अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे, तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र (पासपोर्ट आधारकार्ड/संबंधित पत्र) आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे
0000
Startup
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी
१५ ऑगस्टपासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा
मुंबई, दि. १२ : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतीना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत, अशी माहिती विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली.
मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे येथूनही त्या त्या विभागातील यात्रेचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ होणार आहे. तळागाळातील व ग्रामीण दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे तसेच राज्याची उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे, असे श्रीमती वर्मा यांनी सांगितले.
या यात्रेतील मोबाईल व्हॅन ही राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमूह एकत्रित होणाऱ्या जागा या ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन त्यांना माहिती देण्यात येईल. यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्रांचेही (Bootcamp) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योजकांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या संकल्पनांचे शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.
१० हजारापासून १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके
कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर अंतिम सादरीकरण होईल. राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यांमध्ये उत्तम ३ विजेत्यांची निवड केली जाईल. २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. विभागस्तरावर ६ सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व ६ सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. राज्यस्तरावर १४ विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक १ लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये आहे. याशिवाय विजेत्या संकल्पनांना प्री-इन्क्युबेशन तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधी सहाय्य, स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ज्ञ व संस्थांद्वारे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर, क्लाऊड क्रेडीट्स यांसह इतर आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.
प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक युवावर्ग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ते नवनवीन संकल्पना विकसित करीत आहेत. राज्याच्या तळागाळातून अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व नवउद्योजकांचा शोध घेऊन त्यांच्या संकल्पनांना बळ देण्यासाठी स्टार्टअप यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे. राज्याच्या स्टार्टअप परिसंस्थेला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्टार्टअप रँकींगमध्ये महाराष्ट्र टॉप परफॉर्मर
स्टार्टअप रँकींग २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर श्रेणीमध्ये आले आहे. देशातील १०४ युनिकॉर्नपैकी २४ युनिकॉर्न्स म्हणजे २३ टक्के युनिकॉर्न्स महाराष्ट्रातील आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन १ बिलीयन अमेरीकन डॉलर्स म्हणजे ७ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशातील एकूण २ लाख १३ हजार स्टार्टअप्सपैकी ३६ हजार ८०० म्हणजे १८ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स आहेत.
घरोघरी तिरंगा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची उत्तम कामगिरी
- सचिव अपूर्व चंद्रा
‘घरोघरी तिरंगा’अभियानासाठीच्या प्रसिद्धी साहित्याचे कौतुक
नवी दिल्ली, 12 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफिती, जिंगल्स, बॅनर आदी प्रचार-प्रसिद्धी साहित्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी कौतुक केले आहे.
श्री. चंद्रा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिलेल्या संदेशात राज्यशासनाच्या ‘घरोघरी तिरंगा अभियाना’त जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करुन या अभियानास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी प्रचार-प्रसिद्धी साहित्याचे कौतुक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाचे सांस्कृतिक मंत्रालय ‘हर घर तिरंगा अभियान’ देशभर राबवित आहे. महाराष्ट्रातही हे अभियान राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा’ नावाने राबविण्यात येत आहे.
‘घरोघरी तिरंगा’ अभियानाच्या प्रचार व जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने www.mahaamrut.org हे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावरुन जिंगल्स, कलाकारांद्वारे आवाहन करणारे संदेश, ध्वनिचित्रफिती, विशेष गाणी, बॅनर आदी साहित्य उपलब्ध करू देण्यात आले आहे. राज्य शासनाचे विविध विभाग व नागरिक या संकेतस्थळाहून उपलब्ध साहित्य सहज डाऊनलोड करून वापरू शकतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली ही सोय अभिनव असून याने राज्यात ‘घरोघरी तिरंगा अभियाना’विषयी जनजागृती निर्माण होण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे श्री चंद्रा यांनी यावेळी सांगितले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा आणि कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
०००
अंमली पदार्थ विरोधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात पार पडली
"अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा"
मुंबई, दि. 12 : स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व नशाबंदी मंडळ यांच्यामार्फत व्यसनमुक्ती संकल्प व ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात घेण्यात आली.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव विष्णुदास घोडके, राजेंद्र सवणे, अवर सचिव अशोक अहिरे, अश्विनी यमगर, रा. मा. गायकवाड, अनिल अहिरे, कक्षाधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळ मुंबईचे प्रचारक रायगड जिल्हा संघटक रविंद्र चुरगळ व मुंबई शहरचे जिल्हा संघटक रविंद्र गमरे, वर्षा सरचिटणीस तसेच सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’
कर्मचारी संघटनेकडून मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’
मुंबई दि, 12: अनुसूचित जाती / जमाती / विजा - भज / इमाव/ विमाप्र, शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या वतीने आज मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ घरोघरी तिरंगा उपक्रम साजरा करण्यात आला. सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे यांनी पुष्प अर्पण केले. ‘वंदे मातरम’ ‘भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो’ या घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमास मुख्य अभियंता तथा सहसचिव दिलीप प्रक्षाळे, अवर सचिव सर्वश्री अंबादास चंदनशिवे, राजेश बागडे, विकास थोरात, प्रकाश पाटील, अवर सचिव तथा कार्यकारी अभियंता बाळासाहेब भवर, कक्ष अधिकारी रवि व्हटकर, प्रवीण कोतमे, शरद खारोडे, दत्तात्रय शिंदे, प्रतिभा चौधरी, वसुधा जाधव, आनंद वरकडे, कविता पिसे, स्मिता खानोलकर, निवेदिता वारुळे, सिध्देश्वर कंजारे, मल्लिकार्जुन पनशेट्टी, निधी सावंत तसेच ग्राम विकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव राजेंद्र सवणे, कार्याध्यक्ष सुभाष गवई, उपाध्यक्ष भास्कर बनसोडे, कोषाध्यक्ष सी. आर. निखारे, उपाध्यक्ष विजय नांदेकर, राजू निखारे, राजीव देवकते, प्रविण पवार, किरण शार्दुल व इतर पदाधिकारी, मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
00
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


