Friday, 15 July 2022

शिष्यवृत्ती

 इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षाता 20 जुलै ऐवजी 31 जुलै रोजी

 

            मुंबईदि. 14 :पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) दिनांक 20 जुलै 2022 ऐवजी आता रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे. 

            सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व काही ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा दि. 20 जुलै 2022 ऐवजी रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल.

            यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

00000


               


दिलखुलास

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

 मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार,दि. 16 जुलै व सोमवार, दि. 18 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक श्रीमती मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            देशात दि.18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून ही निवडणूक कशी घेतली जाते, मतांचे मूल्य म्हणजे काय, या निवडणुकीमध्ये सहभागी यंत्रणा तसेच मतदान पेटीचा विमान प्रवास याविषयी सविस्तर माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली.

0000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        रविवार, दि. 17 जुलै 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील समाजमाध्यम लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            देशात दि. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत असून ही निवडणूक कशी घेतली जाते, मतांचे मूल्य म्हणजे काय, या निवडणुकीमध्ये सहभागी यंत्रणा तसेच मतदान पेटीचा विमान प्रवास याविषयी सविस्तर माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

000000



नगरपरिषद निवडणूक

 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

            मुंबई, दि. 14 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली.  

            राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी या निवडणुकांची घोषणा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात 12 जुलै 2022 रोजी सुनावणी झाली. समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासवर्गाबाबत दिलेला अहवाल यावेळी शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला; तसेच 19 जुलै 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे

Jai maharashtra

 




उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

प्रथम 10 मध्ये मुंबई आयआयटीचा तिसरा क्रमांक

 

            नवी दिल्ली, 15 : उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष 100 उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 12 शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुसऱ्या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

            केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने इंडिया रँकिंग -2022’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधानकेंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्तीयुजीसीचे अध्यक्ष एम. जे. कुमार तसेच शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारी तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध 9 अभ्यासक्रमांची श्रेणी  इंडिया रँकिंग-2022’ ची यादी जाहीर केली.

            या कार्यक्रमात प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन संस्थांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

            उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वंकष 100 उत्कृष्ट संस्थांमध्ये राज्याचा दुसरा क्रमांक आहे. प्रथम क्रमांकांवर तामिळनाडूतील 18 उच्च शैक्षणिक संस्थांचा समोवश आहे. प्रथम 100 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राज्यातील 12 संस्था आहेत. यामध्ये तिस-या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्थामुंबई (आयआयटी), 25 व्या क्रमांकावर सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठ, 26 व्या क्रमांकावर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, 28 व्या क्रमांकावर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमुंबई, 33 व्या क्रमांकावर होमी भाभा राष्ट्रीय संस्थामुंबई, 62 व्या क्रमांकावर सिम्बायोसिस इंटरनॅशनलपुणे,  68 व्या क्रमांकावर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानागपूर, 76 व्या क्रमांकावर  डॉ.डी वाय पाटील विद्यापीठपुणे, 81 व्या क्रमाकांवर मुंबई विद्यापीठमुंबई, 89 व्या क्रमांकावर एसव्हीकेएम नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमुंबई, 92 व्या क्रमांकावर दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सवर्धा, 99 व्या क्रमांकावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमुंबई या महाराष्ट्रामध्ये असणा-या संस्था पहिल्या 100 सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.

            देशभरातील उत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये राज्यातील 13 विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 12, 14, 17, 32, 41, 45, 51 ,54, 60, 73, 76 , 81 आणि 83 या क्रमांकांवर आहेत. 

            उत्‍कृष्ट 100 महाविद्यालयांमध्ये राज्यातील 3 महाविद्यालयांचा समावेश आहे यामध्ये 57, 69 , 87, क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 50 संशोधन संस्थांमध्ये राज्यातील 5 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 4, 7, 11, 17 आणि 25 या क्रमांकांवर आहेत.

            उत्कृष्ट 200 अभियांत्रिकी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील 17 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 3, 18, 32, 71, 72, 116, 119, 131, 135, 142, 146, 163, 167, 172, 185, 193, आणि 197 या क्रमांकांवर आहेत.

            उत्कृष्ट 100 व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 10 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये 9, 11, 17, 21, 25, 43, 68, 71, 91, आणि 95 या क्रमांकांवर आहेत.

