Saturday, 12 March 2022

अर्थ

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला.        सन 2022-23 चा अर्थसंकल्प.                                         * कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळणाल चालना.   ·*औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प.      * नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख                    शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान.

                                            · सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ· संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्याचा संकल्प

            मुंबई, दि. 11 :- कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना बळ, संस्कृती जतन आणि वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी योजना ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सादर केला.

            सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 13,340 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. वार्षिक योजनेसाठी 1,50,000 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 12,230 कोटी, अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 11,199 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. महसूली जमा 4,03,427 कोटी प्रस्तावित असून महसुली खर्च 4,27,780 कोटी रूपये आहे. महसुली तूट 24,353 कोटी रूपये अपेक्षित आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद.

            कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23 हजार 888 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत, भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी, आधारभूत किंमतीनुसार शेतमाल खरेदीकरीता 6,952 कोटी रूपयांची तरतूद आणि येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे.

वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देणार.

            कृषी संलग्न क्षेत्राला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणासाठी 950 कोटी, मृद आणि जलसंधारणासाठी 4,774 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. वर्षभरात 60,000 वीज पंपांना जोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रुट, अॅव्हॅकॅडो, द्राक्षे फळांचा तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा समावेश करून फळशेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. पशुधन विकासासाठी देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात तीन मोबाईल प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी 5,244 कोटींची तरतूद.

            महाराष्ट्राने कोवीड-19 महामारीचा खंबीरपणे सामना केला. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशिल आहे. यासाठी 5,244 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारले जाणार आहेत. 200 खाटांच्या सर्व रूग्णालयात येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचारपद्धती सुरू केली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत 16 जिल्ह्यात 100 खाटांची खास महिलांसाठी रूग्णालये उभारली जाणार आहेत. जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्यासाठी 60 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले आहे.

मनुष्यबळ विकासासाठी 46,667 कोटींची तरतूद.

            विकास योजनांची अंमलबजावणी प्रभावीरित्या होण्यासाठी मनुष्यबळ विकासावर भर देण्यात आला आहे. रोजगारक्षम मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असून त्यासाठी 500 कोटी रूपये तर स्टार्टअप फंडासाठी 100 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना ई-शक्ती योजनेतून मोबाईल सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अमृत महोत्सवी महिला व बाल भवन आणि नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय वसतीगृहातील मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिसपेन्सींग मशिन दिले जाणार आहे.

दळणवळण सेवेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण.

            राज्यातील दळणवळण सेवांचा विकास, बळकटीकरण आणि विस्तार करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. यासाठी 28,605 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून 10,000 कि.मी. च्या रस्त्यांसाठी साडेसात हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ केला जाणार असून यातून 6,550 कि.मी.चे रस्ते विकास करण्याचे नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळासाठी 3,000 नवीन बसगाड्या घेण्यासाठी तसेच राज्यातील 103 बस स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी भांडवली अर्थसहाय्य दिले जाणार आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

            नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील मेट्रो मार्ग क्रमांक 3- कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गिकेचा विस्तार कफ परेडपासून नेव्हीनगर पर्यंत केला जाणार आहे. पुण्यातील मेट्रो सेवा अधिक व्यापक करण्यावर भर आहे. त्यासाठी स्वारगेट ते कात्रज, पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या मार्गावरील प्रकल्प अहवालाचे काम सुरू करण्यात आले आहे. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर येथील विमानतळांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी भरीव निधीची तरतूद तर गडचिरोलीसाठी नवीन विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

उद्योग विकासासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद.

              राज्याला अधिकाधिक उद्योगस्नेही करण्यासाठी 10,111 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0, ई-वाहन धोरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना यांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील कौडगाव, शिंदाळा, धुळे जिल्ह्यातील साक्री, चंद्रपूर जिल्ह्यातील वाशिम आणि यवतमाळ येथील सौर उर्जा प्रकल्पा उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील पारेषण प्रणालीच्या क्षमेत वाढ करण्यासाठी पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत, असे उपमुख्यंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम.

            राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द धरणांच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित आहे. पुरातत्व स्मारकाच्या जतन, संवर्धन, दुरूस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी तर पुणे वन विभागात बिबट्या सफारी प्रस्तावित करण्यात आली आहे.

नवीन उपक्रमांची घोषणा.

            स्थानिक संस्थांतील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांना प्रत्येकी 250 कोटी रूपये तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी 250 कोटींची तरतूद वाढविण्यात आली आहे. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगित महाविद्यालय व संग्राहालय स्थापन करण्यासाठी 100 कोटी रूपये निधी राखीव ठेवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी उपलब्ध करणार असून छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करणार आहे. महापुरूषांशी संबंधित 10 शाळांकरीता 10 कोटींचा निधी राखीव ठेवणार असून स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत मुंबई, पुणे व नागपूर येथील स्थळांचा हेरिटेज वॉक विकसित केला जाणार आहे.

नैसर्गिक वायूवरील कर, मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित.

            महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क थकबाकी तडजोड 2022 अभय योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी विक्रीकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध करांवरील सवलती संदर्भात विचार केला जाईल. ही योजना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी असेल. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक वायुवरील मूल्यवर्धीत कर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांवर आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात सवलती प्रस्तावित करण्यात आल्या असून जल वाहतुकीवरील करात पुढील तीन वर्ष सवलत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

००००



 दिलखुलास’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत      .

            मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

           ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि.१२ मार्च, सोमवार दि.१४ मार्च आणि मंगळवार दि.१५ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाची पंचसुत्री मांडली आहे. राज्य शासनाचा विकासाचा महामार्ग कसा असेल याबाबत सविस्तर माहिती श्री. पवार यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

00000



 

 शासकीय रूग्णालयात व्हेंटिलेटर्सची कमतरता नाही

-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

            मुंबई, दि. 11 : जे जे रूग्णालयातील व्हेंटिलेटर्स नादुरूस्त नसून ते अंडर मेंटेनन्समध्ये आहे. कोरोना काळात ज्या रूग्णालयांना व्हेंटिलेटर्सची गरज होती त्यांना ते पुरविण्यात आले असून केंद्र सरकारमार्फतही काही व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले आणि काही सामाजिक संस्थेनेही व्हेंटिलेटर्स पुरविले असल्याने शासकीय रूग्णालयात व्हेंटिलेटरची कमतरता नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            शासकीय रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात औषधी उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले. रूगणालयांना औषधे पुरवठा करण्याबाबत हाफकीन महामंडळासमवेत करार करण्यात आले असून औषधांकरिता 90 टक्के निधी हा हाफकीनकडे तर 10 टक्के निधी अधिष्ठाता स्तरावर खर्च केला जातो. आता अधिष्ठाता स्तरावर औषधखरेदीसाठी 30 टक्के निधी वर्ग करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. आतापर्यंत रूग्णालयाने मागणी केल्याप्रमाणे त्यांना निधी वितरित केला असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.

            हाफकीन बायोफार्मामधील संचालक व सहसंचालक ही पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी करण्यात आली असून याबाबतची जाहिरात देऊन ही पदे भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दिल्ली सरकारने आरोग्य आणि शिक्षणाबाबत ज्याप्रमाणे पाऊले उचलली त्याचप्रमाणे राज्यातही तशी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.

            यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ॲड मनिषा कायंदे, सर्वश्री डॉ.रणजित पाटील, प्रविण दरेकर, अनिकेत तटकरे, प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला होता.

000


 

 जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविणार

- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

            मुंबई, दि. 11 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगकरिता संगणक देण्याबाबतचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यास संगणक उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            पालघरच्या जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग सुविधा मिळण्याबाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उशिरा प्राप्त झाला असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज जोडणी बंद केली असल्यास ग्रामविकास विभागाकडून वीज जोडणी पूर्ववत करण्यात येईल, असेही राज्यमंत्री श्री.सत्तार यांनी सांगितले.

            याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी विचारला होता.

000

 महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत -ललित गांधी*      

……………………………………………………………….

*महाराष्ट्र चेंबरच्या विमानतळ, कर विषयीच्या मागण्या मान्य झाल्याने समाधान*                                 

महाराष्ट्र सरकारने आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या वेगवेगळ्या घोषणा केल्या त्यामध्ये प्राधान्याने महाराष्ट्रातील युवकांना स्टास्टार्टअप कडे प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक महसूल विभागांमध्ये अत्याधुनिक इंक्युबेशन सेंटर करण्याची घोषणा केली व त्याकरीता साडेपाचशे कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली व कौशल्य विकासासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद या दोन्ही तरतुदी युवकांना व्यापार उद्योग करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. स्टार्टअपला लागणाऱ्या बीज भांडवलासाठी राज्य सरकारनं सुरुवातीच्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे याचेही महाराष्ट्र चेंबरतर्फे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत केले आहे.

