Tuesday, 29 March 2022

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील

तिकीट विक्री स्टाँलचा शुभारंभ

गुढीपाडवानिमित्त 12 एप्रिल रोजी सोडत


              मुंबई दि 28 : महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मंत्रालय येथील तिकीट विक्री स्टाँलचा शुभारंभ राज्य लॉटरी आयुक्त अनिल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.

            मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हा स्टाँल 12 एप्रिल पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे. 12 एप्रिल 2022 रोजी सायं. 04.00 वाजता सोडत असून एकूण बक्षिसांची संख्या 8602 आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिस रू.51 लाख असून, तिकीटांची किंमत रू. 200 आहे. एकूण बक्षिसांची रक्कम रू. 98 लाख 55 हजार आहे. पहिले सामायिक (हमीपात्र) बक्षिसाचा क्रमांक विक्री झालेल्या तिकीटांमधूनच काढण्यात येईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

             यावेळी अवर सचिव तथा उपसंचालक, राज्य लॉटरी, प्रशांत पाटील, सहायक राज्य लॉटरी अधिकारी सुनिल लोटणकर उपस्थित होते.

 महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान.


स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव

            नवी दिल्ली, दि. 28 : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे.

           राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित दिमाखदार सोहळयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण, प्रसिद्ध पार्श्व गायक सोनू निगम आणि आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

              पद्म पुरस्कार वितरणाच्या आज दुस-या टप्प्यात 2 पद्मविभूषण, ५ पद्मभूषण आणि 53 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

                कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या मानाच्या नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका आणि विदुषी म्हणून डॉ अत्रे यांचा भारतीय अभिजात संगीतात नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबतच ठुमरी, दादरा,गझल, उपशास्त्रीय संगीत,नाटय संगीत, भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा देश-विदेशात प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखनही त्यांनी केले आहे. कलाश्रेत्रातील योगदानासाठी त्यांना यापूर्वी पद्मभूषण (2002) आणि पद्मश्री (1990) या नागरी सन्मानानेही गौरविण्यात आले आहे. 

           लावणी सम्राज्ञी ज्येष्ठ लोकगीत गायिका सुलोचना चव्हाण यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या ७५ वर्षांपासून त्या गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. श्रीमती चव्हाण या, १९४६ पासूनच हिंदी चित्रपटांमध्ये गायन करू लागल्या. ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये गायनास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी भाषांमध्येही भजन, गझल असे विविध प्रकारचे गायन केले आहे.  

         प्रसिध्द पार्श्वगीत गायक सोनू निगम यांनाही कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. लॉर्ड ऑफ कॉर्ड्स नावाने प्रसिध्द असलेल्या सोनू निगम यांनी हिंदी, मराठीसह एकूण १० भाषांमध्ये ४ हजार गीत गायिली आहेत.                  

                 वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना (मरणोत्तर) पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आज या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी वीणा तांबे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला . डॉ. तांबे यांनी आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ कार्य केले. त्यांनी आयुर्वेदिक औषधीशास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपीवरही संशोधन केले आहे. त्यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले. दूरचित्रवाणीहून त्यांनी हजारो कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार- प्रसार केला. त्यांनी आयुर्वेदावर ५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत.  

००००

 शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            रत्नागिरी दि. 28 (जिमाका):- प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांनी आज खेड येथे व्यक्त केली.

            बिसू हॉटेल, खेड येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंदर्भात प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपविभागीय वनाधिकारी श्री.खाडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.     

            बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्यात होणारी विविध विकास कामे व राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सादरीकरण केले.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी विविध शासकीय विभागातील विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रशासकीय कामांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारणा करुन येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

             या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक योजना, डोंगरी विकास, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कोविड 19 बाबत केलेल्या उपाययोजना, सिंधूरत्न समृध्द योजना, कृषी विभाग,मत्‍स्य विभाग, रोजगार हमी योजना, प्रादेशिक पर्यटन विकास, नगरपालिका प्रशासन, माझी वसुंधरा, वन विभागांतर्गत संरक्षित केले जाणारे कांदळवन पार्क, प्राणीसंग्रहालय उभारणी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी योजना,पणन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला.

            पणन विभागामार्फत रत्नागिरीतील स्थानिक शेतकऱ्यांसाठी आंबा विक्री महोत्सव मार्च अखेर भरविण्यात येतो. आंब्याचा मुख्य हंगाम एप्रिल व मे हे दोन महिने आहे. या दोन महिन्यांमध्ये निधी उपलब्ध होत नसल्याने आंबा विक्री प्रदर्शनास अडचणी निर्माण होतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी माहे एप्रिल मध्ये आंबा विक्री प्रदर्शनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबधितांना दिल्या. त्याचबरोबर आंबा निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच रब्बी हंगाम क्षेत्र विस्तार मोहिमेंतर्गत कुळीथ, चवळी, पावटा, वाल,व भाजीपाला या पिकांचे उत्पादन वाढविण्याबाबत सूचना केल्या.   