 

उत्कृष्ट 100 फॉर्मसी महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 16 संस्थांचा समोवश आहे. यामध्ये 7, 11, 21, 32, 38, 41, 42, 46, 53, 65, 74, 76, 87, 88, 90, आणि 99 या क्रमांकांवर आहेत.

            उत्कृष्ट 50 वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील महाविद्यालये/संस्था/ विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 17, 24, 42, 45 क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 40 दंत 42, 45 क्रमांकांवर आहेत. उत्कृष्ट 40 दंत महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्यें राज्यातील 6 महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये 3, 9, 11, 17, 35 आणि 37 या क्रमांकांवर आहेत.


            उत्कृष्ट 30 विधी महाविद्यालय/संस्था/विद्यापीठांमध्ये राज्यातील एका संस्थेचा समोवश आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर सिम्बायोसिस लॉ स्कुल, पुणे या संस्थेचा समावेश आहे.  उत्कृष्ट वास्तुकला महाविद्यालय/संस्था/ विद्यापीठांमध्ये राज्यातील 8 व्या क्रमांकावरील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, या एका  संस्थेचा समावेश आहे.


            या संकेतस्थळावर सविस्तर यादी उपलब्ध आहे.  https://www.nirfindia.org/2022/Ranking.html


00000



 




Start up health


आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण,

वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट आणि इंडीया हेल्थ फंड यांच्यासमवेत सामंजस्य करार.

            मुंबई, दि. 15 : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसीत करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडीया हेल्थ फंड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील कौशल्य विकासविषयक विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच स्किल इंडियाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने हे सामंजस्य करार महत्वपूर्ण ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.  

            जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मंत्रालयात हे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेन्द्र सिंह कुशवाह, टाटा स्टाईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या उपाध्यक्षा अनिता राजन, इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी यांच्यासह या संस्थांचे प्रतिनिधी अमेय वंजारी, राजर्षी मुखर्जी, श्रद्धा डे, सुहेल जमादार, अभिजीत कुमार, कौशल्य विकासच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण संचालक दिगंबर दळवी, नाविन्यता सोसायटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी मिथून जॉन आदी मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, देशातील प्रत्येकाला कुशल बनवून स्किल इंडिया निर्मितीचे स्वप्न साकारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. आपल्या लोकसंख्येचे देशाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासात योगदान घेण्याचे आपले ध्येय आहे. यादृष्टीने कौशल्य विकास विभाग विविध प्रभावी उपाययोजना राबवित आहे. विविध कार्यक्रमांमुळे राज्यात कौशल्य विकास, उद्योजकता, स्टार्टअप्सचा विकास यासाठी सुलभ वातावरण तथा इकोसिस्टीम तयार झाली आहे. आता टाटा स्ट्राईव्ह, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट, इंडिया हेल्थ फंड अशा विविध संस्थांनीही या कामात सहभाग घेतल्याने कौशल्य विकासाचे विविध उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

            राज्यात भौगोलिक विविधता मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील दुर्गम तसेच जंगल भागात आरोग्यविषयक सुविधा पोहोचविणे कठीण जाते. यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हा प्रभावी उपाय ठरु शकतो. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासाला चालना मिळेल, त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

            कौशल्य विकासच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी सामंजस्य कराराच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टसमवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून राज्यातील आयटीआयचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणास चालना देणे, उद्योजकता आणि नाविन्यतेसाठी विविध कार्यक्रम विकसीत करणे, मास्टर ट्रेनर्स तयार करणे, महिला, दिव्यांग व्यक्ती, एलजीबीटीक्यू, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजातील घटक अशा विविध वंचित घटकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच टाटा ट्रस्ट यांचा उपक्रम असलेल्या इंडिया हेल्थ फंडच्या माध्यमातून राज्यात आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यात येणार आहे. या स्टार्टअप्सना निधीची उपलब्धता, मार्गदर्शन, बाजारपेठेची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील वंचित घटक, दुर्गम भागातील घटक यांना आरोग्य सुविधा सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा विकास करणे, त्याअनुषंगाने स्टार्टअप्स विकसीत करण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली.

