Monday, 18 July 2022

संत खरा कोण

 🔆🔆🔆 जय गजानन माऊली 🔆🔆🔆


 *


एक संत महात्मा नदीच्या पलीकडे रोज जात असे. तिथं त्याचा आश्रम होता. 


त्याला एक होडीवाला गरीब माणूस रोज पलीकडे सोडत असे. पण तो संत आहे म्हणून त्या बदल्यात त्यांच्याकडून एक 

पैसा सुद्धा घेत नसे. 


तसं पाहायला गेलो तर संताजवळ तरी 

कुठे पैसा असतो.? 


होडीवाला बिचारा साधा सरळ होता. 

समज कमी होती. अज्ञानी होता. तो संत रोज जाता येता त्या होडी वाल्या जवळ पारमार्थिक विचार बोलायचं. देवावर चर्चा व्हायची, देवाबद्दल बोलणं व्हायचं. होडीवाला अगदी श्रद्धेने ध्यान देऊन त्या गोष्टी ऐकायचा.


एक दिवस तो संत होडीतून उतरल्यानंतर त्या होडीवाल्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि म्हणाला.


"बाबा रे मी पूर्वी एक मोठा व्यापारी होतो, 

पुष्कळ पैसा कमवला. पण माझ्या वर एक असा प्रसंग आला की, मी माझ्या कुटुंबाला, बायको मुलांना वाचवू शकलो नाही. आता माझे कुटुंबंच राहिले नाही तर हा पैसा माझ्या काय कामाचा. मी सारे सोडले, संन्यासी झालो. पण पैसा मात्र अजून तसाच ठेवला आहे. कोणी योग्य माणूस भेटला तर देणार आहे."


"तू गरीब आहेस तुला पैशाची गरज आहे, तू हा सगळा पैसा घे, तुझं जीवन श्रीमंत होईल, सुखी होईल त्या तुझ्या कुटुंबाचं 

भलं होईल."


त्यावेळेला त्या गरीब होडी वाल्याने 

हात जोडले आणि नम्रपणे म्हणाला.


"नाही महाराज, हा पैसा मी घेऊ शकत नाही, फुकटचा पैसा जर मी घरी घेऊन 

गेलो तर आपण सांगितलेला परमार्थाचा

काय उपयोग.?"


"मी हा पैसा घेतला तर माझ्या आचरणात बिघाड होईल. घरातली माणसं आळशी बनतील. कोणीही काम करणार नाही. लालच, आसक्त्ति वाढेल."


"महाराज आपण मला ईश्वराच्या बाबतीत सांगितलं, ज्ञानेश्वरी सांगितली मला तर आजकल नदीच्या लाटा मधे सुद्धा देव दिसतो. जर तो मला दिसतो, तो मला पहातो, मी त्याला पहातो तर मग मला आणखी काय हवे.?"


"आपणामुळे मला तर खूप मोठे धन मिळाले, मग हे नाशिवंत, दुःख देणारे 

धन घेवून मी काय करु?"


"महाराज. मी माझे काम करीत राहीन, आणि बाकी सारे देवावर सोडून आनंदाने नाम घेत जीवन जगत राहीन. मला हा पैसा नको"


गोष्ट संपली पण एक प्रश्न निर्माण झाला. 

या दोन माणसा मधील संत कोण आहे.?


एक तो श्रीमंत आहे ज्याने आपल्या वर दुःख आल्या बरोबर भगवे कपडे घातले. संन्यास घेतला, ग्रंथांचा अभ्यास केला आणि दुसऱ्यांना समजावून सांगू लागला. पण तरी सुद्धा पैशाची ममता सोडू शकला नाही. 


पैसे देण्यास कोण योग्य आहे अश्या माणसाच्या शोधात राहिला आणि

दुसऱ्या बाजूला तो होडीवाला आहे. 

ज्याला सकाळी खायला मिळाले

तर संध्याकाळी मिळेल असे नाही. पण

तरी सुद्धा दुसऱ्याचा पुष्कळ पैसा मिळत 

असून सुद्धा त्याचे मन लालचावले नाही, 

मोह झाला नाही.


भगवे धारण न करता, संन्यास न घेता, संसारात असून सुद्धा, त्या संताचा उपदेश ऐकून, देवावर विश्वास ठेवून, देवाचे नाम घेत जीवन जगणे शिकून, विषयांची आसक्त्ति न करता, पैशाला ठोकर मारुन, परमार्थ करणारा हा सामान्य गरीब माणूस खरा संत आहे... राम कृष्ण हरी माऊली.


🔆🔆🔆🔆🔆🔆

भवताल eco tour


 अजिंठ्यातील रहस्यांचा शोध घेण्याची संधी !