            प्राणीसंग्रहालयाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, या अधिकाऱ्यांनी जगभरातल्या विविध प्राणीसंग्रहालयांचा अभ्यास करावा त्याचबरोबर आपल्या येथील वातावरणात कोणते प्राणी सुरक्षितपणे राहू शकतात, टिकू शकतात, याचाही अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे प्राणीसंग्रहालय उभारावे.

            बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाबाबतचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, कोणत्याही शासकीय इमारतीचे बांधकाम हे उत्कृष्ट दर्जाचे व आकर्षक असणे आवश्यक आहे. 



 कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात

मतदान करण्यासाठी 12 एप्रिलला सुट्टी जाहीर


            मुंबई, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने कोल्हापूर मतदारसंघात दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडे सोपविलेल्या अधिकाराचा वापर करून मंगळवार, दि. 12 एप्रिल 2022 रोजी 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

            ही सार्वजनिक सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असेल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव यांनी राजपत्राद्वारे जाहीर केले आहे.

Monday, 28 March 2022

Holi






 

Cycber क्राईम

 सायबर प्रलोभनाला बळी न पडता नेटवर्किंग साईटचा विचारपूर्वक वापर करावा.

- अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे.

            मुंबई, दि. 28 : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे व संगणकाचे युग आहे. आपले वैयक्तिक व सामाजिक आयुष्य या तंत्रज्ञानाशी जोडले गेले असल्यामुळे त्याचे चांगले वाईट परिणाम अनुभवत असतो. सायबर विश्वात वावरताना कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता नेटवर्किंग साईट्सचा विचारपूर्वक वापर करावा तसेच आपली गोपनीय व खाजगी माहिती विनाकारण कुणालाही देऊ नये. माहितीचे आदान प्रदान करताना सर्वांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी केले.

            महाराष्ट्र सायबर विभाग आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम यांचा समावेश असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव, चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल, तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ऐश्वर्या राज भाकुनी, पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, मेटातर्फे सेफ्टी मॅनेजर विजय पमार्थी, अंशुमन मेनकर, तसेच इंडिया फ्युचर फाऊंडेशनचे कनिष्क गौर, अमित दुबे, जी डी सोमाणी व कॅम्पीयन विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

            सोशल मीडियाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिंनींनी काळजी घ्यावी. खासगी माहिती, फोटो शेअर करताना विशेष काळजी घ्यावी; तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवू नये, इ मेल किंवा मेसेजद्वारे येणारे प्रलोभने याला बळी न पडता त्याची पूर्ण शहानिशा करावी, ब्लु लिंक ओपन करू नये असे आवाहन श्री पांडे यांनी केले.

            सोशल मीडियावर विविध प्रलोभने देऊन लिंक पाठविल्या जातात त्या लिंक ओपन करू नये. तसेच आपल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, क्रेडीट कार्ड, यांचे पासवर्ड नियमित बदलत राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवू नये तसेच सोशल मीडियावर अनेक संकेतस्थळ आहेत त्याला भेट देऊ नये, तसेच कुठल्याही माहितीची शहानिशा केल्याशिवाय अधिकची माहिती न घेता पुढे पाठवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विद्यार्थिनींबरोबर संवाद साधून सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

            शालेय विद्यार्थ्यांनी आज सायबर बुलिंग, सायबर सेक्सटोर्शन, ट्रोलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, चाइल्ड पोर्नोग्राफी, डार्कनेट गुन्हे, हॅकिंग, ओळख चोरी, गोपनीयतेचा भंग इत्यादीसारख्या इंटरनेटवरील धोक्यांची जाणीव यावेळी श्री यादव यांनी करून दिली.

            श्री. यादव म्हणाले की, आज जगात सायबर क्राईम हा एक संघटित, मोठी उलाढाल असलेले गुन्ह्याचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. अशा वातावरणात इंटरनेटवरील मुलांची सुरक्षा ही संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांनी दखल घेतलेली जागतिक समस्या बनली आहे.

             चांगल्या सायबर स्वच्छ वर्तनासह या पिढीला सायबर जबाबदार नागरिक बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सायबरने राज्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम देण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्म आणि इंडिया फ्यूचर फाऊंडेशन यांचेसोबत भागीदारी केली आहे. यातुन सायबर बुलींग, लैंगिक शोषण इत्यादीसारख्या सायबर क्राईम्सच्या आघात आणि विध्वंसक परिणामांपासून विद्यार्थी सुरक्षित रहावेत असा प्रयत्न राहील, असे श्री. यादव यांनी सांगितले.

            महाराष्ट्र सायबर ही सायबर क्राईम आणि सायबरसिक्युरिटीसाठीची महाराष्ट्र राज्याची नोडल एजन्सी आहे. सायबर क्राईम तपास प्रयोगशाळा, सायबर पोलीस स्टेशन्स तयार करण्यात आणि महाराष्ट्रातील पोलीस आणि नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल आवश्यक सर्व जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्र सायबर प्रयत्नरत आहे,असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

            चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल, हिंदी टेलिव्हिजन आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या राज भाकुनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते याविषयी त्यांचे अनुभव सांगितले.

            या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना श्री पांडे अणि श्री यादव यांनी उत्तरे दिली.

सुरुवातीला सायबर विभागाने तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली.

००००



 

Featured post

Lakshvedhi