            टाटा स्टाईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता राजन म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाबरोबर आज करण्यात आलेल्या भागीदारीमुळे राज्याच्या विविध भागात काम करण्याची संधी मिळाली आहे. येत्या काळात कौशल्य विकास विभागासमवेत राज्यातील विविध वंचित घटकांसाठी काम करता येईल. राज्य शासन आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्टच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करु, असे त्यांनी सांगितले.   

             इंडिया हेल्थ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव जोशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि इंडिया हेल्थ फंड आरोग्य क्षेत्रात एकत्रीत काम करेल. आरोग्य क्षेत्रात विविध कल्पक तंत्रज्ञानाचा विकास करणे, यासाठी स्टार्टअप्सना चालना देणे यासाठी येत्या काळात महाराष्ट्र शासन आणि इंडिया हेल्थ फंड एकत्रीत काम करेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागाचे अधिकारी आणि संस्थांचे पदाधिकारी यांनी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान केले.

०००००


मंडल आयोग यात्रा

 



मंडल आयोग यात्रा

 विदर्भात निघणार मंडल यात्रा

-युवक,विद्यार्थ्यामंध्ये अधिकार आणि कर्तव्याप्रती करणार जागृती


फोटो- मंडल आयोग जनजागृती यात्रेच्या नियोजनाकरीता उपस्थित विदर्भातील बहुजन ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते


नागपूर: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघणार आहे.

विदर्भातील ओबीसी, व्हीजेएनटी,एसबीसी आदी समाजातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी महाराष्ट्र पर्टयन विकास महामडळाच्या सभागृहात झाली.यात हा निर्णय घेण्यात आला. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर,यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात मंडल आयोग जनजागृती यात्रा निघेल. ओबीसी व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपायावर चर्चा, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जागृती, ओबीसींचे वसतिगृह, महाज्योतीच्या आणि ओबीसी आर्थिक विकास महामंळाच्या योजना, शिष्यवृत्तीचा लाभ, ओबीसींची जनगणना आदी अनेक विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

 यात्रेच्या माध्यमातून ओबीसी हितासाठी गठित बी.पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची माहिती ओबीसी समाजाला देऊन या शिफारशी आज परिस्थितीत शासनाने लागू करण्याची आवश्यकता या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी असलेल्या शासकीय योजना, "महाज्योती" संस्थेच्या योजना, ईतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या योजना , ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजना व जागतिक संस्थेच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.ओबीसी जनगणना-काळाची गरज यांवर प्रकाश टाकून शासनाकडे प्रलंबित ओबीसी समाजाच्या अन्य विकासात्मक मागण्यांच्या पूर्ततेसाठी ओबीसी समाज एकीकरण या प्रमुख हेतूने यात्रेच्या माध्यमातून प्रामुख्याने कार्य करण्यात येणार आहे. सभेत ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी अधिकार मंच,सर्व समाज ओबीसी मंच, संघर्ष वाहिनी, संविधान मंच, स्टु़डटंस राईटस असो.सेल्परिसपेक्ट मुव्हमेंट,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ , भोयर पवार महासंघ,आता लढूया एकीनेच सारख्या अन्य बहुजन ओबीसी संघटनांचा सहभाग होता.

 बैठकीत सर्व समाज संघटनांनी ओबीसी , एन.टी., व्हि.जे.एन.टी. , एस.बी.सी. यां ओबीसी प्रवर्गातील नागरीकांना तसेच बहुजन समाजासाठी सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांना या यात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सभेत बळीराज धोटे,दिनानाथ वाघमारे, उमेश कोराम,प्रमोद काळबांधे,अतुल खोब्रागडे,खेमेन्द्र कटरे, अशोक लंजे, श्रावण फरकाडे,नामदेव राऊत गोपाल सेलोकर,डाॅ.वैरागडे,मनोज चव्हाण,ए.ए.डेकाटे,योगीता माचमवार, अश्विनी नागुलवार,दिपक पडोळे, अर्चना कोट्टेवार, स्वाती अडेवार आदी ओबीसी पदाधिकारी एवं सदस्यगण उपस्थित होते.‘मंडल यात्रेबाबत प्रास्तविक ओबीसी युवा अधिकार ‘मंचचे प्रमुख उमेश कोर्राम यानी केले.प्रमोद काळबांधे यांनी उपस्थितांचे आभार मानले.संविधान प्रास्ताविकेचा सामुहिक पठनाने समारोप झाला.



Featured post

Lakshvedhi