- २००० वर्षे जुनी लेणी उलगडणारी 'भवताल इकोटूर'


अजिंठा... जगातील एक अद्भुत कलाकृती. महाराष्ट्राची ओळख असलेल्या काळ्या कातळात कोरली गेलेली जगप्रसिद्ध लेणी. ती तब्बल दोन हजार वर्षांपासून अनेक रहस्यं घेऊन उभी आहेत. तिथले अप्रतिम कोरीव काम आणि विलोभनीय चित्रे पाहताना देहभान विसरून जाते. डॉ. वॉल्टर स्पिंक या अमेरिकन संशोधकाने अजिंठ्याच्या इंचन् इंच जागेचा अर्थ लावला. तेथील अनेक रहस्यांची उकल केली. त्यांच्याच अभ्यासातून ही कलाकृती समजून घेण्यासाठी ही अभ्यास सफर. अजिंठ्याची कलाकृती समजून घ्यायची असेल तर ही संधी दवडू नका...

बॅच १ :

२० - २१ ऑगस्ट २०२२ (शनिवार - रविवार)

बॅच २ :

२३ - २४ ऑगस्ट २०२२ (मंगळवार - बुधवार)

नावनोंदणीसाठी लिंक=

https://bhavatal.com/EcoTours/Ajintha

एकूण जागा: २० प्रति बॅच

मार्गदर्शक:

शुभा खांडेकर

(अजिंठा लेणींच्या ज्येष्ठ अभ्यासक)

रवी जोशी

(अजिंठ्यातील चित्रांचे अभ्यासक)

संपर्कासाठी :

bhavatal@gmail.com / 9545350862



मतदान

 फोटो ओळी :


          देशाच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी आज (सोमवार) निवडणूक होत आहे. मुंबई विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे मतदान करतानाचे छायाचित्र.




००००

संगणक टंकलेखन परीक्षा


 

संगणक टंकलेखन परीक्षा

 संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून.

            मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोनही परीक्षा दि. २५ जुलै ते दि. २३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण २८१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे दि. १६ जुलैपासून देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत देण्यात आली आहे.

            संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थींची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थींना वितरित करण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्रासोबत परीक्षा परिषदेने पुरविलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आणणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, फोटो बदल, सही बदल तसेच विषय बदल (हे फक्त त्या त्या विषयाचेच देण्यात येतील. उदा. इंग्रजी ३० असेल तर इंग्रजी ४०, मराठी ३० असेल तर मराठी ४०, हिंदी ३० असेल तर हिंदी ४०) इ. बाबत दुरूस्ती असल्यास प्रत्येक चुकीस दोनशे रूपये शुल्क आकारण्यात येईल.

            संस्थाचालकांनी प्रवेशपत्र निर्गमित झाल्यापासून परीक्षेपूर्वी (विद्यार्थ्याचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष कार्यालयीन वेळेत येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची सही व शिक्का घ्यावा, तरच संबंधित विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल.तसेच सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावीत. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००


अपघात बचाव कार्य

 इंदोर - अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले.

            मुंबई, दि.18 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात 13 मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरूष, 4 स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

            एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतनचे वडील राम गोपाल जांगिड़, राहणार नांगल कला गोविंदगढ, जयपूर, राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी, वय 70 वर्ष, निवासी मल्हारगढ़ उदयपूर राजस्थान, 3. प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे, राहणार शारदा कॉलनी, अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र, 4. निबाजी यांचे वडील आनंदा पाटील, वय 60 वर्ष राहणार पीलोदा अमळनेर, 5.कमला बाई यांचे पती नीबाजी पाटील वय 55 वर्षे राहणार सी. पिलोदा अमळनेर, जळगाव 6. चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमळनेर, जळगाव, (उपरोक्त 1 से 6 पर्यंतचे मृतकांची ओळख आधारकार्डद्वारे केलेली आहे, 7. श्रीमती अरवा यांचे पती मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे राहणार मूर्तिजापूर, अकोला यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली, 8.सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर, इंदौर यांची नातेवाईकांद्वारे ओळख पटलेली आहे. तसेच मृतांमध्ये बसच्या चालक व वाहकाचाही समावेश आहे.

            याशिवाय अद्याप पाच मृतदेहांची ओळख पटायची बाकी आहे.अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येणार असून रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींवर उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहेत. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.

अपघातस्थळी बचाव कार्य सुरू

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथून अमळनेरकडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या पूलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

            घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 0257- 2223180, 0257- 2217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिद्ध केले आहेत, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी दोनच्या सुमारास मिळाली आहे.

0000




 





Featured post

Lakshvedhi