Tuesday, 12 April 2022

 ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त

राजभवन येथे अजानवृक्षाचे रोपण

वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. 11 : भगवान श्रीकृष्णांनी संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली तर भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी जवळ अजानवृक्ष आहे. आपल्या देशात तुळशीपासून तर वटवृक्षापर्यंत प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्त्व आहे.  वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून वृक्षारोपण ही लोकचळवळ होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावेअसे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ११) राजभवन येथे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व असलेल्या अजानवृक्षाचे रोपण करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            पर्यावरण व जैवविविधता अध्ययनसंरक्षण व संवर्धन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'बायोस्फिअर्सया संस्थेतर्फे वृक्षारोपण तसेच पर्यावरण रक्षणासंबंधी संबंधी माहिती पत्रकांच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            आपल्या देशात प्रत्येक झाडाचे सांस्कृतिक महत्व जाणून पूजा केली जात असे. यामागे शास्त्रशुद्ध चिंतन व दूरगामी विचार होता. परकीय आक्रमणाच्या काळात शास्त्रीय विचार मागे पडून केवळ रूढी उरल्या. त्यामुळे प्रत्येक झाडाचे शास्त्रीय महत्त्व समजून त्याचे वृक्षारोपण केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            सिद्धवृक्ष गोरक्षवल्लीशांभवीयोगवल्ली आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अजानवृक्षाचे राजभवन येथे रोपण केल्यामुळे त्याला राजाश्रय मिळाला, असे बायोस्फिअर्स  संस्थेचे संस्थापक व पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगितले. राज्यातील प्रत्येक विद्यापीठामध्ये अजानवृक्षाचे रोपण व्हावे व त्यामाध्यमातून नवी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक व्हावी अशी अपेक्षा डॉ. पुणेकर यांनी व्यक्त केली.

            संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीवर असलेला अजानवृक्ष सर्वदूर पोहचवणे तसेच त्या माध्यमातून ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने बायोस्फिअर्स ही संस्था कार्य करीत असल्याची माहिती डॉ.पुणेकर यांनी दिली.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते अजानवृक्ष व सुवर्ण पिंपळ या वृक्षांची शास्त्रीय माहिती देणाऱ्या माहितीपत्रांचे प्रकाशन करण्यात आले तसेच जलसंवर्धन व जलसाक्षरता या विषयावरील लघूपटाचे प्रदर्शन करण्यात आले. 

            कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढाह.भ.प. माणिक महाराज मोरेडॉ. रवींद्र जायभायेडॉ. मोहन वामनडॉ. शंकर लावरेसुरेश वैद्यशिवलिंग ढवलेश्वरदिपक हरणेदत्तात्रय गायकवाडचंद्रकांत सहासनेआशिष तिवारीजय जगतापसुनील जंगमनिवेदिता जोशीआदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. लावरे यांनी सूत्रसंचालन केलेडॉ. जायभाये यांनी आभार मानलेडॉ. पुणेकर यांनी प्रास्ताविक केले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.   


 पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे 12 एप्रिल रोजी आयोजन

            मुंबई, दि. 11 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या क्षेत्रीय कार्यशाळेचे दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे.

            ही कार्यशाळा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. महिला व बाल विकास विभाग मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत. तसेच आमंत्रित राज्यांचे समाजकल्याण मंत्री, महिला व बाल विकास मंत्री, महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव, सचिव,आयुक्त, संचालक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय युनिसेफ, युएनवूमन, युएनएफपीए आणि नागरी समाज संघटना यासारखे भागधारक देखील सहभागी होणार आहेत.

            या बैठकीत महिला व बालकांसाठीच्या योजना, उपक्रम व त्यात भविष्यात केले जात असलेले बदल यावर चर्चा होणार आहे, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

००००

देश विदेशातून वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यासाठी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार

विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 11 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले.

            मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्याना विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सल्लागार सीताराम कुंटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानक्षेत्र विकास, संचालक मल्लिकार्जुन, नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांना आकर्षित करणारे जगातील विविध उद्यानामधील पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावे. या उद्यानात पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरीकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात यावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

            विविध जातींचे सर्प संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी या उद्यानात आणावेत. तसेच वाघांची, बिबट्या सफारीचा उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

0000000



 



 केवळ 75 नालेसफाई जूनपर्यंत करायची हा एक मोठा घोळ असून त्याचा तपास घेणार...

नालेसफाई नीट होण्याकरिता मुंबई भाजपा दक्षता समिती स्थापन करणार

– आ. अतुल भातखळकर यांची घोषणा

मुंबईदि. 11 एप्रिल (प्रतिनिधी)

            मुळातच उशिरा काढलेल्या नालेसफाईच्या कंत्राटामध्ये पावसाळ्यापर्यंत अवघे 75 % नालेसफाई करायची असा नियम घालून मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या तुंबण्याची व्यवस्था केली आहे असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज सकाळी नालेसफाई पाहणी नंतर बोलताना केला.

            कांदिवली पूर्व येथील पोयसर व अन्य नाल्यांचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आले की केवळ 75 % नालेसफाई जूनपर्यंत करायची आणि उरलेली नालेसफाई डिसेंबरपर्यंत करायची अशी तरतूद या कंत्राटमध्ये करण्यात आल्यामुळे यावेळी सुद्धा मुंबई पुन्हा एकदा बुडणार असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.  मुळातच नालेसफाईची निविदा एक महिना उशिरा काढली, त्याचबरोबर निविदा उशिरा काढत असताना मुंबई शहरातल्या सर्व नाल्यांचे कंत्राट न करता, टप्प्याटप्प्याने कंत्राट काढण्याचा प्रयत्न केला गेला याचाच अर्थ या सगळ्या कंत्राटामध्ये मोठा घोळ असून याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे ही त्यांनी यावेळेस व्यक्त केले.

            महानगरपालिका बरखास्त झाल्यामुळे आणि दरवर्षी नालेसफाईच्या कामात होत असलेल्या घोटाळ्यामुळे मुंबई भारतीय जनता पार्टी प्रत्येक नाल्याची तपासणी करण्याकरिता व नालेसफाई नीट होण्याकरता त्या त्या विभागातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजातील मान्यवर यांची एक दक्षता पथक स्थापन करणार असल्याची घोषणा सुद्धा आ. अतुल भातखळकर यावेळी यांनी यावेळी बोलताना केली.

            नालेसफाई तातडीने करण्याकरिता ज्यांना कंत्राट मिळाले आहे त्यांना अधिक यंत्रसामुग्री देण्यात यावीतसेच हे काम अत्यंत गतिमान पद्धतीने करावे असे मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांना भेटून सांगणार असल्याचे आ. अतुल भातखळकर यांनी म्हटले.


 मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत

यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान

            मुंबई, दि. 11 : महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजता सह्याद्री शासकीय अतिथिगृह,मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

            या कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, माविमच्या व्‍यवस्‍थापकीय संचालक, श्रीमती श्रद्धा जोशी या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिला सुरक्षा ऑडीट प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण होणार आहे, त्याचप्रमाणे पहिल्या सत्रात महिला सुरक्षा ऑडिट प्रशिक्षण व दुसऱ्या सत्रात राज्यातील यशस्वी महिला उद्योजक/ सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यक्रम व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे

 

रब्बी हंगामातील धान, भरडधान्य खरेदी  

नोंदणी मुदत 30 एप्रिलपर्यंत

 

        मुंबईदि. 11 : पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

          राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे ते 30 जून, 2022 असा कालावधी निश्चित केला आहे. तसेच भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती अन्ननागरी पुरवठाग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.                                      

Featured post

Lakshvedhi