Friday, 27 May 2022

पेशवे

 *गंगाबाई…एक दुर्लक्षित पेशवीण*

संकलन - सुधीर लिमये पेण

पेशवाईतील प्रत्येक पेशवे पत्नीच्या नशिबी वैधव्य लिहिलेले दिसते. असे असुनही या प्रत्येक स्त्रीला पती निधना नंतर व्यवस्थित आयुष्य जगता आले. अपवाद रमाबाईंचा कारण त्या सती गेल्या. त्या काळची कुटुंब संस्था, पेशवे घराण्याचा दरारा आणि समाजात असलेला पेशव्या बद्दलचा आदर या सगळ्या मुळे या स्त्रियाचे आयुष्य सुसह्य झाले असावे.

एकूणच या सगळ्या स्त्रिया कर्तृत्ववान आणि वलयांकित. त्यातील राधाबाई, काशीबाई किँवा रमाबाई बद्दल अजुनही भरभरून लिहिले किँवा बोलले जाते. पण एक दुर्लक्षित राहिली.. ती म्हणजे गंगाबाई .

गंगाबाई म्हणजे नारायण राव पेशव्यांची पत्नी, आजही त्यांच्या बद्दल फारच कमी माहीती मिळते.

कृष्णजी हरी साठ्यांची ही कन्या २२ एप्रिल १७६३ पेशव्याची सुन होऊन शनिवार वाड्यात आली. नारायणराव आणि गंगाबाईचे लग्न सिंहगडावर झाले. अवघा १० वर्षाचा संसार आणि मग ३० ऑगस्ट १७७३ ला नारायणरावांची हत्या झाली. गंगाबाईच्या जन्माची तारीख माहिती नाही, पण मृत्युच्या वेळेस नारायणराव १८ वर्षाचे म्हणजे गंगा बाई १५-१६ वर्षाच्या असाव्यात. पती निधनाच्या दुःखाने त्यांनी प्रचंड आक्रोश केला, आपल्या थोरल्या जाऊबाई रमाबाई प्रमाणे त्यांना सती जायचे होते. पण पोटात पेशवे घराण्याचा वंश वाढत होता त्या मुळे त्यांना सती जाण्या पासुन रोखले गेले. त्याच रात्री शनिवार वाड्यातील लोकांनी ब्राह्मणाच्या मदतीनं नारायणरावावर "नडगेमोडी" वर अंत्यसंस्कार केले. (नडगेमोडी - नडगं म्हणजे गुढगा, नदीच्या पात्रात गुढग्या पर्यन्त पाणी यायची जागा, आजच्या लकडी पुलाजवळ, पोलीस चौकीच्या मागे नदी पात्रात ही जागा आहे )

ह्या दिवशी गंगाबाई पावणे दोन महिन्याच्या गर्भवती होत्या. 

नारायणरावाच्या खुना नंतर शनिवार वाडा सुतकात होता, दुसऱ्या दिवशी राघोबादादाने दरबार भरवला आणि "वैऱ्याचे कसले सुतक" म्हणुन पेशव्याच्या गादीवर जाऊन बसले. १६ वर्षाच्या या मुलीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असताना. वाड्यावर त्यांना समजुन घेणारे कोण होते ? वाडयावर दोनच स्त्रिया होत्या एक पार्वतीबाई आणि दुसऱ्या आनंदीबाई.

त्या प्रसंगी आनंदीबाईनी गंगाबाईना स्वतःच्या महालात ठेऊन घेतले. यात इतिहासकारांची दोन मते आहेत. एक मत असे की राघोबादादाला नारायणरावाचा वंश संपवायचा होता आणि त्या करता तो कुठल्याही थराला जाऊ शकत होता आणी अशा वेळेस राघोबादादा पासुन गंगाबाईला सुखरूप फक्त आनंदीबाई ठेऊ शकत होत्या. दुसरे मत असे राघोबादादाच्या कारस्थानात आनंदीबाई सहभागी होत्या आणि त्यांनी धाकाने गंगाबाईना ठेवले होते. खरे कारण तो शनिवार वाडाच जाणो.

