Monday, 2 May 2022

 दिलखुलास’ कार्यक्रमात बार्टीचे महासंचालक

धम्मज्योती गजभिये यांची मुलाखत

            मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 3 मे व बुधवार 4 मे व गुरूवार 5 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            समता हा कोणत्याही समाजाच्या विकासाचा पाया असतो. समता विचारपीठ सुरू ठेवून विकासाला चालना देणे हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा उद्देश आहे. संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन तरूणपिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य बार्टी ही संस्था करते. या संस्थेचे कार्य, त्याचा उद्देश आणि त्याची सद्यस्थिती याविषयी सविस्तर माहिती धम्मज्योती गजभिये यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

 नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन

सहभागासाठी अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन.

                       · विजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर.

मुंबई, दि. ०१ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत दि. ३० मे २०२२ पर्यंत आहे.

            स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अव्वल १०० स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्त्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश (वर्क-ऑर्डर्स) दिले जातात. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

स्टार्टअपविषयक उपक्रमांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने गौरव.

            यासंदर्भात अधिक माहिती देताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र ‘स्टार्टअप सप्ताह’ या उपक्रमाच्या आतापर्यंत चार आवृत्त्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीस नुकताच मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता उपक्रमाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदा आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहामध्ये राज्यासह देशभरातील कल्पक नवउद्योजक, तरुण-तरुणींनी निश्चित सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या सप्ताहातूनही नवनवीन संकल्पना, कल्पक संशोधन पुढे येईल, असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला. 


 


 


 

 सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. २ :- सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम इस्कॉनच्या 'हरी बोल' उपक्रमाच्या माध्यमातून केले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जुहू येथील इस्कॉन सभागृहात 'सेंद्रिय उत्पादनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना' या उपक्रमाचा शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.

            सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, जैव विविधता टिकेल तसेच मृदा आरोग्य चांगले राहील असे सांगून नागरिकांनी सेंद्रिय शेतीतील अन्नधान्य, दुग्ध उत्पादने, मध आदी जिन्नस खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

            यावेळी इस्कॉनचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मायापुर येथील इस्कॉन मंदिराचे विश्वस्त ब्रज विलास दास प्रभू, गौरांग दास, याचनीत पुष्करणा, टी सी उपरेती, गोपाळ उपरेती आदी उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी इस्कॉन मंदिराला भेट देऊन रासबिहारी भगवान यांची आरती केली.

0000

Governor Koshyari applauds 'Hari Bol' initiative of

ISKCON to promote sustainable agriculture

            Mumbai, Date 2 :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari applauded ISKCON's initiative of supporting sustainable agriculture and upliftment of rural economy through organic products of Uttarakhand in collaboration with 'Hari Bol'. The initiative was launched at ISKCON's temple complex in Juhu Mumbai on Sunday

            The Governor expressed confidence that organic farming will promote Atma Nirbhar Bharat by maintaining soil health, preserving biodiversity and making agriculture profitable for farmers.

            The Governor also visited the Sri Sri Radha Rasbihari Temple of ISKCON Juhu Mumbai and performed arti. 

            ISKCON Chairman Gopal Krishna Goswami Maharaj, Director of Temple of Vedik Planetarium Mayapur Braj VIlas Das, CMD of BSE Ashish Chauhan, Yachneet Pushkarna, Gaurang Das, T C Upreti and Gopal Upreti were present.

0000



 


 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा.

रमजान ईद एकोप्याने, उत्साहाने साजरी करुया

            मुंबई, दि. 2 : “ईद-उल-फित्र तथा रमजान ईद सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित बांधवांना मदत करुन त्यांच्या जीवनात आनंद आणूया. यंदाची ईद एकोप्याने, आनंदाने, उत्साहाने साजरी करुया. मानवकल्याण, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देऊया...,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            रमजान ईदनिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होतो. मुस्लिम बांधवांच्या बरोबरीने सर्वधर्मीय बांधव ईदच्या आनंदात सहभागी होतात. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी रमजान ईद समाजात आनंद, उत्साहाचे वातावरण घेऊन येईल. देशवासियांमध्ये एकजुटीची, सहकार्याची, बंधुत्वाची भावना वाढीस लावेल. ही भावनाच महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

००००


 



 बर्‍याच वर्षापूर्वी ज्योतिषाने माझी पत्रिका पाहून माझे भविष्य सांगीतले होते की तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल तुला एवढ काही मिळत जाईल, ते कुठे ठेवू असा तुला प्रश्न पडेल ,आणि मग तू याला पाठवं, त्याला पाठवं करीत वाटत सुटशील,जेवढे तू वाटशील त्याहून जास्त तुझ्याकडे परत येईल.तू कितीही वाटलं तरी ते संपणार नाही. 

 हे भविष्य ऐकून मला आनंद झाला.....

अनेक वर्षें गेली आणि मग मला नंतर समजलं ज्योतिषी *वाॅट्स अप* बद्दल बोलत होता.

🥱🤪😝😭😭😷

 संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुंबई, दि. १- संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.                                                                      

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त

विधान भवन येथे ध्वजारोहण

'रशियन हाऊस इन मुंबई' च्या संचालिका विशेष निमंत्रित.

            मुंबई, दि १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या समारंभास 'रशियन हाऊस इन मुंबई' या रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका डॉ.एलिना रेमिझोव्हा आणि रशियन भाषा विभागाच्या प्रमुख श्रीमती विद्या स्वर्गे-मदाने विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.

            यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. विधान भवनाचा आसमंत सनई-चौघडा व तुतारीच्या निनादाने मांगल्य आणि उत्साहाने बहरून गेला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य पत्करावे लागलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले.

            महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे असे आवाहन करून त्यांनी राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, सह सचिव (समिती) तथा वि.का.अ. अनिल महाजन, उप सचिव शिवदर्शन साठे,राजेश तारवी,सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव वि.श.कोमटवार,रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे,मंगेश पिसाळ, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य सुरक्षा अधिकारी, प्रदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. या प्रसंगी विधानमंडळ सुरक्षा सेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा सहाय्यक यांना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राष्ट्रपती यांचे गुणवत्ता पदक प्राप्त झालेल्या उप मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्रशेखर गोविंद सावंत यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

'रशियन हाऊस इन मुंबई'च्या संचालिका यांची विधान भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट.

            या समारंभानंतर डॉ.एलिना रेमिझोव्हा यांनी सभापती आणि उपसभापती यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना त्यांनी मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या प्रमुख दोन शहरांमध्ये झालेल्या सिस्टर सिटी कराराला या वर्षीं ५५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगून त्यानिमित्त आजपर्यंतच्या वाटचालीला उजाळा दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या संदेशात सभापती महोदयांनी भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंधाच्या गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांनी या भेटीप्रसंगी अतिशय आनंद व्यक्त करीत 'रशियन हाऊस इन मुंबई' तर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या केंद्राला भेट द्यावी, असे निमंत्रण दिले. उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपल्या रशिया भेटीतील अनुभवांना यावेळी उजाळा देत मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग शहरांना लाभलेला समृध्द सांस्कृतीक वारसा, अनुभव, पर्यावरण संवर्धन आणि साहित्य अनुवाद याबाबत आणखी आदानप्रदान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पाहूण्यांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

000000



 


                                                                            

Featured post

Lakshvedhi