Monday, 24 January 2022

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून

प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

          मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

          जळगाव येथील शिवांगी काळे हिने 'वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने 'नव संशोधन'मध्ये आणि मुंबईतील जिया राय तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने 'क्रीडा' श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

 आरटीई 25 टक्के प्रवेशाकरिता निवासी पुराव्यासाठी


राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य; शिक्षण संचालनालयाची माहिती

            मुंबई, दि. 21- शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज दिनांक 1 फेब्रुवारी पासून भरता येणार आहे. अर्ज करताना निवासी पुराव्यातील गॅस बुकचा पुरावा रद्द करण्यात आला असून राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

            बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1)(सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे सन 2022-23 या वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून या शैक्षणिक वर्षापासून निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/ टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/ घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. तर, निवासी पुराव्याकरिता राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक देखील ग्राह्य धरले जाणार आहे.

            ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य असतील/ अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तथापि भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षांचा असावा, असेही शिक्षण संचालक (प्राथमिक) महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000



International relations

 

Rohan weds Carla

Corona education course

 


 राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी


जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

           मुंबई, दि.23 :- राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून राबविण्यात येत आहे. या सुधारित योजनेअंतर्गत प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक अथवा पोलीस उपायुक्त (प्रशासन), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे या समितीचे सदस्य तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक / निरीक्षक) हे सदस्य सचिव असतील. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रूपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास (दोन अवयव/ दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी)50 हजार रूपये तर अपघातामुळे अपंगत्वामध्ये एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास 30 हजार रूपये सानुग्रह अनुदान अदा करण्यात येते. 

            या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची तर इयत्ता नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांकरीता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची असून बृहन्मुंबईकरीता ही जबाबदारी शिक्षण निरीक्षक यांची आहे. या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास वडील आणि विद्यार्थ्याची आई/वडील हयात नसल्यास 18 वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहिण किंवा पालक यांना अदा करण्यात येते.

            राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन 2018-19 मध्ये 1190 विद्यार्थ्यांकरीता 8 कोटी 78 लाख 65 हजार रूपये, सन 2019-20 मध्ये 483 विद्यार्थ्यांकरीता 3 कोटी 56 लाख 16 हजार रूपये तर 2020-21 मध्ये 476 विद्यार्थ्यांकरीता 3 कोटी 58 लाख 50 हजार रूपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

०००००


 


 


 


 



 वृत्त क्र. 234

स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान या विषयावर

25 जानेवारी रोजी वेबिनारचे आयोजन

        मुंबई, दि. 23 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय पर्यटन दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान (1857 ते 1947)’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. दि. 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात येणाऱ्या या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटन संचालक भा. प्र. से. मिलिंद बोरीकर, यांनी केले आहे. उद्योजक विराट कासलीवाल आणि खाकी टुर्स चे संस्थापक भरत गोठोस्कर हे या वेबिनार मध्ये सहभागी होणार आहेत.

            या वेबिनारच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावलेल्या महाराष्ट्रातील घटना, घडामोडींची पुन्हा आठवण केली जाणार आहे. 1857 च्या बंडापासून महात्मा गांधीजींच्या काळातील महत्त्वपूर्ण घटनांच्या आठवणींबाबत वेबिनारमध्ये चर्चा केली जाणार आहे.

            भारतीय स्वातंत्र्याच्या महाराष्ट्रातील चळवळीतील महत्त्वपूर्ण आठवणी असलेल्या ठिकाणांबाबत वेबिनार, टूर्स, हेरिटेज वॉक आदींचे आयोजन विशेषत: युवा पिढीसाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. यामुळे थोर स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य मिळविण्यात सहभाग असणाऱ्या या शूर क्रांतीकारकांविषयी नवीन पिढीला माहिती मिळेल, अशी अपेक्षा श्री.बोरीकर यांनी व्यक्त केली आहे.

https://www.facebook.com/MaharashtraTourismOfficial या लिंकद्वारे या वेबिनार मध्ये सहभागी होता येणार आहे.

0000

 दिशाभूल करणारी आयुर्वेदिक औषधे जप्त

            मुंबई, दि. 21 : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील गुप्तवार्ता विभागास दिशाभूल करणारा मजकूर असलेली काही आयुर्वेदिक औषधे नागपूर वर्धा मार्गावरील एका पेढीत विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहिती चे आधारे औषध निरीक्षक (गुप्तवार्ता ) नागपूर व औषध निरीक्षक, वर्धा यांचे पथकाने दि. २०/०१/२०२२ रोजी हॉटेल रॉयल फूड, खडकी, जिल्हा, वर्धा या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आली होती.

            इथे उपलब्ध असलेल्या औषधा पैकी काही औषधे जसे Badal Pain Oil, Diabetes Care Churna , Pachak Methi उत्पादक मे. मानस आयुर्वेदिक फार्मसी, गाझीयाबाद, उ. प्र. यावर दिशाभूल करणारा मजकूर तसेच या उत्पादनाबाबत दिशाभूल करणारा मजकूर असलेली जाहिरात प्रदर्शित केली असल्याचे आढळून आले. 

            अशा उत्पादनावर असलेला मजकूर औषधे जादुटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४, कलम ३ व ४ च्या तरतुदींचे उल्लंघन होत असल्याने उपलब्ध औषध साठा मूल्य रु. १५८००/- पंचनामा करून जप्त करण्यात आला. ही कारवाईत नीरज लोहकरे, औषध निरीक्षक (गुप्तवार्ता) व सतीश चौहान, औषध निरीक्षक, वर्धा यांनी भाग घेतला.

            ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह, व सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

            सर्वसामान्य जनतेने दिशाभूल करणारे दावे असणारे औषधे खरेदी करू नये, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घ्यावा तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने यांच्या दर्जा बाबत कोणतीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित जिल्हा कार्यालय तसेच टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi