Wednesday, 6 April 2022

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती

अभिनव पद्धतीने साजरी करणार.

- धनंजय मुंडे.

         · आजपासून दहा दिवस राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम"

         · अंमलबजावणी व नियंत्रणासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत.

            मुंबई, दि. 06 :- सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे नियोजन विभागाने केले असून, यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त, बार्टीचे महासंचालक तसेच मुंबई शहराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदींचा समावेश करण्यात आला आहे.

असा असेल सामाजिक समता कार्यक्रम...

            सामाजिक न्याय विभागाने दि. 06 एप्रिल पासून सलग दहा दिवस राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक समता कार्यक्रम आयोजन करण्याबाबत दैनंदिन उपक्रमांचे शासन परिपत्रक जारी केले आहे.

            या परिपत्रकानुसार दि. 06 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमधून उद्घाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हास्तरावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आली आहे.

            दि. 07 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

            दि. 08 एप्रिल रोजी, जिल्हा व विभागस्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येतील.

            दि. 09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.

            दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन करण्यात येईल.

            दि. 11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.

            दि. 12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.

            दि. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.

            दि. 14 एप्रिल, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील.

            दि. 15 एप्रिल, प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून डॉ. बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.

            दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तिंचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

         

 राज्यपालांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा संपन्न

            मुंबई, दि. 6 :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे 12 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपूजेत भाग घेतला.

            यावेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाज संस्थेचे सचिव पी.एस. सुब्रमण्यम, मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले शिवाचार्य व तंत्री तसेच हजारो भाविक उपस्थित होते.

            यावेळी राज्यपालांनी कार्तिकेय स्वामी, महागणपती तसेच मंदिरातील इतर देवीदेवतांचे दर्शन घेतले. राज्यपालांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

            मुंबईतील तामिळ भाषिक लोकांनी स्थापन केलेला 'श्री सुब्रह्मण्य समाज' आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेतर्फे १९८० साली कला, वास्तुशास्त्र व संस्कृतीचा संगम असलेले 'तिरुचेंबूर मुरुगन मंदिर' बांधण्यात आले. दर बारा वर्षांनी मंदिरात महाकुंभाभिषेक केला जातो.

0000

 



 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2029 अंतर्गत

2000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

            मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र शासनाने 7 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2029 चे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या क्रमांक एलएनएफ/ 10.19/ प्र.क्र. 10/अर्थोपाय दिनांक 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                          

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 7 एप्रिल



 महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचे प्रभावी कार्य  

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे.

            नवी दिल्ली, 5 : घरकामगार महिलांची नोंदणी, महिला सुरक्षेसाठी ‘शक्ती कायदा’, विधवा महिलांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी ‘पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजना’ अशा अनेक योजना व कायद्यांद्वारे महाराष्ट्र शासन महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याची माहिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली.

                महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांसाठी संसदेत आजपासून प्रशिक्षण वर्ग सुरु झाला आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी राज्य शासनाच्या विविध योजना व कायद्यांद्वारे महिला सक्षमीकरणाबाबत होत असलेल्या कार्याची माहिती दिली.

                    डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना संपत्तीत व जमिनीत वाटा मिळण्यास येत असलेली अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिबिर आयोजित करून अशा महिलांच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून महसूल विभागाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. 

               विधवा आणि एकल महिलांविषयी समाजाच्या दृष्टीकोणामध्ये पाहिजे तसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. यात सकारात्मक बदल घडवून यावा म्हणून विधवा आणि एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेत, पंडिता रमाबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ योजना आणल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांसाठी वसतीगृह उभारण्याचा विषय प्राधान्याने हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिलांनाही रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्ड देण्यात आले असून त्यांना या माध्यमातून नियमित रोजगार मिळत आहे. कामगार महिलांची नोंदणी करण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी नमूद केले.

महिला सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कायदे

           पीडित महिलांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी राज्य शासनाने मांडलेले ‘शक्ती विधेयक’ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाकडून मंजूर होवून राज्यपालांकडून सद्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हे विधेयक पाठविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊन महिलांना सुरक्षेची हमी देणारा कायदा राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच ५२ क्रमांकाच्या विधेयकानुसार महिलांसाठी स्वतंत्र न्यायालये उभारणे व महिलांसाठी विशेष सरकारी वकील नेमून देणे अशा काही तरतूदी आहेत. प्रत्येक ठिकाणी महिलांची पोलीस पथक निर्माण करून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या दोन्ही विधेयकांना केंद्राकडून लवकर मंजुरी मिळण्याची अपेक्षाही डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

मावजच्या कार्याला विश्वासार्हता

            उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, राज्य शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (मावज) प्रभावीपणे कार्य करीत असल्याचे समाधान आहे. मावजच्या कार्याला विश्वासार्हता असून मावजकडून महिला विषयक कायदे आणि योजनांची अधिकाधिक माहिती जनतेपर्यंत पोहचावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

               महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी ‘स्त्री आधार केंद्र’ या संस्थेद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयी, तसेच महिलांच्या प्रश्नांविषयी देश-विदेशात केलेले अभ्यास दौरे आणि विविध मंचाहून मांडलेले विचार आदींविषयी त्यांनी माहिती दिली. डॉ. गोऱ्हे यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विधान परिषदचे माध्यम सल्लागार नंदकिशोर लोंढे यावेळी उपस्थित होते. 

००००



 



 ज्वेलरी मशिनरी ॲन्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो

ज्वेलरी मशिनच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल

- उद्योगमंत्री सुभाष देसाई

            मुंबई, दि. 5 :- जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे असेल तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन निर्देश दिले जातील अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन मैदानावर 'ज्वेलरी मशिनरी ॲण्ड अलाईड इंटरनॅशनल एक्स्पो प्रॉडक्ट ॲन्ड एक्स्पो' हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन दि. 5 ते दि. 8 एप्रिल या दरम्यान होत आहे. यात ज्वेलरी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे मशिन्स तसेच इतर सोयींची माहिती इथे मिळाणार आहे.

            प्रदर्शनात सहभागी सर्वांचे अभिनंदन करुन श्री. देसाई म्हणाले, या प्रदर्शनात सहभागी लोकांमुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळेल. जेम्स ॲन्ड ज्वेलरीसाठी नवी मुंबईत शंभर एकर जागा दिली आहे. त्याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुमारे एक हजार उद्योग उभे राहतील आणि दिड लाख रोजगार निर्माण होणार आहे. याशिवाय लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. याचबरोबर देशांतील सर्वात मोठा आणि सर्वात सुंदर पार्क तयार होणार आहे.

            जागतिक स्तरावर भारतातील कारागिरांनी जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रात उत्तम काम केले आहे. मूल्यवान रत्न विक्रीत भारत कायम अग्रस्थानी आहे. भारतातील कारागिरांच्या कौशल्याला जगभरातून मागणी आहे. ही कला या कारागिरांनी परंपरागत व्यवसायातून जीवंत ठेवली आहे. या क्षेत्रात आपली परंपरागत डिजाईन आणि कलाकारी आहे याचा कोणालाही मुकाबला करता येणार नाही, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

            कला ही कारागिरांच्या हातात असते. मशिन्स हे कारागिरांना मदत करण्यासाठी उपयोगी पडावे, त्यांच्या कार्यवृद्धीत सहयोगी व्हावे त्यांच्या कारागिरीला पर्याय निर्माण करण्यासाठी मशिन्सचे आक्रमण व्हायला नको. मेहनत कमी व्हावी मात्र त्यांची कला जिवंत रहावी, अशी अपेक्षा उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. 



 




 

Featured post

Lakshvedhi