राघोबादादाना पेशवाईची वस्त्रं तर मिळाली. पण त्यांनी ज्या पध्दतीने ती मिळवली त्यामुळे कारभारी नाराज होते. कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालु झाल्या. कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस, सखारामबापु, त्र्यंबकराव पेठे, रामशास्त्री, मालोजी घोरपडे. या मंडळींनी ठरवले राघोबादादाला पेशवेपदा वरून दुर करायचे. हेच होते *बारभाई कारस्थान* राघोबाला दुर करून मग कोणाला पेशवे करायचे ? ठरले गंगाबाईच्या नावाने कारभार करायचा. तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा. नाही तर दत्तक विधान करायचे. बाहेर काय चालू याची गंगाबाईना अजिबात कल्पना नव्हती ती बिचारी अबला अडकली होती आनंदीबाईच्या महालात.

नाना आणि मंडळी बोलुन चालुन मुत्सद्दी, त्यांनी गंगाबाईना २६ जानेवारी १७७४ ला शनिवार वाड्यातुन सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले. त्या वेळेस पार्वतीबाई त्यांच्या बरोबर होत्या. ज्या दिवशी गंगाबाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले आणि पेशवाईचा कारभार गंगाबाईच्या नावे सुरु केला. पुरंदरावरच पार्वतीबाईनी त्यांचे साधे पणाने डोहाळ जेवण केले.

पुढे जाऊन १८ एप्रिलला, सवाई माधवरावचा जन्म झाला, मुलाचं नाव माधवराव ठेवण्या मागचे कारण थोरल्या माधवरावच्या निधना नंतर पिंडाला कावळा शिवत नव्हता तेंव्हा नारायणना मुलगा झाला तर नाव माधव ठेऊ असा शब्द दिला आणि काक स्पर्श झाला. त्या नंतर ४० दिवसांनी बाल पेशव्याला पेशवाईची वस्त्रे दिली, या संपुर्ण काळात आणि पुढे पेशवाईचा कारभार गंगाबाईच्या नावे चालु होता.

गंगाबाई धोरणी, दक्ष होत्याच याची प्रचिती नारायणरावांची हत्या ते सवाई माधवरावाच्या जन्मा पर्यन्त च्या वागण्यातून येते. त्या धोरणी किँवा दक्ष नसत्या तर पेशव्याचा वंशज जन्माला येणे अवघड होते. त्या अतिशय समंजस होत्या, राज्य कारभाराची माहिती नसल्यामुळे त्यांनी कारभारी मंडळी वर पुर्ण विश्वास टाकला, नित्य कामे कारभाऱ्यावर सोपवली पण महत्वाचे निर्णय किँवा गुप्त खलबत्ताच्या वेळेस जातीने हजर असत. 

पेशव्यांच्या सगळ्या स्त्रियाना देवा धर्माची आवड होती ती आवड गंगाबाई मध्ये पण होती, पण इतर स्त्रिया प्रमाणे त्यांना काशी किँवा इतर तीर्थयात्रांचा योग आल्याचं दिसत नाही.

पुण्यात त्या विषमज्वराने आजारी पडल्या, वैद्य येऊन उपचार करत होते पण तब्बेतीला उतार पडत नव्हता, त्यांना शेवट जवळ आल्याचं कळुन चुकले, त्यांनी सखारामबापुना बोलावले आणि सांगितले "नानांनी आणि तुम्ही मिळोन श्रीमंतांचे आणि दौलती चे रक्षण करावे" या वेळेस सवाई माधवरावाचे वय होते अवघे तीन वर्ष. या माउलीला लेकराची आणि त्या पेक्षा दौलती ची काळजी.

पती पेशवा असताना पेशवीण म्हणुन कधी मिरवता आले नाही आणि मुलगा पेशवा होऊन पेशव्यांच्या मातोश्री म्हणुन आदराच्या स्थानी बसणे नियतीला मंजुर नव्हते. एकूण काय तर भोगले जे दुःख त्यालाच सुख म्हणायचे.

त्या काळात विधवा असुन सकेशा राहिलेली पेशवीण, नारायणरावाच्या मृत्युच्या वेळेस पोटात गर्भ असल्यामुळे शास्त्रा नुसार केशवपन झाले नव्हते.

