Friday, 14 January 2022

 तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना सुविधा विनासायास मिळतील

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ सुविधेचे लोकार्पण

· मोबाईलवर मिळणार 80 पेक्षा अधिक सेवा सुविधा

         मुंबई, दि 14 : नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली पालिका असून माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

            याप्रसंगी विविध समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी सातत्याने कार्यरत असणा-या देशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित करत या सुविधेचा स्वतः वापर करत लोकार्पण केले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम करावे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली आहे. महापालिका रोज काय काम करते ? या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

तंत्रज्ञानस्नेही संक्रमण

            मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास आहे. ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे. माय बीएमसी टिव्टर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत असून चॅट-बॉट हे पुढचे पाऊल आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी होत असलेले तंत्रज्ञानस्नेही संक्रमण हे अत्यंत चांगल्या दिशेने होत आहे. मुंबईकरांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने करित असलेल्या लोकाभिमुख प्रयत्नांचा त्यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला. 

            मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की,उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे नेहमीच खूप कौतुक वाटते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधीत बाबी मुंबईकरांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे. कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खूप कौतुकास्पद आहे, ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटना व वर्ल्ड बँक यांनीही घेतली आहे.

            महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन देण्यात महानगरपालिका नेहमीच अग्रेसर असते. याच शृंखलेत आता ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर केवळ एक व्हॉट्सअप संदेश पाठवून नागरिकांना विविध सेवा-सुविधा व माहिती उपलब्ध होणार आहे, ही निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय बाब आहे.

            महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नमूद केले की, नागरिकांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानग्या, आपल्या विभागाची माहिती, संबंधीत संपर्क क्रमांक यासारखी विविध माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.

            व्हॉट्सअप कंपनीचे संचालक (सार्वजनिक धोरण) शिवनाथ ठुकराल यांनी नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात सदैव अग्रेसर असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करीत अभिनंदन केले. ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेद्वारे नागरिकांना तब्बल ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका असल्याचाही श्री. ठुकराल यांनी आवर्जून उल्लेख केला.

            अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲङ अनिल परब, सहाय्यक आयुक्त (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे, यांच्यासह महानगरपालिकेतील विविध खात्यांचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेची ठळक वैशिष्ट्ये

१. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

२. ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे २ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे ३ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधीत पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.

३. वरीलनुसार आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होते. यामध्ये संबंधीत पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश आहे.

४. या सुविधे अंतर्गत उपलब्ध होणा-या ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत असल्याने एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती अत्यंत सहजपणे व तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे.

५. वरीलनुसार लोकेशन आधारित पद्धतीने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ द्वारे माहिती उपलब्ध होत असल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.

६. या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे.

७. महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधीत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.

८. महानगरपालिकेशी संबंधीत विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी युपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध.

९. महानगरपालिकेशी व महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत विविध घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध.

१०. महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधीत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी विषयीची माहिती.

११. ही सुविधा दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस (24 x 7) पद्धतीने व भ्रमणध्वनी ऍपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या व अत्यंत सहजपणे माहिती उपलब्ध होणार आहे.

१२. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

0000



 

 वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील मुलीच्या गर्भपात प्रकरणी

दोषींवर कडक कारवाई व्हावी

· उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून निवेदन

            मुंबई, दि. १४ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेच्या अनुषंगाने शहानिशा करुन गृहमंत्री तसेच गृह राज्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेबद्दल माहिती दिली, असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

             या प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेवून त्यांना त्वरीत अटक करण्यात यावी. कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे.महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अख्यात्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’ किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा. पिडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

0000



 *संक्रांत*


*आजपासून 261 वर्षांपूर्वी हरयाणातील पानिपतावर लाख सव्वालाख माणसं उपाशी बसलेली होती.* 

*महिन्याभरापासून त्यांची आबाळ सुरू होती. खायला पुरेसं अन्न नव्हतं की थंडीत ल्यायला पुरेसे कपडे नव्हते. तरीही अशा ह्या अर्धपोटी लोकांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच एका प्रखर लढाईला सुरवात केली. त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या एका बलाढ्य शत्रूवर त्यांनी प्राणपणाने हल्ला चढवला.*

*कोण होती ही लोकं ?*

*त्यांना मराठे म्हणायचे,*

*मराठे, अनेक जातीचे मराठे होते त्यांच्यात. पाटील होते, देशमुख होते, चित्पावन होते, धनगर होते, देशस्थ, कऱ्हाडे, कुणबी,  महार, माळी, तेली, कोळी, वंजारी सगळे होते.  त्यांनाही मराठेच म्हणायचे. त्या संक्रांतीला महाराष्ट्र एकजूट होऊन मराठा म्हणून लढला. बरोबर मध्यप्रांतालाही घेतलं. बुरंडी घाटावर पडलेल्या दत्ताजी शिंद्याचा अपमान पुण्यात बसलेल्या नानासाहेब पेशव्याच्या मनाला झोम्बला. पेशव्याच्या नैतृत्वाखाली लढायला मल्हारबा होळकरांना वाईट वाटलं नाही. जरीपटक्याखाली जमलेल्या सैन्यात जाती पाळल्या जात नसतीलच असं नाही पण तरी त्या सैन्यात जातींच्या भिंती नव्हत्या.*

*आयुष्य फार साधं आणि सरळ होतं. युद्ध करणे हा पोटापाण्याचा व्यवसाय होता, त्याला अजून अस्मितेची भरजरी किनार लाभली नव्हती.*

*14 जानेवारी 1761 च्या संध्याकाळी ज्यांची कत्तल झाली, ती मराठे म्हणून झाली. जे कैदी पकडून नेले गेले, त्यांना आजही मराठा बुगती आणि मराठा मारी म्हणतात. त्यांच्या जाती विरघळून गेल्यात, इतकंच काय धर्मही विरघळून गेलाय पण मराठा ही ओळख अजूनही कायम आहे.*

*पानपतच्या युद्धाला Third battle of Panipat म्हणतात, ती एक लढाई होती जी मराठे हरले. पण मराठे युद्ध मात्र जिंकले. अब्दालीने या लढाईचा इतका धसका घेतला की तो परत कधीच भारतात आला नाही. अफगाण सैन्याच इतकं नुकसान झालं की त्यांना भारतात राज्य करणे हा फायद्याचा व्यवहार वाटलाच नाही.*

*पानिपतानंतर अवघ्या दहा पंधरा  वर्षात महादजी शिंद्यांनी नजीबखानाची कबर खोदून काढली. दिल्लीत पुन्हा मराठयांच्या शिक्याने बादशहा राज्य करू लागला. पानिपतानंतर कमीत कमी 30 35 वर्ष, मराठे मराठे म्हणूनच लढले.*

*कोणतेही युद्ध हे खरेतर फसलेले राजकारण असते. युद्ध म्हणजे आपापल्या हितासाठी झगडणाऱ्या दोन विचारांचा संघर्ष. "मराठा" हा एक  विचार होता, छत्रपतींनी दिलेला. ह्या विचारातूनच महाराष्ट्र घडला. अब्दालीलाही अफगाण राष्ट्राचे जनक मानले जाते. वंश आणि धर्म यांच्या अतिरेकी अस्मितेच्या आहारी गेलेल्या अफगाण राष्ट्राचे काय झाले ते आपल्या समोर आहे, मग त्याच दगडावर आपण पुन्हा पाय का मारून घेतोय ?*

*आज महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती आहे, राष्ट्र म्हणून आपण अफगाणंच्या प्रचंड पुढे निघून गेलोय, पण दुर्दैवाने आपण आपली मराठा ही ओळख विसरून जातोय.  जर आपण आपली ओळख, एका अजून मोठ्या संकल्पनेत विसर्जित करत असू तर ती ओळख विसरायलाही हरकत नाही, पण गंगा उलटी वाहायला लागलीय. आज आपण ब्राम्हण, मराठे, दलित आणि अजून फलाने ढिकाने होण्यात आपली अस्मिता शोधतोय.*

*या संक्रांतीला जेंव्हा आपण एकमेकांना तिळगुळ देऊ, गोड गोड बोला असं म्हणू, तेंव्हा 258 वर्षांपूर्वी त्या थंड मैदानावर खंदकात काकडून बसलेल्या, आणि दुसऱ्या दिवशी रक्ताळून तिथेच धारातीर्थी पडलेल्या तुमच्या नि माझ्या पूर्वजाची आठवण नक्की ठेवा. तो तिथे मराठा म्हणून गेला होता आणि मराठा म्हणूनच मेला होता.*

*आपल्यातील वाढत चाललेली दरी त्याच्या रक्तानेही भरली, तरी त्याला आनंदच होईल.*

 डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

          मुंबई, दि. 13 : महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

            त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रृटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रृटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.

            काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दि. 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचा विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवरी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही श्री.मुंडे यांनी केले आहे.

००००


 14 ते 28 जानेवारी 2022मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

· साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

            मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या वतिने दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी आणि वाचन, भाषा आणि जीवन यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.

        भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा - 2022 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       

दि. 14 जानेवारी

            साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक या असतील, प्रास्ताविक नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दु.1 या दरम्यान होणार आहे.

दि. 17 जानेवारी

            मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यवरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष महेश दत्तात्रय लोंढे असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.

दि. 18 जानेवारी

            आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते - अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन - प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक - भारत जाधव करणार आहेत.

दि. 19 जानेवारी

            आभासी व्याख्यान - मी काय वाचतो?या विषयावर वक्ते नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक - भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

दि. 20 जानेवारी

            आभासी व्याख्यान- प्रशासनात मराठी भाषेचे उपयोजन वक्ते - विजया डोनीकर, भाषा संचालक, आयोजक - संत गोन्साल्वो महाविद्यालय, वसई, अध्यक्ष : सोमनाथ विभुते, प्राचार्य, प्रास्ताविक- संतोष गोसावी

दि. 21 जानेवारी

            आभासी चर्चासत्र- शालेख विद्यार्थी आणि वाचन संस्कृती, आयोजक श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. सहभाग - दीपा देशमुख, पुणे, सुरेश सावंत, नांदेड, नामदेव माळी, सांगली, रमेश पानसे, अध्यक्ष -विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक -डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन - प्रा.राजश्री कुलकर्णी

दि. 24 जानेवारी

                व्याख्यान -मुखी माझ्या रमो माय मराठी, प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी, चेतना महाविद्यालय, वांद्रे आयोजक. अध्यक्ष- श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन<span lang="HI" style="font-size: 12.0pt; mso-bidi-font-size: 10.0pt; font-family:



 लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे

अधिक लस पुरवठ्याची मागणी

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

            मुंबई, दि. 13 : कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोव्हीशिल्ड 50 लाख आणि कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड स्थितीबाबत आढावा घेतला.

            बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, केंद्र सरकारने स्टँडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत राज्यांना कळवावे. होम किटद्वारे टेस्टींग केल्यानंतर बाधित असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. या नोंदी ठेवण्यासाठी ज्या मेडीकल दुकानातून या किट खरेदी केल्या आहेत त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे. तसेच या नोंदीसाठी यंत्रणा उभी करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे ठरवावी. राज्यातील निर्बंधाबाबत केंद्र सरकारने विशेष कार्यपद्धती ठरवावी, असे श्री.टोपे यांनी सांगितले.

             लसीकरण मोहिम राबविताना राज्यात पहिली मात्रा 90 टक्के, दुसरी मात्रा 62 टक्के, 15 ते 18 किशोरवयीन मुलांचे 36 टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंट लाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना द्यावयाच्या प्रतिबंधात्मक मात्रांचे लसीकरण सुरु केले असून लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी लसीकरण मोहिमेला आणखी गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

             पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत दिलेल्या सूचनेची दखल घेत राज्यातील अर्थव्यवस्थेची गती कायम राहील याची दक्षता घेवून उपाययोजना करण्यात येतील. तसेच आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज (ECRP-II) अंतर्गत मनुष्यबळासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. हा निधी 100 टक्के खर्च करण्यात येईल. या पॅकेजद्वारे राज्यांना मिळालेल्या निधीचा खर्च अधिक गतीने करण्यासाठी द्रव्य वैद्यकीय ऑक्सीजन (Liquid Medical Oxygen), ऑक्सीजन पाईपलाईनसाठी केंद्र सरकारने ठरविलेले दरात तफावत असल्याने वाढीव खर्चाला मान्यता देण्यात यावी, असेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले. 

००००



 

Thursday, 13 January 2022

 कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही

- परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची ग्वाही

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी

संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे

- ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचे आवाहन

            मुंबई, दि. 10 : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिककाळापासून संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात आल्यानंतरही केवळ विलिनीकरणासाठी संप सुरु ठेवण्यात आला आहे. राज्यभरात एसटी बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतूक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

            या संपाच्या पार्श्वभूमिवर खासदार शरद पवार व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कृती समितीने संपकरी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत एसटी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मत मांडले. तसेच एसटीचे दैवत असलेल्या जनतेचे अतोनात हाल टाळण्यासाठी तातडीने एसटी सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

            गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या संस्थेला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आपल्या महामंडळाच्या भविष्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री व खासदार शरद पवार यांनी केले.

            खासदार श्री.शरद पवार म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रवासी जनतेचे अपरिमित हाल होत आहेत. गेली 70 वर्षांपेक्षा अधिककाळ सर्वसामान्यांची एसटी कष्टकरी एसटी कामगारांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर व प्रवाशांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. एसटी ही प्रवाशांच्या हितासाठी आहे. प्रवाशांच्या हिताची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्याला एसटी देखील अपवाद नाही. तरीदेखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना 41 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आलेली आहे. हा निर्णय अंत्यत धाडसी असून त्याबद्दल त्यांनी एसटी प्रशासन आणि शासनाचे कौतुक केले. तथापि, कृती समितीने सुधारीत वेतनवाढीतील तफावतीबाबत नोंदविलेल्या आक्षेपावर एसटी प्रशासन आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

            परिवहन मंत्री ॲड.परब म्हणाले, निलंबन, बडतर्फ आणि सेवासमाप्ती झालेले कर्मचारी सोडून सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे कर्मचारी कामावर रूजू झाल्यास नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. तसेच या बाबतचे परिपत्रकही काढण्याचे निर्देशही त्यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले. तसेच याबरोबरच बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतुक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असे प्रति़पादन करीत संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड.परब यांनी केले.


००००




 



Featured post

Lakshvedhi