दिंडोरी येथे आदिवासी व मागासवर्गीयाकरिता औद्योगिक क्लस्टर निर्माण करण्याची घोषणा हि ग्रामीण भागातील आदिवासी व मागासवर्गीय तरुणांना व्यापार व उद्योग करण्यास प्रोत्साहित करेल.

महाराष्ट्र चेंबरतर्फे सातत्याने जीएसटी, व्हॅट, विक्री इत्यादी करांच्या बाबत असलेल्या त्रुटी व व्यापारी उद्योजकांवर असलेले प्रलंबित प्रकरणे यावर सरकारने अभय योजना जाहीर करावी हि मागणी केली होती. आज सरकारने ती अभय योजना जाहीर केल्याबद्दल राज्य सरकारचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र चेंबरने सरकारकडे वेगवेगळ्या विमानतळांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली होती. आजच्या अधिवेशनामध्ये विमानतळांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा फायदा शिर्डी , कोल्हापूर, अमरावती येथील विमानतळांच्या विस्तारीकरण व विविध सुविधा उपलब्ध करण्याकरीता होईल.  

अर्थसंकल्पात अभय योजना, विमानतळांसाठी केलेली तरतूद, अत्याधुनिक इंक्युबॅशन सेंटरकरीता केलेली तरतुद यांचा व्यापार उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.  

 विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला विशेष आमंत्रित केले होते. या अर्थसंकल्पातील तरतुदी या व्यापार उद्योगाला मदतीच्या ठरतील व तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित करतील असे मत अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केले.

 सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना

निधीच्या उपलब्धतेनुसार थकबाकी देण्यात येणार.

- शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 11 : राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी देण्यासाठी सुधारित अंदाजपत्रकात मागणी केली असून निधीच्या उपलब्धतेनुसार ही थकबाकी देण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभा सदस्य सुनिल राणे, विजयकुमार देशमुख यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यात १ लाख ७२ हजार १९७ पैकी १ लाख ३९ हजार ६६ सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा पहिला हप्ता दिला असून ३३ हजार १३१ सेवानिवृत्तांना ही थकबाकी देणे बाकी आहे. आतापर्यंत १ हजार ६६३ कोटी रुपयांपैकी ९११ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून नागपूर वगळता सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांना पूर्णतः तर २३ जिल्ह्यात अंशतः ही थकबाकी देण्यात आली असून राज्यातील सर्व खाजगी शाळांमध्ये ही पहिल्या हप्त्याची थकबाकी देण्यात आली आहे. उर्वरित दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यातील बाकी असलेल्यांच्या थकबाकीसाठी सुधारित अंदाजपत्रकात २ हजार कोटींची मागणी केली असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्यातील ८ हजार ७७६ सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता देण्यात आल्याचेही शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Friday, 11 March 2022

 जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि 11 : जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या जिल्हा युवा पुरस्कारासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

            २०२१-२२ या वर्षाकरिता प्रत्येकी एक युवक, एक युवती, आणि एक संस्था असे एकूण तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा ब्लॉग dsomumbaisub.blogspot.com येथे उपलब्ध आहे.

            युवक किंवा युवती पुरस्कारासाठी पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्षे पूर्ण असावे तसेच ३१ मार्च रोजी ३५ वर्षाच्या आत असावे. अर्जदार हा मुंबई उपनगर जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्यास असला पाहिजे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रके, चित्रफीती, फोटो इत्यादी सादर करावेत. केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. संस्थेसाठी असलेल्या युवा पुरस्कारासाठी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर पाच वर्ष कार्यरत पाहिजे. संस्था सार्वजनिक विश्र्वस्त अधिनियमानुसार पंजीबद्ध असावी. गुणांकनाकरिता संस्थेन केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, फोटो इत्यादी जोडावेत.

            पुरस्कारासाठीचा अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परीसर, संभाजीनगर समोर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई ४०० १०१ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी 022-28871105 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

०००


Featured post

Lakshvedhi