अशी ही दुर्लक्षित पेशवीण १२ जुलै १७७७ ला विषमज्वराने मृत्यु पावली.

बिपीन कुलकर्णी 

संधर्भ - पेशवे घराण्याचा इतिहास ( प्रमोद ओक)

पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे 

पेशवाईतीलस्त्रिया


 






 आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी/नुतनीकरण ऑनलाईन होणार..पीसीपीएनडीटी वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार

- आरोग्य मंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि. 26 : प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

            मुंबईतील कुपरेज येथे स्थित महाराष्ट्र राज्य नाविन्‍यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाईन वेबपोर्टलचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मुलांमुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य शासन प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. महाआयटीच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरणासाठी आरोग्य विभागाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. ज्यांना नोंदणी किंवा नुतनीकरण करावयाचे आहे अशांनी या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. या सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालयातील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे. या ऑनलाईन सुविधेचा चांगला उपयोग करून केंद्रांच्या नोंदणी आणि नुतनीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

            ही नवीन प्रणाली विकसीत केल्याबद्दल आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, या वेबपोर्टलद्वारे नोंदणी/नुतनीकरण प्रक्रियेवर देखरेख केली जाणार आहे. आरोग्य क्षेत्रात उपयुक्त ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य विभागाशी संबंधित इतर सेवा एका प्लॅटफॅार्मवर याव्यात यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

            केंद्र शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी कायद्यानुसार केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/नुतनीकरण करण्यासाठी कार्यप्रणाली विकसीत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पीसीपीएनडीटी कायद्यांअंतर्गत केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/ नुतनीकरणासाठी http://pcpndtonlineregistration.maharashtra.gov.in ही कार्यप्रणाली महाऑनलाईन (महा-आयटी) या संस्थेच्या मदतीने विकसीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल

            आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना संदर्भसेवा देताना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातील पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुंबईत झाले.

            सर्व साधनसामुग्री, अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेली रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयांत दाखल होणार आहेत.

रुग्णवाहिकेचे फायदे

             रुग्णवाहिकेमार्फत नवजात बालकांना संदर्भसेवा देत असताना योग्‍य उपचार सुरु ठेवून इतर आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करेपर्यंत शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल. कमी वजनाची, कमी दिवसाची बालके, नवजात शिशुंमधील श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार, सेप्सीस, न्यूमोनिया, जलशुष्कता, हायपोथर्मिया, जंतूसंसर्ग यासारख्या गंभीर आजारांच्‍या रुग्‍णांना संदर्भीत करताना याचा उपयोग होणार असून त्‍यामुळे मृत्यु टाळण्यासाठी मदत होणार आहे.

            नवजात शिशुला संदर्भ सेवा देताना कांगारु मदर केअर (केएमसी) या सारख्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल.Kangaroo Bag उपलब्ध असल्याने Hypothermia मुळे होणाऱ्या अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

            नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Suction Machine, AMBU Bag, Oxygen Hood, Cylinder, Continuous Positive Airway Pressure (CPAP) यासाखी यंत्रसामग्री व उपकरणेऔषधसाठा व प्रक्षिशीत मनुष्यबळ असल्याने संदर्भीत होताना होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

कार्यपद्धती

            या नवजात शिशु रुग्णवाहिका आदिवासी जिल्ह्यातील तालुक्याच्या उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत असतील.

            सद्यस्थितीत जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा यासाठी वापर करण्यात येईल. तसेच या नवजात शिशु रुग्‍णवाहिकेसाठी २०२२-२३ मध्ये १५ वैद्यकीय अधिकारी व १० वाहन चालकांच्या पदाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे.

            नवजात शिशुंसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

            तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रामधून कॉल आल्यास नवजात शिशु रुग्णवाहिकेमार्फत संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता १०२/१०८ या टोल फ्री नंबरचा उपयोग करण्यात येईल.

           

 



 





सुप्रभात

 


 *जिथे दान देण्याची सवय असते*

*तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे* 

*माणुसकीची शिकवण असते.....*

*तिथे*

*माणसांची कमी नसते👈.....*

            🌹 *शुभ सकाळ* 🌹

Featured post

Lakshvedhi