Tuesday, 15 February 2022

 राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल - दिपक कपूर

महाराष्ट्र चेंबर् ऑफ कॉमर्स बरोबर संयुक्त बैठक संपन्न 

विमानतळांसाठी महाराष्ट्र सरकार मोठा निधी देणार

राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सुचनाबाबतही सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल व राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी चे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांच्या समवेत वर्ल्ड ट्रेड सेन्टर मधील कार्यलयात झालेल्या संयुक्त बैठकित सहभाग घेतला.  

याप्रसंगी प्रास्तविक करताना विमानतळांच्या समस्या सोडविणे व विकास करणे यासाठी महाराष्ट्र चेंबरची सिविल एव्हिएशन समिती संपूर्ण सहयोग असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र , कोकण , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करण्याची मागणी केली.

औरंगाबाद विमानतळावरून नवीन रूट सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे अश्या विविध मागण्याचा अभ्यास अहवाल सादर करून झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण केंद्र उभारून युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.

राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या सिविल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी या प्रसंगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्य वर्धित करा मध्ये कपात करून तो १ टक्के करावा असे सुचविले.

*आजच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण घोषणा*

*कोल्हापूर विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार.*

*रत्नागिरी विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार आहे.*

*शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार*

*अमरावती येथील विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातल्या ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार असल्याचे दिपक कपूर यांनी सांगितले.*

*नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.*

*पुणे शिर्डी नागपूर विमान सेवा १८ फेब्रुवारी २०२२ पासून अलाइन्स एअर सुरु करणार*

*पुणे औरंगाबाद नागपूर सेवा 1 मार्च पासून सुरू होणार*

याप्रसंगी दिपक कपूर यांनी विमानतळ विकास प्राधिकरनाच्या विविध विकास कामांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरनासाठी केलेले प्रयत्न व महाराष्ट्र सरकारने केलेल्या अर्थसहायातून येणाऱ्या तीन ते चार महिन्यात कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली. विमानतळ प्राधिकरण हे लवकरच अमरावती आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील विमानतळाच्या विकास कामाला सुरुवात करणार असून नोव्हेंबर 2022 ला अमरावती विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याचे उद्धिष्ट असल्याचे दीपक कपूर यांनी सांगितले.

विमानसेवा विस्तारीकरणासाठी सर्व विमान कंपनी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर येत्या महिन्यात बैठक घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरनाने सुरू केलेल्या शिर्डी व नागपूर मालवाहतूक सेवेला मिळणारा प्रतिसाद व तेथील शेतकऱ्यांना होणारा फायदा याची सविस्तर माहिती दिली.

शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.

Monday, 14 February 2022

 हे झाड हरि हरि हरेश्र्वरला आहे.



 

 सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

            पुणे, दि. 14 : महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, फुले दांपत्याने ज्यावेळी समाजसुधारणेचे काम केले त्या काळात इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा समाजाला कुप्रथांपासून दूर करणे अधिक कठीण होते. त्या काळात समाजातील सर्वात दबलेल्या महिला, मातृशक्ती तसेच मागास, गरीब समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काम केले. त्यांच्या शिक्षणप्रसाराच्या, समाजसुधारणेच्या कामाला प्रचंड विरोध झाला परंतु कुप्रथा दूर करण्याचे त्यांनी जे स्वप्न पाहिले ते जीवनाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम केले.

            सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.

 सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद ‍निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


            देश आणि समाज निरोगी असावयास हवा यासाठी समाजाला विचार देण्यासोबत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या वर्तनात तो विचार आणला. देश स्वतंत्र झाल्यावर तो रुढी परंपरांमध्ये अडकलेला नसावा यासाठी महात्मा फुले आणि इतर समाजसुधारकांनी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांचा ज्ञानार्जनाबाबतचा विचार स्वीकारला तर प्रगती शक्य आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने हे विचार समाजापर्यंत पोहोचले असे म्हणता येईल.


शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा नसावा – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

          अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनावरील साहित्य जगातील विविध भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर लहान पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. या वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

            सामाजिक कार्य करणाऱ्या द्रष्ट्या महापुरुषांचे महत्व कळायला समाजाला उशीर लागतो. महात्मा फुले यांचा पहिला पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे बसविला. अशा महापुरुषांमुळे सामान्य माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत फातिमाबी शेख या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरला. प्रत्येक भेद दूर सारण्याच्या महापुरुषांनी प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात भेदाला थारा न देता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, त्यातून त्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल घडून येईल, असे त्यांनी सांगितले.

 महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

            विरोधी पक्षनेते श्री.फडणवीस म्हणाले, आज शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम असलेली महिला समाजात ‍दिसते, याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांचे आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याला सावित्रीबाईंची साथ होती. त्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या. त्यांनी आणि महात्मा फुले यांनी समाजाला संघर्ष शिकविला. न्याय आणी ज्ञान यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनेक हालअपेष्टा सहन करताना त्यांनी संघर्ष केला. विधवांच्या मुलांचे संगोपन, अंधश्रद्धेचा विरोध, भ्रूणहत्येचा विरोध अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांचा 'काव्यफुले' हा काव्यसंग्रह ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाला समर्पित आहे.

लिंग समानता चळवळीच्या सावित्रीबाई आधारस्तंभ : डॉ. नीलम गोऱ्हे

           उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अजरामर आहे. अनेक समाजसुधारकांनी या राज्यात समाजजागृतीचे कार्य केले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना प्रगतीची संधी मिळाली. त्या कृतिशील समाजसुधारक आणी तत्वचिंतक होत्या. लिंग समानतेच्या चळवळीचा सावित्रीबाई फुले आधार होत्या. समाजातील तेढ बाजूला सारून समाज एकरूप करण्यासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार अध्यासनाच्या माध्यमातून व्हावा. त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील, असे त्या म्हणाल्या.

            कुलगुरू डॉ.करमळकर म्हणाले, समाजाच्या उद्धारासाठी ‍शिक्षण हे एकमात्र साधन आहे हे लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक कार्यातही आदर्श निर्माण केला. हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यासाठी विद्यापीठ परिसरात पुतळा उभारण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

            आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने सर्व परवानग्या तातडीने मिळाल्या. अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनीदेखील यासाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी ‍ दिली.

            कार्यक्रमाला उपमहापौर सुनिता वाडेकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखित ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

000

 वैद्यकीय उपकरणे यांची नोंदणी लवकरात लवकर करण्याचे

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

            मुंबई, दि. 14 : सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याद्वारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तरी राज्यातील ज्या वैद्यकीय उपकरणे उत्पादक यांनी ही नोंदणी केलेली नाही त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहित मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्या विरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.


            सन २०१७ पूर्वी अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम अंतर्गत नियंत्रण केले जात होते. मात्र अधिसूचित वैद्यकीय उपकरणे यांची यादी अत्यल्प होती. सन २०१७ मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम २०१७ पारित केले आहेत. या नियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केलेला असून वैद्यकीय उपकरणांचे “अ”, “ब”, “क” व “ड” अशी वर्गवारी केली आहे. “अ” व “ब” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर राज्याचे नियंत्रण आहे आणि “क” व “ड” या प्रवर्गातील वैद्यकीय उपकरणांवर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे.


            वैद्यकीय उपकरणांची व्याप्ती व उपलब्धता विचारात घेता केंद्र शासनाच्या दि.११.०२.२०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे जे उत्पादक वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करतात त्यांनी त्यांच्या वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाने तयार केलेल्या “सुगम पोर्टल” (www.cdscomdonline.gov.in) या संगणक प्रणालीवर ऐच्छिक नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही नोंदणी १८ महिन्याच्या आत म्हणजे ३०.०९.२०२१ पर्यंत करणे अपेक्षित होते. त्यानंतर १ वर्षासाठी म्हणजे दि.३०.०९.२०२२ पर्यंत सर्व वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक यांनी त्यांच्याद्वारे उत्पादित वैद्यकीय उपकरणांबाबत केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य (Mandatory) केलेले आहे. तरी राज्यातील ज्या वैद्यकीय उपकरणे उत्पादक यांनी ही नोंदणी केलेली नाही त्यांनी ही नोंदणी लवकरात लवकर विहित मुदतीत पूर्ण करावी. ज्यांची नोंदणी विहित मुदतीत केली जाणार नाही त्यांच्या विरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

००००


 

Featured post

Lakshvedhi